सिंड्रेलाची गोष्ट - भाग २२

ही कथा परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.

क्रमशः

विलास राव सुमित्राला घेऊन ठरल्याप्रमाणे डॉक्टर परांजपेच्या क्लिनिकला गेले. प्रवासात दोघंही एकमेकांशी काही बोलले नाही..

विलास रावांना सुमित्रा सोबत राहायची, संसार करायची अजिबात ईच्छा उरली नव्हती. त्यांना तिला सोडचिठ्ठी द्यायची होती. पण तिच्यासोबत काही वाईट व्हावं अशी त्यांची मुळीच ईच्छा नव्हती. तिला सोडचिठ्ठी देऊन तिचा उदरनिर्वाह ती नीट करू शकेल एवढी पोटगी तिला द्यायची.. असे सर्व विचार गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मनात सुरू होते. पण त्याच सोबत आता स्त्रीरोग तज्ञ म्हणजेच डॉ. परांजपे आता काय सांगणार आहेत याचाही विचार त्यांच्या मनात सुरू होता. काही मोठा प्रॉब्लेम असू नये अशीच ते मनोमन प्रार्थना करत होते.

**********

डॉक्टर परांजपेंच्या क्लिनिक जवळ गाडी थांबली. सुमित्रा जागेवरून उठली नाही.. विलास रावांनी तिच्याकडे कटाक्ष टाकला.. पण तरीही ती तशीच बसून राहिली.

" सुमित्रा आता उतरशील का..? उशीर होतो आहे आपल्याला…" विलासराव म्हणाले.

" नाही.." सुमित्रा म्हणाली.

" काय बालिशपणा सुरू आहे.. कळतंय का तुला.. कुठे आलो आहोत आपण ते..?" विलास राव वैतागून म्हणाले.

" हो मला माहीत आहे आपण कुठे आहोत ते. पण तिथे जाण्या आधी मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत." सुमित्रा म्हणाली.

" आता नको. आपण घरी जाऊन बोलू." विलासराव म्हणाले.

" नाही.. जे काही बोलायचं आहे ते आत्ताच आणि इथेच
." सुमित्रा म्हणाली.

" तू ऐकणार नाहीस तर.." विलास राव म्हणाले.

" नाही.. " सुमित्रा म्हणाली.

" मला जर तुझा हा स्वभाव आधीच माहीत असता … जर हे रूप आधीच कळलं असतं तर… जाऊ देत हे भोग होते माझ्या नशिबात..बोल.. " विलास राव म्हणाले.

" माझा स्वभाव.. खरचं.. मीच नेहमी समजून घेत आले आहे सर्व… पण मला काय मिळालं.. मला सुद्धा सुखा समाधानाचा संसार करायचा होता. मला पण आनंदात राहायचं होतं. माझ्या काही ईच्छा असू शकत नाहीत का..? " सुमित्राने विचारले.

" आहे ना.. तुला सुखी राहायचा, आनंदी राहायचा अधिकार आहे. पण प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. मी तुला लग्नाआधीच, माझं लग्न करायचं कारण सांगितलं होतं. तू ते मान्य देखील केलं होतं.. तुझ्या मनात जर वेगळे विचार होते तर तू मला आधी सांगायला हवं होतं. मी खरचं हे लग्न केलं नसतं.. तुला कोणी जबरदस्ती तर केली नव्हती ना लग्नासाठी.. तू तुझ्या मनाने होकार दिला.. हे लग्न केलं.. आणि त्यांनतर तू जे केल ते अजिबात योग्य नव्हतं.. आताही तू जे वागते आहेस ते चुकीचंच आहे. तुला काहीही वाटतं असलं तरी….. तुझ्या भुतकाळा बद्दल माझं काही म्हणणं नव्हतं. तू मला एकदा सांगून तर पाहायचं.. माझाही भुतकाळ आहेच ना.. तू सांगितलं नाही.. तुला भीती वाटली.. किंवा अजून काही, हेही मी मान्य करतो.. पण आता ही तू त्या व्यक्तीला भेटत होतीस.. होती हे म्हणणं ही चुकीचं आहे.. भेटते.. हो.. तू अजूनही भेटते त्याला.. मी मेहनतीने कमावलेले पैसे तू त्या माणसावर उधळते. तुझ्या भूतकाळात तुझी गर्भधारणा झाली होती.. तो गर्भ तू अयोग्य मार्गाने संपवला आणि आता तू गरोदर राहत नाही आहेस तर त्याच खापर तू माझ्यावर फोडत होतीस.. काय माहित तू भूतकाळात केलेल्या चुकांमुळे आता तुला गर्भ राहत नसेल…. माझ्या मुलांना त्रास दिला.. त्रास नाही.. त्रास शब्द खूप छोटा आणि शुल्लक आहे.. तू छळलस त्यांना.. मला अंधारात ठेवलं .. अजून काय ऐकायचं आहे तुला.. तुझ्या बद्दल बोलायला शब्द अपुरे आहेत … " विलासराव म्हणाले..

" मग आता.. आता काय..? तुम्ही मला सोडणार आहात का..? " सुमित्राने विचारले.

" सुमित्रा प्लिज आता इथे ड्रामा नको.. डॉक्टर कडे जाऊन येऊ.. मग बोलू घरी जाऊन.." विलास राव म्हणाले.

" नाही.. आता बोला.." सुमित्रा चिडून म्हणाली.

" हो… हो.. मला नाही राहायचं तुझ्या सोबत.. " विलास राव म्हणाले..

" खबरदार.. असा विचार पण करू नका.. मी नाही जाणार तुम्हाला कुठेच सोडून.. घराला सोडून.. माझा हक्क आहे.. माझं आहे ते सर्व.. मी तुम्हाला मला सोडू देणार नाही.. " सुमित्रा म्हणाली , आणि कार मधून उतरून क्लिनिकच्या दिशेने जाऊ लागली.

विलासराव पुन्हा गडबडले.. त्यांनी रागात कारच्या स्टेयरींगवर जोरात पंच मारला.. 'काय विचित्र बाई आहे ',असे स्वतःशीच पुटपुटत ते गाडी बाहेर उतरले आणि क्लिनिक मध्ये गेले.

**********

" आत येऊ का डॉक्टर..? " विलास राव म्हणाले.

" हो या ना.. तुमचीच वाट पाहत होते मी.." डॉक्टर परांजपे म्हणाल्या.

" डॉक्टर सर्व ठीक आहे ना..? " खुर्चीत बसता बसता विलास रावांनी विचारले.

" खरंतर नाही आहे ठीक.. म्हणूनच बोलावलं तुम्हाला.." डॉक्टर म्हणाल्या.

" काय झालं..? " सुमित्राने विचारले.

" मी जे सांगते आहे ते नीट ऐका.. सुमित्रा तुम्ही कधीच आई होऊ शकत नाही.. तुमची पाळी बंद झाली आहे.. तसे बदल दिसत आहेत तुमच्या गर्भापिशवी मध्ये.. आपण सर्व मेडिसिन सुद्धा देऊन पाहिले आहेत.. पण तरी पाळी आली नाही.. याचा अर्थ.. " डॉक्टर बोलत होत्या त्यांना सुमित्राने मध्येच थांबवले..

" नाही असं नाही होऊ शकतं.. माझं वय नाही आहे पाळी जायचं.. तुम्ही परत टेस्ट करा.. औषधं द्या मला.. मला आई व्हायचं आहे… असं नाही होऊ शकत.. " सुमित्रा बोलता बोलता रडू लागली.

" डॉक्टर .. मी काय बोलू ते कळत नाही आहे.. तुमच्या वर विश्वास आहे माझा.. पण तुम्ही शुअर आहात ना.. ? काही होऊ शकत का..? बाळ नाही झालं तरी हरकत नाही.. पण मी ऐकलं आहे की पाळी बंद झाली की स्त्रियांना खूप त्रास होतो.. म्हणजे मला नीट माहीत नाही.. तुम्ही मला सांगू शकाल का नीट.." विलास राव म्हणाले.

" मी सर्व खात्रीनिशी बोलते.. योग्य प्रकारे काळजी घेतली तरी काही होतं नाही.. मी सांगते ना.. काय करायचं आहे ते.." डॉक्टर बोलत होत्या इतक्यात सुमित्रा उठून उभी राहिली..

" तुम्हाला यांनी पैसे दिले आहेत ना हे बोलायचे.. हो मला माहित आहे.. हा सर्व प्लॅन आहे तुमचा.. मला माहित आहे मी आई होणार.. मी आई होऊ शकते.. मला बाळ हवं आहे.. मी तुमच्या प्लॅन मध्ये फसणार नाही.. तुम्ही सर्व खोटारडे आहात.. मला माहित आहे.. मला माहित आहे.. " असे म्हणत ती डॉक्टरांच्या केबिनच्या बाहेर पडली..

" आय एम सॉरी डॉक्टर.. " विलास राव म्हणाले आणि जागेवरून उठले.

" नो प्रोब्लेम.. तुम्ही जा.. त्यांना समजवा.. " डॉक्टर म्हणाले.

" हो.. येतो मी नंतर.. " असे म्हणत विलास राव सुमित्राच्या पाठी गेले.

*********

" सुमित्रा .. सुमित्रा थांब.. असं वेड्या सारखं वागू नको.." विलास राव तिला थांबवत म्हणाले.

" मी तुम्हाला मला सोडू देणार नाही.. कुठल्याही कारणामुळे सोडू देणार नाही.. मी नाही जाणार.." सुमित्रा बडबडत होती.

" हे बघ.. इथे तमाशा नको.. सर्व बघत आहेत आपल्या कडे.. घरी जाऊ.. मी हात जोडतो.." विलास राव हात जोडून म्हणाले.

सुमित्राला त्यांनी कार मध्ये बसवलं आणि स्वतःही बसले आणि घराच्या दिशेने निघाले.

**********

सुमित्रा आणि विलास राव घरी पोहोचले.. ते घरात शिरताच दोन्ही मुली रडत रडत त्यांच्या जवळ गेल्या..

" मैथिली, चैताली.. काय झालं..? का रडत आहात..?" विलास रावांनी विचारले.

सुमित्रा मुलींशी बोलायला थांबली सुद्धा नाही.. ती बेडरूमच्या दिशेने जाऊ लागली.

" सुमित्रा आई थांब.. " मैथिली पाठमोऱ्या सुमित्राला म्हणाली.

सुमित्रा ने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ती पुढे जाऊ लागली.

" फोन आला होता.. आजी आजोबांच ॲक्सिडंट झाला आहे.." मैथिली म्हणाली.

हे ऐकून सुमित्रा जागच्या जागी थांबली.

" काय..? कोणाचा फोन ..? काय झालं..नीट सांग..?" विलास राव हडबडून म्हणाले.

" कोणीतरी शरद नावाची व्यक्ती होती.. आजी आजोबा ज्या रिक्षा मधून जात होते त्या रिक्षेला ट्रक ने धडक दिली. रस्त्यावरच्या लोकांनी त्या दोघांना सिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. त्यांच्या बॅग मध्ये फोन नंबरची डायरी सापडली. त्यात पहिलाच नंबर आपल्या घराचा होता.. मग त्यांनी इथे कॉल केला.." मैथिलीला माहित असलेली सर्व माहिती तिने सांगितली.

हे ऐकून सुमित्रा जागेवरच कोसळली.

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.




🎭 Series Post

View all