चिऊताई चिऊताई दार उघड

Story Of Sparrow And Crow


"चिऊताई चिऊताई दार उघड"

थांब माझ्या बाळाला नाहू घालू दे... शाळेत जाऊ दे...डॉक्टर होऊ दे...माझ्या बाळाचं लग्न होऊ दे...नातवंड होऊ दे...
थांब माझ्या नातवाला नाहू घालू दे.....

"अगं चिऊताई, मी तर थांबेनच गं, पण तू किती धावशील ! थांबायची खरी गरज तर तुला आहे . ह्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा वेळ स्वतःसाठीदेखील काढ गं बाई ! कामाच्या रामरगाड्यात स्वतःला हरवू देऊ नकोस !"

चिऊताईच्या मनाचं दार ठोठावणारा हा कोणी कावळा नसून तिचा "आतला आवाज" होता !!

आता मात्र चिऊताईनं दार उघडण्याचा निर्णय घेतला!!!

***********************************************

"चिऊताई चिऊताई दार उघड"
"थांब माझ्या बाळाला नाहू-माखू घालू दे..."

"चिऊताई चिऊताई दार उघड"
"थांब माझ्या बाळाला जेऊ घालू दे..."

"चिऊताई चिऊताई दार उघड"
"थांब माझ्या बाळाला झोपवू दे... "

"चिऊताई चिऊताई दार उघड"

आता बाळ झोपी गेलं होतं.चिऊताईनं दार उघडलं... कध्धीचा वाट पाहणारा कंटाळा जांभई देत आत आला.

चिऊताईनं कंटाळयाला कवेत घेतलं अन् गाढ झोपलेल्या बाळाला गोंजारत मोबाईल हातात घेतला अन् ईरावरच्या कथा वाचत मस्त ताणून दिली !!!

*********************************************

"माझं शेणाचं घर वाहून गेलंय.चिऊताई दार उघड! मला तुझ्याकडेच राहू दे !"

"मग मी काय करू? तुझी सोय तू बघ. सारखा त्रास नको देऊस." चिऊताईनं जवळजवळ झिडकारलं कावळ्याला.

कावळा हिरमुसला अन् चिऊताईच्या घरून निघाला.
"ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवली चिमणीनं ! अशी मैत्री काय कामाची? मी आता कधीच बोलणार नाही तिच्याशी. आमची मैत्री तुटली."

कावळा तिथून निघाला. रात्रंदिवस एक करत काटक्या-कापूस वेचून जिद्दीनं नवीन घरटं उभारलं...

"तू त्याला लपून-छपून मदत करतेयस पण त्याच्या मनात अजूनही राग आहेच" चिमण्यानं चिमणीला म्हटलं.

"असू देत.पण त्यानं असं लाचार होऊन जगणं नसतं आवडलं मला. त्याने मैत्री तोडली तरी चालेल पण जिद्द आणि  स्वाभिमान सोडू नये!

चिमणीने खऱ्या अर्थानं मैत्रीचा धर्म निभावला होता !

***********************************************

"चिऊताई चिऊताई दार उघड"

चिमणीनं दार उघडलं.कावळा घरात आला.

कावळ्यानं त्याच्या लॅपटॉपवर "दोन वर्षात पैसे दुप्पट"ची स्कीम चिमणीला समजावून सांगितली अन् त्यात पैसे गुंतवण्याचा आग्रह केला.

चिमणी हुशार होती.जगातली कुठलीही संस्था दोन वर्षात दामदुप्पट देत नसते हे तिला ठाऊक होते.

तिनं ह्या नकली योजनेत पैसे गुंतवण्याचे नाकारले अन् कावळ्याला लोकांची फसवणूक न करण्याबद्दल बजावले.

कावळ्याने चूक कबूल केली अन् मिळणाऱ्या कमिशनपोटी तो लोकांना फसवत असल्याचे सांगितले.
चिमणी स्वतः विमासल्लागार होती.तिनं कावळ्याला उत्पन्नाचे साधन म्हणून LIC ची एजन्सी घेण्यास सुचवले.LIC त ग्राहकांसाठी खात्रीशीर गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध आहेत त्याची माहिती कावळ्याला दिली.विम्याच्या व्यवसायापोटी त्याला आकर्षक कमिशनही मिळणार होते.

कावळा आता एक यशस्वी विमाएजंट बनला आहे !

**********************************************