चिरुमाला (भाग ७)

मी घराचा दरवाज्या लावून घेतला......

मी घराचा दरवाजा लावून घेतला आणि वेळ पाहिली. आठ वाजत होते. कामगार आणि त्यांची कामे यामुळे दुपारी विश्रांती मिळाली नव्हती. रात्रीचा स्वैपाक तयार होता. बाहेर पावसाने गुधडा घालायला सुरुवात केली होती. बरोबरीने वीजही साथ देतअसल्याने एक प्रकारचा राक्षसीपणा वातावरणात पसरला होता. दिवाणावर बसण्यासाठी मी गेलो , तिथे मला उदीचे खडे आणि त्यांची रेव दिसली. त्यातले काही खडे उजेडात चमकत होते. पिवळसर तांबुस रंगाचे खडे मी गोळा केले . एका पेपरात गुंडाळून त्याची पुडी बनवली आणि ती समोरच्याच खुर्चीवर ठेवली मला अचानक फकिराची आठवण झाली. तो म्हणाला ते किती विरोधी होतं हे आठवलं. सब तकलिफे दूर होगी आणि त्याच बरोबर छे महिने के बाद बिवी बच्चे दुखी होगे , हे मला पटेना. तसाही माझा बुवा, बापू आणि फकीर आणि साधू यांच्यावर बिलकुल विश्वास नव्हता. जास्त विचार न करता मी दिवाणावर आडवा झालो आणि डोळे मिटले.बघता बघता मला डुलकी लागली. सारख्या होणाऱ्या दगद्गीने मला डुलकी लागली असावी. अचानक विजेच्या " धडाम ढुम ........ कड कड कड ............" असा आवाज झाल्याने मलाजाग आली.मी मोबाइलमधे वेळ पाहिली. जेमतेम नऊ वाजत होते. मी एकवार माझ्या भोवतालच्या वातावरणाकडे नजर टाकली. आता बऱ्यापैकी साफ सफाई झाली होती. अर्थातच भिंतींचा काळेपणा गेला नव्हता. उठून मी समोरची दरवाज्याच्या बाजूची कमानी खालची खिडकी उघडली . बाहेर पावसाच्या जाड जाड धारा पडत होत्या. आवाजही फार येत होता. जवळच असलेली उघडी बेड रुम मी आत जाऊन पाहिली. गाद्या नसल्याने बेड उघडावाघडा दिसत होता. कपडे न घातलेल्या एखाद्या मल्ला सारखा. मी आत शिरलो , पण मला त्या बेडवर बसावेसे वाटेना. आता नवीन गाद्या येतील तेव्हाच त्याचा वापर करता येईल . असा विचार करून मी ती खोली लावून घेतली........ स्वैपाकघरात जाऊन तयार पण रिकाम्या मांडण्या दिसल्या साफ केलेले फडताळ मी उघडले. उगाचंच आत हात घालून फिरवून पाहिला. ते स्वच्छ होते. मग ओट्यावरची भाजी गरम करण्यासाठी वातींचा स्टोव्ह पेटवला. भाजी गरम करून डिशमध्ये पोळी आणि भाजी घेऊन मी परत दिवाणावर येऊन बसलो. खाण्यासाठी मी तोंडात घास घालणार तेवढ्यात माझी नजर सरदार साहेबांच्या फोटोवरून फिरली. त्यांचे डोळे उग्रच होते. पण फोटो मात्र चांगलाच चकाकत होता. मला जरा आश्चर्य वाटलं. मग लक्षात आलं की कामगारांनी तोही स्वच्छ केला होता. मी लक्ष न देता जेवायला सुरुवात केली. अचानक मोबाईलचा रिंगटोन वाजला. " घर आया मेरा परदेसी ............" हे गाणं होतं. मला ते अजिबात आवडलं नाही. निदान आत्ता तरी. लीनाचा फोन होता. तिने वाटेल ते गाणे रिंगटोन म्हणून ठेवले होते. तिचा आवाज आला जरा बरं वाटलं दुसरी कोणीतरी व्यक्ती माझ्याबरोबर असल्याचे जाणवले. आठवडाभराच्या घरातल्या एकूण कामाचा तिने आढावा घेतला. एरवी मी चिडलो असतो . पण ती एकच व्यक्ती अशी होती की मला घरदार असल्याची जाणीव करून देत होती. तिला मी कधी बोलावणार आहे यावर तिने बराच वाद घातला पण मी तिला आणखीन आठदहादिवस लागतील असे सांगितल्यावर ती नाराज झालेली दिसली. असो ती त्यावर परत काहीतरी वाद घालेल या भीतीने मी फोन बंद केला.

    लवकरच माझं जेवण झालं . मी भांडी घासून टेवली. नळ एकदम जोरात होता. कुतुहल म्हणून मी स्वैपाकघराची खिडकी उघडली. माझ्या तोंडावर पावसाची झड आली. समोरच्या काळोक्या वातावरणात मी पाहण्याचा प्रयत्न केला. विहिरीवरचा वड गदा गदा हालत होता. भयानक वारा आणि पाऊस यांना घाबरून मी खिडकी बंद केली. बाहेर येऊन मी पुढचे दार उघडे टाकले. मी बाहेरच्या एका पायरीवर बसलो. समोरचा जंगलाचा पॅच आकाशापेक्षा जास्त काळा दिसत होता. जंगल ते वाडा एकही झाड नव्हतं. मध्ये झाडंच उगवली नव्हती का , काही वर्षांपूर्वी एकाद्या आगीत मधली झाडं जळून गेली होती.मला कळेना. धुंवाधार पावसामध्ये तसं अंधूकच दिसत होतं. नदीचाही जोरदार आवाज येत होता.मी आवारातल्या मंदिराकडे पाहिलं. ते तटस्थपणे बसलेलं होतं. जणू घट्टपणे बस असे मला सांगत होते. मला थोडा धीर आला. खरचं आपण न डगमगता इथे राहिलं पाहिजे. एखादी वास्तू बिनवापराची असली म्हणून काय झालं. आता अंगावर पाणी जास्त उडू लागल्याने मी परत घरात आलो. आता मला झोप येत नव्हती. मी वरच्या मजल्यावर जाण्याचे ठरवले.

……………………………………… मुख्य दरवाज्या लावून घेतला. मी जिन्याने वर जाऊ लागलो. वरही तशाच खोल्या होत्या. फक्त बाजूचा भाग जो मी घेतला नव्हता
तिथे असलेल्या खिडकीतून मी आत डोकावून पाहिले. काळोखाशिवाय मला काहीही दिसत नव्हते. मग मी कॉरिडॉरमधला दिवा लावला. त्या
पिवळ्या प्रकाशात अंघुक दिसू लागले. खिळवलेल्या खिडकीच्या अर्धवट उघड्या फटीतून मी आत पाहत होतो. आतला जिना त्याचा कठडा मी
अंदाजानेच ओळखला. अचानक कसली तरी सावलीसारखी हालचाल जाणवल्याने मोबाइलचा टॉर्च सुरू केला. एक काळंकुट्ट मांजर आपली शेपूट फुगवून माझ्याकडे टक्क पाहत होतं. त्याचे हिरवे डोळे विचित्र रितीने चमकत होते. मग मात्र मी अर्धवट खिडकी उघडण्याचा प्रयत्न सोडून दिला. त्याने माझ्यकडे पाहून " म्यांव " केलं . मी खिडकीची फट आणखिनच कमी केली. दिवसा उजेडीच पाहावं लागेल असे स्वतःशी पुटपुटत मी
वरच्या खोल्या उघडण्याचे काम हाती घेतले. वरच्या मोठ्य खोलीत खालच्या सारखाच एक बेड होता. मात्र तो लहान होता. त्याला मच्छरदाणी
बांधण्याची सोय नव्हती. आत नशिबाने कोणताही लाकडी अथवा दगडी पुतळा नव्हता. मी दरवाज्या लावण्यासाठी मागे वळलो आणि आत कुठून
तरी काहीतरी पडल्याचा आवाज झाला. मी विशेष लक्ष न देता दरवाज्या लावू लागलो. पण तो लागेना काहीतरी अडत असावं म्हणून मी खोलीतला लाइट लावला. आणि जे दृष्य मी पाहिले ते विचित्र होते. एका भिंतीत बसवलेल्या कपाटाचे दार अर्धवट उघडे होते. आणि दाराजवळ
एक मानवी कवटी पडलेली दिसली. बाहेर पाऊस असूनही मला घाम फुटला. असलं दृश्य मी कधीच पाहिलं नव्हतं. मानवी कवटी फक्त शाळेत असताना प्रयोग शाळेत आणि रस्त्यावरच्या जादुगाराकडे पाहिली होती. तिच्यामुळेच दरवाज्या लागत नव्हता. आता तिला हात लावून ती बाजूला करणं मला भाग होतं. मला आता भीती आणि किळस या भावना एकदम आल्याची जाणीव झाली. ................ थोडावेळ मी पलंगाला धरून उभाच राहिलो. मी त्याच खोलीत कुठे काठी सापडते का ते पाहू लागलो. आपण कशाला हात लावा. मला काठी सापडेना. असलं काही अचानक समोर येईल याची मला कल्पनाही नव्हती. बरं झालं लीना आली नव्हती. माझ्या मनात आलं शेजारच्या भागातली खिडकी उघडी असती तर त्यातून ही कवटी तिथे टाकता तरी आली असती. अचानक पुन्हा मांजाराचा "म्यांव " असा आवाज आला. ते कुठे आहे पाहण्यासाठी
मला या खोलीचा दरवाज्या बंद करूनच जाता आलं असतं. मी पुन्हा पलंगाखाली काही सापडतंय का ते पाहू लागलो. तिथे एक लोखंडाची
सळई पडलेली दिसली. ती मात्र माझ्या डवल उंचीची होती . आता ती वापरून कवटी सरकवावी लागणार होती. मी लवलवणारी सळई मोठा आवाज करीत बाहेर काढली. कशी तरी ती कवटी पर्यंत नेली आणि एकदाची कवटी सरकवली. कवटी अगदीच जीर्ण झालेली होती. मी हात लावला असता तर थोड्या भागाचा भुसाही झाला असता. तिच्यात भरलेली माती किती वर्षांची होती कुणास ठाऊक. हातातली सळई मी तशीच
घाबरून परत टाकली तिचा परत आवाज झाला . मी दरवाज्या जवळ जाऊन जवळ जवळ बाहेर उडीच मारली . आणि खोलीला एकदाचं
कुलुप घातलं. उद्याच्य उद्या हिची विल्हेवाट कोणालाही न सांगता (त्यावेळेला माझ्या मनात जुडेकर होता ) लावली पाहिजे. मी विचित्र मानसिक अवस्थेत खाली आलो. दिवाणावर बसलो. सहज म्हणून माझी नजर सरदार साहेबांच्या चित्राकडे गेली. त्यांचे डोळे मला विशेष लकाकताना दिसले. निदान मला आत्ता तरी तसा भास झाला होता. ही कवटी कोणाची असेल. इथे असं आही निघेल याची मला कल्पनाही नव्हती. ती कवटी आत्ताच नष्ट केली पाहिजे . अशी मला निकड भासू लागली. कारण सबंध रात्र मला काढायची होती.

रात्रीची झोप चाळवाचाळवीत गेली. मध्येच स्वप्नात फकीर बाबा यायचे आणि म्हणायचे , " देख तूने उदी आगमे डाली नही अबतक . तू पछताएगा. जल्दी कर. उदीको आग दिखा दे. ........... " आणि एकदम अंगावर यायचे. मग झोप उघडायची. मी लाइट उघडा ठेवीतच होतो. जाग आली की माझं लक्ष सारखं जिन्याकडे जात होतं. मध्येच उठून मी वेळ पाहिली. रात्रीचे दोन वाजत होते.
आश्चर्य म्हणजे अशा वाड्यांमध्ये एखादं तरी ठोक्याचं घड्याळ असतं पण ते दिसलं नाही. पुन्हा झोपायचा प्रयत्न केला . सरदार साहेबांच चित्र
दिसू नये म्हणून मी दिवाणावर उलटा झोपत असे. कशी तरी सकाळ झाली. आळसटल्यासारखा मी उठलो. चहा केला. तयार झालो आणि
जुडेकरची वाट बघत राहिलो. दहा साडेदहाला जुडेकर आला. आम्ही दोघे मग बँकेत गेलो. दिवस कंटाळवाणा गेला. सारखी झोप येत होती .
नियमित कार्यालयीन काम चालू झालं होतं . तीनचार दिवस असेच गेले. अचानक एक दिवस जुडेकर माझ्या केबिनमध्ये आला. आणि त्याने मला उद्या गॅस सिलिंडर मिळणार असल्याची बातमी मला दिली. मी त्याला कनेक्शन वगैरे कामं करून घेण्यासाठी वाड्याची चावी दिली. संध्याकाळी घरी गॅस आलेला दिसला. आता रंगकाम बाकी होतं ते करण्याचं ठरवलं . अर्थातच जुडेकरने पुढाकार घेऊन तेही करून दिले. सध्या तरी पांढरा रंग दिला होता. काही का होईना सगळ्या खोल्या स्वच्छ झाल्याचे दिसले. लीना येईपर्यंत बहुतेक सगळी कामं होतील याची खात्री झाली . मध्यंतरी मिशनरी स्कूलच्या प्रिन्सिपॉलने मला भेटायला बोलावलं. मी गेलो. गावातच असलेलं एक जुनाट चर्च आणि त्याच आवारात असलेली शाळेची दुमजली इमारत एखाद्या म्हाताऱ्या माणसाने अंगावर पांढरी शाल गुंडाळून बसावं अशी दिसत होती. शाळेचा रंगही
पांढराच होता. प्रिन्सिपॉलच्या केवीनकडे मी आणि जुडेकर गेलो. जुडेकरला बाहेर त्यांबण्यास मी सांगितले, पण तो म्हणाला मी बरोबर आलो तर तुमचे काम जास्त चांगले होईल. शाळेच्या प्रमुख एक म्हाताऱ्या नन होत्या. त्या जुडेकरला ओळखत होत्या. आम्ही दोघे केबिनमध्ये गेलो.
बसल्यावर नन मॅडम त्यांच्या अशुद्ध मराठी मध्ये म्हणाल्या, " तुमी एकलच यायला हवं होतं. . याला बरोबर कशाला आणला... ? " मी जुडेकरला बाहेर जाण्याची खूण केली. तो नाराज दिसला. पण गेला. मग मी मॅडमना सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर त्या म्हणाल्या, " आमचं स्कूल मिशनरी आहे. तुमच्या मुलांना आमची सिस्टिम घ्यावी लागेल. इथे रोज प्रभूची प्रेयर चालते. आनी बायबलपन सिकवले जाते.
ते तुमाला चालेल काय ? आनी इंग्लिशमध्ये बोलावं लागेल. " मी ते मान्य केलं. फक्त मुलांची मुलाखत घेऊन मगच प्रवेश द्यायचा की नाही ते ठरवले जाईल. आता फक्त लीनाला आणि मुलांना आणायचे होते. ते मी येणाऱ्या रविवारी करण्याचं ठरवलं. शनिवारी संध्याकाळच्या बसने जाऊन रविवारी त्यांना घेऊन येण्याचे लीनाला मी फोन करून कळवलं. तिलाही ते एक्साइटिंग वाटलं. आजपर्यंत मी माझ्या कोणत्याही बदलीच्या ठिकाणी घेऊन तिला गेलो नव्हतो. मध्यंतरी जुडेकरने एक माळी आणून वाड्याच्या समोरच्या मोकळ्या जागेत लाल माती टाकून काही झाडं लावली होती. त्यात फुलझाडंही होती. तुळसही मुद्दाम लावली होती. अचानक लीनाने माझ्या आईचा फोन आल्याचे सांगितले. आता तिला इथे आणणं शक्य नव्हतं. म्ह्णून मी लीनाला तिला कळवायला सांगितलं. त्यावर आई नाराज झाल्याचे तिने सांगितले. मला सध्यातरी म्हातारी माणसं घरात नको होती. कदाचित मी तिथेच चूक केली की काय कोण जाणे. कारण पुढे जे घडलं तेव्ह मला हे प्रकर्षाने जाणवलं.
  असो. एकदाचा शनिवार आला. मी बँकेतून लवकर निघून मुंबईसाठी बस पकडली. जाण्या आधी जुडेकरला वाड्यावर राहण्यासाठी सांगितलं
पण तो नाही म्हणाला. तेवढं मात्र सांगू नका असं चक्क त्याने मला सांगितलं. मी त्याला परोपरीने समजावून सांगितलं . पण त्याची इच्छा दिसली नाही. मग मी सोडून दिलं. ..............
बस वेगात जात होती. मी बस सुटताच सहज बस स्टँडकडे पाहिलं . मला पाटील दिसले. मी त्यांना हाक मारायचा प्रयत्न केला. पण त्यांना ऐकू आलेलं दिसलं नाही. मी मात्र आल्यावर त्यांचा वाडा शोधून काढायचं ठरवल. रात्री अकरा वाजता घरी पोहोचलो. लीनाला बरं वाटलेलं दिसलं. तिने हरिदासचा फोन आल्याचं सांगितलं. म्हणजे मला रजिस्ट्रेशन करण्यासाठी यावं लागणार होतं. रात्री उशिरापर्यंत लीनाला जवळ घेऊन नवीन ठिकाणचे वातावरण समजावून सांगितले. उद्या जाण्याच्या उत्साहात झोप जरा बेताचीच लागली. सकाळ झाली मी दुपारी एकची बस पकडण्याचे ठरवले. तोपर्यंतचा वेळ तयारीत गेला. एक घर बदलायचं म्हणजे काय काय तयारी करावी लागते हे पाहून मला फक्त वेड लागण्याचं बाकी होतं. कसेतरी आम्ही जेवण केले. कपडे घातले. आणि दहा पंधरा मिनिटात निघण्यासाठी असताना दरवाज्याची कडी वाजली. कोण आलं असेल यापेक्षा उशीर होणार नाही ना याची जास्त काळजी वाटली. सोसायटीचे सेक्रेटरी लेले आले असतील तर म्हाताऱ्याला काही बाही सांगून घालवावे लागेल हे लगेच मनात आले. काही दिवसांपूर्वीच लीनाने पुढील सहा महिन्यांचा चेक दिला होता. कपाळावर थोड्या आठ्या आणून मी जरा जोरातच " कोण आहे ...........? " असे विचारले. दरवाज्या उघडला. ,,,,,,,,,,,,,,,,,,पाहतो तो काय .....? समोर उभ्या असलेल्या माणसाला जिवंत माणूस म्हणावे की जिवंत प्रेत म्हणावे हे ठरवण्याच्या आतच त्याने खुणेने जेवायला पाहिजे असे सांगितले. त्याच्या हातातला काळा कुट्ट पडलेला कटोरा अंगावरील चिंध्या आणि त्यातून दिसणारे किडकिडित अंग पाहून मला शिसारी आली त्याच्या दुसऱ्या हातात सापाचे तोंड असलेली काठी होती. त्याचे डोळे जास्तीत जास्त निस्तेज होते. डोळ्याभोवती नुसती काळी वर्तुळे नव्हती तर तिथे काळे खड्डे पडलेले होते. खांद्यावर एक फाटकी झोळी होती. गळ्यातल्या रंगी बेरंगी दगडांच्या माळा त्याच्यापेक्षा जास्त वजनदार वाटत होत्या, कारण त्याचीमान त्यांचं वजन पेलत नव्हती. त्याने एक हात वर केला. आणि मला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला. मी त्याला पाहून दरवाज्या लावणार होतो , तेवढ्यात आतून लीना आली. आणि त्याला पाहून तिने मला हाच माणूस काही दिवसांपूर्वी आल्याची आठवण दिली. मी त्याल पकडून बाहेर काढू लागलो तर लीना म्हणाली, " अहो तो एक प्रकारचा अघोरी साधू आहे त्याने आपल्या घरावर काही केलं तर आपल्याला अतिशय त्रास होईल . त्याला काय हवंय ते द्या आणि जाऊ द्या. " पण मी ऐकायला तयार नव्हतो. मी त्याला गेटमधून बाहेर ढकलला . तो तोल सावरीत धडपडत उभा राहिला. आणि म्हणाला, " तूने ये अच्छा नही किया , वहां जाओगे तभी पछताओगे. आणखी वेगळ्याच भाषेतले शब्द बडबडत तो निघून गेला. मी रागाने फुनफुनत माघारी आलो. जायच्या वेळेला त्याचं येणं मला अजिबात आवडलं नाही. दहा पंधरा मिनिटात आम्ही शेजारी राहणाऱ्या मिश्रा अंकलकडे चावी दिली. आणि सामान घेऊन निघालो.
एस. टी एकदाची मिळाली.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all