Mar 03, 2024
सामाजिक

चुकीला माफी..? आहे! भाग -४(अंतिम)

Read Later
चुकीला माफी..? आहे! भाग -४(अंतिम)
चुकीला माफी..? आहे!
भाग -चार. (अंतिम )

चार ते पाच तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर जेव्हा डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांच्याभोवती सर्व गोळा झाले.

"डॉक्टर, रचना ठीक आहे ना? आणि बाबा?" अनिश डोळ्यात प्राण आणून विचारत होता.

डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ते काय बोलणार? या विचाराने त्याचा जीव टांगणीला लागला होता.
"काळजीचे काहीही कारण नाही. रचना आणि रामराव, दोघांच्याही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. काही तासांनी दोघेही शुद्धीवर येतील." डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले तेव्हा कुठे त्याने सुटकेचा निःश्वास सोडला.

******
ऑपरेशन होऊन सहा महिने लोटले. किडनी मिळाल्यामुळे रामराव खूष होते. आता त्यांचा बराच त्रास कमी झाला होता. हेकेखोरपणा मात्र आणखी वाढला होता. पैश्याच्या जोरावर मी वाचलो, आपल्या माणसांपेक्षा पैसा मोठा असतो या भ्रमात ते वावरत होते.

त्यांची दुपारची चहाची वेळ झाली आणि अजून कोणी चहा दिला नाही म्हणून ते स्वतःच स्वयंपाकघराच्या दिशेने निघाले होते. आजकाल रचना कामं जरा हळू हळू आणि वेळ लाऊन करते हे त्यांच्या लक्षात आले होते आणि त्यांची चिडचिड वाढली होती.


"अनिश हा चहा पटकन बाबांना नेऊन दे. त्यांची चहाची वेळ झालीये." अनिशच्या हातात चहाचा कप थोपवत रचना म्हणत होती.

तिचा आवाज कानावर पडला आणि रामराव बाहेरच थबकले.


"किती करतेस गं त्यांच्यासाठी? पण त्यांना त्याचे काही आहे का? पाच मिनिटं उशीर झाला तर काय आभाळ कोसळणार आहे का? ज्या किडनीच्या जोरावर ते आता बाता करत आहेत ना, त्यांना हे सुद्धा ठाऊक नाही की ज्या किडनीच्या जोरावर ते आज जिवंत आहेत, ती तुझी किडनी आहे." तो थोडा रागाने आणि थोडे हताश होऊन बोलत होता.

"अनिश, अरे किती त्रागा करून घेत आहेस? असतो रे एखाद्याचा स्वभाव. आपलीच माणसं आपल्यालाच समजून घ्यायला हवे ना?" ती त्याला समजावत होती.


"हम्म. म्हणूनच तर काही बोलत नाही ना. पण त्रास होतो गं." त्याच्या डोळ्यात पाणी आले.
"रचना, तू मात्र शेवटी करून दाखवलेसच. मी पोटचा पोर असूनदेखील जे करू शकलो नाही ते तू केलेस, थँक यू. थँक यू सो मच!" डोळ्यातील अश्रू पुसून रचनाचा हात हातात घेऊन अनिश बोलत होता.


"वेडा आहेस का रे अनिश? आपल्यात तुझे माझे कधीपासून व्हायला लागले? आपले लग्न झाले आणि तेव्हाच मी सगळ्यांना आपले मानले. मग आपल्याच माणसासाठी काही केले तर बिघडते कुठे?" ती त्याच्याकडे बघून म्हणाली.


"करावं गं आपल्या माणसासाठी पण ज्यांना आपली कदर आहे त्यांच्यासाठी करावं. बाबांच्या मनात कायम तुझ्यासाठी राग, माझ्यासाठी मी तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली ही भावना. त्यांना आपले मन कधी कळणारच नाही. तू तरुणपणात त्यांना तुझी किडनी दिलीस, पुढे जाऊन तुला काही झालं तर? तर मी कुणाकडे बघायचं?" त्याचे डोळे अजूनही भिजलेले होते.

"काहीही तुझं. असं काही होणार नाही. बरं हा चहा तू नेऊन देतोस की दुसरा करून देऊ?" ती.

"नको हाच दे." इतकावेळ दारापाशी उभे असलेले रामराव आत येत म्हणाले.

"बाबा.." ती गोंधळली. "थांबा, लगेच दुसरा करते. हा थंड झालाय." आता काय काय ऐकायला लागणार म्हणून तिच्या मनात थोडी भीती होती.

"रचना, पोरी माफ कर गं मला. पैशांच्या घमंडात मी माणसं ओळखायला चुकलोच." त्यांच्या डोळ्यात पाणी होते.
ते काय बोलताहेत हे रचनाला तर कळतच नव्हते. ती पहिल्यांदा त्यांच्या तोंडून तिचे नाव ऐकत होती.

"अनिश, रचना मी तुमचं बोलणं ऐकलेय." तिचा गोंधळलेला चेहरा बघून ते बोलू लागले.
"रचना, तू माझ्यासाठी काय आणि किती केलेस याची कल्पना नाही तुला. मी तुझ्याशी एवढे कठोर वागूनही तू मला जीवनदान दिलेस. मी शिक्षेच्या पात्र आहे आणि तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. ते हात जोडून उभे होते.

"बाबा, अहो काही काय बोलताय? तुम्ही मोठे आहात. आणि तुम्ही असे वागलात कारण तुमच्या मते आम्ही चूक होतो. तुम्हीच आम्हाला माफ करा." ती आज पहिल्यांदा त्यांच्याशी एवढे बोलत होती.

"तुमची चूक नव्हतीच. मी हेकेखोर होतो. माझ्या स्वभावाने माझी माणसं दुरावलीत पण तू मला आपलं मानलंस. माझी चूक अक्षम्य आहे पोरी तरी माफ करशील का?" त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप झलकत होता.

"बाबा, चुकीला माफी असते हो. क्षमा करणे हा सगळ्यात मोठा दागिना आहे. आपण सगळं विसरून नव्याने आनंदात राहूया का?" भरल्या डोळ्यांनी ती विचारत होती.

ती आशीर्वादासाठी खाली वाकली आणि त्यांनी तिला कवेत घेतले. हे बघून अनिशच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या. तोही त्यांच्या मिठीत विसावला.

"आई भूक लागलीये." छोटा सोहम डोळे चोळत किचनमध्ये आला. तिथले दृश्य बघून तो बुचकाळ्यात पडला. रामरावांनी त्यालाही प्रेमाने जवळ घेतले. आजोबांच्या स्पर्शाने त्याचा चेहरा खुलला.

आज त्या चौकोनी कुटुंबाचे वर्तुळ पुर्ण झाले होते.

***समाप्त.***
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//