चौकट बुरसटलेल्या चालीरीतींची

Eka shri chi katha ji kup himmatine jagate

चौकट बुरसटलेल्या चालीरीतींची.

       रविवार म्हणजे माझा सुट्टीचा दिवस. हातात चहाचा कप आणि समोर पेपर. खिडकीतून बाहेर परसबागेतील फुल झाडांकडे बघत चहाचा एकएक घोट घेत पेपर वाचणे चालू होते. तेवढ्यात माझं लक्ष बागेतील चाफ्याच्या डहाळीवर गेलं. हिरवट-पिवळ्या रंगांच्या पाखरांचं एक जोडपं तिथं बसलं होतं. त्यांच्याकडे बघून ते काहीतरी हितगुज करत असावेत असं मला वाटलं.

" किती छान वाटत असेल ना! एकमेकांच्या साथीनं उडताना , फिरताना , पिलांना चोचीने भरवताना , एकमेकांशी पाखरांच्या त्या मंजुळ चिवचिवाटात संवाद साधताना. जोडीदाराबरोबर असल्यावर जीवन कसं सुसह्य , आनंदी , हसतखेळत होतं. वेळ कसा निघून जातो कळतही नाही. "

त्यांच्याकडे बघत विचार करत असताना नकळत माझ्या मनाची नाव भूतकाळातील आठवणींच्या लाटांवर हेलकावे खाऊ लागली.

        मी सीमा. तशी अबोलच. पटकन कुणाची ओळख होऊन मिसळणं मला कधी जमलंच नाही. किंबहुना माझा तो स्वभावच नव्हता. वडिलांची सरकारी नोकरी. त्यामुळे घर, संसार, मुलं यांची तारेवरची कसरत करत आईने आम्हा भावंडांना सांभाळलं. मोठं केलं. चांगलं शिक्षण दिलं. कला शाखेत उत्तम मार्कांनी पास होऊन पदवीधर झाले. इतर भावंडांमुळे आईला कधी लाड करायचा वेळच मिळाला नाही. पण बाबा मात्र माझा नेहमी लाड करायचे. पाटलांच्या घरात लग्न होऊ आले. माहेरचा अल्लडपणा सोडून जबाबदारीने सासरी पहिले पाऊल टाकले. पदवी मिळवलेली सासरी एकुलती एक सून अर्थात मोठी देखील मीच होते तो भाग वेगळा. 

        आई व आजीने सांगितलेल्या सगळ्या सूचना डोक्यात कायमच्या कोरून मी सासरी आले. त्यांनी जणू मला संसाराची शिदोरीच बांधून दिली होती. आजी नेहमी सांगायची ,

"बघ सीमे , ( माझं जगासाठी नाव सीमा असले, तरी आजी मला प्रेमाने सीमेच म्हणायची. )

सासरी गेल्यावर अशी हुल्लडबाजी करू नको. जरा जबाबदारीने राहा. मोठ्याने बोलायचं नाही. मोठ्याने हसायचं नाही. तोंडावर नाही किंवा मी करत नाही असे म्हणायचे नाही. त्याने मोठ्या माणसाचा अपमान होतो. आता तुझे सासर हेच तुझे घर व तेथील माणसे हेच तुझे जग. त्यामुळे त्यांना वाईट वाटेल; असे काही एक करू नको. आपण कितीही कामात असेल तरीही कुणी आले तर पाया पडायला व पाणी द्यायला विसरायचे नाही. "

        अशा हजारो सूचना पदरी घेऊन इतर मुली येतात त्याचप्रमाणे मी सासरी आले. सासर म्हणजे जणू गोकुळच होतं. प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखून वागत असे. अर्थात मी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वागू लागले. पाहुण्यांची उठ बस, त्यांना हवं नको ते बघ, सणवार, घराण्याचे नियम, सासूसासऱ्यांची औषधे, खानपानाच्या वेळा आणि इतर बरीच कामं सांभाळत होते. त्यांच्या विश्वात मी इतकी गुंतले होते, की मला देखील एक स्वतंत्र आयुष्य आहे; याची जाणीवच मला राहिली नव्हती. घरातील जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता आमच्या संसारवेलीवर सुजय आणि सुजाता ही दोन फुलेदेखील उमलली. आतापर्यंत आदर्श सून असलेली मी आता आदर्श आई झाले होते. त्यांच्या रूपाने मी माझे बालपण पुन्हा अनुभवत होते. मी आदर्श सून, आदर्श पत्नी आणि आता आदर्श आई झाले होते.

        रोज माझी सगळी कामे आवरून यांची कामावरून यायची वाट बघत बसायचे. सोबतच जेवण करायचो. मग ते आले की आम्ही सगळेसोबत जेवण करायचो. त्या दिवशी देखील मी त्यांची वाट बघत बसले होते. पण त्यांची येण्याची वेळ उलटून दोन तास झाले होते. सगळ्या मित्रांना कॉल करून झाले पण कुणाकडूनच काही माहिती मिळत नव्हती. बाबांचा तर बीपी उच्च पातळी गाठत होता. मनात नको नको त्या शंकांचं काहूर माजलं होतं. सगळीकडे चौकशी करून देखील त्यांची काहीच खबर लागत नव्हती, माझं डोकंच सुन्न झाल्यासारखं वाटत होतं. शेवटी शेजारचे दादा मी बघून येतो म्हणून गेले तर ते पोलिसांना सोबत घेऊनच आले. त्यांना पाहताच सगळे घाबरले.

        त्यांचे रक्तानं भरलेले कपडे फक्त मला दिसले. त्यानंतर कानाचे पडदे फाटतील कि काय? असे आवाज कानावर पडत होते. सगळी माणसं माझ्या आजूबाजूला गरगर फिरताना अंधुकशी दिसत होती. काय चाललंय काहीच कळत नव्हतं. अचानक कुणीतरी माझ्या कपाळावरून हात फिरवला. वाटलं, कुणीतरी धीर देण्यासाठी मायेनं फिरवत असेल. पण दुसऱ्या क्षणी कुणीतरी कपाळावरची टिकली काढली. घशाला कोरड पडली होती. जीव कासावीस झाला होता. डोळ्यांतून अनाहत अश्रुधारा वाहत होत्या. कुणीतरी आपल्या काळजावर कुऱ्हाडीने वार करून हजारो तुकडे करत आहेत कि काय असं वाटत होतं. जिवाच्या आकांताने ओरडावं वाटत होतं. आईच्या कुशीत शिरून धाय मोकलून ढसाढसा रडावं वाटत होतं. शून्यात बघणारी नजर आणि थाऱ्यावर नसलेलं मन सोबतीला घेऊन मी तशीच भिंतीला चिकटून खाली चटकन बसले. हातात कुणीतरी मंगळसूत्र दिलं. सगळे बाजूला झाले. घरात कसलीतरी पळापळ चालू होती. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली आणि मी जमिनीवर अंग टाकून दिलं.

        जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर नर्स होती. आजूबाजूला नजर जाताच समजलं कि, मी हॉस्पिटलमध्ये होते.

"ताई , कसे वाटतंय आता?"  नर्सने गोड स्वरात विचारले.

तिला प्रतिप्रश्न करणार तोच ती उत्तरली,  "तुम्हाला काल चक्कर आली म्हणून रात्री ऍडमीट केलं होतं."

मी फक्त तिच्याकडे खिन्न नजरेने बघत होते. तिच्याकडे बघत असताना अचानक नजर माझ्या हाताकडे गेली.  " अरे बांगड्या कुठे गेल्या माझ्या? गळ्यातलं मंगळसूत्र हातात कसं आलं? " मी घाबरतच मनाशी पुटपुटले. पटकन उठून उभी राहीले. हात, पाय , कपाळ बघू लागले. तोंडात कुणीतरी जोरात चपराक मारावी व रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तोंडात बोळा घालावा, अशी माझी अवस्था झाली होती.

माझे जोडवे...
माझे मंगळसूत्र...
माझ्या बांगड्या...
माझी टिकली...
कानातले झुमके...

माझ्या सौभाग्याचं कोणतंही लेणं जागेवर नव्हतं.

"सिस्टर सांगा ना कुठे आहे?" मी जोरात ओरडू लागले.

माझा आवाज ऐकून माझी आई, बहीण, नणंद व सासूबाई पळत आतमध्ये आल्या. त्या मला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. पण मी कुणाचेच 
ऐकण्याच्या मनःस्थितीत मध्ये नव्हते. त्यांनी मला कसे तरी शांत केले व खाली बसवले,

"सीमा , तुझं सौभाग्यच राहीलं नाही. मग या वस्तू तुझ्याकडे कशा राहतील. तो गेला गं तुला एकटीला सोडून. कशाला आता त्या वस्तूंमध्ये जीव अडकवतेस?" सासूबाई पदरात तोंड खुपसून रडत बोलू लागल्या.

"मंगळसूत्र, कुंकू, जोडवे, कोणताही सौभाग्यालंकार या नंतर तुला कधीच घालता येणार नाही गं पोरी. सावर स्वतः ला." आई मला जवळ घेत म्हणाली.

"वहिनी , आता कोणत्याच रंगाची साडी तुला कधीच नाही घालता येणार." नणंद जवळ येत म्हणाली.

"ताई , आता प्रत्येक ठिकाणी तुला दुय्यम स्थान सहन करावे लागेल. अगं, आपल्या समाजाची तशी रीतच आहे गं. ती तू कशी मोडू शकतेस?" माझी बहिण स्वतःचे डोळे पुसत म्हणाली.

        माझं सगळं ऐकून झालं होतं. उठून उभी राहीले. डोळे पुसले. म्हणाले,

"म्हणजे नवरा गेला मग एकट्या स्त्रीने जगूच नये का? तिने रोज रोज मरण यातनाच सहन करायच्या का? स्त्रीने सुंदर दिसावं , तिचे सौंदर्य खुलाव म्हणून तिला अलंकार दिले जातात. पण त्याच अलंकारापुढे सौभाग्य नाव लावून तिला लंकेची पार्वती केलं जातं. का? स्त्रीच्या शरीरावरील प्रत्येक दागिन्यांची जागा ठरलेली आहे. कारण, त्यांना एक शास्त्रीय आधार आहे. बर शास्त्रीय आधाराचे जाऊ द्या. पण हे मंगळसूत्र म्हणजे यांची शेवटची आठवण. जर ते माझ्यासोबत राहील तर मला ते सतत माझ्यासोबत आहेत याची जाणीव राहील. हे जोडवे जे ते प्रत्येक वेळी मला माझ्या आवडीच्या डिझाइनचे बनवायचे. माझी ती हिरव्या रंगाची साडी. त्यांनी मला सातव्या महिन्यात घेतली होती. फक्त त्यांना डिझाइन आवडली म्हणून. ती पिवळ्या रंगाची साडी. जेव्हा आम्ही पहिल्यांदा आईबाबा झालो तेव्हा त्यांनी माझ्यासाठी आणली होती व मला म्हणाले होते, 

" पिवळा रंग सर्व रंगात रंग भरतो. तशी तू या बाळाला जन्म देऊन माझ्या आयुष्यात रंग भरलेत. "  

तुमचा समाज व तुमच्या रूढी मी समजू शकते. पण माझ्या भावनांचे काय? हे सोबत नाहीत याची दुःख तर खूप आहे. पण त्यांची आठवण असलेली प्रत्येक गोष्ट हिरावली जाणार, हे कसे सहन करू? काहीही झाले तरी माझी कुठलीच वस्तू देणार नाही मी. आहे तशीच राहणार." मी ठामपणे बोलले.

          माझा ठामपणा ना माहेरी रुचला ना सासरी पचला. सगळ्यांनी विरोध चालू केला. शेवटी सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. माझ्या चिमुकल्यांना घेऊन खंबीरपणे लढले. कारण, मी एक आई होते व दोन जीवांची जबाबदारी होती माझ्यावर.

मी लढले...
खंबीरपणे उभा राहिले...
जिंकले देखील...

        आज माझी मुलगी इंजिनिअर, मुलगा डॉक्टर आहे. एका छोट्या गृहउद्योगापासून सुरू करून आज मी स्वतः ची कंपनी स्थापन केली. त्या कंपनीमध्ये नोकरी देताना मी महिलांना आवर्जून प्राधान्य देते खासकरून विधवा, घटस्फोटीत किंवा काही कारणास्तव एकट्या राहणाऱ्यांना. आणि हे सगळं मी माझी सर्व सौभाग्यलेणी माझ्या अंगावर मानानं लेऊन त्यांची आठवण सांभाळत.

कोण म्हणतं मी विधवा आहे?

माझं मंगळसूत्र त्याने त्याच्या हाताने माझ्या गळ्यात घातलं , कुणालाही ते काढण्याचा काय अधिकार?
माझ्या केसांत भरलेलं कुंकू त्यानं त्याच्या बोटांनी भरलं, कुणाला काय ते पुसायचा अधिकार?
त्याला मी वेगवेगळ्या रंगांची साडी, ड्रेस घातलेलं आवडायचं. मग का मी फक्त पांढऱ्याच रंगाचे कपडे परिधान करायचे ?

मी अजूनही माझ्या नवऱ्याची सौभाग्यवतीच आहे. मग का मला सुवासिनींनी करावयाचे सोपस्कार नाकारले जातात ?

सण-सणवार, ओटीभरण, नामकरण, सोवळे यांना का मला बोलावलं जात नाही ?

शरीराने माझा नवरा गेलाही असेल हे जग सोडून. पण त्याची विचाररूपी साथ सदैव माझ्या सोबत आहे.

मी अजूनही माझ्या नवऱ्याची बायकोच आहे. दोघांनी घेतलेल्या सात जन्मांची वचने सांभाळते आहे. मग का म्हणून मी विधवा?

अश्या कितीतरी स्त्रिया आजही समाजामध्ये प्रचलित जुन्या रूढी आणि परंपरांमध्ये दबून राहिलेले आहेत. कधीतरी त्यांना आवाज फुटेलच!

- धन्यवाद.