Login

सिंड्रेलाची गोष्ट - भाग १०

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.
क्रमशः

घड्याळात पावणे अकरा वाजले होते आणि दारावरची बेल वाजली. बाबाच आले असतील..असे मनातल्या मनात म्हणतं मैथिली बेड वरून उठली.

" नको नको.. थांबते जरा.. त्यांना फ्रेश होऊ देत. थोड्या वेळाने जाते.." असा विचार करून ती परत बेड वर बसली.

" आता सांगू का..? खूप उशीर झाला आहे.. उद्या बोलू का..? काय करू.. ? आधीच काही गोष्टी सांगायला उशीर झाला आहे.. काय करावं..? एक काम करते , बाहेर जाऊन बघते.. बाबा थकलेले वाटले नाही तर सांगते , नाही तर उद्या बघते.. असे ही ते हल्ली उशिराच येतात.." मैथिली मनोमन विचार करत बसली होती.

अकरा वाजून गेले.. तशी ती तिच्या बेडरूम मधून बाहेर आली. हॉल मध्ये कोणीच नव्हतं . लाईट सुद्धा बंद होती. ' काय करू…' हा विचार करत असताना तिचं लक्ष आई बाबांच्या बेडरूम कडे गेलं. दरवाजा थोडा उघडा होता. त्यातून प्रकाश सुद्धा येत होता.. ' म्हणजे हे झोपलेले नाहीत. एकदा जाऊन बघायला हरकत नाही. आणि जे काही बोलायचं आहे ते सुमित्रा आई समोरच होईल.. उगीच तिच्या पासून का लपवायचे. असंही मी चुकीचं काही करत नाही आहे. तिला सुद्धा कळेल आमच्या मनात काय आहे.. आणि कदाचित तिच्या मनात काय सुरु आहे आमच्या बद्दल ते सुद्धा कळेल.. कदाचित प्रोब्लेम सोल्व होतील सर्व. आणि चैताली सुद्धा झोपली आहे.. सो हाच योग्य टाईम आहे बोलायचा ' हा सर्व विचार करत ती त्या दोघांच्या बेडरूमच्या दाराजवळ पोहोचली..आणि तिने जे पाहिलं ते तिला अजिबात अपेक्षित नव्हतं.

**********

सुमित्रा ने पांढऱ्या रंगाचा पारदर्शक गाऊन घातला होता. त्यातून तिने आत घातलेली लाल रंगाची अंतर्वस्त्र सुद्धा नीट दिसून येत होती. ती आरश्या समोर उभी राहून स्वतः ला न्याहाळत होती. तिला असे पाहून मैथिली गोंधळली.. तिला आत जायची हिंमतच झाली नाही. तिने त्या अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून आत डोकावून पाहिले , पण तिला विलास राव कुठेच दिसले नाही.. इतक्यात त्यांच्या बेडरूम मध्ये असलेल्या बाथरूम मधून आतून कडी खोलण्याचा आवाज आला.. तसं लगेच सुमित्राने जवळच असलेला पांढऱ्या रंगाचा सॅटिनचा कोट स्वतःच्या अंगावर चढवला. आणि बेड वर बसून स्वतःच्या हाताला , जिथे चैताली चावली होती तिथे मलम लावू लागली.. कडीच्या आवाजाने मैथिली सुद्धा दोन पावलं मागे झाली होती. विलास राव बाथरूम मधून केस पुसत बाहेर आले.. आणि आरशा समोर उभे राहिले..

" मुली झोपल्या का गं..? जेवल्या ना नीट..?" विलास रावांनी केस पुसता पुसता सुमित्राला विचारले.

सुमित्रा ने काहीच उत्तर दिले नाही, म्हणून मग ते तिथेच शेजारी बेड वर बसलेल्या सुमित्रा कडे वळले.. सुमित्रा कुठे तरी तंद्रि लागल्या सारखं त्यांना भासवत होती. अर्थात ती भासवत होती हे फक्त मैथिलीला कळले होते . ते सुद्धा तिने अगदी दोन मिनिटं पूर्वी तिचं वागणं पाहिलं होतं म्हणून.. 

" काय गं.. कुठे हरवली आहेस..? काय विचारतो आहे मी.." विलास राव म्हणाले..

" अं..काहीच नाही.." सुमित्रा म्हणाली.

" काय झालं..? चेहरा पडला आहे तुझा.. आणि हे काय हाताला.. ? काय झालं आहे.? बघू देत मला.." विलास राव म्हणाले.

" अहो काही नाही.. सोडा तुम्ही.." सुमित्रा हात सोडवत म्हणाली.

" थांब इथेच .. गप्प बस.. मला बघू देत.." विलास राव म्हणाले.

" अग हे काय आहे..? चावल्या सारखं वाटतं आहे.. " विलास रावांनी सुमित्राच्या हातावराची जखम पाहून विचारले..

मैथिली दुरून हे सर्व पाहत होती. बाकी सर्व ठिकाणी काळोख असल्यामुळे ती सुमित्रा आणि विलास रावांच्या नजरेला पडली नाही. रात्र असल्यामुळे सर्वत्र शांतता होती , त्यामुळे सुमित्रा आणि विलास रावांच बोलणं तिला स्पष्ट पणे ऐकू येत होतं. चैताली सुमित्राला चावली होती हे खरं होतं पण ती एवढं चावली नव्हती की सुमित्राला खूप मोठी जखम होईल. कदाचित सुमित्रानेच चैताली चावलेल्या जागी मोठी जखम तर केली नाही ना.. असा विचार मैथिलीच्या मनात आला..

इथे सुमित्रा विलास रावांना तिने बनवलेली स्टोरी सांगू लागली.

" नका विचारू मला काहीच… मला सांगता नाही येणार.." सुमित्रा डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

समोरच असलेली खुर्ची सुमित्राच्या जवळ घेत विलास राव खुर्ची वर बसले आणि म्हणाले.. " हे बघ आता हे कोड्यात बोलणं बंद कर ,आणि सांग मला नेमकं काय झालं आहे ते."

" मला चैताली चावली आज.." सुमित्रा मान खाली घालून म्हणाली.

" काय..? काय म्हणते आहेस..? चैताली चावली..!! पण का..? " विलास रावांनी विचारले.

" मैथिली आणि चैताली दोघी हॉल मध्ये बसून कोलाज पेंटिंग करत होत्या. हॉल मध्ये खूप कचरा झाला होता. म्हणून मग मी त्यांना म्हणाले तुमचे झालं की कचरा उचला. घरात पसारा चांगला नाही वाटत. माझं डोकं फार दुखत होत. नाही तर मीच उचलला असता सर्व पसारा. पण घरची इतर कामं सुद्धा बाकी होती. मी माझी सर्व कामं आवरून आले , तरीही कचरा तसाच होता. आणि.दोघी सुद्धा टीव्ही लावून बसल्या होत्या. मग मी टीव्ही बंद केला आणि मैथिलीला म्हणाले, ' आधी सर्व पसारा आवरून घ्या मग तुम्हाला हवं ते करा.. ' पण मैथिलीला मी बोललेल आवडलं नाही. ती मला म्हणाली, ' तू कोण आहेस आम्हाला हे सांगणारी. आम्हाला हवं ते आम्ही करणार..' मी तिला बोलले , ' मी आई आहे तुमची आणि तुम्हाला शिस्त लावणं माझं काम आहे. ' त्यावर मैथिली म्हणाली , 'की तू आमची आई नाही आहेस.. तू सावत्र आहेस.. तू आम्हाला काही शिकवू नकोस. तू तुझं काम कर.. ' या वर मी तिला म्हटलं की,' मी आज सर्व बाबांना सांगेन. ' त्यावर ती अचानक चिडली. मला काही कळायच्या आत हॉल मधल्या गोष्टी इथे तिथे फेकू लागली. न्यूज पेपर फाडू लागले. एवढंच काय तर जे पेंटिंग त्यांनी बनवलं ना ते सुद्धा तिने फाडून टाकलं. मी तिला अडवायला गेले. मी तिचा हात पकडला. तर तेव्हड्यात ती मोठं मोठ्याने ओरडू लागली , चैताली ला म्हणाली, ' चैताली चाव हिला..' मला काही कळायच्या आत चैताली येऊन माझ्या हाताला चावली.." सुमित्रा रडत रडत सांगत होती..

" तू हे काय सांगते आहेस.. मैथिली… माझी मैथिली असं वागली…? नाही .. नाही ..हे शक्यच नाही.. आणि ती का वागेल अशी..?" विलास रावांना विश्वासाचं बसत नव्हता..

" तुम्हाला खोटं वाटतंय ना.. मला माहित होत.. म्हणूनच या आधी मी कधीच तुम्हाला काही सांगितलं नाही.." सुमित्रा म्हणाली.

" या आधी म्हणजे..? प्लिज मला काही समजेल असं बोल.. मला विश्र्वासच बसत नाही आहे.." विलास राव म्हणाले.

" तुम्ही मला म्हटलं होतं ना तुम्ही हे लग्न मुलींसाठी करत आहात म्हणून.. मग मी सुद्धा त्यांना माझ्याच मुली मानलं.. मानते.. आणि त्यांनी कधीही मला स्वीकारलं नाही तर मी त्यांना माझ्याच मुली मानेनं.. पण त्या मला कधीही स्वीकारणार नाहीत हेही खरं आहे… कधीच नाही.. अगदी पहिल्या दिवसापासूनच मैथिली माझ्याशी तुटक वागते. मला वाटलं की थोडा वेळ लागेल.. आपल लग्न झालं तेव्हा चैताली लहान होती. तिला नीटसं कळतं देखील नव्हतं. पण आता ती सुद्धा मला म्हणते तू सावत्र आई आहेस म्हणून.. आमची खरी आई नाही आहेस.. रोज काही ना घडत असतं. पण तुमच्या पर्यंत काहीही पोहोचणार नाही या साठी मी प्रयत्न करते .. मुळात आता पर्यंत करत आले.. आजही करत होते … पण तुम्हाला ही जखम दिसली…" सुमित्रा म्हणाली.

" माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे. " विलास राव म्हणाले.

" मग का विचारलं तुम्ही मला..? म्हणूनच मला काही सांगायचं नव्हतं.. मी नव्हते बोलत ना काही.. करत होते सगळं सहन निमुटपणे. मला माहित आहे तुमच्या सारख्या माणसाची बायको व्हायची माझी लायकी नाही.. दोन वेळच्या जेवणाची सुद्धा आमची नीट सोय नव्हती.. पण तुम्ही माझ्या सारख्या गरीब … खरंतर गरीब पण नाही भिकारड्या मुलीशी लग्न करून तिला हे सुख दिल आहे.. मग मी हे सगळं निमुटपणे सहन केलं पाहिजेच ना.. मला माहित आहे हे.. मी माझी पायरी ओळखून आहे.." सुमित्रा रडत म्हणाली.

" अगं तसं नाही म्हणायचं नाही आहे मला.. मैथिली माझं सगळ्यात गुणी बाळ आहे.. कधी कसला हट्ट नाही. कधी काहीच तक्रार नाही.. आणि आता हे असं अचानक… मला हे कळतं नाही आहे काही.. तू खोट बोलते आहेस , असं मला नाही म्हणायचं.." विलास राव अगदी हताश होऊन बोलत होते.

" मी समजू शकते.. आई होत्या तो पर्यंत सर्व ठीक होतं.. म्हणजे तेव्हा सुद्धा तिने मला स्वीकारलं नव्हतच पण असं वागणं नव्हतं तिचं.. आई गेल्या आणि ती असं काही तरी विचित्र वागू लागली आहे. तुम्हाला आठवतंय आहे का, डॉक्टर काय म्हणाले होते.. तिच्या मनावर तिची आजी गेल्याचा परिणाम झाला आहे.. मला हल्ली तिचं वागणं पाहून तसंच काहीस झाल्या सारखं वाटतं आहे.. पण या सर्वात चैताली वर मात्र चुकीचे संस्कार होतं आहेत. मैथिली काहीतरी विचित्र वागते आणि मग चैतालीला ती जे वागते , सांगते ते सर्व खरं आणि योग्य वाटत आहे. ती चुकीच्या मार्गाने जाईल याची मला काळजी वाटते आहे.." सुमित्रा सांगत होती. 

तिच्या प्रत्येक वाक्या गणिक मैथिली अगतिक होत होती तर विलास राव बिथरून जात होते.. ती अजून किती खोटं बोलू शकते हे ऐकण्यासाठी मैथिली दारात तशीच आडोश्याला लपून उभी होती.

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )