चिरुमाला (भाग १८)

थोड्याशा काळजीतच माझा प्रवास चालला होता........


              थोड्याशा काळजीतच माझा प्रवास चालला होता. हा फोन कोणी केला, मला समजेना. मला पैंचा संशय होता. कारण ते ऑफिसमध्ये माझ्या जास्त जवळ होते.कोणीतरी रिसिव्हरवर हात ठेवून किंवा रुमाल लावून बोलत असणार. मी पुन्हा पुन्हा फोनवरचं बोलणं आठवत होतो. आवाज थोडा दबलेला आणि लांबून आल्यासारखा वाटत होता.
शब्द अशुद्ध नव्हते.म्हणजे माणूस चांगल्या थरातला असावा. आजूबाजूला कोणतेच आवाज नव्हते.मी आलेला फोन नंबर पाहिला. आठ आकडी होता. म्हणजे पब्लिक फोन असावा.हा हरिदास, किंवा गोळे तर नाही? मला नक्की काही ठरवता येईना. मी हे कानविंदे साहेबांना सांगायचं ठरवलं. मला वाटणाऱ्या शक्यताही सांंगण्याचं ठरवलं. ..... त्यांना लगेचच फोन लावला. त्यांना सांगितल्यावर त्यांचं तिरसट उत्तर आलं. " म्हणजे मी आता हेही शोधू. ?, तुम्ही आहात कुठे ? " त्यावर मी म्हणालो," मला तुम्हाला ही डेव्हलपमेंट सांगावी असं वाटलं. तुम्ही नाही काही केलंत तरी हरकत नाही". ते काहीतरी बोलणार होते. पण मी फोन बंद केला. मला राग आला होता. .....
घरी जायला जवळजवळ अकरा वाजतील. लीना झोपलीही असेल. तिला कशी तरी मनवू. असा विचार मी केला .रात्रीचे आठ वाजत होते. येणाऱ्या स्टॉपला मी जेवून घेतलं.अजून निदान अडीच तास तरी होते.मला आता पेंग यायला लागली.....
घरी जायला रात्रीचे अकरा वाजले. लीनाने जांभया देत दार उघडलं. तिनी जेवणाबद्दल विचारलं. पण मी जेऊन आल्याचं सांगितलं. त्यावर ती म्हणाली," मग तुमच्यासाठी केलेल्या जेवणाचं काय करु ? कारण तुम्ही शिळं खात नाही". मग मात्र मी नाईलाजाने जेवायला तयार झालो. मला तिला नाराज करायचं नव्हतं.माझ्यासमोर ती डायनिंग टेबलापाशी बसली होती. मी जेवण अक्षरशः भरत होतो.तिला चांगलीच झोप येत होती. ते पाहून मी म्हणालो," तू जाऊन झोपलीस तरी चालेल. " पडत्या फळाची आज्ञा मानून ती उठली. मात्र जाता जाता," तेवढं ताट बेसिन मधे ठेवा आणि अन्न झाकून उठा. नाही तर याल तसेच .तुमचं वागणं मी वाड्यावर पाहिलंय. " मला खरा राग आला होता,पण मी भडकायचं नाही असं ठरवलं होतं. त्याला कारण म्हणजे बरेच दिवसांनी मी तिला जवळ घेणार होतो. दहा पंधरा मिनिटांनी मी बिछान्यात शिरलो. ती माझ्या कडे पाठ करून झोपली होती. मी तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला त्यावर ती कोरडेपणानी म्हणाली," झोपा आता, रात्र फार झाल्ये.मला झोप येत्ये " मला प्रचंड राग आला. मी म्हंटले " एवढ्या लांबून मी तुझ्या साठी आलो.आणि तुझं हे असं " ती उत्तर न देता आणि माझ्याकडे न वळता झोपी गेली.माझी चांगलीच निराशा झाली. मी जेमतेम दोन दिवसांसाठी आलो होतो.एक तर मी एकूण वाड्यातलं रुटीन, बॅंकेतलं वातावरण,जेवणाची आबाळ , पोलिस वगैरेंना जाम कंटाळलो होतो. याला उपाय फक्त लीनाचं प्रेम हाच होता. मला फार उशिरा झोप लागली. मी सकाळी नऊ वाजता उठलो.
मी पण लीनाशी फार न बोलण्याचं ठरवलं. मग दुपारी जेवणं झाल्यावर आमची वादावादी झाली. तिचं एकच म्हणणं. मी नोकरी सोडावी. म्हणजे आपला संसार नीट चालेल. पण मग वाड्यासहीत सगळंच विसरणं मला शक्य नव्हतं. तसंच जुडेकर आणि पारलोकेंचं काय ? त्यांचा जीव निष्कारण गेला होता. मी ही ट्रान्स्फर स्वीकारली नसती तर हे काहीच घडलं नसतं. मग मला एकदम एका साहेबांची आठवण झाली. ज्यांनी काही लागलं तर मदत करण्याची तयारी दाखवली होती.असो. तरीही मुलांना आणि लीनाला घेऊन बाहेर जेवायला गेलो.थोडंफार शॉपिंगही केलं.तेव्हा कुठे लीनाची मुद्रा थोडी सौम्य झाली. आता ती हसत जरी नसली तरी बरी बोलत होती. हळूहळू बोलता बोलता माझा हात मी तिच्या खांद्यावर ठेवला. सोमवारी सकाळी निघण्यापेक्षा मी संध्याकाळी निघण्याचं ठरवलं.तिला मी मुलांना दोन चार दिवस रजा घेऊन माझ्याबरोबर चालण्याचा आग्रह केला. ती काहीच बोलली नाही. मात्र शनिवारची रात्र मात्र माझ्या अपेक्षेप्रमाणे गेली.सोमवारी सकाळी मी पुन्हा माझ्याबरोबर चलण्याचा आग्रह धरला. रात्रीच्या प्रेमालापामुळे तिने मुलांची आठवड्यांची सुट्टी शाळेकडून मंजूर करुन घेतली. पण तिने यापेक्षा जास्त राहणार नसल्याची अट घातली.मला तिच्या निश्चयी स्वभावाची कल्पना होती. मुलं मजेत होती पण लीना मात्र तणावाखाली वाटली. मुलांचं लक्ष नाही असं पाहून मी तिला जवळ घेतली आणि," काही टेन्शन आहे का ? जेवण झाल्यापासून मी पाहतोय. " ...
त्यावर ती म्हणाली," छे हो टेन्शन वगैरे काही नाही.फक्त तिथले येणारे विचित्र अनुभव आठवून काळजी वाटते.मुलांना त्रास झाला तर ? ". मग तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी म्हणालो, " अगं तसं काही होणार नाही. आणि विशेष म्हणजे माझा श्रीकांत म्हणून मित्र आहे,तो हल्ली सोबत राहतो.हे बघं असं तोंड करुन नकोस. त्यांचा त्रास न होता उलट उपयोगच होतोय. गाडीत बसल्यावर सांगतो तुला. चल, निघू या आपण. बॉंबे सेंट्रलला पोहोचे पर्यंत वेळ लागेल." मग आम्ही साडेतीनला निघालो. गाडी लागलेली होती. आम्ही आपल्या सिटांवर बसलो. मुलं कधी आमच्याजवळ तर कधी त्यांच्या सीटवर बसत.मग मी लीनाला श्रीकांत बद्दल सांगायला सुरुवात केली. ती मन लावून ऐकत होती. चांगली खूण म्हणजे तिला आता माझ्यात चांगलाच इंटरेस्ट आला होता. काही वेळानंतर आम्ही सगळेच पेंगुळलो.तेवढ्यात माझा फोन वाजला. पलीकडे श्रीकांत होता. तो म्हणाला," एक खुशखबर आहे. आलास की देतो. " मी ठीक आहे म्हणालो आणि लीना आणि मुलांना ही बरोबर घेऊन येत असल्याचं सांगितलं. संध्याकाळचे सात वाजले होते.अजून किमान तीन साडेतीन तास तरी होते.बसमधले दिवे लागले. बहुतेक प्रवासी पेंगत होते. मी सहज म्हणून इतर प्रवाशांवरुन नजर फिरवली. शेवटच्या आडव्या बाकावर खिडकीजवळ एक शेंदरी रंगाचं पागोटं घातलेल्या म्हाताऱ्या गृहस्थांची पाठ मला दिसली.का कोण जाणे पण त्यांची शरीरयष्टी मला ओळखीची वाटली.ते खिडकीतून बाहेर पाहात होते. त्यांनी चेहरा वळवला आणि ते पाटील असल्याचं मला दिसलं.मी त्या हात हालवून ओळख दाखवली . त्यांच्या डोळ्यातही ओळख तरळल्याचं दिसलं. पण लगेचच ती नाहीशी करून अनोळखी माणसाकडे पाहतात तसे ते माझ्याकडे पाहू लागले.लीनाला हे सांगितलं असतं तर ती घाबरली असती.मी पुन्हा लीनाशी बोलायला सुरुवात केली.पण तिला झोप येत असल्याचं दिसलं.मग मीही थोडावेळ पेंगलो.पुन्हा एकदा माझी नजर मागे गेलो.पण तिथे पाटील नव्हते,दुसराच कोणीतरी बसलं होतं .म्हणजे मला भास झाला होता तर. असो.आम्ही रात्री अकरा वाजता स्टॉंडवर पोहोचलो. इथे घरी जायला रिक्षा टॅक्सी असायला हवी काही मुंबई नव्हती. अर्ध्या तासाने आम्ही वाड्यावर पोहोचलो.श्रीकांतने दार उघडले. मुलांना एका बेडरुममध्ये ंझोपवलं.कारण त्यांच्या डोळ्यात झोप चांगलीच भरली होती. काहीही न बोलता आम्हीही दुसऱ्या बेडरुममध्ये झोपलो. लीनाला गाढ झोप लागल्याने येणारे आवाज कळले नाहीत.मला संवय होतीच.
दुसऱ्या दिवशी लवकर उठलो आणि ब्रेकफास्ट टेबलावर लागलेला पाहून मला आश्चर्य वाटलं.मग लीना आली असल्याचं जाणवलं.बायकांचं बरं असतं,त्या नवीन वातावरणात लवकर रुळतात.श्रीकांतशी लीनाची ओळख करून दिली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पण श्रीकांत वाड्याबद्दल काहीच बोलला नाही.मलाही बॅंकेत जायचं असल्याने मीही काही बोललो नाही. मग त्याला नंतर बोलू असं सांगून मी निघालो. मुलं लगेचंच खेळायला. त्यांना विहीरीकडे जायचं नाही हे बजावून सांगितलं.
ऑफिसमध्ये मला पै दिसले नाही. माझ्या मनात आलं, म्हातारा आजारी पडला की काय ? मीही कोणालाही विचारलं नाही. कारण मला उन्नीकृष्णन ची काळजी होती. काय काढतो कोणास ठाऊक ? उन्नीकृष्णनने मला बऱ्याच पॉईंट्स वर कॉर्नर करायचा प्रयत्न केला.मी नव्हतो तेवढ्या अवधीत त्यांच्या बऱ्याच फायली तपासून झाल्या होत्या. त्यांच्या काही क्वेरीज होत्या.त्यापैकी मी कधी स्वतः जाऊन कर्ज मागणाऱ्या इंडस्ट्री किंवा व्यक्तीच्या घरी भेट दिली नव्हती.त्यामुळे काहीही न तपासता अर्ज निकाली काढले होते. आणि मी बरोब्बर तेवढंच केलेलं नव्हतं.पण त्यावर माझं उत्तर तयार होतं.मी हेडऑफिसला तीनचार वेळा कळवूनही इन्स्पेक्टर्स पाठवले नव्हते.इतरही लहान सहान क्वेरिज होत्या.शेवटचं त्यांचं अर्ग्यूमेंट म्हणजे मी त्याच्याशी सहकार्य करीत नव्हतो. पण मला त्याचं महत्व वाटलं नाही.शेवटी तो म्हणाला," कल हम जायेंगे और हमारी ये रिपोर्ट चीफ मॅनेजर को सबमिट होगी. फिर मैं कुणबी मदत नहीं कर सकूंगा" जणूकाही त्याने फार फ्रेंडली वातावरण तयार केलं होतं. त्याला कोरडा निरोप दिला आणि मी घरी यायला निघालो.आणि अचानक इन्स्पे. कानविंदे येऊन उभे राहिले. मी त्यांना मेहरबानी करुन तुम्ही निघा.माझी फॅमिली आली आहे आणि मला लवकर घरी जायचंय असं सांगितलं.त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष न देता आवराआवरीला सुरुवात केली.ते पाहून ते निघाले आणि जाता जाता म्हणाले," ठीक आहे,जा तुम्ही,पण उद्या पोलिस स्टैशनला या ,तुमच्या पैंनी आत्महत्या केल्ये हे लक्षात ठेवा." आणि ते बाहेर पडले. मला चांगलाच धक्का बसला होता.याचा अर्थ मला पै फार आवडत होते असं नाही.मी जरा वेळ खुर्चीत तसाच बसून राहिलो. मग बेल वाजवली, आणि साखळकर मॅडमना बोलवायला सांगितलं. मॅडम आल्या. त्यांना बातमी सांगितली.त्यावर त्या म्हणाल्या," तुम्हाला कोणी सांगितलं ?" मग मी जरा वैतागून म्हंटलं, " तुम्हाला माहिती होतं का ? मी रजेवर होतो,मग मला कसं माहित असणार? काहीतरीच प्रश्न विचारता. आपल्या रेकॉर्ड मधून पैंचा पत्ता पाहून मला सांगा. त्यांच्या घरी गेलं पाहिजे. " ते ऐकून त्या म्हणाल्या," सर आम्ही, म्हणजे स्टाफमधले काही जण आलो तर चालेल का ? " मग मी थोडा विचार करून होकार दिला. मग स्टाफमधले तिघे तयार झाले. आम्ही पैंच्या घराकडे निघालो. बरोबर कोणी असलं म्हणजे अशा वेळी बोलणं सोपं जातं.
त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा सात वाजले होते. आमच्या आधीच तिथे गोळे आणि त्याची बायको आले होते. मला तो आवडत नसे.पैंचं घर म्हणजे दोन तीन बैठ्या खोल्या होत्या. त्यांचा देह बाहेर ठेवला होता माफक गर्दी होती. मी काहीच बोलत नव्हतो.माझा स्टाफ मात्र ते काम चोख करीत होता. अधूनमधून गोळे मात्र माझ्याकडे डोळे वटारून पाहात होता. तो माझं निरीक्षण उगाचच करीत होता.स्टाफमधले एकदोघे प्रेतयात्रेसाठी थांबणार आहेत असं म्हणाले. मी अर्थातच थांबायला नकार दिला. मी लवकरच निघालो.माझ्याबरोबर गोळे आणि त्याची बायकोही निघाले. जाता जाता मला ऐकू येईल अशा रितीने आणि माझ्याकडे पाहात गोळे म्हणाला," आणखी किती बळी घेणार आहेत कोण जाणे ". मी पैंच्या मृत्यूला जबाबदार नव्हतो.मी त्याला नंतर जाण्याचं ठरवलं आणि घरी गेलो.गेल्या गेल्या मुलं गळ्यात पडली. " काय हे डॅडी,आम्ही खेळण्यासाठी तुमची किती वाट पाहिली. शेवटी श्रीकांत काका आमच्याशी खेळले ,आणि आम्ही विहीरीकडे गेलो नाही काही." मी त्यांना जवळ घेऊन त्यांना समजावलं.मग लीना आणि श्रीकांतला मात्र खरं कारण सांगितलं.मग लीना आत गेल्यावर श्रीकांत म्हणाला," अरे, तू वहिनींना आणलंस खरं. पण उगाच चर्चा नको म्हणून भुयारात उतरलो नाही.शोध अर्धवट राहतो रे. " मग मी त्याला लीना आणि मुलं झोपल्यावर उतरु असं आश्वासन दिलं.रात्रीच्या वेळेस भुयारात उतरणं कितपत योग्य ठरलं असतं मला अंदाज नव्हता.असो.जेवण्यात, गप्पा मारण्यात आणि मुलांशी खेळण्यात वेळ फार लवकर गेला.रात्रीचे दहा वाजत आले.लीनाने मुलांना दुसऱ्या खोलीत झोपवलं.आणि आम्ही दोघे आमच्या बेडरुममध्ये शिरलो.श्रीकांत हॉलमध्ये झोपला.त्याने माझ्याकडे खाली कधी उतरायचं ते खुणेने विचारलं.मी त्याला नंतर येतो असं खुणेनेच सांगितलं.खोलीत शिरल्या शिरल्या लीनाने माझ्या गळ्यात हात टाकले.अर्थातच आम्ही बेडवर पडलो.तिचं प्रणयाराधन बराच वेळ चालू होतं.मग मी तिला कुरवाळत विचारलं," राणीसाहेब आज रात्र गाजवायच्ये की काय? तुम्ही ऐकण्याची नावच घेत नाही. " तो तो ती जास्तच चाळे करु लागली.मला अचानक शंका आली,ती मला श्रीकांतला भेटण्यापासून परावृत्त तर करीत नव्हती ? मी झटकन बाजूला सारीत म्हंटलं," तू दमली नाहीस वाटतं ? " त्यावर ती म्हणाली," इथे दमण्या इतकं कामच नाही.जुडेकरची बायको बरीचशी कामं स्वतःच करते. आणि मला झोप येत नाही आहे.मग ? काय करणार, नाही का ?". हळूहळू अकरा वाजत आले. आमचा प्रणय संपेना.माझ्या मनात भुयारात उतरण्याच्या विचाराने जोरात उचल खाल्ली. मग मीनाला म्हंटलं, " आपण बाकी सगळं उद्या केलं तर ?" ते ऐकून ती म्हणाली," हे तुम्ही बोलतात ? ठीक आहे." मग तिने माझ्याकडे पाठ केली. तिला राग आला असावा.मी तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला.श्रीकांतला समजावून सांगू ,असा विचार करून तिच्या अंगावरून हात फिरवला.त्यावर ती मांजरी सारखी फिसकारीत म्हणाली," मूड घालवलात,आता झोपा ." आणि ती पुढच्या अर्ध्या पाऊण तासात झोपी गेली. मी घड्याळ पाहिलं.पावणे बारा होत होते.अचानक मला पैंची आठवण झाली. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला ? म्हातारा एवढा लेचापेचा नक्कीच नव्हता.उद्या पोलिस स्टैशनला जायला लागेल. असा विचार करीत मी दरवाजा आवाज न करता उघडला.हॉलमधे आलो. श्रीकांत घोरत होता.त्याला उठवावा की नाही याचा विचार करीत मी पुन्हा खोलीकडे वळलो.तेवढ्यात त्याची हाक ऐकू आली. " विकास,अरे जरा डोळा लागला होता,पण तसा मी जागाच आहे. चल,उतरु या." मला त्याच्या सिन्सिरिटीचं आश्चर्य वाटलं. मग आम्ही दोघांनी मिळून सरदार साहेबांचं चित्र सरकवलं.मी हातात टॉर्च आणि तो हातात पिस्तूल घेऊन भुयारात उतरु लागलो.

   आज वटवाघूळांची संख्या फार नव्हती.पण जी होती चांगलीच मोठी जास्त क्रूर वाटली.ती आमच्या भोवती फिरु लागली..त्यातल्या एकाने माझा खांदा धरुन ठेवला.मी फार प्रयत्न केला पण ते खांदा सोडेना. मग श्रीकांतने एक झाडली . त्याबरोबर त्याने घाबरून पकड सोडली. पण खांद्यातून काही वेळ रक्तस्त्राव झाला. मी चांगलाच घाबरलो.खांद्याला विश्वाच्या मदतीने रुमाल घट्ट बांधला.मग श्रीकांत म्हणाले," तुला पाहिजे तर वर जा आणि विश्रांती घे.उद्या डॉक्टरांकडे जाऊन ये." अर्थातच मी वर जायला नकार दिला.आम्ही परत काटेरी मुकुट हातावर असलेल्या पुतळ्या जवळ आलो.आता आम्ही सराईता सारखा पुतळ्याखालचा मार्ग उघडला.टॉर्चच्या प्रकाशात जे मृतदेह दिसले होते ते मात्र तिथे नव्हते.कदाचित त्यांनी वरच्या मजल्यावर किंवा आणखी कुठेतरी गर्दी केली असावी. कारण आम्हाला ते वर दिसले नव्हते. अचानक आम्हाला असा भाग दिसला जो चर्चच्या विरुद्ध दिशेला म्हणजे उजव्या बाजूला होता. तिथला भाग संगमरवरी असून तो बराच स्वच्छ होता. तिथे मात्र जुन्या मूर्ती किंवा विक्षिप्त शिल्प दिसली दोनतीन मिनिटं चालल्यावर समोर एक प्रचंड भिंत लागली. जिच्यात मोठा दरवाजा बसवला होता.काही वर्षांचा कचरा तिथे पडला होता. पण फार नव्हता.त्या दरवाज्याला हॅंडल नव्हते की कडी ,किंवा कोणताही असा भाग ज्यामुळे तो उघडेल.आम्ही दोघेही तिकडे पाहण्याशिवाय काहीही करु शकत नव्हतो. तिथे काहीच न सापडल्याने आम्ही मागे वळायचं ठरवलं.श्रीकांतला काय वाटलं कोण जाणे. त्याने भिंतीचा खालचा भाग तपासायला‌ सुरुवात केली.भिंत दहा ते पंधरा फूट लांब आणि छताला चिकटलेली होती.प्रत्येक फुटावर हाताने तपासताना अचानक त्याने जमीनीवर दाबून पाहिले.आणि अचानक मोठा आवाज करीत भिंतीला दरवाजा उघडला.अर्थातच आत काळोख होता. टॉर्च मारुन पाहिल्यावर असं दिसलं की लहान रेल्वे प्लॅटफॉर्म सारखा हॉल दिसला. आम्ही अजूनही आत प्रवेश केला नव्हता.टॉर्चच्या प्रकाशात काही तुटलेले सोपे आणि खुर्च्या दिसल्या. आणि लांबवर एक स्टेज सारखा भाग दिसला.कदाचित हा पूर्वीचा विशिष्ट कार्यक्रमांचा हॉल असावा. स्टेज वरही मध्यभागी काहीतरी रचना दिसली. पण अंदाज येईना.मग श्रीकांत म्हणाला,आपण हे दिवसाउजेडी येऊन पाहू.आम्ही मागे वळलो. अजूनही हॉल उघडाच होता.तो बंद कसा करायचा हे माहित नव्हतं. श्रीकांत म्हणाला," आपण दरवाजा बंद कसा करायचा ते शोधू . " पण त्याला आठवीत म्हंटलं," राहू दे तसंच. आपल्याला कोणी विचारणार नाही.". श्रीकांतला ते पटलं नाही.तो अनिच्छेनेच वळला.तशी मी त्याला समजावलं." अरे आता जवळजवळ दीड वाजत आलाय. मला उद्या कामावरही जायचंय आणि लीना उठली तर ? " असं म्हंटल्यावर तो यायला तयार झाला.आम्ही बाहेर येणार एवढ्यात कर्कश्श आवाज करीत दरवाजा बंद झाला. आम्ही बाहेर आलो. कांटेरी मुकुट पुतळ्याच्या हातावर ठेवला.तोही मार्ग बंद केला. पुन्हा वटवाघूळं अंगावर आली . पण श्रीकातने सावधानतेने फायर केलं. आम्ही बाहेर आलो. आपापल्या बिछान्यांवर जाऊन झोपलो.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all