चिरुमाला (भाग २)

मी पाटलांच्या मागे चालत होतो.....

           मी पाटलांच्या मागे चाललो होतो. मध्येच एकदा थांबून मला म्हणाले," आणा ती ब्याग इकडं.." मी म्हंटले , " राहू द्या हो. मी आणतो की." त्यावर ते म्हणाले," अवंअसं कसं ,कुनि पाह्य्लं तर काय म्हनल ,पावन्यास्नी सामान घेऊन चालवतोय. " मग मात्र मी त्यांना म्हंटलं , " नाही नाही , ठीक आहे. " पण त्यांनी ऐकलं नाही. माझ्या हातातली बॅग घेऊन ते निघाले. आम्ही बराच वेळ चालत होतो. रस्ता म्हणजे रानातली पायवाटच होती. .... आजूबाजूला माजलेलं रान आणि त्यातली रानटी रंगीबेरंगी फुलं पाहात मी जात होतो. पाटील वयस्कर असले तरी त्यांचा चालण्याचा वेग माझ्य दुप्पट होता. मला फार भराभर चालावे लागत होते. हळू हळू आम्ही एका मोकळ्या मैदानावर आलो. आजूबाजूच्या माजलेल्या गवतातून वाट काढीत आम्ही एक लहानसे टेकाड ओलांडले. समोरच पाटलांचा दुमजली मोठा वाडा आपलं अंग पसरुन उभा होता. ई या इंग्रजी अक्षराची मधली दांडी जर काढून टाकली तर जो आकार होईल त्या आकाराचा वाडा समोर उभा होता.मुख्य दरवाज्याजवळ आल्या बरोबर पाटलांनी हळी दिली," अरे , हाय का न्हाई कोन ? अरे ए तुकाराम .............? " त्या बरोबर एक वाकल्या अंगाचा बु टका , तांबुस रंगाचा माणूस आमच्या पुढे येऊन उभा राह्य्ला. त्याने पाटलांच्या हातातली बॅग घेतली . मग पाटील माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले," या सायब, हा आमचा वाडा . मोप जागा हाय हितं. " असं म्हणून मला घेऊन ओटीवरच्या झोपाळ्या वर मला बसवून आत निघून गेले. मी इकडे तिकडे पाहात होतो. वाडा चांगलाच मोठा होता. आतल्या खोल्या थोड्या अंधारलेल्या होत्या. एका बाजूने वरच्या मजल्यावर जाण्याचा दगडी जिना होता. तेवढ्यात आतून एक नोकरासार खा दिसणारा माणूस आला. त्याने बरोबर एक स्टूल आणले होते.त्यावर एका थाळीत चिरलेले आंबे, थोडी द्राक्षं आणि थोडी जांभळं ठेवून तो आत निघून गेला. मग पाटील आले. म्हंणाले, " घ्या , खाऊन घ्या. पुरा वाडा दाखिवतो की तुमास्नी. तोपर्यंत जेवणाची तयारि होईल. " मी आंब्याच्या एक दोन फोडी खाल्ल्या. काही द्राक्षं आणि दोन तीन जांभळं खाल्ली. " ते पाहून पाटील म्हणाले, " तुमी शहरी मानसं म्हंजे खान्यात एकदम कच्ची. "
मग ते म्हणाले, "आता चला. वाडा दावतो ........." असं म्हणून मला घेऊन ते दगडी जिन्याने वर जाऊ लागले. मी त्यांच्या मागून जात होतो. वाड्याचा खालचा मजला जेवढा टापटीप होता तेवढा वरचा नव्हता. बर्‍याच ठिकाणि धूळ साठलेली होती. वरच्या खोल्या बंद होत्या . एक दोन तुटकी बाकं आणि दोन खुर्च्या पडलेल्या होत्या. पाटील एकेक गोष्टी सांगत होते. " वरला भाग आमी वापरीत न्हाई. माज्या न्हान्पनी , लई मानसं वाड्यात वावरायची. समदेच एका घरात र्‍हायचे की. नंतर एकेक जण भायर गेला. अन वाडा असा वोसाड पडला बघा. आता बलिवलं तरी बी येत न्हाईत. न्हाई तर येतो म्हनून खोटं तरी सांगत्यात. सुरवातिला आमी वाट बगायचो. मंग त्यात्ला खोटेपना ध्येनात येवू लागला. काय करनार ? " पाटील थोडे सद्ग्दित होऊन म्हणाले. मग त्यांनी खिशातला चाव्यांचा जुडगा काढीत समोरच असलेली खोली उघडली. खोली उघडल्या उघडल्या एक प्रकारचा कुबट वास आला. आणि बरेच वर्षांनी उजेड आत शिरला. आतला प्रचंड मोठा दिवाणखाना पाहून मला तशी भितीच वाटली. मानसाचा स्पर्श न झालेला तो दिवाणखाना जणू अंगावर आल्याचा भास मला झाला. आजूबाजूचे दोन दरवाजे त्या दिवाणखान्यातच उघडणारे होते. आत शिरून पाटलांनी पाठीमागच्या दोन खिडक्या उघडल्या. त्या बरोबर वार्‍याचा मोठा झोत आत शिरला.

खिडकी मधून माझी नजर समोर असलेल्या डोंगरावरच्या किल्ल्यावर गेली . पडका का होईना पण किल्ला होता. मी पाटलांना विचारले. " इथे किल्ला पण आहे. म्हणजे गावाला इतिहास आहे, नाही का ? " त्यावर पाटील अभिमानाने म्हणाले," एकदा म्हाराज बी आले होते म्हन्त्यात किल्ल्यवर. " मी विचारले , " कोण महाराज ? " पाटील भडकून म्हणाले," ओ , म्हाराज येकच, शिवाजी म्हाराज. " मग स्वर खाली करून
म्हणाले," असं फकस्त आमी ऐकलंय बरं का . पन हितं बी एक राजा होता. त्यो होता कोणि कानडी फिनडी. त्यो गेल्यावर इंग्रज सरकारनी किल्ला आनी , त्ये खाली दिसतात का चार वाडे ?, ते बी ताब्यात घेत्ले. आता ते वोसाड पडून हाईत. हा त्या राजाचे वंशज हाईत म्हन्तात. पन
भायेरच्या देशात. जाऊ द्या , आपल्याला काय करायचंय म्हना चला जेवन तयार असंल. " असं म्हणून त्यांनी घाई घाईनी खिडक्या बंद केल्या.
बाहेर येऊन कुलूप लावून खाली निघाले. कदाचित त्यांना आणखीनही माहिती असावी ,पण मला देण्याची त्यांना इच्छा नसावी. मीही
मुकाट्याने खाली उतरलो.
जेवणाचा वेत साधाच होता. आतल्या खोलीत पाट मांडले होते. आता पाटलीण बाई स्वतः वाढीत होत्या. पाटलीण
बाई सुद्धा थोराड अंगाच्या नाकात मोठी नथ कपाळावर लालबुंद चिरी , हिरवे गार लुगडे , उंची पाटलांसारखीच. त्या जास्त बोलत नव्हत्या.
कदाचित मी त्यांना नवीन होतो,म्हणून असेलही. पण त्या हसल्या की दात मात्र एखाद्या हिंस्त्र पशू सारखे बाहेर येत होते आणि डोळे अकारण मोठे होत होते. अर्ध्या तासात जेवणं उरकली. मग पाटील मला म्हणाले, " आता वर दावला त्या दिवाणखान्यात निवांत पडा. " ,,,,,,,,, " पण
साडेतीन वाजायला आले आहेत " असें मी त्यांना म्हंटले. त्यावर ते म्हणाले , " अवो तुमी गेल्याशिवाय बस सुटलं कशी ? " असं म्हणून त्यांनी
मगाचचा जो नोकर होता त्याला वरचा दिवाण्खाना आवरून माझे अंथरून घालण्यास सांगितले. मी त्या नोकरामागे चुप चाप निघालो.
दिवाणखाना नोकराने उघडून मला अंथरूण तर घालून दिले, आणि तो गेला. दरवाजा लावून घेतला आणि विचार केला एवढ्या मोठ्या दिवाण खान्यात झोप लागणार तरी कशी. अगदी लहान जागा आणि अति मोठी जागा झोपण्या मधे भिती निर्माण करते असा विचार त्यावेळी माझ्या मनात आला. मी अंथरूणावर नुसताच बसून होतो. तरीही थोडी डुलकी आलीच. थोड्यावेळाने मी जागा झालो. पाहतो तो काय समोरच्या भिंतीवर एक मोठे पेंटिंग होते. त्यात वादळात सापड्लेल्या शिडाच्या होडिने प्रवास करणारी स्त्री दाखवली होती. उसळता समुद्र आणि होडीत बसलेली स्त्री , जिच्या दोन्ही भुंवया वर चढलेल्या. चित्राचा उद्देश लक्षात येईना. मघाशी बोलण्याच्या नादात या चित्राची दखल घेतली गेली नव्हती. नाही तर मी त्यांना प्रथम या चित्राबद्दलच विचारले असते. काही असो चित्रातील स्त्रीच्या भुंबया थोड्या सौम्य झाल्याचे मला वाटू लागले. आणि ते चित्र आता समोरच्या भिंती एवढे वाटू लागले. मी स्वतःला चिमटा काढून पाहिले , पण चित्राचा आकार खरंच वाढला होता. ते आता जवळ जवळ भिंतीभर पसरले होते. मी माझी नजर दुसर्‍या भिंती कडे वळवली. पण तिथेही तेच चित्र दिसू लागले. आता मात्र माझ्या अंगाला हलकासा घाम येऊ लागला. मी प्रथम अंथरून सोडून माझ्या लगतच्या भिंतीला चिकटून दरवाज्याकडे सरकण्यास सुरुवात केली. हळू हळू ते चित्र तिसर्‍या भिंतीवर उमटण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र मी धावत जाऊन दरवाजा गाठला. सगळं बळ एकवटून मी दरवाज्या उघडला. आणि एकदाचा बाहेर पडलो. मी मागे वळून चित्राचे काय झाले हे देखील पाहिले नाही. माझ्या धापा टाकणार्‍या हृदयाला कसा तरी थांबवीत
दगडी जिना उतरू लागलो. समोर पाहिले तर पाटील झोपाळ्यावर बसलेले दिसले. माझ्याकडे पाहून ते म्हणाले," काय सायव , लवकर झोप झालेली दिसत्ये. "
मी म्हंटले," छे हो. उगाच डुलकी लागली खरी. पण चार वाजलेले आहेत. आता निघावं म्हणतोय. " आता पुन्हा पाटील थांबवतात की काय असे मला वाटले. पण ते होकार देत म्हणाले, " चला तर मग. " त्यांना चित्रा बद्दल विचारायचे होते. पण मी मुद्दामच
विचारले नाही. मुकाट्याने बॅग घेऊन मी निघालो. तेही निघाले. आता आम्ही दोघेही चुपचाप चाललो होतो . थोडा वेळ गेल्यावर मी त्यांना न राहवून विचारले," पाटील एक विचारू का ? " बोला अशा अर्थी त्यांनी हातवारे केले. थोडे घाबरतच मी म्हंटले." वरच्या दिवाणखान्यात भिंतीवरच्या चित्राबद्दल काहीच सांगितले नाही ? " मग ते म्हणाले " चित्र ? कोनचं चित्र ? वर तर काय बी न्हाई " ते ताकास तूर लागू देईनात आणि एका दिवसाच्या ओळखीवर मला जास्त बोलवेना. आता स्टँड दिसू लागला होता. समोरच एक बस उभी होती. मी पाटलांच्या पाया पडलो. आणि त्यांचा निरोप घेऊन निघालो. बरोबर दिसलेले चित्रही मी घेतले होते. पूढे मला काही सुचेना. चित्रही मनातून जाईना

(क्र म शः )

🎭 Series Post

View all