चुकीला माफी..? आहे! भाग -३

खरंच चुकीला माफी नसते का?


चुकीला माफी..? आहे!
भाग - तीन.

सोहम वर्षभराचा झाला आणि कसल्याशा आजाराने सासूबाई वारल्या. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही काहीच उपयोग झाला नाही.

सासूबाई गेल्या आणि इतर मुलांनीही रामरावांपासून पाठ फिरवली. त्यांच्या स्वभावाने कोणीही त्यांच्याकडे फिरकत नव्हते. परिणामी त्यांचचा स्वभाव चिडका व्हायला लागला. रचना तर त्यांना डोळ्यासमोरही नको झाली होती. आणि तिचे मूल? त्याच्याकडे ते ढुंकूनही पाहत नव्हते.


रचना मात्र भोळी होती. एक ना एक दिवस रामराव तिला सून म्हणून स्वीकारतील या वेड्या आशेत ती वावरत होती.

मागच्या दोन वर्षांपूर्वी रामरावांना किडनीच्या आजाराचे निदान झाले. त्या आधी कित्येक वर्षापासून वाढलेले रक्तदाब आणि मधुमेह या सारख्या श्रीमंत आजाराने ते ग्रासले होते यात भर म्हणून हा किडनीचा आजार.

दर दोन दिवसाआड त्यांना डायलीसिस करावे लागत होते. सासरी गेलेली मुलगी त्यांच्या स्वभावापाई दुरून डोंगर साजरे असे वागत होती आणि मोठा मुलगा आई गेल्यापासून आपल्या कुटुंबाला घेऊन दुसऱ्या फ्लॅटमध्ये रहायला गेला होता.

त्यामुळे रामरावांची सगळी कामं अनिशच्या पथ्यावर पडली. तो त्यांच्या तब्येतीचे सारे काही करत होता. रचनाचीही त्याला साथ लाभत होती.

माझ्याजवळ पैसा आहे म्हणून अनिश माझे करतो हे ते येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत असत. दोन वर्ष डायलीसिस करण्यात गेले त्याला आता रामराव कंटाळले होते. त्याच्यावर पर्याय म्हणून डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय सुचवला.
पैशांनी आपण सगळे विकत घेऊ शकतो त्यामुळे किडनी काय सहज मिळून जाईल या भ्रमात रामराव होते. पण मागील सहा महिन्यापासून प्रयत्न करूनही डोनर मिळत नव्हता.

रक्ताची नातीही या वेळी उपयोगी पडली नाही. अनिशची ईच्छा असूनही त्याचा रक्तगट जुळत नसल्याकारणाने तो किडनी देऊ शकत नव्हता.


"अनिश, मी काय म्हणते? माझ्या किडनीबद्दल डॉक्टरांशी बोलूया का?" रचना त्याला विचारत होती.

"वेडी आहेस का? तू का त्यांना तुझी किडनी देशील? तुझा किती छळवाद त्यांनी मांडलाय ते मला दिसत नाही का?" त्याने तिला स्पष्ट नकार दिला.


"अरे, पण एक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? डॉक्टरांशी बोलून तर बघू." ती कळकळीने म्हणाली.

"रचना, नाही म्हणजे नाही. माझ्याबाजूने विषय संपलाय हा."


"अनिश, तुला माझी शपथ! आपण आधी डॉक्टरांना भेटून तर बघू. ते काय बोलतात त्यानंतर निर्णय घेऊ. अरे, सोहमने एका वर्षातच आजीचे छत्र गमावले आता किमान त्याला आजोबांच्या प्रेमाला तरी पारखे नाही होऊ द्यायचेय." हुंदका देत ती म्हणाली.

तिने शपथ घातली म्हणून अनिश कसेबसे डॉक्टरांना भेटायला तयार झाला. रामरावांना आणि तिच्या माहेरच्या लोकांना कसलीही भनक लागू न देता ते दोघे डॉक्टरांना भेटले. सगळी तपासणी झाल्यानंतर योगायोगाने ती डोनर बनू शकते हे डॉक्टरांनी सांगितले.

अनिशच्या नकारानंतरही रचनाने आपल्या मत बदलले नाही आणि ती आनंदाने डोनर बनायला तयार झाली.

रामरावांना मात्र यातले काहीही माहिती नव्हते. पैसा फेकला म्हणून कोणीतरी डोनर आपल्याला मिळाला याच भ्रमात ते होते.

*******


आणि आज तीच शस्त्रक्रिया होती. अर्ध्या तासाने ऑपरेशनची प्रोसिजर सुरू झाली. सगळ्यांच्या नजरा ऑपरेशन थिएटरच्या ब्लबकडे लागून होत्या. अनिशचे डोळे अखंड वाहत होते. एका बाजूला बायको तर दुसरीकडे त्याचा जन्मदाता. त्याच्या कुशीत विसावलेला सोहम जेव्हा आईबद्दल विचारत होता तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले.


चार ते पाच तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर जेव्हा डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांच्याभोवती सर्व गोळा झाले.

"डॉक्टर, रचना ठीक आहे ना? आणि बाबा?" अनिश डोळ्यात प्राण आणून विचारत होता.

डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ते काय बोलणार? या विचाराने त्याचा जीव टांगणीला लागला होता.


काय सांगतील डॉक्टर? ही शस्त्रक्रिया सुरळीत पार पडली असेल ना? याचे उत्तर वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all