चुकीला माफी..? आहे! भाग -२

चुकीला खरचं माफी नसते का?


चुकीला माफी..? आहे!
भाग -दोन.

"श्श! भलते विचार डोक्यात नको ना आणूस. मी नाही म्हणत असताना इथवर तूच मला घेऊन आलीस ना? आपण आत्ताही विचार बदलू शकतो. तू नकार देऊ शकतेस." तिला उसण्या बळाने समजावत अनिश म्हणाला.

"नाही रे, विचार तर पक्का आहे. जर असं काही झाले तरच्या या गोष्टी. बाकी मी ठाम आहे. अजिबात डळमळले नाहीये." त्याचे डोळे पुसत ती म्हणाली आणि नर्ससोबत आत गेली.

ऑपरेशन टेबल वर झोपताना तिच्या डोळ्यात पाणी होते. सगळे सुरळीत होईल हा विश्वास स्वतःला देत तिने डोळे मिटले. मिटल्या डोळ्यासमोर तिला सहा वर्षांपूर्वीचा काळ आठवत होता.

"अनिश, तू म्हणतोस तसे खरंच होईल? आपले एकमेकांशी लग्न होईल का?" रचना अधीरतेने अनिशकडे पाहत विचारत होती.

तब्बल दोन वर्षांपूर्वी तिला प्रेमाची कबुली दिल्यावर आज मावळतीच्या सावित्याला साक्षी ठेऊन अनिशने तिला लग्नासाठी मागणी घातली आणि रचनाच्या गालावर गुलाब फुलले होते. तिच्या मनात तर तो आधीपासूनच होता, मग त्याच्याशी लग्न करायला ती कशी नकार देणार होती?

पण त्याच्या हाती हात देऊन 'हो, मी तयार आहे.' हे म्हणण्यापूर्वी तिला वास्तवाचे भान झाले. अनिशच्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती. रचनाची परिस्थिती मात्र बेताची. एकुलती असल्यामुळे तिला फारशा अडचणी आल्या नाही पण पाठीवर दुसरं भावन्ड असते तर नक्कीच ती इतवर शिकूही शकली नसती. अशा रचनाचा जीव पहिल्या भेटीत अनिशवर जडला होता. पण त्याची आणि आपली बरोबरी होऊ शकणार नाही हे जाणून ती त्याच्यापासून दूर राहत होती.

दोन वर्षांपूर्वी त्याने तिला प्रेमाची कबुली दिली तेव्हा आनंदाने आकाश दोन बोटंच दूर उरलेय असे तिला झाले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात रंगले होते. त्याच्याशिवाय ती कुणाचा विचार करू शकत नव्हती आणि आज त्याने तिला लग्नाचे विचारले तेव्हा मात्र थोडीशी ती डगमगली. त्याच्या घरचे तिला स्वीकारतील की नाही या प्रश्नाच्या कोंडीत ती अडकली होती.

"अगं आपण करू तर होईलच ना लग्न." त्याने हसून तिच्या डोक्यावर टपली मारली तशी लाजली ती.

"अनिश, पण तुझ्या घरचे..?"

"बाबा नाही म्हणालेत. मी कालच त्यांना आपल्याबद्दल सांगितले. आईची काही हरकत नाहीये पण बाबाला घाबरून असते ती. दादा ताईंना विचारून काय करू? लग्न मला करायचे आहे. आणि जिथे आई बाबांच्या विरोधात बोलत नाही तिथे माझी भावन्ड तरी काय बोलणार?" तो सांगत होता.

"अरे पण.."

"पण काय? तुला आवडतो ना मी? तुला त्रास होणार नाही असं कायम वागेन तुझ्याशी. फक्त तुझी साथ मला हवीय. रचना तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही मी करू शकत नाही." तो तिच्याकडे एकटक बघत म्हणाला.

"अनिश, तू आहेस ना सोबत, मग मलाही काही नकोय. मला आवडेल तुझ्यासोबत माझे उरलेले आयुष्य घालवायला."

रचनाने होकार दिला आणि पुढच्याच महिन्यात कोर्ट मॅरेज करून अनिश तिला घेऊन घरी आला. रामराव त्यांच्या लग्नाला परवानगी देणार नव्हतेच आणि चुकून दिली असती तरी लग्नात मानअपमानाचे नाट्य घडले असते, ते त्याला नको होते म्हणून त्याने कोर्ट मॅरेजचा निर्णय घेतला.

"या दीडदमडीच्या पोरीला मी कधीच सून मानणार नाही." रामरावांनी रचनाला पाहताक्षणीच आपला निर्णय सांगून टाकला.

रचनाने मात्र प्रेमाने सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. सासूबाईला तिचा साधा सोज्वळ स्वभाव रुचला होता. उघड उघड दाखवत नसल्या तरी त्या तिची काळजी घेत होत्या. वर्षाभरात तिला सोहम झाला. नातवंडाचे तोंड बघून तरी ते चांगले वागतील ही रचनाची आशा फोल ठरली. रामरावांचा हेकेखोर स्वभाव काही कमी झाला नाही उलट ते आता रचना बरोबर सोहमचा देखील तिटकारा करत होते.

सोहम वर्षभराचा झाला आणि कसल्याशा आजाराने सासूबाई वारल्या. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही काहीच उपयोग झाला नाही. सासूबाई गेल्या आणि इतर मुलांनीही रामरावांपासून पाठ फिरवली. त्यांच्या स्वभावाने कोणीही त्यांच्याकडे फिरकत नव्हते. परिणामी त्यांचचा स्वभाव चिडका व्हायला लागला. रचना तर त्यांना डोळ्यासमोरही नको झाली होती. आणि तिचे मूल? त्याच्याकडे ते ढुंकूनही पाहत नव्हते.

बदलेल का रामरावांचा हा स्वभाव? कळण्यासाठी वाचा पुढील भाग.

:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all