चिरुमाला ( भाग १५)

झोप जेमतेमच लागली........

झोप जेमतेमच लागली. हळू हळू गाल चांगलाच सुजला. उद्या डॉक्टरांकडे जावं लागेल . त्यांना काय सांगायचं. प्रश्नच होता. सध्या त्यावर विचार न करता मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. अर्धवट लागलेल्या झोपेत मध्येच पुढचा दरवाज्या कोणीतरी वाजवित असल्याचा भास झाला. मी खडबडून जागा झालो. खरोखरीच कोणीतरी दरवाज्या वाजवीत होतं. मी वेळ पाहिली " सव्वातीन. ......... यावेळेला कोण आलं असेल . असा विचार करीत मी दरवाज्याजवळ गेलो. गोळेची बायको तर नाही आली ? . दरवाज्या पुन्हा वाजला. आता मी तो उघडण्या ऐवजी , पुन्हा बेडरूममध्ये आलो. तिथली खिडकी हळूच उघडली . हेतू हा की तिथून मुख्य दरवाज्या दिसेल. मी वाकून वाकून पाहिलं पण काहीही दिसलं नाही बाहेर मरणाचा अंधार होता. बरोबरीनं वाराही. मी दरवाज्याशी आलो. आता वाजणं बंद झालं होतं. हातात टॉर्च आणि काठी घेऊन मी जोरात दरवाज्या उघडला. प्रथम वादळासारखा वारा तोंडावर भुंकला. बाहेर डोकावलो तर कोणीही नव्हतं. मी टॉर्च फिरवला. त्या प्रकाशात माझ्या गाडीच्या पुढच्या बाजूला एक मुलगी पाठमोरी बसलेली दिसली.तिच्या अंगावर एक पांढरा फ्रॉक ज्याच्यावर लाल रंगाचं डिझाइन होतं. मला अचानक तो फ्रॉक कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला. मग आठवलं. असा फ्रॉक मोहंतींच्या मुलीनि घातला होता. मला आता थंडी भरल्यासारखं वाटू लागलं. हे काय होतंय माझ्याबरोबर ? मी स्वतःला विचारलं. बसलेल्या मुलीने आपली मान मागे न वळता तशीच वळवली. ती मोहंतींचीच मुलगी होती. तिचे डोळे खोल गेलेले निस्तेज होते. तिचा चेहरा रडवेला दिसत होता. मी तिला विचारलं. " क क क कोण आहेस तू .........? " उत्तरादाखल फक्त सर्रकन सरकत ती गेट बाहेर गेली . तिनी जाताना माझ्याकडे पाहिले देखिल नाही. मी कसातरी दरवाज्या लावून घेतला. आणि अचानक मला लीनाचे शब्द आठवले. "............. अजूनही तुम्ही इथेराहणार आहात ? " काही न बोलता मी मागे परत आलो. पुढची रात्र मी बिछान्यावर बसून काढली.
सकाळी सकाळी इस्ंपे. कानविंदे आले. सात वाजत होते. आल्या आल्या त्यांनी विचारलं, " काल कुठे होतात ? "
उत्तर देण्यापूर्वी मला शंका आली. काही घडलंय का ? तरीही मी काही न दाखवता म्हणालो, " कुठे असणार ? घरीच. " त्यावर ते भडकून म्हणाले, " मि. सबनीस , तुम्ही दोन दिवसांची जुडेकरला रजा का दिलीत ? " " त्याचं कारण मला पटलं नव्हतं. पण तो ऐकेचना म्ह्णून दिली. का काही घडलंय का ? " मग ते थोडावेळ असाच घालवून माझ्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत म्ह्णाले, " जुडेकरचा खून झालाय, आत्ताच मुंबई पोलिसांनी कलवलंय आणि आम्हाला बोलावलय पण. " माझ्यावर झोपेसारखी ग्लानी होती. ती फाटकन बाजूला झाली. आणि नकळत माझ्या तोंडून शब्द आले, " बाप रे ! " ते एवढ्यासाठी श्रीकांत तिकडे गेलाय, मला त्याची काळजी होती. त्याचा काही संबंध जर पोलिसांनी लावला तर माझी पंचाइत व्हायची. खरंतर श्रीकांतचा फोन यायला हवा होता. तेवढ्यात माझा फोन वाजला. तो घ्यावा की नाही याचा विचार करीत असताना इन्स्पेक्टरांनी घ्या घ्या अशा खाणाखुणा केल्या. तो श्रीकांतचा फोन होता. मी तो बंद केला. त्यावर इन्स्पे. म्हणाले, " घेतला नाहीत फोन ? कोणाचा होता. ? " माझ्या बायकोचा असे मी त्यांना सांगितले त्यावर ते काही बोलले नाहीत. फक्त ते निघाले आणि म्हणाले, " संध्याकाळी पो. स्टेशनला या. " मी हो म्हंटले. ते गेल्यावर मला जुडेकरच्या बाबतीत बसलेल्या धक्क्याची जाणीव होऊ लागली. त्याच्या घरी जाणं आधी भाग होतं. नाही म्हंटलं तरी त्याच्या बायकोनी आमची कामं केली होती. मी कशीतरी अंघोळ केली इतर सगळी आवरा आवर केली. आणि ऑफिससाठी निघालो. दरवाज्याला कुलुप लावीत होतो, तेवढ्यात गेटचा आवाज आला. वळून पाहिल्यावर श्रीकांत आत शिरताना दिसला. मला आश्चर्य वाटलं. मी पुन्हा दरवाज्या उघडला. तो आत आला. दोन मिनिटं तो काही न बोलता सोफ्यावर बसून राहिला. शेवटी न राहवून मीच विचारलं, " असा अचानक परत कसा आलास ? एक दोन दिवसांपूर्वीच तर गेला होतास. " तरीही तो बोलेना. मग मी त्याच्या जवळ जाऊन , त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, " श्रीकांत काही फार गंभीर घडलंय का " त्यावर तो म्हणाला, " हरिदास गायब झालाय ........ आणि मला त्याचा ट्रेस लागत नाही. मग मी त्याला सविस्तर काय झालं ते सांगायला सांगितलं. मध्येच मी कॉफी केली. आम्ही दोघांनी ती घेतल्यावर तो म्हणाला, " मी जुडेकरच्या मागावर होतो, तुला माहित आहे. त्याचा पाठलाग करता करता हरिदासच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. त्याच्या फ्लॅटकडे जाणाऱ्या जिन्यावर पोहोचलो. दरवाज्या उघडा होता. मी वरच्या जिन्यावर गेलो. हरीदासशी इतरांचं चालू असलेलं बोलणं ऐकू येत होतं. प्रथम बोलणं सौम्यपणे चालू होतं. मग अचानक आवाज वाढले. आतल्या माणसांपैकी एक जण म्हणाला, " अरे पण तू का घाई केलीस, हा सबनिस का कोण आहे त्याची तुला माहिती नव्हती तर त्याची ऑर्डर काढायला पिंटो साहेबाला का भाग पाडलंस ? पैसे न मिळून जवळजवळ वर्ष झालं अशानं आपली रोजी रोटी कशी चालेल ? " हरिदासच्या तोंडून एक शब्दही फुटत नसावा. मग शिव्यागाळी झाली. तेवढ्यात आत असलेले दोन बुरखाधारी व्यक्ती हातात पिस्तुलं घेऊन त्याला पुढे करून दरवाज्याकडे निघाले. " चल, तुला इथे ठेवण्यात अर्थ नाही. तू काही कामाचा नाहीस, तुझं जगणं आता मोहंतीच ठरवेल. " मी पटकन वरच्या जिन्यावरच्या टोकाला जाऊन लपलो. हरिदास पुढे आणि ते बुरखाधारी मागे आणि तिसरा जो होता तो त्यांच्या मागे. जो यांचा म्होरक्या असणार. त्या पैकी कोणाचाच चेहरा माझ्या ओळखीचा नव्हता. दरवाज्या तसाच उघडा ठेवून ते निघाले. मी , ते गेल्यावर आत जाऊन झडती घ्यायला सुरुवात केली. थोडा वेळ गेला. मला काही कागदपत्रं मिळत होती . त्यातली काही खिशात कोंबली. अचानक जिन्यावर पावले वाजली तशी मी फ्रंट डोअरच्या मागे लपलो. तिथे जुडेकर येणार अशी माझी खात्री होती. ऑफिसच दार सताड उघडं होतं. रात्री दहाचा सुमार होता. आणि खरंच जुडेकर आला. त्याला काही दिसलं नसावं. तो आत पाऊल टाकताक्षणीच जिन्यावरून एक पिस्तुलधारी गोळ्या झाडित आला. त्या जुडेकरला लागून तो रक्ताच्या थारोळयात पडला. त्याला मारून पिस्तुलधारी वेगाने जिना उतरू लागला. . त्याला मी फ्रंट डोअरच्या मागे लपलेला दिसलो नाही. कदाचीत त्याला हरिदासने आधीच सुपारी देऊन ठेवलेली असावी. पण हरिदासला आपल्यालाच किडनॅप करतील याची कल्पना नव्हती. असो. जुडेकरचा खून माझ्यासमोर झाल्याने मी पोलीस यायच्या आत तिथून बाहेर पडलो. पुढे काय झालं मला माहित नाही. " मग मात्र मी लवकरच मिळेल ती बस पकडून तिथून निघालो. मला कोणती बस पकडली माहीत नसल्याने पुण्याला उतरावं लागलं दुसरी बस पकडून मी इकडे आलो. " त्याचा चेहरा घामाने डबडबला होता.

माझं डोकं चालेना. माझ्या गालावर रुमाल धरलेला पाहून त्याने मला विचारलं. " हे काय केलंयस ...........? " मी हात बाजूला करून त्याला जखम दाखवली. आता गाल दुप्पट आकाराचा झाला होता. शिवाय ठणकाही लागला होता. ते लक्षात घेऊन मी त्याला उत्तर न देता म्हणालो, " तू आता इथेच राहा. सध्या कुठेही जाऊ नकोस. मी डॉक्टरांकडे जाऊन परत येतो . मला वाटत नाही आज मला कामावर जाता येईल. " असं म्हणून मी त्याच्या होकाराची वाट न पाहता बाहेर पडलो. गाडी घेऊन डॉ. कीर्तनेंचा दवाखाना गाठला. मलम पट्टी करून इंजक्शन देताना डॉकटर म्हणाले, " ही जखम उंदराच्या चाव्याची दिसत नाही. उंदराचा दात टोकदार असतो. ...... " असं म्हणून त्यांनी माझ्याकडे उत्तरादाखल पाहिलं. मी म्हंटलं , " तुमचं म्हणणं खरं आहे , डॉ. काल रात्री लीना व्हॉयलंट झाली होती. अतिउत्तेजित आवस्थेत तिनी हे केलं असावं. " त्यांना लीना इथे नाही हे माहित नव्हतं. त्यावर ते हसत हसत म्हणाले, " एकदा वहिनींना भेटलं पाहिजे. बहुतेक त्या बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटल्या असाव्यात. " मी गोळ्या आणि औषधाचं प्रिस्क्रिपशन घेतलं आणि तडक जुडेकरचं घर गाठलं. त्याच्या घरासमोर माफक गर्दी दिसत होती. मी पुढे झालो. त्यावर त्याची बायको उठून माझ्याकडे येत म्हणाली, " का दिलीत त्याना रजा ? नाही तरी म्हनायचं होततं. ............... " आणि तिनी रडायला सुरुवात केली. जुडेकरची बॉडी अजून मिळाली नव्हती . पोलिस ताबा केव्हा देतील कळत नव्हतं. बाहेर उभ्या असलेल्या लोकांमध्ये गोळे असलेला मला दिसला नाही. तो पुढे झाला आणि म्हणाला, " वहिनी, तुमच्या नवऱ्याला यांनीच मारलेला आहे. याला सोडू नका. पोलिसांना यांचं नाव सांगा...... " मला कापरं भरत होतं. मी जोरात ओरडलो, " मी मुंबईला गेलो नव्हतो. माझा याच्याशी काही संबंध नाही. असं म्हणून मी तिथून निघालो. तशी गोळे माझ्या मागे आला . गाडीच्या खिडकीवर हात ठेवले. आणि गालावरची पट्टी पाहून म्हणाला, " तिची जखम खोल असते, लवकर बरी होत नाही. रोमान्समध्ये एवढा जोर दाखवायला नको होता. " त्याला हे बोलताना लाज वाटली नाही. त्याचीच बायको माझ्या कडे आली होती. मी काही न बोलता गाडी सुरू केली. आणि घाईघाईनी वाड्याकडे निघालो.

दरवाज्या वाजवला. श्रीकांतने दार उघडलं. तो झोपला असावा. मी काही न बोलता आत गेलो. तो पुन्हा बेडरूममध्ये जाऊन झोपला. प्रथम गोळ्या घेतल्या. आता गाल दुखायचा थांबला होता. जेवणाची तयारी करावी लागणार होती. पुन्हा बाहेर जाऊन हॉटेलातून जेवण घेऊन येणं कंटाळवाणं होतं. तरीही मी घरात पडलेल्या पावाचं सँडविच बनवून खाऊन घेतलं. तासाभरानी श्रीकांतला उठवलं. त्याला बऱ्याचश्या गोष्टी सांगणं भाग होतं. तो कॉफी आणि सँडविच खात होता. मी त्याला अथ पासून इति पर्यंत सगळं काही न लपवता सांगितलं. ते झाल्यावर तो म्हणाला, " मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस ? " ..... बारा वाजून गेले होते. बाहेर लख्ख ऊन पडलं होतं. मी त्याला चित्र वर सरकवून खालच्या भुयाराचा तपास करायचा विचार सांगितला. तो तयार होता. त्याची ही गोष्ट फार चांगली होती. तो कोणत्याही कृतीला हरकत घेत नसे. मात्र त्यातून काहीतरी निष्पन्न व्हायला पाहिजे असे. आम्ही पुढचा दरवाज्या लॉक केला आता कोणी येण्याची शक्यता नव्हती. त्यातून कोणी आलंच तर करू काहीतरी . नाहीतर दार उघडायचंच नाही. ............

त्यानी चित्र वर सरकवलं. कोनाड्यात थोडा दिवसाचा प्रकाश पडला. अर्थात टॉर्च घेणं जरूर होतं. आणि काठीही. आम्ही काळजीपूर्वक पायऱ्या उतरू लागलो. तिसऱ्या पायरीवर आल्यावर लक्षात आलं की सगळं छतच वटवाघूळांनी भरलंय. आमच्या दोघांभोवती ती फिरू लागली. आम्हाला ना मागे जाता येई ना पुढे. हातातल्या काठ्या फिरवून फिरवून हात दुखायला लागले. अचानक यांची आज शाळा कशी काय भरली. असला फालतू विनोद मला सुचला. अर्थात मी तो ; श्रीकांतला सांगितला नाही त्याची प्रतिक्रिया चांगली नसण्याची शक्यता होती. अचानक मला तो म्हणाला, "अरे , थांब, माझ्याजवळ पिस्तुल आहे. घाबरू नकोस , लायसन्सही आहे. माझ्या धंद्यात

मला त्याची गरज लागते. " तो कसातरी मागे वळला. एक दोन वाघुळानी त्याला चोची मारल्या. पण ते सहन करून तो वर गेला. जवळ जवळ पंधरा मिनिटांनी तो पिसुल घेऊन परतला . त्याने एक दोन गोळया हवेत झाडल्या . मला गोळीच्या आवाजाची सवय नसल्याने आणि आत आवाज घुमल्याने माझ्या हातातील टॉर्च आणि काठी गळून पडली. श्रीकांतनी मिलिटरी सर्व्हिस केल्याने त्याला प्रश्न नव्हता. अचानक वाघुळांचा कालवा थांबला. आणि ती जिथून आली होती तिथे गेली. आता आम्ही नेटाने आमचं काम करू शकत होतो. एक दोन वाघुळं तडफडत खाली पडली. आम्ही पुढे पुढे जात होतो. आज आम्हाला या तळघर वजा भुयाराला दुसरं तोंड आहे का ते पाहायचं होतं. दिवस असला तरी आत अंधार होता. मध्ये मध्ये येणारी थडगी अडचण निर्माण करीत होती. आम्ही ठेचाळत होतो. थोडे पुढे गेल्यावर एक मोठं दगडाचं कारंज दिसलं. त्याच्या भोवती निरनिराळे दगडी पुतळे बसवले होते. त्यातले काही नग्न होते. काही कपडे ;घातलेले होते. त्या सगळ्याच्या डोळ्यात जिवंतपणाची झाक होती. टॉर्च मारल्यावर त्यांच्या मुद्रा भीतीदायक वाटत होत्या. सगळीकडे प्रकाश टाकता टाकता. अचानक पुष्करणीच्या मध्ये प्रकाशाची तिरिम गेली. आणि त्यात एक सहा सात फूट उंचीचा पुतळा दिसला. त्याच्या एका हातात काटेरी मुकुट होता . दुसऱ्या हातात भाल्यासारखे शस्त्र होते. त्याचे डोळे इतके जिवंत होते की तो काहीतरी बोलू पाहत होता अस वाटलं. कोरलेल्या डोळ्यांमध्ये क्रौर्याची झांक होती. ओठ पूर्णपणे मुडपलेले, पण जिवणीच्या दोन्ही कडांतून त्याचे सुळे डोकावीत होते. पुष्करणीचं पाणी त्याच्या हातांतून येत असावं. अर्थात आता ती कोरडी होती. कदाचित दोनएक शे वर्ष तरी ती जुनी असावी. असले पुतळे वापरात कशासाठी होते याचा अर्थ लागत नव्हता. त्यावरश्रीकांत म्हणाला, " 

मध्ययुगात चेटुक, जारण मारण आणि तंत्र मंत्र विद्या वापरात फार असाव्यात . त्यांचा अर्थातच किती उपयोग झाला हे माहीत नाही. म्हणजे बघ ना, एखाद्याला तांत्रिकाने तुझे रुपांतर मांजरात होईल असे म्हंटले तरी ते नाही झालं तरी तसं बाहेर सांगितलं जायचं.साधारण लोकांवर वचक बसावा असा समाजातील एखाद्या घटकाचा आग्रह असणार हे नक्की. किंवा आपल्याला कुठे तंत्रविद्येचं ज्ञान आहे , कदाचित असं रुपांतर होतही असेल. ............" तो आणखीही काही बोलणार होता पण मी दुसरीकडे लक्ष दिल्याने तो थांबला. मग आम्ही पुढे सरकलो. आता मात्र तास भर चालल्यानंतर पाणी लागलं आणि भुयाराचं छत उतरतं होत होतं खाली येउ लागलं. पाण्यात पाय टाकावा की नाही ते कळेना. आणि ते किती खोल आहे याच अंदाजही येईना. मग श्रीकांतनी हातातली काठी त्यात घालून पाहिली. सध्यातरी ते गुडघ्यापर्यंत खोल होतं. पुढे टॉर्च मारून पाहिला. समोर उतरतं छत आणि त्यापर्यंत येणारं पाणी याशिवाय काही दिसलं नाही. आत शिरण्याचं आम्हाला धैर्य होईना. शोध मोहिम इथेच थांबवून जाता येणार नव्हतं . अशी संधी पुन्हा मिळेल की नाही याची शंका होती. आजूबाजूला काही सापडतं का ते पाहावंसं वाटलं. मग मला एकदम नकाशाची आठवण झाली. मी श्रीकांतला सांगितालं. त्यावर तो म्हणाला, " हरकत नाही. आपण नकाशा बरोबर आणू या किंवा आधी त्याचा अभ्यास करू या. पण लवकर केलं पाहिजे. जवळ जवळ दुपारचे चार वाजत होते. आता मागे जायला हरकत नव्हती. मागे वळलो आणि टॉर्च मारून पाहिलं तर परवा पाहिलेल्या कानडी आजी भिंतीजवल उभ्या होत्या. त्या एका ठिकाणी हात दाखवित होत्या. जणू काही आम्ही तिकडे जावं असंच त्या सांगत असाव्यात. या इथे कशा आल्या आणि कशाला असले प्रश्न आम्हाला पडले. त्या विरळ विरळ होत होत नाहीशा झाल्या .त्यांना काय दाखवायचं होतं. कोणास ठाऊकत्या दाखवीत असलेल्या दिशेत आम्ही वळून पाहिले. तर जिथे पाणी कमी होतं. तिथे एक भुयारासारखं भोकसं होतं . तिथे जाणं शक्य होतं . पण तिकडे गेलंच पाहिजे का याचाही विचार करायला हवा होता. तिथे आणखी कोणता धोका तर नव्हता ? श्रीकांतला माझ्या मनातले विचार कळले असावेत. तो म्हणाला, " आपण तिकडे जाऊन बघायला काय हरकत आहे.थोडा वेळ घालवावा लागेल इतकंच. पुन्हा टॉर्च मारून पाहिलं तिथलं पाणी उथळ होतं. आम्ही पाण्यात पाय टाकले. पाण्यातून उडी मारून एक उंदीर चिर्र असा आवाज काढीत अंगावर चढला. मी घाबरून मागे सरकलो. श्रीकांतनी तो झटकून टाकून पुढे जाण्याची खूण केली आता आणखी दोन चार उंदीर अंगावर आले. तरीही आम्ही त्या भोकशात शिरलो. आत पाणी फारच कमी होतं. टॉर्चच्या प्रकाशात ती एक खोली होती. तिथे तीन पेटारे होते. त्यांना कुलुपं नव्हती तरी उघडणं आम्हाला जड गेलं आम्ही दोघांनी प्रयत्न केल्यावर एका पेटाऱ्याचं दार वर उचलंलं गेलं टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं तर तिथे एक मृतदेह रक्तात तरंगत असलेला दिसला. (कदाचित मोहतींच्या मुलीचं रक्त वापरलेलं असावं. याचाच अर्थ मोहंतींच्या मुलीचा देहही सापडेल. माझ्या मनात आलं ) त्याचे अर्धवट दृष्टीहीन उघडे डोळे पाहून मला चक्कर आल्यासारखं झालं. श्रीकांतनी मला धरलं म्हणून बरं . नाहीतर मी पडणारच होतो. त्या देहाला अत्यंत घाण मारत होती. तो एका मुलीचा मृतदेह होता. तिचा चेहरा इतका ताजा कसा , याचं मला आश्चर्य वाटलं. त्यावर श्रीकांत म्हणाला, " पूर्वी , अतिप्राचीन काळी माणूस मेल्यावर त्याच्या देहात जिवंत माणसाचं रक्त घालून तो काही वर्ष ताजा ठेवण्याची पद्धत होती. असा एक पंथ होता. अशा रितीनि माणसं आपले आप्तेष्टांचे देह सांभाळित असत. नंतर नंतर ही पद्धत बंद झाली. त्यांच्याही काही अडचणी असणार. असो. मी जे वाचंलय ते तुला सांगितलं. " आम्ही कशीतरी ती पेटी बंद केली. दुसरे दोन पेटारे उघडण्याचं धैर्य आम्हाला झालंनाही. ती मुलगी म्हणजे मला सुरुवाती पासून दिसलेलीच होती. आम्ही वळून पायऱ्यांवरून लवकरच हॉलमध्ये आलो. चित्र परत सरकवलं . आता भीतीदायक काहीही दिसणार नव्हतं. पाच वाजून गेले होते. मला अजून पो. स्टेशनला जायचं होतं. मी श्रीकांतला सांगितल्यावर तो म्हणाला, " तुम्ही लोक हे असे विदाउट समन्स का जाता काही कळत नाही. त्यांनी तुला समन्स पाठवलं नाही ना . मग गप बस. " मला तो विचार पटला. पण उद्या ते बँकेत आले तर ? माझी शंका श्रीकांतला जाणवली. त्यावर त्याने "पाहा बुवा " अशी मुद्रा केली. असो. आम्ही थोडा नाश्ता बनवला आणि सहा साडेसहच्या सुमारास गाडी घेऊन नदीकिनारी गेलो. भन्नाट वारा सुटला होता. थोडं अंधारत होतं. संधिप्रकाश पसरला होता. काही वेळ

शांततेत गेला. श्रीकांत नदीच्या पाण्यात दगड टाकीत बसला होता. मी इकडे तिकडे करीत होतो. अचानक मला चर्चची आठवण झाली. मी श्रीकांतला सांगितल्यावर तो म्हणाला, " काही हरकत नाही , आत्ता जायला. फक्त आपल्या जवळ टॉर्च नाही. मोबाईलचा टॉर्च आहे म्हणा. "
आम्ही निघालो. गाडी तिथेच ठेवली. चर्चच्या प्रवेशदारापाशी आलो. त्याच्या प्रार्थना हॉलमध्ये गेलो. तिकडे जसं आधी होतं तसंच होतं. अचानक मी फादरच्या डेस्कच्या उजव्या बाजूला वळलो. तिथेच ते विवर होतं. आत टॉर्च मारला . पुन्हा उंदरांचा आवाज आला. ते पाहून श्रीकांत म्हनाला, " हेच पाणी तिकडे आहे . याचाच अर्थ भुयारवजा तळघराच दुसरं तोंड इथेच असलं पाहीजे. आपण आत्ताच जाऊन तिकडे बघू या का ? " असे म्हंटल्यावर मी शहारलो. तो मृतदेह मला दिसू लागला. मी नकार दिला. ते श्रीकांतला आवडलं नाही. मग आम्ही घरी गेलो. कुलुप उघडतो न उघडतो तोच मागून इन्स्पे. कानविंदेंचा आवाज आला, " तुम्ही आला नाहीत पो. स्टेशनला. तुम्हाला काय लेखी समन्स पाहिजे का ? " ............ "नको ? " असं श्रीकातने विचारताच ते म्हणाले, " आता हे आणखीन नवीन कोण ? " मला त्याची ओळख करून द्यावी लागणारच होती. मी काही बोलण्याच्या आत तेच म्हणाले, " हे तुमचे डिटेक्टिव्ह तर नाहीत ? " माझा चेहरा बोलका असावा. आम्ही काही उत्तर न देता आत शिरलो. तेही आत शिरले. सोफ्यावर बसत ते म्हणाले, " तुम्ही , जुडेकर आणि हरिदास यांचा ब्रॅकेट असावा असा मला वाटत आलंच होतं. तुम्ही जुडेकरचा खून कोणाकडून करवलात ? तेवढं मला सांगा. म्हणजे केस सुटायला सुरुवात होईल. तुमचा सहभाग बराच असणार नाही का "
ते माझ्या चेहऱ्याचं निरिक्षण करीत होते. मी टाळाटाळ करीत नव्हतो , पण आत्ता मला श्रीकांत असताना काहीही उत्तरं द्यायची नव्हती.तुम्ही म्हणाल तुमचातर तो मित्र होता, मग असं का ? खरंतर मला आत्ता सुचत नव्हतं. मी कानविंदेंना चहा घेणार का विचारलं. त्यावर ते म्हणाले," आम्हाला पो. स्टेशनचाच चहा पचतो आणि दुसर्‍यालाही तो पचवायला लावतो. " थोडक्यात ते चहा घेणार नव्हते. मी त्यांना नजरेने बाहेर बोलावले. ते उठले. मी बाहेर गेल्यावर त्यांना सांगितलं, " हे पाहा, तो माझा नातेवाईक आहे , तो वाटेल ते बाहेर जाऊन सांगेल, मी उद्या सकाळी
दहा वाजता , पाहिजे तर पो. स्टेशनला येतो. प्लीज. ........" असं म्हणून मी त्याची तो डिटेक्टिव्ह आहे  
ही शंका दूर केली आणि खोटं सांगून उद्यापर्यंत
चा वेळ मागून घेतला. एक तर मी श्रीकांत बरोबर आज चर्चा करीन आणी मग ठरवेन आणि आत्ताच्या आत्ता मला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार नाहीत. ते विचार करून हो म्हणाले. पण त्यांनी विचित्र अट घातली. या तुमच्या नातेवाईकाचं नाव , पत्ता, फोन नंबर पाहीजे. अर्थातच मी ते उद्या देईन असं सांगितलं. तेव्हा ते निघाले. ते गेल्यावर श्रीकांत मला विचारणार हे मला माहिती होतं. पण आश्चर्य म्हणजे त्यानी काहीच विचा रलं नाही.
लवकरच मी स्वैपाकाच्या मागे लागलो. म्हणजे जेवण निदान नऊ वाजेपर्यंत तरी तयार होईल. मला फारसं करता येत नव्हतं. तो बाहेर जाऊन बसला होता. तो फिरत होता. आसपासचा परिसर बघत असावा. टीव्ही लावला. वेगवेगळ्या बातम्या ऐकण्यात माझा वेळ जाऊ लागला. आता तो पुन्हा आत येऊन बसला. माझ्या मागे स्वैपाकघरात येत तो म्हणाला," तू खरंच जुडेकरला पाठवायला नको होतंस. "
मी त्याच्याकडे पाहत राहिलो.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all