चौकट ♦️♦️♦️ भाग 2

अशीही एक चौकट!

चौकट भाग पहिला येथे वाचा.
चौकट ♦️♦️♦️

मागील भागात आपण पाहिले की विराग आणि राशीचा विवाहसमारंभ पार पडला. त्यात राशीच्या ओटी भरण्याच्या विधीच्या वेळी विदिताला काहीतरी खटकले आणि त्यानंतर विदिता विचार करत राहिली होती, ' खरंच ही रूढी जर योग्य असती तर आतापर्यंत अशा पहिल्या मुलाच्या आईने ओटी भरलेल्या सर्व नवऱ्या मुलींना पुढे पहिले मुलगेच झाले असते ना? मग मलाही नसता का झाला पहिला मुलगा ? मला पहिली मुलगी आहे , यात माझी काय चूक ? स्त्रीला नेहमी अशा व्याख्येत, अशा चौकटीत का बसविले जाते ? मुलीची आई, मुलाची आई, निपुत्रिक, विधवा ... का हवीत अशी सगळी विशेषणे ? केवळ एक व्यक्ती , एक स्त्री, एक भावभावना असलेली जिवंत व्यक्ती एवढं तिचं अस्तित्व पुरेसे नाही का? स्त्रीला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपत अशा गोष्टींपासून तणावमुक्त जीवन कधी जगता येईल? अशा अनावश्यक, अर्थहीन रूढींची चौकट ओलांडून पुढे जायला नको का? '

काही दिवसांतच राशी आपल्या सासरी रुळली होती. सगळे स्थिरस्थावर झाले होते. अशातच एक दिवस विदिता आणि तिची आई विशाखा , फोनवर बोलत असताना लग्नाच्या वेळी ओटी भरण्याच्या विधीचा विषय निघाला . तेव्हा विदिताने आईकडे तिच्या मनात झालेली खळबळ व्यक्त केली. 

"हो . खरंय तुझं म्हणणं. त्या दिवशी तू तिथे वाद घातला नाहीस ते योग्यच केलंस. खरं सांगायचं तर आम्ही कधी विचारच केला नाही याचा. आपण कधी विषय निघाला तर बोलू या शर्वरीकाकूंशी. तेव्हा हळुवारपणे तुझं मत मांडशील त्यांच्याकडे. " विशाखाताई विदिताला म्हणाल्या.

"हो . ठीक आहे. काकू खूप प्रेमळ आहेत ना ग, तू काळजी करू नकोस. मी त्या दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेईन." विदिता .

त्यानंतर वर्षभराने त्यांना तशी संधी मिळाली सुद्धा.
काही महिन्यांनंतर राशीने गोड बातमी दिली होती. सातव्या महिन्यात विशाखाताईंनी डोहाळजेवणाचा कार्यक्रम करण्याचे निश्चित केले. विदिता, शर्वरी काकू आणि सर्व नातेवाईकांना आमंत्रण दिले होते. ठरल्याप्रमाणे विदिता तयारीसाठी एक दोन दिवस लवकर आली आणि तितक्यात शर्वरी काकूही आल्या.

"अगबाई विदिता, आलीस होय तयारीला ? बरं केलंस ग. आता बघ कसं घर दणाणून गेलंय. तुझ्याशिवाय कसं चालायचं? लग्नाच्या वेळी नाही का , केवढी धावपळ करत होतीस , भिंगरी लागली होती जणू पायाला!" शर्वरी काकू विदिताचे कौतुक करत म्हणाल्या .

तेवढ्यात राशीने त्यांना विशाखाताईंनी राशीसाठी आणलेली हिरवी साडी आणि त्याला अनुरूप असे विदिताने आणलेले  फुलांचे सुरेख दागिने दाखवले.

"अगबाई, कित्ती सुंदर! राशीच्या चेहऱ्यावरचं आलेलं तेज आणि त्याला आणखी खुलवणार ही साडी अन् हे दागिने. छान रंगणार बघ आपला सोहळा."

अशाच गप्पा रंगल्या असताना पुढे विषय निघाला तर विदिताने काकूंना विचारले.

"काकू, आपल्याकडे पहिल्या मुलाच्या आईने ओटी भरण्याची पद्धत का आहे?"

"का आहे ... ते तर काही माहिती नाही. अग आम्ही कधी असं काही विचारलंच नाही. जे सांगितलं तसं केलं. बहुधा त्यामागे जिची ओटी भरली जातेय तिला मुलगा व्हावा अशी अपेक्षा आणि भावना असावी." काकू.

"काकू , खरं तर मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे स्त्रीच्या हाती नसतेच मुळी." विदिता.

"काय? म्हणजे कसं?" काकू.

"म्हणजे , विज्ञान असं सांगतं, की जन्माला येणारे बाळ मुलगा की मुलगी, हे त्याच्या वडिलांच्या गुणसूत्रावरून ठरते. आईच्या नव्हे. स्त्रीकडे फक्त एक्स  गुणसूत्र असतात आणि पुरुषाकडे एक्स आणि वाय ही दोन्ही गुणसूत्रे असतात. दोघांची एक्स एक्स गुणसूत्रे एकत्र आली तर बाळ मुलगी म्हणून जन्माला येते आणि जर दोघांची एक्स आणि वाय गुणसूत्रे एकत्र आली तर मुलगा होतो. मग आता सांगा बरे मुलगा होण्यासाठी कोण जबाबदार असते? " विदिता समजावून सांगत होती.

"अगबाई, मग तर पुरुषच जबाबदार आहेत की. मग बायकांना उगाच नावं ठेवल्या जातात म्हणायची."

"तेच म्हणतेय मी काकू, आणि असं मुख्यतः करतात कोण ? तर त्याही स्त्रियाच असतात. आणि तुम्हीच सांगा काकू, स्त्रीनेच स्त्रीला समजून घ्यायला नको का? आपल्यासारखीच भावभावना असलेली एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीकडे का पाहू नये? अशा रुढींमुळे खरोखर हक्क असलेल्या जवळच्या प्रेमाच्या माणसांना डावलले जाते, उगाच मने दुखावल्या जातात ना ? सगळ्याच जुन्या रूढी चुकीच्या असतात असेही नाही. पण मग मने दुखावून अशा या रुढी पाळण्याला काही अर्थ उरतो का?"

"खरंय ग तुझं म्हणणं, बाळा. " शर्वरीकाकू म्हणाल्या आणि त्यांनी मनाशी काहीतरी निश्चय केला.

कार्यक्रमाच्या दिवशी सकाळीच विदिताने एकदोघांना हाताशी घेऊन सजावटीला सुरुवात केली. भिंतीवर फिकट आकाशी रंगाचा तलम पारदर्शक पडदा लावला. त्यावर  निळ्या पांढऱ्या ढगांचे आकार सजवले. चमकदार चंदेरी चांदण्या त्या आकारात कापून अध्ये मध्ये लावल्या. त्याच्या जवळपास छोटे छोटे लाईट्स लावले. त्यासमोर  हरणाची एक जोडी ढगांमधून चंद्रकोरीच्या आकाराच्या रथाला ओढते आहे अशी सुंदर सजावट केली. चंद्रकोरीच्या रथामध्ये राशीला बसता येईल अशी व्यवस्था करून ते संपूर्ण दृश्य जांभळ्या गुलाबी रंगाच्या प्रकाशाच्या झोतांनी उजळून टाकले.

समारंभ सुरू झाला. आसपासच्या , ओळखीतल्या आणि नातेवाईक असलेल्या बऱ्याच स्त्रिया आल्या होत्या. लाल सोनेरी काठांची गर्द हिरवी पैठणी नेसलेली राशी फुलांचे दागिने घालून साजशृंगार करून रथामध्ये बसली होती.

विशाखाताई आणि शर्वरीकाकू दोघीही तिचे ते सुंदर तेजस्वी रूप आणि तो सुंदर देखावा पाहून अत्यंत आनंदित झाल्या होत्या.

" विशाखा, बाई, दृष्ट काढायला हवी ग दोघी पोरींची. एक गर्भारपणाचे तेज ल्यालेली अन् दुसरी मायेने, स्नेहाने, आस्थेने, सारं करणारी. आण , मीच काढते दृष्ट." शर्वरीकाकू म्हणाल्या.

होता होता ओटी भरण्याची वेळ आली. तसे विशाखाताईंची  नजर इकडेतिकडे कोणाला तरी शोधू लागली.

ते ओळखून शर्वरीकाकू लगेच पुढे होत मोठ्याने सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाल्या,

"राशी, इथे तुझी ओटी भरण्याचा पहिला मान तुझ्या सासूचा बरं का आणि मग विदिताचा. चालेल ना ग राशी तुला? "

"हो तर. मला एवढा जीव लावणाऱ्या सासूबाई आणि नणंद मिळाल्या आहेत ! तर हा मान त्यांनाच मिळायला हवा." राशी उत्तरली.

उपस्थित बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली. तिकडे शर्वरीकाकूंचे लक्ष होतेच. त्यांना अंदाज होताच तसा.

"अहो पण, मी कशी? मी तर विदिताची आई झाले ना पहिल्यांदा. म्हणजे पहिला मुलगा नाही ना मला... तुम्हीच मला सांगताय... " विशाखाताई हळूच म्हणाल्या.

"हो हो, माहिती आहे मला. तरीसुद्धा मी हेच सांगणार आहे. कारण ... मुलगा होणे वा मुलगी होणे हे स्त्रीच्या हाती नसतेच मुळी. तिची कूस तर दोघांसाठीही सारखीच ! कळलंय आता मला आणि पटलं सुद्धा आहे."

असे म्हणत विदिताने समजावून सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी उपस्थित स्त्रियांनाही सांगितल्या. त्यांनाही ते पटले. मग काय !

"चला चला , विशाखावहिनी , ओटी भरा. " एकजण म्हणाली.

मग विशाखाताई आणि त्यांच्यापाठोपाठ विदितानेही आनंदाने ओटी भरून राशीला आणि होणाऱ्या बाळाला आशीर्वाद दिले. आणखी पाहुण्या बायकांनीही आज न संकोचता मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

विशाखाताईंनी आनंदाने सुंदरसे गाणेही गायले. आणखी काही गाणी आलेल्या पाहुण्यांपैकी दोघीतिघींनी गायली. राशी हा कौतुक सोहळा अनुभवून खूप सुखावली होती . त्यात तिच्या लाडाच्या नणंदेच्या आणि प्रेमळ सासूबाईंच्या चेहऱ्यावर आज जो आनंद दिसत होता त्यामुळे तिलाही खूप समाधान वाटत होते. राशी आणि विशाखाताईंच्या आनंदाला आणि उत्साहाला तर उधाण आले होते. भरपूर आठवणी फोटो काढून त्यात कैद करण्यात आल्या. जेवणखाण , खेळ इत्यादी होऊन समारंभ छान रीतीने पार पडला.

आज एका अनावश्यक रूढीच्या चौकटीला भेदून प्रेम आणि जिव्हाळ्याचा विजय झाला होता.

समाप्त

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

मागील भागाला दिलेल्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद. कथा कशी वाटली ते लाईक्स कमेंट्स च्या माध्यमातून अवश्य कळवा.