चिंतामणी भाग 3

Chintamani

                                           सकाळी उपासना करी , चित्तशुद्धी करी. दुपारी ऋषिजवळ बसून व्यवहार शिक्षण घेऊ व संध्याकाळी आजूबाजूच्या गावात जाई. त्याच्याबरोबर  आश्रमातले कित्येक शिष्यही जात. तिथे जाऊन ते मानवी जीवनाची महत्ता समजावून देत.                                                                                           भगवंताने हा देह दिला आहे त्याची किंमत जाणली पाहिजे. हा केवळ भोगविलासात फुकट घालवता कामा नये. मानव होऊन पशुजीवन जगता कामा नये. मानवाचा देव होईन की न होईन ही गोष्ट वेगळी. पण कमीत कमी मी मानव म्हणून तरी जीवन जगेन, अशा प्रकारचे शिक्षण देत.                                                                                                      जीवन कशासाठी ? प्रभू कार्यासाठी जीवन आहे, हे ध्यानात घ्या, यालाच बहिर्भक्ती म्हणतात. श्रीकरने ही बहिर्भक्ती जाणली व ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करू लागला. आता तर तो मोठा झाला होता. तरुण झाला होता .                                                                         आंतरभक्तीने विशूद्ध झालेल्या चित्तात बाह्यभक्तीचा सुंगध भरीत होता. एक दिवस आपले मोठे लक्ष गाठण्यासाठी त्याने आश्रमाचा निरोप घेतला. जाता जाता एका  वटवृक्षाखाली बसला व भगवान शंकराची आराधना करू लागला. भगवंतालाही वाटले : हा तेजस्वी तरुण माझे काम करीत आहे. भविष्य काळात लोकात सद्विचार नेण्याचे काम हा करील. लोकाची वृत्ती बदलविल. लोकाचे मन कामाकडून रामाकडे वळविल. भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले, त्यांनी त्याला चिंतामणी नावाचा एक मणी दिला.                                                                           तो मणी पाहून श्रीकरचे हृदय भरून आले. त्याचे जीवन धन्य झाले. त्याच्या या मनुष्य- देहाचे सार्थक झाले त्याने प्रभूला विचारले: " हे काय आहे ? ". "हा चिंतामणी आहे . तांब्याला लागताच त्याचे सोने होते." "परंतू भगवंता ! मला कशाचीही गरज नाही. तुझ्या चरणकमली सतत माझे चित्त राहावे एवढीच माझी उपेक्षा आहे. हा मणी घेऊन मी काय करू ? आपल्या कृपेने या देशात परमेश्वराचे नाव घेणाऱ्याला दोन घास अन्न मिळतेच आहे .असे असताना हा मणी घेऊन मी काय करू ? हा मणी मी माझ्याजवळ कसा ठेवू ?".  " मी प्रसन्न झालो आहे म्हणून हा मणी तुला घ्यावाच लागेल. हा मणी तुला दुसऱ्या कोणाला द्यायचा असेल तरीही त्याला माझी काही हरकत नाही. परंतु यावेळी तू याचा स्वीकार केलाच पाहिजेस."                                                                       प्रभूचा प्रसाद म्हणून श्रीकरने त्या मण्याचा स्वीकार केला.व तो घेऊन ती गावोगावी जाऊ लागला. मण्याच्या प्रभावाने लोक स्तिमित होत व विचारीत :" हे काय आहे ? " श्रीकर सांगे:" हा चिंतामणी आहे . तांब्याला लावला की त्याचे सोने होते." " मग तुम्ही सोने का तयार करीत नाही?" " मला त्याची गरज नाही ". श्रीकर थोडक्यात जबाब देई. " मग तुम्ही तो आपल्याजवळ का ठेवता ?" मी अशा प्रकारच्या शोधत आहे की, या जगात सर्वात मोठा भिकारी तो असेल. मी त्याला हा मणी देणार आहे. ज्या क्षणी अशा प्रकारचा भिकारी मला मिळेल त्याच क्षणी हा मणी मी त्याला देणार आहे."                                                                                                 प्रभूचे गुणगान करीत, लोकांना सदवृत्तिकडे वळण्याची प्रेरणा देत श्रीकर एका गावात आला. एका प्रशस्त हवेली जवळ येऊन उभा राहिला. मणीभद्र नावाच्या नगरशेठजीची ती हवेली होती. बाहेर शेठजीची वाट पाहत बरेच लोक बसले होते. आत खुशामत करणाऱ्या लोकाबरोबर गप्पा सुरू होत्या. खाण्यापिण्याची धमाल चालू होती.                                                                               आपल्या दाराशी अशा प्रकारचा एक प्रतापी व तेजस्वी तरुण आलेला पाहून शेठजीची पत्नी बाहेर आली.आदराने मस्तक नम्र केले व विचारले: आपले कोणापाशी काम आहे ? " श्रीकर म्हणाला:" मला दुसरे काहीही नको. अशा प्रकारच्या या भाग्यशाली व्यक्तीचे दर्शन घ्यावे अशी माझी इच्छा आहे ". " पण आपण कोण " ? शेठजीच्या पत्नीने विचारले ." मी  गवळ्याचा मुलगा श्रीकर आहे " श्रीकर म्हणाला.                                               क्रमशः 

🎭 Series Post

View all