चित्रपटांचे तरूणाईवर होणारे दुष्परिणाम अंतीम भाग

तरूणाईला कशी चित्रपटांमुळे भरकटते ह्याची उदाहरणे



चित्रपटांचे तरूणाईवर होणारे दुष्परिणाम

वादविवाद स्पर्धा

संघ - मुंबई.

*पिक्चर रांझना*: अल्लड सोनमच्या सतत पाठी पाठी फिरणारा धनुष.
मुलगी शेवटी वैतागुन हो म्हणते कारण मुलगा जीव देण्याची धमकी देतो.

*पिक्चर डर*: ..क..क..किरन.कोण विसरेल सायको शाहरूखच्या त्या अदाकारीला. "तुम मेरी नही तो किसकी नही".हे त्याच फेमस वाक्य. त्याला चित्रपटात एवढं मोठं केल गेलं की आपण शाहरूख याला हिरोईनला घाबरवताना पाहुनही राग येण्याएवजी आपण उत्साहीत होतो.

*पिक्चर पुष्पा* :श्रीवल्लीच्या पाठी पाठी फिरणारा, पाच हजार रूपये देऊन किस मागणारा हिरो.ज्याला ती चित्रपटात शेवटी तू मला आवडतो म्हणुन होकार देते.


काय संदेश जातो ह्याने.मुलीचा नकार आहे तर तिला छळा, तिचा पाठलाग करा, तिला विकत घ्यायचा प्रयत्न करा. अगदी साम, दाम, दंड असं काहीही करा, पण तिचा होकार मिळवा कारण मुलगी नकार देऊच शकत नाही. हे असे पिक्चर स्त्रीला माणुस म्हणुन न दाखवता वस्तू सारखं दाखवतात.त्यातुनच झारखंड, दिल्ली, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि अनेक राज्यात एकतर्फी प्रेमातून अंकिता ,प्रियंका ,निकिता, रिंकु पाटील जाळल्या किंवा मारल्या जातात.

पाठीमागे सतत फिरणारा,फोन करून त्रास देणारा म्हणजे मजनु ,रोमिओ टाईपचा असा व्यक्ती चित्रपटात एवढं सहज आणि रोमँटिक पद्धतीने दाखवला जातो की तरूणाईला वाटतं मुलींचा नकार हा नकार नसतोच किंवा आपण त्यांना छळणं हे ही प्रेम व्यक्त करण्याचा एक आविष्कारच आहे.त्यांच्या खूप मानसिक आणि शारीरिक, भावनिक, पातळीवर बदल तर होत असतात त्यात ते विरुद्ध लिंग व्यक्ती आणि लैंगिक आकर्षण वाढत असतं.खासकरून मुले, ती जर एखाद्या मुली किंवा प्रौढ स्त्रीकडे आकर्षीत झाले तर कोठल्याही टोकाला जातात.

तिच्या त्या मुलांबद्दल प्रेम भावना आहे का ?तिच वयं कमी किंवा खुपच जास्त आहे का ? तिची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे ?ह्याच्याशीही त्यांना घेण देण राहत नाही.अगदी लग्न झालेल्या स्त्रियाही ह्या त्रासापासून सुटत नाही.तिचे अश्लिल विडियो तयार करणे आणि ते वायरल करण्याची धमकी देणे, मुलीचे फोटो फोटोशॉप करून नाही ते उद्योग करणे असे अनेक प्रकार मुले करतात.ज्यातून पुढे गुन्ह्याची मालिका तयार होते.

ज्याचे उत्तम उदाहरण *दृष्यम*:
ज्यात तब्बुचा मुलगा, अजय देवगणच्या मुलीचा आंघोळीचा विडिओ काढतो नंतर तिला ब्लॅकमेल करतो.तिची आई हातापाया पडल्यावर तिच्याकडे सेक्स डिमांड करतो.ज्यात मुलीची लाज वाचवायला म्हणुन आई मुलगी त्याचा जीव घेतात आणि त्यातही हिरो म्हणुन दाखवलेला गुन्हेगार अजय देवगणही चित्रपटांतून आयडीया घेऊन स्वत:च्या गुन्ह्यावर पांघरूण घालतो आणि ह्याच चित्रपटावरून प्रेरणा घेऊन एका बिझनेस मॅननेही आपल्या प्रेयसीचा खुन केला होता.


जर दृष्यममध्ये त्या मुलाने असं केलं नसतं तर त्याचा जीवही गेला नसता,पण मुलांना हे समजत नाही.त्यांना मात्र अश्या चित्रपटांमुळे आपल्या आवडत्या व्यक्तिला मिळवण्यासाठी मात्र नवीन विकृत आयडिया मिळतात.

अश्यावेळी ह्या आकर्षणाच्या समाधानासाठी चित्रपटात दाखवलेल्या चुकीच्या गोष्टीही बरोबरच वाटू लागतात. ज्याचं उदाहरण आहे, *चित्रपट ये जवानी है दिवानी*.


चित्रपट *ये जवानी है दिवानी* :ट्रेनमधील एक दृष्य.नयना जी सालस अभ्यासू मुलगी आहे, तिला सोडुन प्रत्येक जण काहीतरी असभ्य वागला आहे.
ज्याचे त्या सिनमध्ये एवढं उदात्तीकरण केल आहे कि ज्यामुळे तिलाच स्वत: मध्ये काहीतरी कमतरता जाणवते आणि तिचा आत्मविश्वासही कोसळतो.

ह्या अश्या चित्रपटांमुळे तरूणाईला असं वाटतं की असभ्य वागणं, खोट बोलणं, पैसे चोरणे ह्या एकदम धाडशी गोष्टी आहेत.जो हे करत नाही तो मिळमिळीत व्यक्तिमत्वाचा आहे. मग आपल्यालाही नयना सारखं कोण मित्र नसणार आणि जर आपण असे वागलो तर आपल्या मित्र मैत्रिणी ह्यांच्या समोर आपण कूल दिसू किंवा आपला स्वॅग तयार होईल म्हणजेच आपण आपल्या लाडक्या हिरो प्रमाणे दिसू.

चित्रपट सृष्टीतील कलाकारांना मिळणारे अतोनात महत्व आणि पैसा ह्यामुळे कित्येक मुलं मुली हिरो किंवा हिरोईन बनण्यासाठी घरातून पळुन मुंबई, हैद्राबाद यांसारख्या सिनेमा बनवणाऱ्या शहरात पळुन येतात.

आधीच त्यांना चित्रपट व्यवसायाबद्दल काही माहिती नसल्यामुळे अनेक गुन्हेगार गिधाडांसारखे ह्या अबोध मुलींना व मुलांनाही वेश्याव्यवसाय,ड्रग पँडलींग यांसारख्या चक्रव्यूहात अडकवून टाकतात. लहान मुले जी आपल्या लाडक्या सिनेस्टार भेटायला घरातून न सांगता पळुन येतात, त्यांना तर कित्येकदा भीक मागण्याच्या धंद्याला देखील लावलं जातं.

\"मर्दानी\", \"पिंक\",\"लिपस्टिक अंडर माय बुरखा\",\"तारे जमिन पर\" यांसारखे चित्रपट समाज प्रबोधनही करतात, पण त्यांची संख्या हातावर मोजण्याएवढीच असते.

तसच मला तुम्ही सांगा, "रांजना\"चित्रपटातील किंवा "डर" सिनेमातीलमधील कोण तुम्हाला जास्त आवडलं हिरो म्हणुन.तुमचं पहिलं उत्तर हिरोईनला सतवणारा व शेवटी मरणार विलनचं  जो दिसतो एक हिरोच. 

धनुष जो सोनमची मर्जी न विचारता तिला मिळवायला तिच्या पाठी पाठी करतो का अभय देओल जो तिच्या मनाचा व मतांचा सम्मान करतो.

*डर* किंवा *बाजीगर* म्हटलं की शाहरूखच कूल वाटतो. जर तो व्हिलन असला तरी कारण त्याच्या वाईट वागण्याचं केलेलं उदात्तीकरण.

हे झाले थेटरमधील चित्रपट. ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या चित्रपटाबद्दल न बोलणंच चांगलं. शिव्या, अश्लिलता आणि मारामारी ह्याने ह्यांच्या सिनेमाचे विषय भरलेले आहेत.मग ते गँग्स ऑफ वासेपुर' असो, 'अपहरण', 'सॅक्रेड गेम्स' किंवा इतर मालिका.ज्या तुम्ही पुर्ण कुंटुबाबरोबर पाहुच शकत नाही, मग ही तरूणाई चित्रपटातून काय चुकीचं आहे, जे टाळायला हवं ह्याच मार्गदर्शन कसं घेणार. त्यांना तर आपल्या कुंटुबासोबतही हे चित्रपट बघताना लाज वाटते.

मनोवैज्ञानिक सांगतात की जर तुम्ही एखादी गोष्ट सतत बघत राहिलात तर तुमच्या सुप्त मनावर तिचा प्रभाव पडतो.अश्या चित्रपटात कोणालाही मारण अगदी सहज दाखवलं जातं.ज्यामुळे तरूणाई गुन्ह्यासाठी उद्युक्त होतेच, पण केलेल्या गुन्ह्यानंतर आपण चुकीचं केलंय ह्याची जाणवही मनात राहत नाही.
जसं हल्लीच उदाहरण देते, *के.जी.एफ.*पिक्चर पाहून त्यापासून प्रेरीत होऊन रॉकी भाई स्टाईल एका माणसाने पाच सिक्युरिटी गार्ड ह्यांचा खून केला आणि तो माणुस फक्त एकोणीस वर्षाचा मुलगा आहे.

तसेच चुकीचा इतिहास दाखवणं हे तर चित्रपटांच वैशिष्ट्य आहे. जसं 'तानाजी', 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी 'ह्या चित्रपटांच उदाहरण घ्या.

तानाजी यांच उदात्तीकरण करताना लांबसडक तोफ दाखवणं, घोरपड बंधू दाखवणं हे खरचं इतिहासांत आहे का ह्याची चाचपणी कुणीच करून पाहत नाही.अधू काशीबाईला मस्तानीसोबत नाचवून चित्रपटाने तर काल्पनिकच इतिहास रचला. काय बोलावे ह्यावर.

*पद्मावत* ह्यात अल्लाउद्दीन खीलजीचं एवढं उदात्तीकरण केल की महाराज रतन सिंग यांची वीरता, पद्मावती हीच राजा रतन सिंग यांना सोडवण्याची धाडपड सारं झोकाळलं गेलं आहे.

अश्याने तरूणाईला आपल्या इतिहासातील योद्धे यांच्यापेक्षा आक्रमणकारी जास्त प्रभावित करतात. अकरा ते पंचवीस वर्षापर्यंत मुलं खुपच नाजुक अश्या पौगंड अवस्थेतून जात असतात. अश्यावेळी जे त्यांना दाखवलं जातं तेच त्यांच्यासाठी सत्य असतं. त्यामुळे गल्लाभरू, सवंग चित्रपट त्यांच्या मनावर आयुष्यभरासाठी खुप चुकीच्या धारणा निर्माण करतो आणि ऐन अभ्यास आणि करियर करणाच्या दिवसात,ही तरूण मुले सिनेमा कलाकारांना मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा ह्यांच्या आकर्षणापायी स्वत:ही चुकीचे दिशेने जाऊन स्वत:ची आणि कुंटुबाची वाताहात करतात म्हणुनच मी म्हणेन की चित्रपट तरूणाईवर दुष्परिणाम जास्त करतो.

समाप्त.

©®vrushali gude