#चौकट
© स्वाती अमोल मुधोळकर
सुंदर सजवलेल्या प्रशस्त कार्यालयात विरागच्या लग्नसमारंभासाठी सर्वजण जमलेले होते. लग्नापूर्वीचे विधी सुरू होते. सजूनधजून तयार झालेले विराग आणि राशी आपापल्या मंचकावर बसून भटजी सांगतील त्याप्रमाणे करत होते.
" विदिता, अग ए विदिता, ओटी भरायची आहे ना तुझ्या वहिनीची, म्हणजे नवऱ्या मुलीची ? आता भरावी लागेल थोड्याच वेळात. तशी ... बहिणीने भरायची असते." शर्वरीकाकू विदिताला हाक देऊन सांगत होत्या.
शर्वरी काकूंचे विदिताच्या आईशी , आजीशी पूर्वीपासूनच ओळख आणि चांगले संबंध होते. त्यामुळे सगळे त्यांना अगदी घरच्यासारखेच मानत. आजीनंतर आता सर्वात वयस्कर म्हणून त्यांना मान होता. त्याही समोरच बसून सर्व लग्नकार्य विधीवत होत आहे की नाही याकडे लक्ष देत होत्या. बाजूलाच कुटुंबातील इतर बायका आणि पाहुणेमंडळीही बसलेली होती.
विदिता लग्नसमारंभात इकडे तिकडे लगबगीने वावरत काम करत होती. आलेल्या सर्व पाहुण्यांची विचारपूस करत जातीने कार्यक्रमाची व्यवस्था बघत होती. लग्नाच्या वेगवेगळ्या विधींसाठी लागणारे साहित्य भटजींना तत्परतेने पुरवत होती. हे सगळे करताना तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. दर एक दोन मिनिटांनी तिला कोणी न कोणी हाक देऊन विचारायचे , विदिता , हे कुठे आहे? ते कुठे आहे ? नवरीला देण्याचे सामान आण बरं. अग आहेराच्या साड्यांची पेटी कुठे आहे ? नवरदेवाच्या या कार्यक्रमाच्या ड्रेसवर हा दुपट्टा घ्यायचा ना ? त्याचा टिका कुठे आहे? एक ना दोन गोष्टी... गेल्या कित्येक दिवसांपासून अगदी पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे विदिता सगळीकडे फिरत काम करीत होती. अखेर नवरदेवाची बहीण ना ती ! बहिणीला भावाच्या लग्नाचा किती आनंद आणि उत्साह असतो ना !
"हो काकू , बस आलेच एवढं तिकडे ठेवून . आले की लगेच भरते ओटी." हातातलं आहेराच सामान सावरत लगबगीने जात असलेली विदिता किंचित थबकून म्हणाली.
"अग अग, थांब , ऐक जरा. तिकडे जात आहेस ना , त्या रेवतीला आण बोलावून . तिला सांग ओटी भरायला. " खुर्चीवर बसलेल्या शर्वरी काकू बाजूलाच येऊन उभी असलेल्या विदिताकडे बघत उत्तरल्या.
"पण ... काकू , बहिणीने भरायची ना? मग मी भरीन की. " विदिता.
"अग हो, पण पहिल्या मुलाच्या आईने भरायची असते. " शर्वरीकाकू.
"आता ही काय बरं भानगड?" विदिताने काही न कळून विचारले.
"अग, म्हणजे पहिल्या मुलाच्या आईने ओटी भरण्याची आपल्याकडे प्रथा आहे . त्यामुळे रेवती खरं तर जवळच्या नात्यात नाही, पण तिला पहिला मुलगा आहे ना, म्हणून म्हणाले. " शर्वरी काकू उत्तरल्या.
"अच्छा असं आहे का ? माझ्या लग्नाच्या वेळीसुद्धा रेवतीनेच ओटी भरली होती माझी. आठवतंय मला." विदिता.
"हो, तू बोलावून आण तिला. तुला पहिली मुलगीच आहे ना, म्हणून तू नाही ओटी भरायची आज नवरीची." शर्वरीकाकू.
विदिताच्या डोळ्यात टचकन पाणी आले. पण तसे जाणवू न देता ते कसेबसे लपवत, एका हाताने डोळ्यातून ओघळू पाहणारे थेंब त्याआधीच पुसत, ती रेवती बसलेली होती त्या ठिकाणी जाऊ लागली. क्षणापूर्वी असलेला चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह कुठल्याकुठे गुडूप झाला होता, मन दुखावले होते तिचे. का नाही दुखावणार?
विदिता ही विरागची सख्खी मोठी बहीण. जसे विरागचे लग्न ठरले तशी ती उत्साहाने आईच्या खांद्याला खांदा लावून तयारीला लागली होती. मग ती नवरीसाठी साड्या घेणे असो, नवीन, सुंदर डिझाईनचे दागदागिने घेणे असो, मॅचिंग कपडे , त्यासोबत वेगवेगळ्या ॲक्सेसरीज घेणे असो, आमंत्रणाच्या याद्या करणे असो, पाहुणे आल्यावर वेगवेगळ्या दिवशीचा जेवणाचा अन् नाश्त्याचा मेनू ठरवणे असो, की हलवायाला लागणाऱ्या वाणसामानाच्या याद्या करून ते मागवणे असो, सगळीकडे धावपळ करून तिने आईचा लग्नाच्या तयारीचा, कामाचा बराचसा भार हलका केला होता. आईची अन् तिची स्वतःची हौस पुरवत आईच्या आवडीप्रमाणे शक्य तितक्या गोष्टी होतील अशी काळजी ती घेत होती. सोबतच तिच्या सासरच्या घरीही सगळी व्यवस्था नीट राहील याची काळजीही तिने घेतली होती . स्वतःचे ऑफिसच्या कामाचे वेळापत्रक नीट सांभाळून , मुलीच्या शाळा , परीक्षा, लग्नाच्या संगीत कार्यक्रमाच्या वेळी करण्याचे नृत्य यांची तयारीही करवून घेत तिने लग्नाच्या तयारीचाही डोलारा सांभाळला होता. अर्थात हे सगळे करणे तिच्यासाठी इतके सोपे नव्हतेच. दर आठवड्यात आठवडाभर ऑफिस, मग सुट्टीच्या दिवशी खरेदी, घरातली आणि इतर कामे आणि आता लग्नाचीही कामे असे सगळे नियोजन करत, या सर्वांची सांगड घालत, अथक प्रयत्न करत तिने सगळे जमवून आणले होते. प्रसंगी ऑफिसमध्ये सुट्टीसाठी भांडावेही लागले होते तिला. कधी कधी सुट्टीच्या दिवशी ऑफिसचे काम करून तर कधी जास्त वेळ काम करून तिने लग्नासाठी सुट्टी जमविली होती.
"खरंच, माझ्या स्वतःच्या भावाच्या लग्नात एवढाही हक्क असू नये का मला? यासाठीसुद्धा त्या नियमांच्या, रुढींच्या पारड्यात स्वतःला तोलावं लागेल का? माझ्या भावाच्या आणि वहिनीच्या प्रति माझ्या मनातल्या निर्मळ भावनांना , प्रेमाला काहीच अर्थ नाही का? मीही तिला आशीर्वाद आणि शुभेच्छाच देणार होते ना? मीसुद्धा तर एक स्त्री, एक आईच आहे ना? मुलीची आई असली तर काय झालं? मीही मुलीला जन्म देताना तेवढेच कष्ट घेतले आहेत ना? तसंही स्त्रीसाठी तर मुलगा मुलगी काहीही असले तरी सारखेच असते. ती त्याला तेवढ्याच प्रेमाने आपल्या उदरात वाढवते , जन्म देते, जपते. विज्ञान सांगते, की मुलगा होणार की मुलगी , हे तर तिच्या नवऱ्याचे म्हणजेच पुरुषाचे गुणसूत्र ठरवतात. एवढे शिकल्या सवरलेल्या लोकांनीसुद्धा अशा रूढी मानून त्या पाळाव्यात का? तर्कसंगत तरी वाटते का ही परंपरेने चालत आलेली पद्धत?" ती विचार करत जरा थबकली होती.
"विदिता, बोलावतेस ना रेवतीला ?" शर्वरी काकूंचा आवाज आला.
"अं, हो." त्या क्षणी कुठलाही वाद घालणे आणि कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचा रसभंग करणे योग्य नाही हे ओळखून आपली मन:स्थिती सावरत पुन्हा हसऱ्या चेहऱ्याने विदिताने रेवतीला नवरीच्या मंचकाजवळ आणले. रेवतीने नवरीची अर्थात विदिताच्या वहिनीची , राशीची ओटी भरली आणि तो विधी आणि विवाह यथासांग संपन्न झाला. सर्वजण आपापल्या घरी परतले.
परंतु विदिता कित्येक दिवस विचार करत राहिली , ' खरंच ही रूढी जर योग्य असती तर आतापर्यंत अशा पहिल्या मुलाच्या आईने ओटी भरलेल्या सर्व नवऱ्या मुलींना पुढे पहिले मुलगेच झाले असते ना? मग मलाही नसता का झाला पहिला मुलगा ? मला पहिली मुलगी आहे , यात माझी काय चूक ? स्त्रीला नेहमी अशा व्याख्येत, अशा चौकटीत का बसविले जाते ? मुलीची आई, मुलाची आई, निपुत्रिक, विधवा ... का हवीत अशी सगळी विशेषणे ? केवळ एक व्यक्ती , एक स्त्री, एक भावभावना असलेली जिवंत व्यक्ती एवढं तिचं अस्तित्व पुरेसे नाही का? स्त्रीला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपत अशा गोष्टींपासून तणावमुक्त जीवन कधी जगता येईल? अशा अनावश्यक, अर्थहीन रूढींची चौकट ओलांडून पुढे जायला नको का? '
***
वाचकहो, तुमच्याकडे आहे का विदिताच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तर? अशा आणखी कोणत्या रूढी तुम्हाला खटकतात? कमेंट मध्ये कळवा.
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा