सिंड्रेलाची गोष्ट - भाग १४

ही गोष्ट परिकथेत रमणाऱ्या एका मुलीची आहे.
क्रमशः

ठरल्या प्रमाणे मैथिली शाळा सुटल्यावर पाटील बाईंच्या घरी गेली. मैथिलीच्या घरापासून जवळच त्यांचं घर. अधून मधून येणं जाणं असायचं तिचं तिथं . त्यामुळे तिच्यासाठी त्यांचं घर काही नवीन नव्हतं. पण आज तिला तिथे खूप छान आणि मोकळं वाटतं होतं. मनावरचं दडपण आपोआप कमी झालं होतं. शाळेत त्या पाटील बाई असल्या तर घरात त्या मैथिलीची निशा मावशी होत्या. 

निशा आणि रजनीश पाटील.. एक छान जोडपं. दिसायला ही दोघं उत्तम तसेच स्वभावाने प्रेमळ.. दोघेही शिक्षक. निशा शाळेत शिक्षिका होती तर रजनीश कॉलेज मध्ये प्राध्यापक. निशा आणि मैथिलीची आई बालपणीच्या मैत्रिणी. नशिबाने लग्ना नंतर सुद्धा काहीश्या अंतराने शेजारी राहायला आल्या होत्या. मैथिलीच्या आई साठी हक्काचं माहेर तर उरलं नव्हतं. पण निशा आणि रजनीशच्या रूपाने हक्काची अशी माणसं मिळाली होती ज्यांनी तिच्या माहेरची कमी भरून काढली होती. त्या दोघांचंही सर्व उत्तम होत. फक्त एक कमी होती ती मुलाची. त्यांनी खूप प्रयत्न केला मुलासाठी पण त्यांच्या प्रयत्नांना कधी यश आलं नाही. शेवटी त्यांनी जे नशिबात आहे ते स्वीकारलं. मुलं दत्तक घ्याचा विचार अनेकदा त्यांच्या मनात आला, पण घरातल्या वडीलधाऱ्या माणसांनी त्याला विरोध केला. विरोध असताना आपण एखादे मुल घरी आणले आणि त्याला घरच्यांनी कधीच स्वीकारले नाही तर त्या मुलाला आधी पेक्षा जास्त त्रास होईल असा विचार करून निशा आणि रजनीश यांनी कधीच मुलं दत्तक घेतले नाही. पण एका संस्थेच्या दहा मुलांचे ते पालक झाले होते. मुलांच्या शिक्षणाचा, कपड्याचा , खाण्या पिण्याच्या, खर्च ते उचलत होते. एकंदर त्या मुलाचं भविष्य घडवण्याचा त्यांचा संकल्प होता. मैथिलीची आजी गेली तेव्हा निशा आणि रजनीश इथे नव्हते. कदाचित निशा इथे असती तर मैथिलीला आधार झाला असता. सुमित्राच्या वागण्यावरून सुमित्राला निशा आणि रजनीश घरी आलेले आवडत नाहीत ,हे त्या दोघांना जाणवले होते , त्यामुळे त्यांनी हळू हळू करून त्यांच्या घरी जाणं बंद केलं होते. शाळेत मैथिली निशाला भेटे, तेवढीच काय ती भेट. त्या व्यतिरिक्त मैथिली , चैताली यांचं काय सुरू आहे याची तिला कल्पनाच नव्हती.

" मैथिली एक काम कर तू हात पाय धुऊन ये.. मी मस्त काहीतरी खायला आणते.." निशा मावशी म्हणाली.

" हो चालेल.." असं म्हणत मैथिली फ्रेश व्हायला गेली.

' देवा तू नहामी असं का करतोस..? आमची आई किती छान होती. आम्हाला हवी होती ती.. तू तिला आमच्या पासून दूर घेऊन गेलास.. आणि नंतर आजीला सुद्धा.. आता निशा मावशी आणि रजनीश काका इतके छान आहेत. पण त्यांना तू बाळ दिलं नाहीस.. आणि सुमित्रा आई , जिच्यात ममता नाही, तिला तू आई होण्याचा हक्क दिला आहेस.. असा क्रूर कसा वागतोस तू.. तू नेहमी चांगल्या माणसांसोबत वाईट का वागतोस.. का असं होत नेहमी.. ' असे सर्व विचार मैथिलीच्या मनात सुरू होते.

मैथिली फ्रेश होऊन निशा मावशीची वाट बघत बसली होती. निशा मावशी तिच्या साठी गरम गरम कांदा भजी तळत होती. मैथिली मावशीच घर न्याहाळत होती.. किती शांत, सकारात्मकता भरली होती त्या वास्तू मध्ये. मैथिलीला खूप छान वाटत होत. थोड्या वेळात मावशी आली.

" किती दिवसांनी आज मी कांदा भजी खाते आहे.. वॉव..… थँक्यू मावशी.." मैथिली म्हणाली.

" तुला आवडली हे पाहून मला खूप बरं वाटलं.. मैथिली इथे तुला बोलावण्याचा एक खास कारण आहे.. तुलाही ते माहित आहे ना.." निशा मावशी म्हणाली.

" हो.. मावशी.. मला माहित आहे. शाळेत आल्या आल्या तुला कळलं असणारच मी काय केलं ते… आता तू सुद्धा मला ओरडणार आहेस ना.. तू सुध्दा मला समज देणार असशील ना..?" मैथिली म्हणाली.

" ओरडणार तर मुळीच नाही.. आणि काय समज देऊ मी तुला.. तू समजूतदार आहेस हे मला माहीत आहे.. आणि मलाच काय तर तुला ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते माहित आहे. पण मला तुझी बाजू ऐकून घ्यायची आहे.. तू हे असं करण्यामागे काहीतरी कारण नक्की आहे हे मला माहीत आहे. मला ते कारण जाणून घ्यायचं आहे. आणि तू ते मला सांगावस अस मला मनापासून वाटतं आहे.. " मावशी म्हणाली.

" काहीच नाही आहे सांगायला माझ्याकडे.." मैथिली मान खाली घालून म्हणाली.

" मैथिली.. मला माहित आहे बरंच काही आहे.. या इतक्या दिवसात बरंच काही घडून गेलं आहे.. तू ते सर्व मनात साठवून साठवून एकदम अचानक शाळेत त्याचा स्फोट झाला .. असं पुन्हा होऊ नये असं मला वाटतं म्हणून मला तुझ्या मनात जे काही सुरू आहे ते ऐकायचं आहे.. त्यावर कदाचित मी काही मार्ग काढू शकते. तू मला तुझ्या मनात काय सुरु आहे हे सांगणं तुझ्या साठीच खूप गरजेचं आहे.. हे सर्व जर तू मनातल्या मनात असंच ठेवलं तर तुझी घुसमट होत राहील आणि शाळेत जसा प्रकार झाला तसे प्रकार वारंवार होतील.. आणि मला माहित आहे तुला सुद्धा पुन्हा हे सर्व असं व्हायला नको आहे. विश्वास ठेव माझ्यावर.. " मावशी म्हणाली.

मैथिलीला सुद्धा मावशीच म्हणणं पटलं तसेच तिला सुद्धा कोणाशी तरी हे सर्व शेअर करायची गरज होतीच.. तिने सांगायला सुरुवात केली.. आजी सोबत तिचं काय काय बोलणं झालं होत, आजी गेल्या नंतर काय झालं, तिने त्या मुलीला का मारलं सर्व काही तिने मावशीला सांगितलं. विलास राव आणि सुमित्राला तिने जसं पाहिलं होत त्यामुळे तिच्या मनात राग आणि गिल्ट अशा दोन्ही भावना होत्या. सुमित्रा नक्की कशी आहे ते तिला कळत नव्हतं. काही गोष्टी ती खूप छान प्रकारे हाताळत असे तर तिच्या काही गोष्टींमधून ती सावत्र आई आहे हे दाखवून देत असे. त्यात ती आई होणार होती ,त्यामुळे त्या नंतर ती कशी वागेल हा प्रश्नच होतं. त्या मुलीने सांगितल्या प्रमाणे सुमित्रा कुठल्या माणसाला भेटायला जाते हे सुद्धा एक कोडंच होत तिच्यासाठी. आणि या सर्व गोंधळात आपण नक्की कसं लागलं पाहिजे हा गोंधळ तिच्या मनात सुरू होता.. मावशीने हे सारं ऐकून घेतलं.. समजून घेतलं.

" अच्छा असं आहे तर हे सर्व.. तुझ्या आई बद्दल बोलायचं झाल तर तू तिच्या कडून काहीच अपेक्षा ठेऊ नको. ती तुझी आई नाही आहे हे तुला माहीत आहे ना.. ती तुझ्या आईची जागा घेऊच शकत नाही कधीच.. सख्खी आई, सावत्र आई वैगरे गोष्टी मनातून काढून टाक. ती तुमच्या घरी आली आहे राहायला कायमची, असा विचार कर. आणि ती तुमच्या साठी सुद्धा काही ना काही करते आहे.. सो ती जेव्हा काही चांगल वागेल ना तुला छान वाटेल पण वाईट वागली तर जास्त त्रास नाही होणार. एक लक्षात ठेव सर्वच गोष्टी किंवा माणसं चांगली किंव्हा वाईट नसतात.. त्या मधली ही असतात.. प्रसंगानुरूप, त्याच्या मूड प्रमाणे, त्यांच्या हेतू प्रमाणे वागणारी असतात.. तुझ्या सोबत किंवा चैताली सोबत ती वाईट वागली तर तिला तिथे रोख, बाबांना सांग , पुरव्या निशी सांग, सहन करू नको. बाबांना सुद्धा कळेलच.. ती चांगली वागली की तिला त्याची पोचपावती सुद्धा दे , तिची स्तुती करायला कमी पडू नकोस. स्वतः वर आणि चैताली वर अन्याय होऊ देऊ नको. तसचं सुमित्राला सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तिचं बाळ येऊ दे ना.. तू मोठी आहेस.. चैतालीला समजावं.. तिच्या मनातला गोंधळ शांत कर. तिला आधार दे. विश्वास दे की तू तिच्या सोबत आहेस नेहमी.. काही अडलं तर लगेच बाबांना सांग. कठीण आहे हे सर्व पण अशक्य नाही…" मावशी म्हणाली.

" थोड फार कळतंय मला.. पण तिची स्तुती करू म्हणजे काय…?" मैथिलीने विचारले.

" ती तुमच्यासाठी जेवणं बनवते ना.. कसं बनवते? " मावशी ने विचारले.

" छान बनवते. खूपदा तर माझ्या आणि चैतालीच्या आवडीचच बनवते.." मैथिली म्हणाली.

" मग तुम्ही कधी तिला सांगितलं आहे का , की ती छान जेवणं बनवते..? " मावशीने विचारले..

" नाही.." मैथिली म्हणाली.

" मग सांग.. तिला बरं वाटेल.. तुम्ही तिला स्वीकारलं आहे असं वाटेल.. कदाचित त्या नंतर तिचं वागणं बदलेल.. छोट्या छोट्या गोष्टीच आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात.. कळतंय का?" मावशी म्हणाली.

" हो.. हो.. कळतंय.. पण मावशी त्या माणसाचं काय..? कोण असेल तो..?" मैथिलीने विचारले.

" हम्म्म .. माहित नाही गं.. इथे बसून आपण कुठलेच तर्क नाही लावू शकतं. आपण त्यावर काहीही बोलणं चुकीचं ठरेल.. तो विषय आपण बाजूलाच ठेवू, अस मला वाटतं.." मावशी म्हणाली. 

" हममम.. मला पटतय.. बरं झालं मावशी मी तुझ्याशी बोलले. खूप मोकळं वाटतंय मला.. रिलॅक्स झाले आहे मी. " मैथिली म्हणाली..

" दॅट्स ग्रेट.. त्यासाठीच तर मला बोलायचं होत तुझ्याशी. आणि मी आहे तुझ्यासाठी .. नेहमी.. " मावशी म्हणाली.. मैथिली ने तिला मिठी मारली.

" माय चाईल्ड.. मी नेहमी आहे तुझ्या सोबत." मैथिलीच्या केसातून हात फिरवत मावशी म्हणाली.

**********
इथे सुमित्रा आणि विलास राव वर , घरात आले.. आल्या आल्या सुमित्राला म्हणाले. " सुमित्रा काही कन्फर्म व्हायच्या आधी तू असं कसं सर्वांना सांगून मोकळी झालीस..?" 

" मला खात्री होती.. म्हणून मी सांगितलं सर्वांना.." सुमित्रा म्हणाली

" ठीक आहे.. मग आता सर्वांना सांग तसं काहीच नाही आहे.." विलास राव म्हणाले.

" नाही.. मी असं नाही सांगू शकत. एक काम करू माझा गर्भपात झाला किंवा आपण काही कारणांमुळे आपण केला असं सांगू… तेच बर होईल.." सुमित्रा एकदम तंद्रीत म्हणाली.

" काय बोलते आहेस तू हे..? अगं वेड लागलं आहे का तुला..? विनाकारण खोटं बोलायचं…? मला हे नाही चालणार..मी हे असं काही ही बोलणार नाही आहे." विलास राव म्हणाले.

" तुम्हाला कोण विचारत आहे…मी जे सांगते आहे तेच होणार.. " सुमित्रा त्वेषाने म्हणाली. तिचं हे असं बोलणं ऐकून विलास राव काही क्षण गोंधळले. ही सुमित्राच आहे ना की दुसरी कोणी तरी आहे हा प्रश्न त्यांच्या मनात आला. 

" सुमित्रा.. तू हे असं बोलते आहेस.." विलास राव म्हणाले.

" हो.. मी जे बोलते आहे तेच होणार. मला दिवस गेलेच नाही आहेत हे कळलं लोकांना तर माझं हस होईल सगळी कडे. आणि मला ते नको आहे. पण जर माझा गर्भपात झाला आहे हे कळलं तर सर्वांना माझी दया येईल. माझं हस होण्यापेक्षा माझी दया आलेली बरी.." सुमित्रा म्हणाली.

" तुला हवं ते कर.. मी तुझ्या खोट्या मध्ये सामील नाही होणार. मला कोणी विचारलं तर मी सांगेन तू कधीच गरोदर नव्हतीस." विलास राव म्हणाले.

" ठीक आहे.. जर तुम्ही असं सांगितलं तर मी सुद्धा बोलेन ,की तुम्ही मला गर्भपात करायला भाग पाडलं, तुमच्या मुलींसाठी.. आणि लोकांना ते पटेल सुद्धा.." सुमित्रा म्हणाली.

" तुला वेड लागलं आहे का..? छोटीशी गोष्ट आहे.. का बाऊ करते आहेस.. ?" विलास म्हणाले.

" बाऊ करते आहे .. मी करते आहे हे सर्व..? तुम्ही केलं आहे.. मला आई व्हायचं सुख सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही.." सुमित्रा म्हणाली.

" मला खरंच आता असं वाटतं आहे , तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे.. ती काहीही बरळते आहेस.." विलास राव वैतागून म्हणाले..

सुमित्रा काही बोलणार इतक्यात मैथिली म्हणाली..," बाबा बस झालं.. " तिच्या या वाक्या निशी सुमित्रा आणि विलास रावांनी दरवाजाच्या दिशेने पाहिले तर मैथिली आणि निशा मावशी दोघी दारात उभ्या होत्या.

" तू कधी आलीस…? कधी पासून बोलणं ऐकते आहेस आमचं..? तुला दारावरची बेल वाजवता नाही आली का..? " सुमित्रा संतप्त होऊन म्हणाली.

" माझ्या जवळ असलेल्या चावीने मी दर उघडलं.. एरवी तुला आवडत नाही ना मी बेल वाजवलेली . तुला डिस्टर्ब होतं.. आणि मला माहित नव्हतं बाबा घरी आले असतील ते.. नाही तर मी बेलच वाजवली असती." मैथिली म्हणाली.

" अगं ठीक आहे.. त्यात काय एवढं.. निशा आता ये ना.. खूप दिवसांनी आली आहेस. प्लीज ये.. चहा घेतल्या शिवाय तुला आज जाऊच देणार नाही.." विलास राव म्हणाले.

विलास राव असं बोलल्यावर सुमित्रा तावातावाने आत तिच्या खोलीत निघून गेली.

" नको आज नको.. मी आज न थांबलेलं बरं.. पुन्हा येईन मी कधी तरी. तुम्ही प्लिज वाईट वाटून घेऊ नका.." निशा म्हणाली.

" काळजी घे.. " निशा मैथिलीच्या गालावरून हात फिरवत म्हणाली. आणि तिथून निघून गेली. विलास राव आणि मैथिली , दोघानाही काय बोलायचं ते सुचत नव्हतं. त्यांना एकमेकांसमोर खूप अवघडल्या सारखं वाटत होतं.हे असं पहिल्यांदाच घडलं होत. 

**********

निशा मावशी ने मैथिली ला जरी खूप समजावलं असलं तरी ती स्वतः मात्र विचारातच होती. सुमित्रा खरंच कधी मैथिली आणि चैतालीचा स्वीकार करेल का..? तू माणूस कोण असेल? काय होईल या दोन्ही मुलींचं पुढे? आणि आज जे ऐकलं ते…कठीण आहे सर्व.. पण या सर्वात मैथिलीने पोसिटिव राहणं खूप गरजेचं होत. त्यामुळे निदान काही प्रमाणात का होईना मैथिली आता गोष्टी हाताळू शकेल याचं तिला बरं वाटतं होतं.

**********

क्रमशः

( वाचकहो ही कथा, यातील पात्र,घटना ,स्थळ हे सारं काही काल्पनिक आहे. )

फोटो साभार - गूगल ( ohyaraaro.com )

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


🎭 Series Post

View all