चौकट.. रूढींची..
" अग.. दूर हो कार्टे.. मी देवपूजा करते आहे ना? कालच पाळी आली ना तुला? हजार वेळा सांगितले असेल. पाळी आली कि देवाला शिवू नकोस म्हणून.. पण ऐकशील तर शपथ.. वळणंच नाही या पोरीला कसले.." वृंदाताई ओरडत होत्या..
" आजी चिल मार.. मी तुला आणि देवाला शिवायला आले नव्हते.. तर तू हे जे नैवेद्याचे दूध विसरली होतीस ते द्यायला आले होते.." पूर्वा फणकारत म्हणाली..
" तू त्याला शिवलीस?"
"न शिवता आणून द्यायला मी काही जादूगार नाही.. आणि देवाला चालते बरं हे.."
" तुझ्या कानात येऊन सांगितले देवाने?"
" तूच तर म्हणतेस ना, शंकराकडून पार्वतीला मिळालेले वरदान आहे हे. द्रौपदी ऋतुस्नात असताना कृष्णाने तिची मदत केली.. याचा अर्थ देवांना चालते.. तुझ्यासारख्या मानवांनाच चालत नाही.."
" हे बघ माझ्या वडीलधाऱ्यांनी जे नियम आखून दिले ना मी त्यावरच चालते.."
" जाऊदे.. हा आपला न संपणारा वाद आहे.. मी निघते.. तू बस तुझी पूजा करत.. आणि देवाला माझा अशावेळेस केलेला नमस्कार चालतो बरे.. " पूर्वा नाक उडवून तिथून निघून गेली..
" एवढीशी पोर ही.. बोलते बघा किती? " वृंदाताई महेशरावांना बोलल्या..
" तू जाणे आणि तुझी नात जाणे.. मला यात पाडू नका.." महेशराव तिथून पेपर घेऊन निघून गेले..
" जो येतो तो मलाच वेड्यात काढतो.. मी देवाचे करते आहे म्हणून सगळे सुरळीत चालू आहे.. वृंदाताई स्वतःशीच बोलल्या.
" कुसुम , देवाला फुले?"
" तो आपला फुलवाला आजारी आहे म्हणून आला नाही.."
" तो आला नाही म्हणून काय झाले? तुम्ही तर आणू शकता ना?"
" पूर्वा घेऊन आली होती, पाळी असताना आणली म्हणून तुम्हीच नको म्हणालात.."
"जा तू.. मी बघते काय करायचे ते.." वृंदाताई गॅलरीत गेल्या.. तिथे पूर्वाने लावलेली फुलझाडे होती.. वरची अबोली छान फुललेली होती.. कसातरी हात उंचावून त्यांनी ती फांदी धरली.. पण फुलांच्या ऐवजी अख्खी फांदी हातात आली.. त्या थोड्या चपापल्या.. कारण पूर्वाला झाडावरची फुले तोडलेली अजिबात चालायची नाहीत.. त्यांनी तशीच पूजा केली.. पूजेचे पाणी झाडांना घालायला परत गॅलरीत आल्या.. तोवर पावसाला सुरूवात झाली होतीच.. चिंब ओल्या असलेल्या झाडात त्यांनी पूजेचे पाणी ओतले.. तशाच आत गेल्या.. चांदीच्या भांड्यातून पाणी घेऊन नसलेल्या सूर्य देवाला अर्ध्य दिले.. दुसरे झाडही पाण्याने भरून गेले..
" आजी.." गॅलरीत आलेली पूर्वा जोरात ओरडली..
" अग, हे काय करते आहेस? एवढा पाऊस पडतो आहे वरून.. आणि तू अजून पाणी घालते आहेस.."
" मग देवाचे पाणी काय गटारात ओतून देणार?"
" अग पण त्यांना गरज नसताना जास्त पाणी नको ना घालत जाऊस.. म्हणून माझी झाडे मरतात.. आणि मगाशी या झाडाला फुले होती आता फांदी कुठे याची?"
" ती मी फुले घेताना तुटली.."
" आजी.. काय हे ? पहिला बहर होता फुलांचा.. मी किती दिवस वाट पहात होते.. आणि फांदीवर फुले राहिली असती ना अजून काही दिवस.. तू वाहिलेल्या फुलांचे उद्याच निर्माल्य होईल ना?"
" पूर्वा मला शिकवू नकोस.." आजी ओरडली.. पूर्वा अजून बोलणार होती. पण तिने आईचे डोळे वाचले.. आणि ती गप्प झाली.. दिवस जात होते. वृंदाताईंचे सनातनी वागणे वाढतच चालले होते.. सगळ्यांनाच त्याचा त्रास होत होता.. पण वयात आलेल्या आणि स्वतःची मते असलेल्या पूर्वाला ते जास्तच खटकायचे.. आईबाबांच्या धाकामुळे ती जास्त बोलू शकत नव्हती.. तिला सांगायचे होते आजीला कि तू चुकीचे वागते आहेस.. नशीबाने तशी संधी तिला लवकरच मिळाली. एका कामासाठी तिचे आईबाबा गावाला गेले होते.. पूर्वा, आजी आणि आजोबा तिघेच घरी होते.. आजीला अचानक जुलाब सुरू झाले..
"पूर्वा, ए पूर्वा.. जरा आपल्या डॉक्टरांना फोन कर ग.." आजोबांनी सांगितले.
" कशाला आजोबा? आजीच्या बटव्यात औषधे असतील. त्यातलीच देऊ या. नाहीतरी ती आपल्या वाडवडिलांनी लिहून ठेवलेली औषधे आहेत. बरोबर ना आजी?" आजीने मान हलवली. औषधं घेऊनही तिला बरे वाटले नाही.
" कर ग बाई एकदाचा डॉक्टरला फोन. जीव नकोसा झाला आहे माझा."
" पण आजी तुझी पारंपरिक औषधे?"
" फरक पडत नाही दिसतो आहे ना तुला? मग का अंत बघते आहेस माझा?" काहीच न बोलता पूर्वाने आतून औषध आणून दिले.
" कालच जेव्हा तुझी सुरुवात झाली होती तेव्हाच मी डॉक्टरांना सांगून औषध आणून ठेवले होते.."
" मग देत का नव्हतीस. निष्ठुर कुठली." आजीने औषध घेतले. थोडे बरे वाटल्यावर लगेच पूर्वाने आजीला नारळपाणी दिले..
" अग आत्ताच तर पिऊन झाले ना माझे?"
" तरीही.. घे थोडेसेच आहे.."
"अग पोट फुटेल माझे हे पाणी पिऊन."
"असे कसे फुटेल? साधं पाणीच तर आहे.."
" हो पण माझे पोट लहान आहे ना.. किती साठवणार त्यात मी?"
" तेच मला तुला सांगायचे आहे.. तू जेव्हा पाणी पिऊन तृप्त झालेल्या माझ्या झाडांना नको तेव्हा उगाचच पाणी घालतेस तेव्हा असे नाही का वाटत ती झाडे अतिपाण्याने मरतील? मागच्या वर्षी माझी दोन झाडे तू पाणी घालून मारली होतीस.. आणि ते पाणी गटारात ओतू का असे तू विचारलेस, पण मी झाडे लावायच्या आधी तू बेसिनमध्येच ओतत होतीस ना?"
वृंदाताई विचार करत होत्या..
" अजून एक गोष्ट.. खरेतर मला बोलायची नव्हती.. पण बोलल्याशिवाय रहावत नाही.. तुला पाळी आल्यावर देवाला शिवलेले चालत नाही.. मला माझे बालपण आठवते.. आई जेव्हा बाजूला बसायची तेव्हा तू स्वयंपाक करायचीस.. आता तुला होत नाही मग आईच्या हातचा स्वयंपाक चालतो.. असे का? खरेतर आम्ही दोघीही अशावेळेस खूप स्वच्छता पाळत असतो.. ती देवाला चालत नाही.. आणि त्या दिवशी तुझ्याच सांगण्याप्रमाणे तू बाथरूमला जाऊन आल्यावर हात न धुता तशीच देवापाशी गेलीस.. ते देवाला चालते?
नंतर तीच गोष्ट तू तुझे म्हातारपण या नावाखाली हसण्यावारी नेलीस? हे देवाला चालते? जुन्या रुढी परंपरा पाळायला पाहिजे असे म्हणतेस.. मग मला सांग जुन्या काळातल्या बालविवाह, सती, केशवपन या रूढी चांगल्या होत्या?"
" बरोबर बोलते आहेस तू पूर्वा.. हिचे कसे झाले आहे. हिला पटतात त्या गोष्टी रूढी म्हणून हि पाळणार.. नाही आवडत त्या चालीरीतींच्या नावावर दडपणार.." आजोबा म्हणाले..
" आजी देव भक्तीभावाचा भुकेला असतो.. या बुरसटलेल्या वाईट रूढींचा नाही ग.." पूर्वा म्हणाली..
" बरोबर आहे.. आज तू माझे डोळे उघडलेस.. या रूढींच्या चौकटीतून बाहेर येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तुम्ही सगळे मला मदत कराल ना? आजींनी विचारले. आजोबा आणि पूर्वाने हसत होकार दिला..
कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई