सिंड्रेलाची गोष्ट - भाग १२

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या मुलीची आहे.

क्रमशः

आजची सकाळ मैथिली साठी खूप वेगळी होती. स्वतःच्या घरात तिला परक्या सारखं वाटतं होतं. ती सर्व काही गमावून बसली आहे असं तिला वाटतं होतं. नाश्ताच्या टेबलवर बाबा नेहमी सारखे नव्हते. ते आज तिच्याशी काहीच बोलले नाहीत. चैताली त्यांना काही प्रश्न विचारत होती ते केवळ त्यांचीची उत्तरं देत होते. नेहमी प्रमाणे मैथिलीला त्यांनी जाण्या आधी बाय सुद्धा केले नाही. त्यांची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मैथिली बघत होती. त्यांच्या वागण्यात काही बदल झाला आहे का हे नमूद करत होती. तिने या आधी कधीही बाबांच्या वागण्याचं एवढ्या बारकाईने निरीक्षण केलं नव्हतं. त्यांच्या वागण्याचा ती तिच्या आकलन शक्ती प्रमाणे अर्थ लावत होती. ती हताश झाली होती. चैतालीला सर्व काही सांगायची तिच्या हिम्मत नव्हती. मुळात चैताली एवढी लहान होती की तिला काय सांगाव, सांगितलेलं तिला कीतपत कळेल हा प्रश्नच होता. आणि चैताली व्यतिरिक्त तिच्याकडे या विषयावर बोलायला कोणी दुसरी व्यक्ती नव्हतीच. त्यामुळे मैथिली सारं काही मनात साठवून होती.

**********

दिवस जात होते. मैथिलीची घुसमट होत होती. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. अभ्यास करणं तीच्याने होत नव्हतं. नृत्य करणं तिने सोडलं होत. पुस्तकं वाचणं बंद केलं होत. चैताली सोबत ती खेळायला बसायची खरी पण फक्त शरीराने. चैताली तिला नेहमी प्रमाणे सर्व सांगायची , पण ते फक्त मैथिलीच्या कानांपर्यंत पोहोचायच.. एकटं राहणं तिला आवडू लागलं होत. सर्व गोष्टींचा परिणाम तिच्या आरोग्यावर, अभ्यासावर होऊ लागला होता. शाळेतून तक्रारी येऊ लागल्या होत्या. सुमित्रा सुद्धा संधी साधून विलास रावांना तिच्या बद्दल काहीना काही सांगत असेच. सहा महिन्यांनी होणाऱ्या पालक सभेत मैथिलीच्या वर्ग शिक्षिकेने तर विलास रावांना सांगून टाकलं , " मैथिली सारख्या हुशार मुली कडून एवढ्या कमी गुणांची अपेक्षा नव्हती." विलास रावांना सुद्धा काय करावं सुचत नव्हतं. ही हे सर्व मुद्दाम करते आहे की काही प्रॉब्लेम खरंच आहे हे त्यांना कळत नव्हतं. तिच्याशी बोलावं की नाही तेच कळतं नव्हतं. बऱ्याच विचारांती त्यांनी विकेंडला तिच्याशी बोलायचे ठरविले. 
 
**********

पालक सभेच्या दुसऱ्या दिवशी मैथिलीच्या शाळेतून विलास रावांना ऑफिस मध्ये सुमित्राचा फोन गेला. ताबडतोब शाळेत बोलावल्याचा निरोप तिने दिला. सुमित्रा आणि विलास राव शाळेत पोहोचले.' मैथिलीने वर्गातल्या एका मुलीच्या डोक्यात डस्टर फेकून मारले होते. एवढंच नाही तर ती मुलगी खाली कोसळल्या नंतर तिला एक जोरदार बुक्का सुद्धा मारला होता. त्या मुलीला खूप रक्त स्त्राव झाला होता. ती बेशुद्ध पडली होती. तिला हॉस्पिटल मध्ये न्यावे लागले.', हे सर्व मैथिलीच्या वर्ग शिक्षिकेने विलास राव आणि सुमित्राला सांगितले. मैथिलीने असे का केले याचं कारण ती काही कोणाला सांगायला तयार नव्हती. 

" मैथिली वर्गातली सर्वात हुशार मुलगी आहे. कधीच कोणाच्या अध्यात मध्यात नसते ती. पण हल्ली ती फार विचित्र वागते. बरेचदा तिचं भांडण होतं वर्गातल्या इतर मुलांशी. अभ्यास करत नाही. काही विचारलं तर बोलत नाही. वयात येते आहे.. कधी कधी मुलं वागतात अशी असं म्हणून आम्ही फक्त ओरडुन सोडून देत होतो. माझीच नाही तर इतर शिक्षकांची सुद्धा तक्रार आहे तिच्या बद्दल. काल पालक सभेत सुद्धा फक्त तिच्या अभ्यासाबद्दल बोलले मी. म्हटलं जाऊ देत थोडे दिवस.. बघू कशी वागते.. नाहीच ऐकलं तर सांगेन तुम्हाला.. पण आजच हे असं घडलं.. आता हे सर्व अती झालं आहे.. त्या मुलीच्या जीवावर बेतल असतं हे सर्व.. आणि हे असं वागून सुद्धा तिला अजिबात त्या बद्दल वाईट वाटत नाही आहे. तिने असं का केलं ते सुद्धा ती सांगायला तयार नाही आहे.. ही हद्द झाली आहे आता. प्लिज तुम्ही तिला समजवा अथवा आम्ही कठोर पावलं उचलू.. तुम्हाला प्रिन्सिपल मॅडमनी सुद्धा बोलावलं आहे , त्यांना पण भेटून घ्या.. आणि आता मैथिलीला घरी घेऊन जा. " मैथिलीच्या वर्ग शिक्षिका विलास रावांना म्हणाल्या.

प्रिन्सिपल मॅडम सुद्धा मैथिलीच्या वागणुकी मुळे विलास रावांना बरंच काही बोलल्या.. तिने असे का केले हे तिला तिथेही विचारण्यात आले. पण तिथेही तिने उत्तर दिले नाही. विलास रावांनी माफी मागितली. विलास रावांना खूप खजील झाल्यासारखे वाटतं होते. त्यांना एवढं कधीच कोणी अपमानित केलं नव्हतं. अपमानच सुद्धा ठीक होत , पण आपल्या मैथिली मुळे कोणाला तरी गंभीर जखम झाली आहे ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. ते मैथिली आणि सुमित्रा सोबत तिथून निघाले. निघताना त्या मुलीच्या पालकांचा फोन नंबर घेतला. सुमित्राला त्यांनी मैथिलीला घरी नेण्यास सांगितले. आणि ते त्या मुलीला भेटायला गेले. तिची विचारपूस तर केलीच, सोबतच उपचारांचा खर्च पण दिला. हात जोडून तिच्या आई वडिलांची माफी मागितली. आणि ते तिथून निघाले. असंख्य विचार त्यांच्या मनात येत होते. आज घडलेल्या प्रकारामुळे त्यांना मैथिलीचा प्रचंड राग आला होता. हे असं पहिल्यांदाच झालं होतं. ते रागातच घरी आले. घरात येताच त्यांनी मैथिलीला मोठ्याने हाक मारली. त्यांच्या हाके सरशी सुमित्रा,चैताली आणि मैथिली धावत बाहेर आल्या.  

" का मारलं तू त्या मुलीला…? " विलास रावांनी मैथिलीला विचारेल.

मैथिली तशीच उभी होती.

" पुन्हा विचारतोय का मारलं..? काय झालं आहे तुला..?का अशी वागते आहेस..? किती लागलं आहे तिला तुला माहीत आहे का..? आज एका दिवसातच किती अपमानित केलं आहेस तू मला.. किती जणांची माफी मागितली आहे मी तुला माहित आहे..!! का केलं तू असं..? " विलास राव रागात म्हणाले. 

मैथिली आता सुद्धा तशी उभी होती..

विलास रावांना आता सहन झाल नाही . ते त्यांच्या खोलीत गेले आणि काही तरी शोधू लागले. काही क्षणात ते खोलीच्या बाहेर आले , तेव्हा त्यांच्या हातात एक काठी होती.

" पुन्हा संधी देतोय.. सांग का मारलं ?" विलास राव म्हणाले.

मैथिली आता सुद्धा तशीच उभी होती. 

त्यांचा राग अनावर झाला.. त्यांनी न राहून तिला त्या काठीने मारायला सुरुवात केली. मैथिली आता सुद्धा तशीच होती. मार खात होती . डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण ती गप्प होती. मैथिलीला मारताना पाहून चैताली मध्ये आली .. " बाबा नको.. नको.. दिदा ला मारू नका ", म्हणून गयावया करू लागली. पण विलास राव ऐकायला तयार नव्हते. त्यांनी चैतालीला बाजूला केले. आणि ते पुन्हा काठी ने तिला मारू लागले. शेवटी सुमित्रामध्ये आली आणि तिने विलास रावांच्या हातातून काठी खेचून घेतली .  

" बस झालं.. किती माराल तिला…जीव घेणार आहत का तिचा.." सुमित्रा म्हणाली.

" सुमित्रा तू मध्ये नको येऊ. तुझ्याशी विचित्र वागते. चैतालीला सुद्धा विचित्र वागायला लावते. आज शाळेत जे केलं तो तर कहर झाला आता.. का वागते आहे अशी ही हे विचारून पण काही बोलत नाही. आज तिने जे केलं त्यासाठी तिला वाईट सुद्धा वाटतं नाही आहे. विकृत होत चालली आहे ही.. " विलास राव बोलत होते.

" बस झालं.. थांबा आता.. मैथिली तू तुझ्या खोलीत जा.." सुमित्रा म्हणाली.

" नको.. मारू देत त्यांना मला.. त्यांना बरं वाटेल.. यासाठीच तर आई मला त्यांच्या कडे सोडून गेली ना.. करू देत त्यांना जे करायचं आहे ते माझ्यासोबत.. " मैथिली म्हणाली.

" मैथिली काय बोलते आहेस तू हे..? असं काय वाईट वागलो आहे मी..? काय झालं आहे तुला..? " विलास रावांनी तिला विचारले.

" आज विचारावस वाटलं तुम्हाला..? इतके दिवस कुठे होता तुम्ही..? " मैथिलीने त्यांना विचारले.

" प्लिज थांबा आता.. शांत व्हा.. बोलू आपण नंतर.. पण आधी तुम्ही शांत व्हा.." सुमित्रा म्हणाली.

" तू म्हणशील तसं… असं ही बाबा थोडीच तुझं बोलण टाळणार आहेत.. मी जाते आत.. तुम्हाला पुन्हा मारावस वाटलं…तुमचा राग व्यक्त करावासा वाटला तर आवाज द्या.. येईन मी परत मार खायला.." मैथिली म्हणाली.. आणि तिथून निघाली. तिच्या पाठोपाठ चैताली सुद्धा गेली.. विलास राव स्तब्ध झाले होते..' ही काय बोलली.. का बोलली.. काय झालं आहे असं.. मी चुकलो आहे का कुठे.. माझ्याकडून असं काही घडलं आहे ज्या मुळे ही दुखावली गेली आहे आणि मलाच माहीत नाही आहे.. काय झालं आहे नक्की..? ' असंख्य प्रश्न त्यांच्या डोक्यात सुरू होते..

**********

" दिदा खूप लागलं आहे ना तुला..? तू का नाही सांगितले बाबांना तू का असं वागली ते..? आणि तू असं का केलं.. काय झालं.." चैतालीने रडत मैथिलीला विचारले..

मैथिली सुद्धा आता हुंदके देऊन रडू लागली.. 

" नको सांगू.. चालेल.. प्लिज रडू नको.. रडू नको..तुला दुखतयं का..? सांग ना.. मी काय करू..?" चैताली म्हणाली.

मैथिलीने तिला घट्ट मिठी मारली.. " मी चुकीचं वागले मला माहित आहे.. मी या गोष्टी साठी स्वतः ला कधीच माफ नाही करू शकणार.. मी तिला मारायला नको हवं होतं.. पण मला काहीच सुचलं नाही.. ती मला खूप त्रास देते.. शाळेत चिडवत असते.. तिच्या बिल्डिंग खाली एक गार्डन आहे तिथे तिने सुमित्रा आईला खूप वेळा एका दुसऱ्या माणसासोबत पाहिलं आहे.. तिने हे सर्व तिच्या ग्रृप मधल्या मुलींना सुद्धा सांगितलं आहे.. सर्व मला चिडवतात.. बाबांनी दुसरं लग्न केलं त्यावरून तर मला बोलतातच .. तुझे आता दोन दोन बाबा आहेत का असं सुद्धा विचारून चिडवतात.. खूप दिवस हे सर्व सुरू आहे.. इथे आपले बाबा सुद्धा आपल्याशी नीट वागत नाहीत.. ते पहिल्या सारखे राहिले नाहीत.. आजी गेल्या नंतर ते खूप बदलले आहेत. मला खूप त्रास होतोय.. मला खूप त्रास होतोय.. " मैथिली हुंदके देत बोलत होती.

" दिदा.. तू नको ना रडू प्लिज.. सुमित्रा आई कोणाला भेटते हे मला सुद्धा नाही माहित.. पण तू हे सर्व बाबांना का नाही सांगितलं..? त्या मुली तुला त्रास देतात तू हे शाळेत टीचरला का नाही सांगितलं..? " चैताली म्हणाली.

" टीचरला बोलले असते तर सर्वांना कळलं असतं.. आणि बाबांशी मला काहीच बोलायचं नाही आहे.. मला खूप राग येतो त्यांचा.. मला नाही बोलायचं त्यांच्याशी.. ? मैथिली म्हणाली.

" बाबांचा तर मला पण राग येतो.. आणि आता बाहेर ते सर्व किती चुकीचं बोलले..तू काय चुकीचं वागली आईशी.. मी काय केलं.. आपण तर कधीच तिला त्रास देत नाही.. मग ते असं का बोलले.. बाबांना आता आपण नको आहोत का..? आई त्यांना वारस देणार आहे म्हणून त्यांना आपण नको आहोत का..? " चैताली म्हणाली.

वारस.. या एका गोष्टीवरून मैथिली चपापली.. तिने डोळे पुसले.. " काय म्हणालीस..? वारस..? काय हे ? कोण बोललं तुला..? " मैथिलीने विचारले.

" वारस म्हणजे मुलगाच ना दिदा..?" चैतालीने विचारले.

" हो.. म्हणजे मला माहित आहे त्या नुसार तरी असंच आहे.. पण तुला हे सर्व कोण बोललं ते सांग मला.." मैथिली म्हणाली.

" मी खेळायला जाते ना खाली तिथे त्या रिया, सखी, कृतिकाच्या आई बसून गप्पा मारत होत्या.. त्यांचं बोलणं मी ऐकलं.. आपल्या घरी बाळ येणार आहे.. बाबांना मुलगा हवा आहे म्हणून त्यांनी हा चांस घेतला या वयात .. असं काही तरी त्या बोलत होत्या.." चैताली म्हणाली..

" तू मला हे आधी का नाही सांगितलं.. " मैथिली म्हणाली.

" तुझं गेले किती तरी दिवस लक्ष कुठे आहे माझ्या कडे.." चैताली म्हणाली.

पुढे काय बोलावं हे त्या दोघींनाही सुचत नव्हतं..

**********

" मैथिलीला फार लागलं असेल का.. काय झालं असेल नेमकं .. मैथिली असं वागुच शकत नाही.. काहीतरी मोठं कारण असणार.. काय करते आहे मी हे.. आज ह्याचं हे रूप मी पहिल्यांदा पाहिलं.. माझ्यामुळे बाप लेकी मध्ये दुरावा आला आहे.. मीच खरं कारण आहे.. पण काय करू मी.. मला माझा हक्क हवा आहे .. या दोघी असताना मला तो नाही मिळणार.. मला या दोघी नको आहेत.. पण या दोघी सोबत काही वाईट घडाव असंही नाही वाटतं.. काय करू.. मी नक्की काय करत आहे.. जाऊ का.. बघून येऊ मैथिली ला.. नको नको.. राहू देत तिला तिथेच…मला सलगी नकोच आहे या मुलींशी.. देवा काही तरी मार्ग काढ म्हणजे या मुली यांच्या पासून लांब होतील आणि हे सुद्धा मुलींपासून लांब होतील.. मनाने पण आणि शरीराने पण.. पण त्या दोघींनाही अशा प्रकारे काही त्रास नको व्हायला.. त्यांना त्यांच्या वाटेच सुख मिळू देत…पण इथे.. या घरात.. विलास रावांवर फक्त आणि फक्त माझाच हक्क असायला हवा.. " सुमित्राच्या मनात हे असे सर्व विचार सुरू होते.. तिलाच तिचं काही कळतं नव्हतं.

**********

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.






🎭 Series Post

View all