चिठ्ठी ना कोई संदेस

अव्यक्त भावना जाणून घेण्याचा एक प्रयत्न




गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय-टपाल


शीर्षक- चिठ्ठी ना कोई संदेस


प्रिय संतोष,


काय! दचकलात का? किती वर्षांनी पत्र लिहितेय तुम्हाला! कदाचित लग्न झाल्यानंतर एखाद-दोन वेळेस लिहिलं असेल पत्र… तुम्हाला आठवतं (हे काय विचारणं झालं का? सगळी पत्र जपून ठेवलीत तुम्ही आणि आता तुमच्या पश्चात मी) आपलं लग्न ठरलं होतं तेव्हा आपण एकमेकांना किती पत्र लिहायचो! पत्रांचाच काळ तो… तेव्हा कुठे आतासारखे फोन होते… पत्र लिहायचं, पोस्टात टाकायचं आणि उत्तराची वाट बघायची… किती साधं, सरळ आणि सोपं गणित होतं ना! पुढे पुढे मात्र सगळ्यांनाच हे पत्र लिहिणं कमी झालं… 

अवघा सव्वीस वर्षांचा संसार आपला… कर्करोगाचं काय ते निमित्त आणि तुम्ही मात्र अनंताच्या प्रवासाला निघून गेलात… अगदी कायमचेच!


सगळी कर्तव्ये पूर्ण करता करता तुमच्यासोबत निवांत बसून बोलायचं राहूनच गेलं… तुमचा हात हातात घेऊन स्वच्छंदपणे फिरायचं राहूनच गेलं… चार क्षण शांततेत जगायचे राहूनच गेले… उशिराने बांधलेलं आपलं घर… आपल्या स्वप्नातल्या घरासारखं सजवायचं राहून गेलं… वाईट बिलकुल वाटत नाहीये… पण; मनातल्या इच्छा असतात ना… डोकावतात त्या कधी कधी…


घरी मी एकटीच असते आता… आपले तिन्ही पिल्लं उंच भरारी घेत आहेत आकाशात… पिल्लांच्या पंखात बळ भरायचं काम करतेय… पिल्लं घरात आली की तो चिवचिवाट मनभरून जगून घेते… पुन्हा आपली पिल्लं येईपर्यंत पुरतो तो… आता माझ्यासोबतीला तुमची प्राचार्य पदाची खुर्चीपण आहे बरं का! तुम्ही म्हणायचे अगदी तसाच अनुभव येतोय… लोकांना खुर्चीवर बसलेलं दिसतं पण त्यावरचे काटे दिसत नाहीत कुणाला… अगदी पदोपदी अनुभव येतोय… बरेचदा तिथे निर्णय घेताना त्रास होतो, बऱ्याच गोष्टी कळत नाहीत, तेव्हा डोळे बंद करते… तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि त्यासोबत रस्ताही दिसतो… अवघड असलेलं, जमत नसलेलंही जमून जातं.
वर वर पाहिलं तर सगळं अगदी सुरळीत भासतं; पण

सुबह आती है, शाम जाती है 
सुबह आती है, शाम जाती है यूँही
वक़्त चलता ही रहता है, रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता है
आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे पे मंज़र बदल जाता है
एक बार चले जाते हैं जो दिन-रात सुबह-ओ-शाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते


तुम्ही सोडून गेले तसं सगळं जसंच्या तसं आहे… तुमची लायब्ररी, तुमची पुस्तकं… तुम्ही लिहिलेला कागद अन् कागद…  कपड्यांचं कपाट… अगदी त्या कपड्यातला स्पर्शही!


सैरभैर लिहितेय का मी? असेलही कदाचित… भावनांचाच धबधबा तो… त्याला हवा तसाच आणि हवा तेव्हाच कोसळणार! मला माहितीये, तुम्ही समजून घ्याल.


तुमच्यासारखं मला लिहिता येणार नाही… शेवटी तुम्ही साहित्यवारीचे वारकरी!


तुम्ही कुठे आहात माहिती नाही; पण एका ऊर्जेच्या रुपात कायमच आमच्या सोबत आहात… जमलं तर परत या… आमच्यासाठी नाही तर या साहित्यासाठी तरी या…

आभाळालाही वाटतं तुमच्या लेखणीतून बरसावं...
मोत्यांचं रूप घेऊन अलगद कागदांवर उतरावं...
तुमच्या हातातल्या लेखणीने पुन्हा नशीबवान व्हावं...
तुमच्या शब्दांमुळे कागदानं पुन्हां श्रीमंत व्हावं....
कथा कवितांच्या बीजांनी पुन्हा एकदा रुजावं...
पुस्तकांच्या मळ्यांनी पुन्हा एकदा बहरावं….
पुन्हा एकदा गुंफाव्या अक्षर-फुलांच्या माळा...
पुन्हा एकदा व्याख्यानांनी गर्जावा आसमंत सारा...
पुन्हा एकदा सूर्यानी तुमच्या शब्दांतून उगवावं...
प्रकाश ओंजळीत भरून पुन्हा अंधाराला हरवावं…


आता सोबतीला फक्त आठवणी... प्रत्येक आठवण परत परत जगायची... आठवणीतला तुमचा सहवास परत मनात साठवून घ्यायचा... कोसळलेल्या मनाला सावरत परत उभं राहायचं... आपल्या घरासाठी... आपल्या लेकरांसाठी...

अब यादों के कांटे
इस दिल में चुभते हैं
ना दर्द ठहरता है
ना आंसू रुकते हैं
तुम्हें ढूंढ रहा है प्यार
हम कैसे करें इकरार
के हाँ तुम चले गए

कदाचित हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतील...!
अजून काय लिहू?

तुमचीच
कल्पना


(पप्पा जाऊन आठ वर्षं झाली… आईने मात्र सगळं अगदी खंबीरपणे सांभाळून घेतलंय… स्वतःला खंबीर दाखवताना आईच्या मनात काय गुंता असेल हे जाणून घेण्यासाठी आईच्या जागी स्वतःला ठेऊन पाहिलं… आणि जाणवलं… डोक्यावर आभाळ फाटलं असतांनाही ती आपल्या पिल्लांना अगदी सुरक्षित ठेऊन पहाडासारखी उभी आहे… अगदी निश्चल मनाने! आज जागतिक टपाल दिवस… त्या निमित्ताने आईच्या जागी स्वतःला ठेवून हे पत्र लिहायचा प्रयत्न केलाय… तिच्या मनातल्या भावना काही अंशी तरी मांडायचा प्रयत्न…! आता तिच सांगेल… तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत...मी...)


© ® डॉ. किमया मुळावकर

फोटो- गुगलवरून साभार