Login

सिंड्रेलाची गोष्ट - भाग २५

ही कथा परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

विलासरावांना सकाळी उशिराच जाग आली. ते बेड वर उठून बसले. त्यांना आता ही त्यांचं डोकं जड झाल्यासारखं वाटतं होतं. त्यांनी आसपास नजर फिरवली. अस्ताव्यस्त बेड, विझलेल्या मेणबत्त्या, एकाबाजूला पडलेले कपडे.. ते सर्व पाहून त्यांना घाम फुटला.. ' हे आपण काय करून बसलो..' ते स्वतः शीचं पुटपुटले. ते कपडे घालून रूमच्या बाहेर आले. किचन मध्ये सुमित्रा होती.. पण ती नेहमी सारखी नव्हती.. विलासरावांचा शर्ट घालून, छोटीशी शॉर्ट, मोठ्या केसांचा मेसी बन बांधून ती किचन मध्ये नाश्ता बनवत होती.

" अरे.. उठलात तुम्ही.. गुड मॉर्निंग.. मला वाटलं एवढ्या लवकर तुम्ही उठणार नाही . " सुमित्रा लाजत म्हणाली .

" हा सर्व काय प्रकार आहे ? " विलासराव चिडून म्हणाले .

" अहो , असं काय करत आहात ....खूप दिवसांनंतर असा एकांत मिळाला आहे आपल्याला ... त्याचा पुरेपूर उपभोग नको का घ्यायला .... " असे बोलून सुमित्रा पुन्हा लाजाजली .

" हे बघ ..." विलास राव काही बोलणार तो पर्यंत सुमित्रा ने त्यांना मधेच टोकले.

" अजून काय दाखवणार आहात .... ईश्शह्ह ... काल तुम्ही कमालच केली... मला नव्हतं माहीत तुम्ही इतके .... कसं बोलू. ... मला तर लाजच वाटते .... एवढे वर्ष मी तुमचं हे रूप पाहिलंच नव्हतं ... " एवढे बोलून ती पुन्हा मान खाली घालून लाजू लागली

" सुमित्रा प्लिज ... तुला कळतंय का... असो .. तुला काहीही बोलण्यात अर्थ नाही आहे. आधी ते कपडे बदल .... वाटच बघत होतीस का , मुली बाहेर जायची ... " विलास राव म्हणाले .

" आवाज चढवून बोलायचं नाही माझ्याशी ... बोलताना नीट विचार करा. " सुमित्रा म्हणाली.

" कशी आहेस ग तू ... तुझे आई बाबा गेले म्ह्णून तुझ्यासोबत आतापर्यंत अदबीने वागत होतो . मला तू माझ्या घरात नको आहेस हे तुला पण माहीत आहे ... तू माझी परत फसवणूक केली आहेस . " विलासराव म्हणाले.

" तुम्ही लहान नाही आहेत तुम्हाला फसवायला ... " सुमित्रा म्हणाली .

" तू काल काय केलं आहेस माझ्या सोबत ... ? काहीतरी गडबड झाली आहे .. मी असं वागूच शकत नाही ..." विलासराव म्हणाले .

" मी तुमची लग्नाची बायको आहे. काल आपल्यात जे झालं ते काही गैर नव्हतं . जे काही झालं ते दोघांच्याही संमतीने झालं ... " सुमित्रा म्हणाली .

" तू काहीतरी केलं आहेस माझ्यासोबत. काल जेवल्यानंतर मला कसं तरीच वाटतं होतं . तू नक्की माझ्या जेवणात काहीतरी टाकलं होतं . आता कळतंय मला. नाहीतर माझ्या हातून हे असं काही घडण शक्यच नाही . तुला काही सुख दुःख नाही आहे .. कोणाचच . तुला फक्त तुला हव्या त्या गोष्टी मिळवायच्या आहेत. मग त्यासाठी तुला काहीही करावं लागलं तरी चालेल... तुझ्यासारखी बाई मी आजवर बघितलेली नाही. तुझ्या त्या आधीच्या प्रियकराला पण तूच फसवलं असशील... तुझा काहीच नेम नाही . तू माझ्या घरातून चालती हो. या घराला , मला , आणि माझ्या मुलींना तुझी गरज नाही आहे. तू जा आताच .. मला तुझ्या सोबत संसार नाही करायचा . तुला किती पोटगी हवी ते सांग. तुला देईन मी. पण आता या घरात तू क्षणभर ही नको आहेस मला.. " विलासराव म्हणाले.


" झालं तुमचं बोलून ..!!! एक तर तू फसवलं , तू फसवलं, हे बोलणं बंद करा आणि पुरावा द्या. मी फसवलं आहे याचा पुरावा आहे का तुमच्याकडे !!! नसेलच ... माझे आई-बाबा तुमच्यामुळे आणि तुमच्या त्या आगाऊ लेकींमुळे गेले . त्या दिवशी जे घडलं ते घडलं नसतं , तर ते इथे आलेच नसते. आणि हा सर्व प्रकार पुढे झालाच नसता . पुन्हा एकदा सांगते आहे , काल जे झालं ते आपल्या दोघांच्या संमतीने झालं . मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही. तम्ही दूध खुळे नाही आहात .. आणि आता शेवटचं सांगते मी कुठेही जाणार नाही. मला सोडायचा , घटस्फोट द्यायचा विचार सोडून द्या. नाहीतर मी तुमचं जगणं कठीण करेन . मला मुलं होतं नाही आहे म्ह्णून तुम्ही मला सोडलं असं सांगेन सगळ्यांना ... मी काय करू शकते तुम्हाला पण माहीत आहे . आता मीच तुमचं वर्तमान आणि भविष्य आहे हे स्वीकारा . आणि हो, मुलींचा विचार करा... तुमची बदनामी झाली तर त्यांचं काय होईल... समजतंय ना तुम्हाला... " असे बोलून सुमित्रा बेडरूम मध्ये निघून गेली.

विलासराव स्तब्ध झाले होते.. कोणीतरी खूप जोरात मुस्काटात मारावी आणि कान बंद व्हावे आणि डोकं बधिर व्हावं अशी त्यांची अवस्था झाली होती. रात्री जे झालं त्या साठी ते स्वतःला कोसत होते. सुमित्रा काहीही करू शकते याची त्यांना जाणीव होतीच . बदनामीची त्यांना फार भीती वाटे. खास करून मुलींचा विचार केला कि ते डगमगत . सुमित्रा तमाशा करण्यात, स्वतःला हवं ते साध्य करण्यात पटाईत होती. विलासराव हतबल झाले... आणि त्यांनी परिस्थिती स्वीकारली. स्वतःला तर त्यांनी शिक्षा दिलीच पण सोबतच त्यांनी चैताली आणि मैथिलीलाही शिक्षा दिली... अर्थातच त्या शिक्षेचे नाव होते सुमित्रा...

**********

विलासरावांनी सुमित्रा समोर हार मानली. सुमित्राच आता या जगात कोणीच नव्हतं, ती आई होऊ शकत नाही, तिच्या माहेरची परिस्थिती ठीक नव्हती आणि आता तिच्याकडे माहेर सुद्धा नव्हतं या सर्व गोष्टींचा ती बाऊ करत होती. त्यात अशा अवस्थेत सुद्धा ती विलासरावांच्या पहिल्या बायकोची मुलं सांभाळत होती. त्यांचा विखुरलेला संसार सावरत होती. अशी तिची प्रतिमा सर्वांसमोर होती. त्यामुळे काही ठराविक जणं सोडली तर शेजाऱ्यांची, नातेवाईकांची सहनभुती तिच्या बाजूने होती. विलासरावांनी तिला घटस्फोट नाही दिला पण ते तिच्यापासून दूर झाले होते. जास्तीजास्त वेळ ते बाहेर राहू लागले होते. मद्यपान करू लागले होते. सुमित्रा सुद्धा मनमानी करत होती. रोज काही ना काही कारणावरून त्या दोघांची भांडण होतं. विलारावांच्या बाहेर राहण्यामुळे सुमित्रा त्यांच्यावर संशय घेऊ लागली होती. तर सुमित्राचा गैर समज दूर करण्याचा प्रयत्न देखील विलासरावांनी केला नाही.

दिवसामागून दिवस आणि वर्षांमागुन वर्ष जात होते. जगतापच्या घरात चार माणसं राहत होती जी शरीराने जरी एका घरात राहत असली तरी मनाने एकमेकांपासून दूर गेले होती.

मैथिली खूप संवेदनशील झाली होती. प्रत्येकाची तिला दया येई. आपण आपलं काम चोख करायचं. कोणाला दुखवायचं नाही. त्रास द्यायचा नाही. दुसऱ्या कडून काही अपेक्षा करायची नाही. नीट अभ्यास करायचा आणि डॉक्टर व्हायचं.. मग आपलं आयुष्य सार्थकी लागेल. ती स्वतः च्याच जगात असायची. मित्रपरिवारा मध्ये ती रमायची पण तेवढ्या पुरतच.. पुस्तकं हेच तिचे खरे मित्र होते. तिचं ध्येय तिने ठरवलं होतं. आणि त्यासाठी कुठल्या मार्गावरून जावं लागणार आहे हे तिला माहीत होतं. पण या सर्वात ती तिची सिंड्रेलाची गोष्ट विसरली नव्हती.. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती स्वतःला सिंड्रेला समजत होती आणि कधीतरी राजकुमार येईल आणि तिला घेऊ न जाईल असे तिला वाटत होते. घरात सुरु असलेल्या गोष्टींमुळे ती डिस्टर्ब होतं असे पण तरीही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जायचे असे तिने ठरवलं होतं. तर या उलट चैतालीच झालं होतं. तिला जेव्हापासून कळू लागलं होतं तेव्हापासून तिने घरात वाद, भांडणं हेच पाहिलं होतं. सुमित्राचा जाच तिने अनुभवला होता. आता ती खूप हट्टी आणि हेकेखोर झाली होती. आपलं तेच खरं करायची. कोणाचं काही ऐकून घ्यायची नाही. मनमानी करायची. अभ्यासात ती मैथिली पेक्षा हुशार होती, त्यामुळे शाळेत , स्पर्धा परीक्षेत ती पहिलीच यायची.. आपण खूप हुशार आहोत या गोष्टीचा तिला थोडा गर्व ही होता. पुढे काय करायचं हे तिला काहीच ठाऊक नव्हते आणि तिला त्या गोष्टीची चिंताही नव्हती. आयुष्य हे एकदाच मिळतं, ते मजेत घालवायचं अस तिचं धोरणं होतं. कोणीच कोणाचं नसतं. सगळे स्वार्थी असतात , म्हणून आपण सुद्धा तसंच वागल पाहिजे हा तिचा सिद्धांत होता.

या जगात चैताली साठी तिच्या हक्काचं , श्रध्देच एकच ठिकाणं आणि व्यक्ती होती ती म्हणजे तिची दिदा.. मैथिली… मैथिलीच्या मनात चैताली साठी प्रेम होतंच. तिची काळजीही होती. चैताली वर वर कितीही रफ टफ वाटतं असली तरी ती आतून खूप सेन्सिटिव्ह आहे हे मैथिली जाणून होती. आपल्याला आईची माया अनुभवता आली पण बिचाऱ्या चैतालीच्या वाटेला ते सुख, ते प्रेम कधीच आलं नाही , चैतालीच्या आताच्या स्वभावालाही परिस्थिती कारणीभूत आहे याची जाणीव मैथिलीला होती. अगदी लहान वयातच ती चैतालीची आई झाली होती. त्या दोघी एकमेकींपासून विरुद्ध स्वभावाच्या असल्या तरी त्या एकमेकींसाठी नेहमी एका अचल पर्वतासारख्या होत्या.

या सर्व वाईट गोष्टीमध्ये एकच गोष्ट चांगली होती ती म्हणजे दोन्ही बहिणींमध्ये असलेलं प्रेम, जिव्हाळा पूर्वीपेक्षा अधिक वाढला होता…

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )