चिरुमाला (भाग १७)

सध्या माझा मूड ही नव्हता.........

सध्या माझा मूडही नव्हता,की मी भुयारात उतरेन. इतका वेळ मला काळजी वाटली नाही.पण आता कानविंदेंपासून भीती वाटू लागली.. पोलीस लोक काय करतील सांगता येत नाही.माझ्या बोलण्याचा मला अजिबात पश्चात्ताप वाटतं नव्हता. मला जाम भूक लागली होती.अचानक काल आणलेल्या ब्रेडची आठवण झाली.मी उघडल्यावर दोनच स्लाइस दिसल्या.उरलेल्या श्रीकांतने खाल्ल्या असतील.मी स्लाइस भाजल्या . कांदे बटाट्याची भाजी बनवली आणि सॅन्डविच बनवून खाल्लं.तेव्हा बरं वाटलं.मग हॉलमध्ये येऊन बसलो. लीनाला जाऊन बरेच महिने झाले होते.जेवताना झोपताना तिच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही.सारखी जेवणं बनवायला मी सुद्धा कंटाळलो होतो. त्यात आणखीन मी श्रीकांतला इथे ठेवून घेतलं होतं. त्यालाही दुसरं कुठेही थारा नव्हता.लीनाचा अधुनमधून फोन यायचा. पण तिचं एकच म्हणणं असायचं. मी ट्रान्स्फर तरी घ्यावी किंवा नोकरी सोडावी.मुलं रोज आठवण काढीत असतात. खरंतर मलाही कंटाळा येत होता. गाव लहान. त्यामुळे हॉटेलं नाहीत. बाहेरून जेवण मागवण्याचा प्रश्नच नव्हता.अगदी क्वचितच वडे बाहेर मिळत असत. आणि आता डबा द्यायला जुडेकरच नव्हता . मग त्याची बायको कशाला डबा देईल ?.

मी हॉलकडे पाहिलं.एवढ्या मोठ्या हॉलमध्ये, किंबहुना एवढ्या मोठ्या वाड्यातच मी का राहत होतो ? हे सोडून लहानशा जागेत राहायला गेलो तर काय बिघडणार होतं ? मला विचित्र रितीने या सगळ्या सेटअपचं सुप्त आकर्षण वाटत असावं.इथे सगळ्याच गोष्टी गैरसोयीच्या होत्या.....मी स्वप्नरंजन करण्यात गुंग होतो. तेवढ्यात भुयाराच्या उघड्या तोंडातून अचानक " चिर्र चिर्रऽ ऽ. ऽ ......" असा आवाज करीत दोन वटवाघळं हॉलमध्ये फिरली आणि पुढच्या दरवाज्यातून निघून गेली. नंतर पुन्हा एकदा अशीच दोन वाघुळं आवाज करीत बाहेर आली आणि हॉलच्या छताला चिकटून लोंबू लागली.आता भुयाराचं तोंड बंद तरी करायला हवं किंवा खाली जाऊन श्रीकांतला मदत तरी करायला हवी.
एक वाजता होता.मी कपडे बदलून टॉर्च आणि काठी हातात घेतली . भुयारात उतरलो.आतून चार वाघुळं अंगावर आली.त्यांना वारुन पायऱ्या उतरलो.सगळं जसेच्या तसेच होतं. तिथे काय बदल होणार होता,म्हणा. आमच्या दोघांशिवाय कोणीच आत जात नव्हतं.माझी नजर इकडेतिकडे भिरभिरत पुष्करणीच्या पुतळ्यासमोर निश्चल उभ्या असलेल्या श्रीकांतकडे गेली. हा एवढा टक लावून का बघतोय मला समजेना.मी जवळ जाऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. त्याच्या दोन्ही हातांत तो दगडाचा कांटेरी मुकुट होता. मी त्याला हांक मारुन हालवल्यावर भानावर येत म्हणाला, " मी हा मुकुट हातात धरल्यापासून हा पुतळा अगदी सावकाश पण घुर्र खुर्र...असा आवाज करीत डावीकडे सरकतोय.बराच वेळ झाला मी वाट पाहतोय." मलाही आवाज ऐकू आला. अर्ध्याहून अधिक सरकल्यावर पूतळ्याच्या पायाखालचा भाग उघडा झाला.आम्ही पुढे वाकून पाहू लागलो.त्याने तो काटेरी मुकुट आता माझ्या हातात दिला.मी टॉर्च आणि काठी बाजूला ठेवली. मुकुट चांगलाच जड असल्याने दोन्ही हातांनी धरावा लागत होता. आम्ही अर्धातास तसेच उभे राहिलो. आता पुतळ्याची पाठ पूर्णपणे आमच्याकडे वळली , तशी आवाजही थांबला.एक चौकोनी , दोन अडीच फुटांचा मार्ग आमच्यासमोर उघडा झाला. टॉर्चच्या प्रकाशात आत उतरण्यासाठी पायऱ्या दिसू लागल्या.आम्ही भीतीयुक्त आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागलो....
आतल्या पायऱ्या वरच्या सारख्या नव्हत्या चांगल्या संगमरवरी होत्या. अर्थात थोडीफार धूळ चिकटलेली होती. आत जावं की नाही या विचाराने आम्ही एकमेकांकडे पाहत होतो.श्रीकांत म्हणाला," मला वाटतं आपण खाली जाऊन पाहावं." त्याने पाय उचलला. त्याला थांबवीत मी म्हणालो," अरे पण आपण आत शिरलो आणि पुतळा परत जागेवर सरकला,तर आपण आत अडकून पडू . मला वाटतं,मी बाहेर थांबतो. तू आत उतरून पाहा. " तो तयारच होता.मी थोडा विचार करीत त्वाला थांबवून म्हणालो," आधी टॉर्च मारुन आत पाहू , काय दिसतंय ते.उगाचंच का उतरायचं ?" त्यानी तसं केलं. पण पायऱ्यांशिवाय काहीच दिसलं नाही.मला काहीच माहिती नसल्याने मी हातातला मुकुट पुतळ्याच्या मागें जाऊन त्यांच्या डाव्या हातात ठेवला.अजूनतरी मार्ग उघडा होता.मी पुन्हा पुढे येऊन उभा राहिलो.श्रीकांत दोनतीन पायऱ्या आता उतरला.मग आस्ते आस्ते पूर्णपणे आत उतरला. तो दिसेनासा होईपर्यंत मी तिथेच थांबलो. तो आत उतरल्यावर मीही एक दोन पायऱ्यांवरून डोकावून पाहू लागलो. आम्हाला दिसलेलं आतल दृश्य अतिशय विक्षिप्त होतं.आतमधे एक हॉलवजा दिवाणखाना होता.त्यात अंगावरचं. मांस सुकलेले देह वर्तुळाकार उभे होते. त्यांचे दृष्टीहीन डोळे पाहून श्रीकांतने डोळे झाकून घेतले.पणं त्याने तेवढ्यात दिवाणखान्याच्या दुसऱ्या टोकाकडे पाहिलं. त्याला कुठेच पाणी दिसलं नाही. मग मात्र त्याने मला जाण्यास सांगितले. मी वळणार एवढ्यात घुर्र खुर्र.....असा आवाज सुरू झाला होता आणि पुतळा फिरुन बसण्यासाठी हालू लागला. आम्ही दोघेही कसेतरी एकमेकांना हाताने आधार देत बाहेर आलो. कारण पुतळा सरकू लागला होता. एक गोष्ट मात्र लक्षात आली .ती म्हणजे पुतळ्याच्या डाव्या हातातला काटेरी मुकुट म्हणजे पुतळा सरकवण्याची कळ होती. आम्हाला आश्चर्य वाटलं.ते त्यावेळच्या आर्किटेक्चरचं.

आम्ही इकडेतिकडे नजर टाकली.फारसं काही बदलेले नव्हतं. दोघेही थोडेसे भेदरलेलेच होतो.श्रीकांतही थोडा काळजीत वाटला मग मीच म्हंटलं ," मला वाटतं खाली जे देह पाहिले,तेच काल बिनचेहऱ्याने वर आले असावेत. पण त्यांना कोणाला भेटायचं होतं आणि का ?"... काय माहित ? अशा अर्थाचे हातवारे त्याने केले. मग तीन वाजत आल्याची मी त्याला जाणीव करुन दिली. अजून जेवणं व्हायची होती. आम्ही भुयारातून वर आलो. सरदार साहेबांचं चित्र परत जागेवर बसवलं.हातपाय धुऊन मी स्वयंपाकाला लागलो. श्रीकांत अंघोळीला गेला. जाता जाता आपण संध्याकाळी चर्चच्या भागातून भुयारात जायचा प्रयत्न करावा का असं विचारलं. त्यावर मी त्याला म्हंटलं," हे बघ आपण सकाळी गेलो तर जास्त वेळ शोधायला मिळेल " असं म्हणालो. त्याला ते फारसं पटलं नाही. तो बाथरूम मधून बाहेर आल्यावर म्हणाला," तू नेहमी कोणतीही गोष्ट लगेच करायला तयार नसतोस असं दिसतंय." मग मात्र स्वयंपाकाचं काम अर्धवट टाकून मी म्हणालो," आता आपण जाऊच. तो समजावणीच्या सुरात काही तरी बोलणार होता. त्याने मौन पाळले. मी तयार झाल्यावर तोही निघाला. दोघेही बाहेर पडलो. ऊन रणरणतं होतं.नदीकाठाचा भाग असल्याने वारा प्रचंड होता. पण गरम. चर्चच्या प्रेयर हॉलमध्ये शिरलो. तुटलेले फर्निचर लाथेने तुडवीत आम्ही कोपऱ्यातल्या विवराजवळ आलो. जिथे भुयाराचे छप्पर उतरते होत गेल्याने डोक्याला लागत होतं.

..........पुढचं पाणी जसं होतं तसंच होतं. मग श्रीकांत म्हणाला, " हे पाणी पंप लावून बाहेर काढलं तरच आत शिरणं शक्य आहे" मी मात्र पंप लावण्याची माझी इच्छा नाही, असं म्हणून ती आयडिया धुडकावून लावली. " पण इथून आत जाऊन मिळणार काय ? दोन्ही जोडलेलं आहे हे तर माहीतच आहे. " मग मात्र तो न बोलता चर्च बाहेर आला.
. मी थोड्या नरमाईने म्हंटले," काय आहे ना, मला आता या सगळ्या सेट अपचा कंटाळा आलाय." नवंघरात शिरल्यावर मी माझ्या कामाला लागलो. तो मात्र पारलोकेंची डायरी आणि नकाशा घेऊन बसला. जेवण तयार होईपर्यंत त्याचा अभ्यास चालू होता. जेवता जेवता तो म्हणाला," एक नवीन गोष्ट सापडली.पुतळ्याच्या अवतीभवती एक दगड असल्याचं वर्णन या डायरीत आहे. ज्याच्यावर इथे असलेल्या माणसांची नावं कोरलेली आहेत. दगड लाल रंगाचा आहे. आपल्याला तो दगड दिसलाच नाही. मला वाटतं पुतळ्याजवळ बरीच रहस्य सापडतील.. पुतळ्याखाली कुठेतरी एकाच रेषेतले तीन बाण आणि तारका कोरलेली आहे. तिथेच तो दगड असावा . त्यावर फक्त गेलेल्या लोकांची नावं कोरल्येत की जिवंत लोकांची पण ? आपली तर नावं नाही ना सापडणार?. कदाचित पारलोकेंना तो दगड सापडला आणि त्यांनी तो लपवून तर ठेवला नाही ? कदाचित त्यांना त्यांचं नाव त्यात सापडलं तर नाही ? डायरीतला न दिसणारा पेन्सिलचा भाग नीट वाचला पाहिजे. ". .......मला जरा टेन्शन आलं. मी म्हणालो," तू मला घाबरवतोयस की काय ? " . मग तो आश्चर्याने म्हणाला," मी कशाला घाबरवू ? शक्यता विचारात घ्यायलाच हवी. तू म्हणत असशील तर आपण हे शोधकार्य थांबवू.मी माझ्या घरी जातो‌. तू बघ तुला काय करायचंय ते. "
मला निश्चित निर्णय घ्यायला हवा. मी आवराआवर केली. मग जरा पडून विश्रांती घेण्यासाठी बेडरूममध्ये गेलो.

संध्याकाळ होत आली.मग मी त्याला माझा विचार बोलून दाखवला," मी हा वाडा सोडून लहानशा जागेत राहायला जायचा विचार करतोय.आपल्याला काय करायचंय हे सगळं शोधून ? याचा बॅंकेशी काहीही संबंध नसावा.उगाचंच आपण आपली एनर्जी का घालवायची ? कदाचित मी ही नोकरी सोडूनही देईन. कदाचित मी ट्रान्स्फरही मागीन." हे ऐकून त्याला धक्काच बसला. तो अस्वस्थ होत म्हणाला," अरे, मग मोहंतीच्या मुलीचं काय ? जुडेकरचा खून झाला, हरदास, गोळे, पै यांचं काय ? आणि पारलोकेंच्या खुनाचं काय ? कितीतरी घटना एकमेकीत गुंतलेल्या आहेत. " ... मग मी म्हणालो," ते शोधण्याचं काम पोलिसांचं आहे. मी या सगळ्यात सामील नाहीच आहे."....मग मात्र तो विचार करीत बसला. त्याला या सगळ्यातून काहीच मिळत नव्हतं. मी अर्थातच तसं बोललो नाही.पण त्यांची निराशा झालेली दिसली.गूढ घटनांचं रहस्य उकलून काढण्याचं त्याला व्यसनच होतं.किंबहुना त्याने त्यासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. पण हे काम गेलं तर त्याला दुसरं मिळालं असतं. जगात अशा गोष्टी घडतच असतात. मला माझ्या आयुष्याचा विचार करायलाच हवा. माझ्यावर मुलांची जबाबदारी आहे. मी जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हंटलं ," अरे मी एक विचार बोलून दाखवला. याचा अर्थ मी तसं करीनच असं नाही. "

हळूहळू अंधारुन येत होतं. त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हंटलं ," चल, आपण नदीकाठी जरा फिरून येवू. " असं म्हंटल्यावर तो नॉर्मलला आला. मग आम्ही मुख्य दरवाज्या बंद करुन निघालो. नदीचा खळखळाट,वाऱ्याचा जोर असूनही आम्हाला संधिप्रकाशात सूर्यास्ताचा सुंदर देखावा दिसतो होता. तो न्याहाळत आम्ही एका खडकावर बसलो.

आम्ही त्या निसर्गसौदर्यचा अनुभव घेत असतानाच माझा मोबाईल वाजला. अनोळखी नंबक्ष पाहून मी बंद करणार तेवढ्यात श्रीकांतने फोन घेण्याची खूण केली. मी हॅलो म्हंटल्यावर पलीकडून आवाज आला," सबनीस सर, मला ओळखलंत का ? " मला असले कोंडी घालणारे लोक आवडत नाहीत. तरीही मी ऐकू लागलो. " सर,मी दिलीप वायंगणकर. तुम्ही आमच्या बॅचला ट्रेनिंग दिलं होतं. सध्या मी ज्युनिअर ऑफिसर आहे ".... मला काहीच आठवलं नाही, तरीही मी हो आठवलं असं म्हणालो. मग तो म्हणाला ते ऐकून आश्चर्य वाटलं. " सर, एक गुप्त बातमी आहे. तुमच्या ब्रांचबद्दल इथे बरेच गैरसमज निर्माण झाले आहेत. आणि तिथे काही तरी फ्रॉड चालू आहे म्हणून चारपाच जणांचं व्हिजिलन्स स्क्वाड लवकरच तुमच्या ब्रांचला इन्व्हेस्टिगेशनसाठी येणार आहे. असं खात्रीपूर्वक समजलं आहे. आणि त्यांचा हेड उन्नीकृष्णन साहेब आहेत ,सर तुम्ही ऐकताय ना ? सर त्या स्क्वाड मधे माझा मित्र संतोष पण आहे. मी त्याला उद्या भेटणार आहे.तो तुम्हाला नक्की मदत करीत. सर तुमच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ". मग मी थॅन्क्स म्हणून फोन बंद केला. माझे आणि उन्नीचे मिटिंगमध्ये दोन चार वेळा खटके उडाले होते. तो काही मागे तर लावणार नाही ही काळजी मला वाटली. माझा चेहरा कोमेजल्या सारखा दिसू लागला. श्रीकांतने सगळंच ऐकलं होतं.त्यावर तो म्हणाला ," अरे एवढं अपसेट होण्याची गरज नाही. मी आहेच की तुझ्याबाजूनी. आणि तू वेगवेगळ्या अनुभवातून चाललाच आहेस. अरे आपण दोघे सगळं काही हॅंडल करु शकतो. " .... मग मला त्याचं महत्व वाटलं. पण मी एकदा लीना आणि मुलांना भैटून यायचं ठरवलं. तसं मी त्याला सांगितलं. त्याला ही ते पटलं.

जेवणात हलका पदार्थ केला. लवकरच जेऊन घेऊन आम्ही बिछाने घातले.आज चांगलेच दमल्याने आम्ही लवकरच झोपलो. अडीच तीनच्या सुमारास मला जाग आली. बाथरूम कडे जाता जाता कोणीतरी सरकत जिन्याकडे जाताना दिसलं.हल्ली आम्हाला भीती वाटेनाशी झाली होती. आणि आम्ही दुर्लक्षही करीत होतो. जणू अमानवी भुतं आमच्या घरातले न आवडणारे पाहुणे होते. पुन्हा येऊन झोपल्यावर मात्र जाग थेट साडेसातला आली. मी घाईघाईत उठून तयार झालो. श्रीकांतला उठविण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. पण तो मधेच उठला आणि म्हणाला, " तू मुंबईला जाणार आहेस ना ? साधारणपणे तू रविवारी येतीलच. तोपर्यंत माझं शोधकार्य पुढे सरकलेलं असेल." त्यावर मी, आज मला यायला उशीर होऊ शकतो असं म्हणालो.आणि निघालो.
दरवाज्या उघडून बाहेर पाहिलं तर समोर जुडेकरची बायको उभी. मी तिला आत घेतली. तिने तिच्या पर्स मधून चॉकलेटी रंगाची डायरी बाहेर काढून माझ्या हातात देत म्हटलं," साहेब ही माझ्या नवऱ्याची डायरी मी पोलिसांपासून लपवून ठेवली होती. तिचा उपयोग होईल कदाचित. माझा पोलिसांवर भरवसा नाही. माझा नवरा गेला तरी घराची झडती घेतली. आणि वाटेल ते प्रश्न विचारुन मला भंडावून सोडलं. " मग मी सहानुभूतीने तिच्याकडे पाहात म्हंटलं " चांगलं केलंत तुम्ही . बरं मी आता बॅंकेत निघालोय. तुम्हाला काही पैसे हवेत का ? " त्यावर ती म्हणाली," साहेब मी तुमच्याकडे कामाला येऊ का ? मला मुलांना सांभाळायचंय. तुम्हाला द्यायचं ते द्या. ". मला जरा बरं वाटलं. माझ्या मागची स्वयंपाकाची जबाबदारी तरी सपेल. मी तिला काही पैसे दिले आणि आजपासुन कामावर यायला सांगितलं. मग मात्र मी लगेचच निघालो.

बॅंकेत शिरलो. पै फोनवर बोलत होते. मला पाहून त्यांनी फोन बंद केला.पैंचा संशय तर मला पहिल्यापासून होताच. केबिनमध्ये शिरलो. आणि पहिल्यांदा हेड ऑफिसला फोन करून उद्याची रजा घेणार असल्याचा मेसेज केला.रुटीन कामं हातावेगळी करून लीनाला फोन केला.मी येणार आहे म्हंटल्यावर तिनी फार उत्साह दाखवला नाही. समोरचा माणूस जेव्हा उत्साह दाखवित नाही तेव्हा जेवढी निराशा यायला हवी तेवढीच मला आली. मी मात्र उत्तेजीत झालो होतो. नाही म्हंटलं तरी लीनाचा सहवास लाभणार होता.साधारण तीनच्या सुमारास मी निघालो. पैंनी थोडी हरकत घेतली. कारण मी हेड ऑफिसची अनुमती येईपर्यंत थांबलो नाही. मला बॅंकेने माझ्यावर अविश्वास दाखवला , त्याचा मला राग होता.असो. मी एस्टु स्टॅण्डवर पोहोचलो. तेव्हा साडेतीन वाजून गेले होते. मुंबईहून आलेली एस्टी चार वाजेपर्यंत लागणार होती. कंट्रोलरला विचारुन एस्टीत बसलो. पंधरावीस मिनीटात कंडक्टर आला. मी तिकीट काढलं. लवकरच गाडी सुटली. आणि अचानक मला फोन आला. ," अरे, सबनीस साब आप है कहां? हम पांच लोग पहुंच गये. र आप है की रजा लेकरं भाग गये ? कमसेकम हेड ऑफिस की सॅंक्शन तक तो लुक जाते. ". त्याचा सूर मी पळून गेलो हे मला अजिबात आवडलं नाही. मला धक्का बसला होता. हे लोक चारपाच दिवसांनी येणार होते, मग आज कसे आले ? राग आणि आश्चर्याने मी काळजीत पडलो. तरीही डोकं ठिकाणावर ठेवून म्हणालो, " मुझे क्या मालूम ? मालूम होता तो रुक जाता. पै साब सब दिखा देंगे.और वैसेभी मैं सोमवार या मंगलवार को आनेवाला हूं." त्याने चुपचाप फोन. बंद केला. किरण दिलीपराव फोन आला आणि आज हे हजर ? मी प्रथम मनातले प्रश्न थांबवले. बाहेरून येणारा गरम वारा आणखिनच डोकं फिरवित होता. तेवढ्यात आणखी एक फोन आला. " अननोन नंबर....कोणाचा होता ? मी घ्यावा की नाही या विचारात असतानाच मला श्रीकांतची आठवण झाली. अननोन नंबर घ्यावा. एखादा गरजू माणूस असतो. मी हॅलो म्हंटलं . पलीकडून आवाज आला " काय साहेब असं पळून जाऊन काय मिळणार आहे? पुन्हा यालच की. आम्ही तुला बरं जाऊन देऊन ? सावधान राहा साहेब. पुढची चाल निर्णायक ठरणार आहे. घाबरलात की काय ? " मी काहीच बोलत नाही असं वाटून पलीकडचा माणूस म्हणाला. मी तो काही बोलण्याच्या आतच फोन बंद केला. माझा मूड खराब झाला . पण लीनाच्या आकर्षणाने मला दुर्लक्ष करावं लागलं.


(क्रमशः)

🎭 Series Post

View all