चित्रपटांचे तरुणांवर होणारे दुष्परिणाम लेख-२

चित्रपटांचे तरुणांवर होणारे दुष्परिणाम

विषय-चित्रपटांचे तरुणांवर होणारे दुष्परिणाम

वादविवाद स्पर्धा

संघ-मुंबई

भारतात ३ मे १९१३ रोजी चित्रपट सृष्टीला चालना मिळाली. तसेच अनेक चित्रपट पडद्यावर दिसू लागले. १९ व्या शतकात चित्रपटांना काही श्रेणी देण्यात आल्या होत्या. त्या श्रेणींना केन्द्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड या प्रमाणपत्राद्वारे जाहीर करण्यात आल्या.


केन्द्रीय फिल्म प्रमाणन बोर्डात चित्रपटांच्या ४ मुख्य श्रेणी आहेत त्या बद्दल आधी जाणून घेऊया:

१) अ (अनिर्बंधित) या U- या श्रेणीचा अर्थ असा आहे की, हे चित्रपट सगळ्या वयोगटातील व्यक्ती पाहू शकतात.

२) अ/व या U/A- या श्रेणीतील चित्रपटात काही हिंसा जनक किंवा अश्लील भाषेचा वापर केलेला असून या श्रेणीतील चित्रपट केवळ १२ वर्षाच्या वयोगटातील मुलं पालकांच्या उपस्थितीमध्ये बघू शकतात.

३) व (वयस्क) या A - ही श्रेणी फक्त तरूणांसाठी आहे. म्हणजेच १८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगातील व्यक्तींसाठी पात्र आहे.

४) वि (विशेष) या S- ही विषेश श्रेणी आहे. या श्रेणीतील चित्रपट फक्त डॉक्टर्स किंवा इंजिनिअर इत्यादींसाठी बनवलेली आहे.

वरील प्रमाणे "व/A" या श्रेणीचे जे महत्त्व सांगितले आहे, ते आजच्या तरूणांना त्याचा काही फरक पडत नाही. कारण आजकाल या तिसर्‍या श्रेणीतील चित्रपट म्हणजेच वयस्क श्रेणीतील चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही पाहू शकते. व/A याचा अर्थ असा आहे की ते १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी चित्रपट नाहीत. तरी आजकाल ते सहज रित्या टेलिव्हिजनवर किंवा थिएटर मध्ये दाखवल्या जातात. आजकाल सगळीच पिढी चित्रपटांची शौकीन झाली आहे. ते लहान असो किंवा मोठे, वयाचं बंधन बांधलेलं असूनही हे चित्रपट बघतात आणि याचाच परिणाम तरूण पिढीवर भयंकर झाला आहे.

याची सत्य परिस्थिती पाहुया. एक सुखी कुटुंब आणि वयात आलेला मुलगा घरी कसा वागत असतो...

चिन्मय प्रौढ अवस्थेत आला होता. घरी एकदम छान चालत असताना त्याला मित्रांसोबत राहून अनेक गोष्टींची सवय लागली होती. अभ्यासात गुंतून राहणारा चिन्मय लपून छपून मोबाईल वापरायला लागला होता. घरी आईने विचारलं असता काही ना काही कारण काढून तो टाळायचा आणि उलट उत्तर देऊन निघायचा. असंच रात्र-बेरात्री तो जागा राहुन मोबाईलवर अनेक प्रकारचे चित्रपट पाहू लागला तर कधी मित्रांसोबत अभ्यास करायला जातो असं सांगून तो त्यांच्या सोबत मोबाईलवर अनेक विडिओ पाहू लागला होता. मोबाईलद्वारे त्याने अनेक चित्रपटांची नावं शोधून काढली होती.

असेच काही दिवसांनी लेट नाईट स्टडीजचा बहाणा करून तो बाईकवर दारू पिऊन स्टंअंट मारणं, सिगारेट ओढणे हे चालू केलं होतं. हळू हळू तो व्यसनाच्या आहारी जाऊ लागला होता. चित्रपटात पाहून तो आणि त्याचे मित्र नवं-नवीन गोष्टींच्या आहारी जात होते. घरातही घरच्यांना न जुमता या गोष्टी करायला चालू केल्या होत्या. अशातच तो आणि त्याचे मित्र रेव्ह पार्टीत जाऊ लागले आणि त्यांना महाभयंकर गोष्टीची चटक लागली. तो आणि त्याचे मित्र ड्रग्सच्या अधीन झाले. अमली पदार्थांचे सेवन करून ते अश्लील चाळे करू लागले. चित्रपट पाहून चिन्मय तेच जीवन खऱ्या आयुष्यात जगू पहात होता.

आजकाल चित्रपटांत अश्लील व्हिडिओ क्लिप किंवा अश्लील शब्दाचा वापर सहज रित्या दाखवला जातो. याचा परिणाम समाजातील तरुण पिढीवर नक्कीच होत चालला आहे. आजच्या चित्रपटांमध्ये लोकांना हवी असलेली सवंग दर्जाची करमणूक हिंसा, लैंगिकता, अश्लीलता या गोष्टींकडे जास्त वळलेली आहे. इतकंच नव्हे तर अशा काही चित्रपटांमुळे बलात्कार, अश्लील भाषा, क्रुरपणाचे तपशील चित्रिकरण वाईट रित्या होत आहेत.

चित्रपटात नायक दाखवला जातो तो व्यसनाच्या आहारी असतो तसेच बेकायदेशीर गुन्हांमध्ये गुरफटलेला असतो म्हणजे या सगळ्या गोष्टी चित्रपटात सहज चालतात. हेच पाहून तर आजची तरूण पिढी हाच विचार करून त्याचं निरसन करते. हिंदी चित्रपटातील प्रेमचित्रीकरणामुळे आताच्या तरूण पिढीवर एवढा प्रभाव पडला आहे की ते गुंडगिरी किंवा अॅसिड अटॅक करण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. मारामारीचे अड्डे, शिक्षण सोडून प्रेमाचे आखाडे, धांगडधिंगाणा हेच काय ते आजची तरूण पिढी आपलं आयुष्य मानू लागली आहे. चित्रपटात या सगळ्या गोष्टी जरी मनोरंजन हेतू बनवल्या जात असल्या तरी या सगळ्या गोष्टींचा परिणाम आताच्या तरूण पिढीवर सहज रित्या होऊ लागला आहे. त्यांचा समजच झाला आहे की चित्रपटात जसे जगतात तसे आपणही जगू आणि हीच मोठी गोष्ट तरूण पिढीला घातक ठरली आहे. अन् खरतर फक्त हिंदी नाही त्याच्या जोडीला मराठी, बंगाली, कन्नड, पंजाबी, गुजराती असे अनेक भाषेचे चित्रपट प्रकशित होतात ज्यामुळे तरूणपिढीच्या आयुष्याचं खूप नुकसान होत चाललं आहे.

आजकालच्या चित्रपटांच्या जबरदस्त परिणामांमुळे समाजातील प्रामाणिकपणाला, मेहनती वृत्तीला आळा बसला आहे. तसेच चित्रपटातील श्रीमंतीच्या प्रदर्शनाने अनेक तरूणांच्या मनात लालसा निर्माण होत चालली आहे. अनेक गैरकानूनी धंदे दाखवले जातात तर ते पाहून आजच्या तरूण पिढीतील तरुण त्या मार्गाने जाऊ इच्छितात. चित्रपटाच्या माध्यमातून जे काही दाखवलं जातं ते तरूण पिढी सोबत उगवत्या पिढीसाठी घातकच ठरतंय आणि हीच गोष्ट नैराश्यजनक आहे.

चित्रपटांचे चर्चा साप्ताहिक काढले जातात. वर्तमानपत्रात छापून येतात. समस्त वयोगटातील व्यक्ती वाचतात पण तोच चित्रपट न बघण्यासारखा असेल तर तोच चित्रपट पाहण्याचा अट्टाहास ही तरूण पिढी करते. यामुळेच समाजात चंगळवादी, अनैतिकता, हिंसाचार, लैंगिक अत्याचार बळावत चालले आहे. चित्रपटांच्या नावाखाली याचा तरुणांवर विपरीत परिणाम होत चालला आहे.

व्यसनाधीतचे उद्दातिकरण असेलेले चित्रपट पाहुन अनेक तरूण पिढी आजच्या मायावी जगात संस्कारांपासून लांब राहत चालली आहे. जसं की तो मुलगा किंवा मुलगी घरात आई-बाबांसोबत एक असतात. अन् बाहेर गेल्यावर काही वेगळंच वागतात. आपण बोलतो ना "दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं." अशीच गोष्ट तरूणांसोबत घडत आहे. घरातल्यांना वाटत असतं की आपली मुलं खूप सोज्वळ, सुसंस्कृत, संस्कारी आहेत. पण तिच मुलं जेव्हा घरा बाहेर पडतात आणि कट्ट्यावर बसून किंवा नाक्यावर बसून कसे चालू करतात ते समाजाला दिसून येतंच असतं. टवाळगिरी करणं, रस्त्यात वयस्कर लोकांची टिंगल उडवणं, मुलींची छेड भर रस्त्यावर काढणं या सगळ्या गोष्टींचं आत्मचिंतन चित्रपट पाहून आणि मोबाईलवर सिरीज पाहून होतं असतं. आजकाल तरूणांच्या हातात सहज मोबाईल मिळून जातात. पण त्याचा वापर ते कशाप्रकारे करतात त्याचा पत्ता कोणाला नसतो. या सगळ्या गोष्टींना बळी आजकालची मुलंच नाही तर मुली सुद्धा आहेत. अनेक मुली अल्कोहोल, सिगारेट आणि कित्येक अमली पदार्थांच्या आहारी जातात. त्याच कारण पण आहे की चित्रपटांमध्ये नायिका पब मध्ये जाऊन अल्कोहोलच सेवन करते आणि सिगारेट ओढत असते. तर आता मुलींना पण वाटू लागते की हे करतात तर आपणही एकदा घेऊन पाहू आणि असं करून त्यांना त्या गोष्टींची चटक लागते. चित्रपट पाहून अनेक तरूण व्यसनाच्या अधीन होतात आणि इथूनच विपरित परिणामची सुरूवात तरुणांवर व्हायला चालू होते.


©®PanuSid?

संघ-मुंबई