चौकटीबाहेरील निर्भेळ यश

ईरा : शब्दांचा नवा दृष्टीकोन

चौकटी बाहेरील निर्भेळ यश 

     एक छोटसं टुमदार गाव होते. हिरव्यागार निसर्गाचे वरदान गावाला लाभले होते.गावाजवळूनच नदी वाहत असलेमुळे पाण्याची कमतरता नव्हती.शेतीने समृद्ध असणारे हे गाव सुपिक जमिनीत जोमदार पिकासाठी प्रसिध्द होते.सपाट काळी कसदार जमिन जितकं कष्ट करिल तितकं मोल शेतकऱ्यांच्या पदरात टाकत होती.मुबलक पाण्यामुळे शेतकरी सुखी समाधानाचे जीवन जगत होता.अशा संपन्न गावात गणपतराव देशमुख हे अतिशय कष्टाने शेती करत होते.लहान कुटुंब सोबत पत्नी आणि दोन लहानमुले संसाराचा गाडा हाकत होते.त्यामुळे सगळी जबाबदारी गणपतराव यांच्यावरच होती.

        गणपतराव यांचे  शिक्षण बारावी पर्यंत झालेले होते.घरातील शेतीची जबाबदारी त्यांच्यावर पडलेली असलेमुळे पुढील शिक्षण  थांबले व ते पूर्णवेळ शेती करु लागले.वडिलोपार्जित जमिन असलेमुळे शेतीत भात , ऊस , मक्का , भुईमूग , सोयाबीन  ही पिकं ते घेत होते.पारंपरिक पद्धतीने ते ऊस लागण करत होते.खतेही ते आपली नेहमीचीच वापरत होते.त्यामुळे पिक जोमदार यायचे पण अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते.तसेच भात आणि भूईमूग पिकाबद्दल होते.जुनी बियाणे वापरुन ते ही सगळी पिकं घेत होते.गणपतरावांचा हा शेती व्यवसाय कित्येकवर्ष जुन्याच पद्धतीने चालू होता.मुबलक शेती असूनसुद्धा उत्पन्न वाढत नव्हते.वेळच्यावेळी पाणी,  खते देणे सुरुच होते परंतू म्हणावे तशी उत्पन्नात भर पडत नव्हती.

एकदिवस गावात अॕग्रोवन या शेती कंपनीने गावात शेतकरी परिसंवादाचे आयोजन केले होते.गावातील शेतक-यांना आधुनिक शेतीबद्दल मार्गदर्शन व्हावे व शेतकरी नविन तंत्राचा अवलंब करत रहावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.गणपतराव व गावातील शेतक-यांनी हजेरी लावली होती.परिसंवादात कंपनीच्या अधिकारी यांनी ऊस  , भात, भाजीपाला व फळझाडे यांची माहिती तपशीलवार सांगितली.शेतक-यांचा प्रतिसाद भरपूर मिळाला. कंपनीचे अधिकारी यांनी गणपतरावसह अनेक शेतक-यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.गणपतराव व शेतकरी आनंदी झाले.त्यांच्यात नवा उत्साह संचारला होता.

      अॕग्रोवन या कंपनीच्या मार्गदर्शमुळे गणपतरावांनी आधुनिक शेती करण्याचा मनात चंग बांधला.त्यादृष्टीने त्यांनी हालचाल करण्यास सुरवात केली.त्यांना आता गप्प बसवत नव्हते.आपल्या सौभाग्यवतीला आपला नवा विचार व दृष्टीकोन सांगितला. तिनं लगेच दुजोरा दिला आणि जोरात आधुनिक शेतीला सुरवात केली.गणपतरावांनी सुरवातीला आपल्या सगळ्या शेतीचे मातीपरिक्षण करुन घ्यायचे ठरवले.मातीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले.आठवडाभरात मातीचे परिक्षण आले.आपल्या जमिनीत कोणत्या पोषक द्रव्यांची कमतरता आहे याची माती परिक्षणातून त्यांना जाणिव झाली आणि त्यानुसार पिकाला खत देण्याचे ठरवले.

     गणपतराव कामाला लागले.सगळी जमिन त्यांनी नांगरुन घेतली.जमिनीला सेंद्रिय खताची गरज असलेमुळे त्यांनी सगळ्या शेतांना शेणखताचा वापर केला.आपल्या सहा एकर शेतीची त्यांनी वर्गवारी केली. दोन एकर शेती ऊसासाठी ठेवली.दोन एकरमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला व एक एकरमध्ये मक्का आणि उरलेल्या जमिनीत फळझाडे लावण्याचे नियोजन केले.सुरवातीला त्यांनी ऊस शेतीवर लक्ष केंद्रीत केले.चारफुटी सरी सोडली.संकरती वाण म्हणून को ८६०३२ ऊसजातीची निवड केली. पाण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला.रासायनिक खते ठिबव्दारे दिली.टॉनिकची फवारण्या वेळच्यावेळी केल्या.योग्य नियोजनामुळे ऊसाचे भरघोस उत्पन्न मिळाले.एकरी साठ टन उत्पन्न हे नव्या तंत्रदानाचे फलित होते.दुप्पट उत्पन्न वाढल्यामुळे गणपतराव यांचा उत्साह वाढला होता त्यामुळे इतर पिकाकडे त्यांनी आधुनिक तंत्राचा वापर सुरु केला.नंतर त्यांनी भाजीपाला पिकाकडे मोर्चा वळविला.वांगी , टोमॅटो  , मिरच्या , कोबी , गवार , बेनस असा भाजीपाला केला.नवीन संकरीत बेणे वापरले पण त्याला सेंद्रिय खताची जोड दिली.पद्धतशीर नियोजनबद्धतेमुळे सर्व भाजीपाला जोमदार आला.जवळच्या शहरात स्वतः भाजीपाला विक्री केली.सेंद्रिय खताचा वापर आसलेमुळे भाज्यांना वेगळेच तेज होते त्यामुळे भरपूर मागणी होती.गणपतरावांना शेतीच्या तंत्राची गती सापडली होती. दुस-या पिकाकडे वळताना त्यांनी मक्का लागवड केली. खाण्यासाठी ज्या कणसांचा उपयोग होतो आशा गोड व मधुर मक्याची लागवड करुन त्याची उत्तम देखभाल केली.बाजारात याला भरपूर मागणी असलेमुळे गणपतरावांच्या या प्रयोगाला प्रचंड यश आले आणि बघता - बघता बाजारपेठ काबीज केली.गणपतरावांचा जोश वाढतच चालला होता शेतीतील नवीन प्रयोगामुळे त्यांचा नावलौकिक वाढला होता.त्यामुळे त्यांनी सगळे प्रयोग करताना फळझाडांच्या नवीन जाती लावल्या.आंबा , पेरु डाळींब आणि संत्री यांचे सुनियोजित पालनपोषन करुन भरघोस उत्पन्न मिळवले.यासाठी गणपतरावांनी स्वतः कष्ट घेतले.सोबत पत्नीचीही साथ लाभली.कमी मजूर घेऊन जास्त फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले.सर्व पिकांची खते , मजूरी , देखभाल य सर्वांची वेळच्यावेळी नोंद ठेवली त्यामुळे आपण पूर्वी कसे कष्ट करत होतो व आता नव्या तंत्राच्या वापरामुळे कसे समृद्ध झालो याचे गणित गणपतरावांना समजले होते.गणपतरावांनी आपल्या कष्टाने व नव्या पद्धतीचे बदल स्विकारुन आपले जीवन सुंदर केले.

     रुढी , परंपरा , चालीरीती , नाती यांची एक विशिष्ट चौकट आहे यांची जोपासना करुनच आपण आयुष्य जगत चाललोय ..! पण काळाच्या ओघाप्रमाणे बदलणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी कांही चौकटी या भेदाव्याच लागतात आणि तेच काम गणपतरावांनी आपल्या जुन्या शेतीतील तंत्राला तिलांजली देत आधुनिक शेतीचे तंत्राचा स्विकारुन करुन कमी कष्टात जास्त उत्पादन घेतले.कल्पकतेचा वापर केला.स्वतः कष्ट घेतले व अल्पावधीत ते प्रगतील शेतकरी झाले.गावातील शेतक-यांनी त्यांचा आदर्श घेत आधुनिक शेती सुरवात केली.गावातील शेतक-यांना मार्गदर्शन केले.शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ' कृषीभूषण ' पुरस्काराने सन्मानित केले.हे आहे पारंपरिक चौकट सोडून मिळवलेले निर्भेळ यश …!! 

             ©®नामदेवपाटील