चित्रकला स्पर्धेचा निकाल

चित्रं काढण्यात रस असणाऱ्या मुलाचे निरागस विश्वाचे गोड दर्शन
     

आज शाळेतून येतांना मला पाण्याचं एक  डबकं दिसलं. त्या डबक्यातल्या पाण्यावर  तेल सांडलेलं होतं. आणि त्या तेलावर प्रकाश पडून इंद्रधनुष्य तयार झालं होतं. ही गोष्ट फक्त माझ्याच लक्षात आली होती. म्हणून मी सुरेशला हाक मारून ती दाखवली.

सुरेश माझा मित्र आहे पण थोडा लबाड मुलगा आहे. लबाड म्हणजे थोडासा चांगला नाही. त्याला गणित विषय खूप आवडतो तर मला चित्रकला. त्या मुळे आम्ही चांगले मित्र आहोत. तो फक्त गोड गोड बोलतो पण वेळेवर  कल्पना पण येणार नाही असा फसवतो. मी कितीतरी वेळा फसलो आहे. पण तरी त्याच्या गोड  बोलण्याने कुणास ठाऊक त्याच्यावर माझा पटकन  विश्वास पण बसतो. तसा तो चांगला पण आहे. एकदा त्याने मला गणिताच्या पेपरला परीक्षेत उत्तरं पण सांगितली होती. सगळी चुकली होती. तो म्हणाला होता. त्यालाच येत नव्हती. पण तरीही त्याने मित्र म्हणून मला दाखवली होती.पण त्या वेळी गणितात तो पास झाला होता पण मी नापास. हे कसं झालं होतं तेच मला समजलं नव्हतं. म्हणजे असा तो चांगला पण वागतो. म्हणून माझा मित्र आहे.

पण कधी कधी उगाचच त्रास देतो. मला त्रास द्यायला त्याला आवडते असं तो म्हणतो.  तो माझ्या भोळे पणाचा बऱ्याच वेळा बेमालूम पणे फायदा घेतो. आताही असंच झालं मी त्याला ते इंद्रधनुष्य दाखवलं तेंव्हा त्याने खूप बारकाईने पहिल्या सारखं केलं. कदाचित त्याला दिसलं नसावं.तो म्हणाला,

" अरे अशोक, कमाल आहे बुवा. मला तर काहीच दिसत नाही. माझी आजी म्हणते जी माणसं पुण्यवान असतात. त्यांनाच पाण्यातलं इंद्रधनुष्य दिसतं.आणि जे या इंद्रधनुष्याला हात लावतात .त्यांना रंग सिद्धी प्राप्त होते. "

" रंग सिद्धी म्हणजे काय.? " माझा वेंधळा प्रश्न.

" अरे रंगसिद्धी म्हणजे समोरच्या वस्तूला आपल्या मनात असेल तो रंग दिसायला लागतो. आता तूला कावळ्याचा काळा रंग आवडतं नसेल ना तर तुझ्या मनात असेल तो रंग त्याला देता येतो. "

" तू आता असं कर ना, त्या पाण्यातल्या इंद्रधनुष्याला पटकन हात लावून ये. नाहीतर ते नाहीसं होऊन जाईल. कारण ते जास्त वेळ राहात नाही. "

मी लगेच त्याच्या जवळ दप्तर दिलं. आणि पाण्याजवळ जाऊन त्या रंगाच्या इंद्रधनुष्याला हात लावण्या साठी खाली वाकलो. तर तेव्हढ्यात या बदमाशाने मला पाण्यात ढकलून दिले. आणि मी पूर्ण चिखलाने भरलो तेंव्हा खो खो हसत घराकडे पळून गेला.

मी रडत रडत घरी गेलो. तर आजीने उलट मलाच रागावले.
आजी मला मूर्ख म्हणते. खरं तर मी त्या इंद्रधनुष्याला शिवल्या नंतर आजी साठी काय काय गमती जमती  करणार होतो. पण कोणाचाच माझ्यावर विश्वास बसत नाही.

परवा आमच्या शाळेत  चित्रकला स्पर्धा होती. मी, सुरेश, आणि शाळेतले बहुतेक सगळ्या मुलांनी  त्यात भाग घेतला होता.

तुम्हाला तर माहितीच आहे की मी छान चित्रं काढतो . मला चित्रं काढायला खूपच आवडत म्हणून मी अगोदर पेन्सिलीने चित्रं काढून घेतलंहा होतं. छान डोंगर, सूर्य, नदी, घर, एक पायवाट काढली होती. आकाशात सूर्य उगवत होता. पक्षी उडत होते. असं ते मस्त चित्र होतं. आणि मी रंग भरायला सुरुवात करणार एव्हढ्यात मला दिसलं की सुरेश रडतो आहे. माझं मन कळवळल.

" काय झालं रे ? "मी विचारलं.

" अरे अशोक, मला चित्र काढताच येत नाहीये. मला मदत कर ना प्लीज." सुरेश म्हणाला.

त्यात काय मोठी गोष्ट आहे; असं म्हणत मी त्याला मदत करायला पुढे सरसावलो.

मग आम्ही दोघ मिळून चित्रं काढायला लागलो.

सुरेश म्हणाला, "आपण बागेचं चित्र काढू या. "

मग तो सांगायचा आणि मी कागदावर तसं त्या  गोष्टीच चित्र काढायचो.

" हे बघ. बागेत फुलं, झाडं, गवत दाखव. "

मी लगेच काढून दाखवलं.

"आता मध्य भागी एक तलाव काढ." सुरेश म्हणाला आणि मी लगेच काढला.

" तलावात एक नावं दाखव. पाण्यात कमळ आणि मासे दाखव. " सुरेश सूचना देत होता आणि मी तस तस् चित्रं काढत होतो.

" आता थोडं प्राणी पण दाखव, हत्ती, हरीण, जिराफ, आणि झाडावर माकडं वगैरे.. "सुरेश च्या सूचना.

" हा, हे बघ. प्राणी पण काढलेत." माझा आज्ञाधारक पणा .

" झाडावर झोपाळा पण दाखव ना."

" हा, हे बघ झोपाळा काढला. " लगेच झोपाळा तयार.

" आता छान एक पायवाट काढ."
लगेच पायवाट तयार.

" त्या पायवाटेवर बसायला बाक दाखवना गड्या. " सुरेशची विनंती.

" हो, हे बघ दाखवलं. "

" आता मुलं बागेत खेळतांना दाखव."

"दाखवली बघ." मला सुरेशच्या कल्पना शक्तीच आश्चर्य वाटायला लागलं. तो सांगेल तस मी चित्रं काढण्यात मी त्या बागेच्या चित्रात एव्हढा रंगून गेलो की मला कसलं  भानच उरलं नाही. मग पुढे सरसावून आम्ही दोघांनी मिळून,  म्हणजे मीच ते चित्र झकास रंगवून टाकलं.

हिरवी झाडं. रंगीबेरंगी फुलं. ते छान छान झोपाळे. ते रंगीत प्राणी. वा वा, काय मस्त दिसत होती ती बाग.

या गडबडीत, जेंव्हा आमची चित्रं जमा केली गेली तेंव्हा मला लक्षात आलं की अरेच्या माझं चित्रं तर अर्धवटच राहून गेलं होतं. म्हणजे काढलं होतं पूर्ण, पण  रंगवायचंच राहून गेलं होतं की.

निकाल लागला.
सुरेशच्या बागेच्या चित्राला पाहिलं बक्षीस मिळालं.
मला काहीच नाही वाटलं त्याच.

आजीला मी समजावून सांगितलं की ,"आजी बक्षीस जरी सुरेशला मिळालं तरी खरं ते मलाच मिळालं आहे. "

पण आजीला ही गोष्ट लक्षातच येत नाही. ती म्हणते मी मूर्ख आहे. आता तुम्हीच सांगा.
हो, ही गोष्ट माझ्या पण लक्षात आली नाही की  जर चित्रं मी काढलं होतं तर सुरेशला कसं काय पाहिलं बक्षीस मिळालं होतं. अजूनही ही गोष्ट माझ्या अजून लक्षात येत नाही.