चिरुमाला (भाग १३)

लीनाने धावत येऊन तिला जवळ घेतले......

लीनाने धावत येऊन तिला जवळ घेतलं. लीनाने लावलेल्या मंदिरातल्या दिव्याच्या उजेडात रसिकाला कोणीतरी दिसत होते. आम्ही सगळ्यांनीच मग तिकडे पाहिलं. पण आम्हाला काहीही दिसले नाही. मी धावत जाऊन मंदिरावजवळ गेलो. पण तिथे कोणीही नव्हते. पोलिस स्टेशनला आठवड्यातून एक दोन तरी फेऱ्या माझ्या होत होत्या. पण त्यांच्याकडे सबळ पुरावा माझ्या विरोधात नसल्याने ते मला पकडू शकले नाहीत. असो. हरिदासला भेटायला हवं होतं. पण कसं ? हा प्रश्न होता. त्याला नक्कीच बरीच माहिती असणार. पोलिस हरिदास काय म्हणाला ते सांगत नव्हते. एक दोन वेळा त्यांनी माझ्याबद्दल हरिदासला बरीच माहिती आहे असा गुगली त्यांनी टाकून पाहिला पण त्यांना मला या प्रकरणात गोवता आलं नाही.
असेच विचित्र विक्षिप्त अनुभव अधून मधून येत राहिले. त्यात मुलांच्या परीक्षा झाल्या. मार्चच्या सुरुवातीला लीना मुलांना घेऊन मुंबईला गेली. आता मी मोकळा होतो. माझा शोध चालू झाला अर्थात संध्याकाळच्या सुमारास आणि रविवारी सकाळी सुद्धा. लीना गेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्ह्णजे लगेचच येणाऱ्या रविवारी सकाळी मी परत स्क्रू ड्रायव्हर आणि पटाशीच्या सहाय्याने सरदार साहेबांचे चित्र वर ढकलले. मुख्य दरवाज्या बंद केला होता. टॉर्चच्या प्रखर प्रकाशात मला पायऱ्या दिसत होत्या. प्रथम मी एक पाय टाकून पाहिला. एखाद्या जाजमात पाय बुडावा तसं मला वाटलं . ते धुळीचं जाजम होतं. किती वर्षांची धूळ होती काय माहित . मग दुसरा पाय टाकला टॉर्च आणि पटाशी हातात धरून मी दुसरी पायरी उतरलो. पायऱ्या थोड्या उंच होत्या. असो. पण दोन तीन पायऱ्या उतरलो तरी समोर काहीच दिसेना अजूनही भिंतीसारखा भाग दिसत होता. मग टॉर्चची तिरिम समोरच्या प्रशस्त हॉलसारख्या जागेवर पडली. कुठेतरी लांबवर पाणी पडत असल्याचा आवाज येत होता. आत अंधारच होता. आता माझ्या पायऱ्या संपल्या होत्या. मी सपाट दगडी जमिनीवर उभा होतो. मी टॉर्च सगळ्या दिशांनी फिरवला. तिथे मला तीन चार लाकडी पेट्या भली मोठी कुलुपे लावून ठेवलेल्या दिसल्या. यांची कुलुपं उघडायची म्हणजे कर्मकठीण . चाव्या सापडण्याची सुतराम शक्य्ता नव्हती. तिथे एक पहार पडली होती. मी हातातली पटाशी सर्वात खालच्या पायरी वर ठेवून पहार उचलली. शस्त्र म्हणून वापर करता येईल . एका पेटी जवळ गेलो ती वाजवून पाहिली. आत काय असावं कळणं कठीण होतं. हातातली पहार जाडजूड कडीत सरकवून मी टॉर्च खाली ठेवला. आणि जोर लावायला सुरुवात केली.

जोर लावून लावून मी थकलो पण कडी रेसभरही हलली नाही. शेवटी जुनं काम होतं. अर्थात मी आत्ता त्या गोष्टीचं कौतुक करण्याच्या मनः स्थितीत नव्हतो. थंडी असूनही माझ्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या. मग दुसऱ्या बाजूने पण प्रयत्न करून पाहिला पण कडी ढिम्म हालेना. मग मी कंटाळून पहार तिकडेच टाकली. जरा दम खाण्यासाठी बसलो., पण उकिडवा. खाली फरशी असावी . ती बरीच जुनी असल्याने खडकासारखी भासत होती. पायऱ्यांवर बसण्याची सोय नव्हती . माझा एक हात लाकडी पेटी वर होता. आपण दुसरं कोणाची मदत घ्यावी का असा विचार माझ्या मनात आला. कोणाची मदत घेणार ? जुडेकर , गोळे , की पै ? जुडेकरवर विश्वास वेताचा होता. गोळे लबाड होता. पै कितपत मदत करतील कळत नव्हतं. कदाचित ते नाही म्हणतील. त्यांना न विचारताच मी ठरवीत होतो. तसे ते सामान्य होते. मलाबरेच सीनियरही होते. माझी नजर मग समोरच्या बाजूकडे गेली. मी टॉर्च मारला. त्या प्रकाशात त्या भुयाराचा शेवट दिसत नव्हता. म्हणजे ते बरंच मोठं असणार. मी उठून दुसरीकडे काय आहे ते पाहायला गेलो. मला माझ्या पेटी वरच्या हातावर कसली तरी हालचाल जाणवली. पाहतो तर काय ......? माझ्या हातावर एक दीड इंच लांबीचा कोळी चालत होता. मी घाबरून त्याला उडवले. आणि आजूबाजूला पाहिले. टॉर्चच्या प्रकाशात भुयाराच्या छतापासून जमिनीपर्यंत मोठ मोठी कोळ्यांची जाळी लटकलेली दिसली. मी परत पहार उचलली. आणि समोर जाऊ लागलो. पेट्यांच्या पलिकडे काही अंतर सोडून चांगली आठ दहा थडगी होती. त्यातली काही फुटकी होती. तर काही तडे गेलेली होती. आत नक्कीच मृतदेह असावेत, म्हणजे त्यांचे सांगाडे. ते तरी असतील का , अशी शंका घेत मी पुढे निघालो. जवळच दिसणारं थडगं मी पाहू लागलो. त्यावर काही लिहिलंय का , ते पाहत होतो. कसल्यातरी अगम्य भाषेत काही तर कोरलेलं होतं. त्याला तडा गेलेला होता. मी त्या तड्यावर टॉर्च मारून आत काही दिसतंय का ते निरखून पाहू लागलो तर मला बऱ्याच लांबून " मि. स ब नि स , दार उघडा ........ " असं ऐकू येऊ लागलं. मी घाबरून पायऱ्यांकडे पाहिलं. पण तिथे काहिच दिसलं नाही. मग मी स्वतःशी म्हणालो, " आत्ता कोण आलंय की काय ..........? " लगेचंच माझ्या प्रश्नाला हुंकारासारखा आवाज आला आणि उत्तर मिळाले. दचकून मी इकडे तिकडे पाहिलं . कोणीच नव्हतं. मग उत्तर दिलं कोणी ? आता पुन्हा बाहेरच्या दरवाज्या वाजवल्याचा आवाज आला. कोणीतरी मोठ मोठ्याने दरवाज्या वाजवीत होतं. आत्ता कोण असेल ?

जुडेकर ? गोळे ? की आणखीन कोणी ?

... मी पटकन टॉर्च बंद केला आणि पायऱ्यांकडे धावलो. पायऱ्या चढून वर आलो. आता दरवाज्याठोकणं बंद झालं होतं. बहुतेक आलेला माणूस निघून गेला असावा. मग मला बोलणं ऐकू आलं. " तुम्ही असं करा , मागच्या बाजूने कोणती खिडकी उघडी असेल तर आत शिरता येतंय का ते पाहा " आवाज ओळखीचा होता. तो इन्स्पेक्टर कानविंदेंचा होता. मी आता कोनाड्यातून हॉलमध्ये प्रवेश केला. अचानक माझ्या अंगाला थरथर सुटली. काय करावं मला सुचेना दुसरं कोणी आता येण्याच्या आत मला काहीतरी करून कोनाडा बंद करावा लागणार होता. ते कंगव्यासारख हत्यार बाहेर होतं. चित्र परत खाली आणणं मुष्किल होतं पण गरजेचं होतं. मला काही उपाय सुचेना मी सहज म्हणून बेडरूममध्ये गेलो आणि कोनाडा झांकण्यासाठी काय उपयोगी पडेल ते पाहू लागलो. तिथलं कपाट उघडल. पण काही सापडलं नाही मग अचानक मला बेडवरची चादर दिसली ती त्यावर लावता येईल या विचाराने मला सुटल्यासारख वाटू लागलं. मी ती ओढली आणि हॉलमध्ये येऊन तिथे लावून पाहिली . माझ्या हातांच्यावर अजून दोन ते तीन फूट चित्राचा खालचा भाग होता. आता मला तिथे उभं राहून चादर कशी लावावी सुचेना . मी तिथली एक खुर्ची आवाज न करता उचलली आणि कोनाड्याजवळ आणली. तिच्यावर उभं राहून मी चादरीचं एक टोक चित्राच्या मागच्या फटीत कोंबू लागलो. बरोबर त्याक्षणीच पुन्हा दरवाज्या वाजू लागला. इन्स्पे. कानविंदे ओरडले " मि. सबनिस दरवाज्या उघडा नाहीतर मला तोडावा लागेल.मला माहित आहे तुम्ही आत दबा धरून बसले आहात . " कसं तरी टोक तर अडकलं. दुसरं टोक अडकवण्यासाठी खुर्चीवर उभा राहिलो तेही अडकलं. मग मी सोफा शक्यतोवर हळूच सरकवून कोनाड्याला समांतर आणि चिकटवून ठेवला. तेव्हा कुठे तो कोनाडा बंद झाला. मग मी तोंड धुण्यासाठी बाथरुममध्ये गेलो. तिथला टॉवेल पाहून मला एक कल्पना सुचली. मी माझ्या डोक्यावरपाणी मारून घेतलं आणि टॉवेल गुंडाळून , "आलो , आलो .............." असं ओरडत दरवाज्या उघडला. रागाने लाल झालेले इन्स्पे. इतर माणसांसहित आत घुसले. आणि अंगावर येत म्हणाले," आम्हाला थांबवून ठेवण्याची काय सजा आहे माहिती आहे ? " हा सरकारी कामात अडथळा झाला. तुम्ही पुराव नष्ट करीत असणार. बोला कुठे होतात तुम्ही .........? " त्यावर मी शांतपणे उत्तर दिलं " अहो मी अंघोळीला गेलो होतो. आणि पाण्याच्या आवाजात मला तुमच्या हाका ऐकू आल्या नाहीत त्याला काय करणार ? " त्यावर भडकून ते म्हणाले, " एकदम खोटं , साफ खोटं , पाण्याचा आवाज बिलकूल येत नव्हता. मला काय लहान पोर समजलात ? " मध्येच त्यांचे पाताडे नावाचे सहकारी म्हणाले, " अहो पण सर आपलं लक्ष दरवाज्यावर असल्याने आपल्याला ऐकू आलं नसेल." ते ऐकल्यावर इन्स्पे. त्यांच्यावर ओरडले. " पाताडे, आरोपीची बाजू घेताय ?तुम्ही त्यांचे वकील आहात की काय ? बंद करा तोंड . पाताडे सॉरी म्हणाले. “............ असं पुन्हा केलत तर निलंबित करीन. " साहेब पुन्हा त्यांच्यावर गुरकावले. माझ्याकडे वळून मग म्हणाले " आम्हाल दिवसाउजेडी वाडा पाहायचाय, काढा चाव्या. आमच्या बरोबर चला. " मी त्यांच्या हातात चाव्या ठेवल्या. त्यांची अजून तगमग चालू होती . त्यांना पाहिजे तशी कारवाई माझ्यावर करता येत नव्हती. मी कपडे केले आणि परत आलो त्यांच्या बरोबर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी वळणार एवढ्यात अचानक चित्राखाली लावलेली चादर आधी एका बाजूने खाली आली आणि नंतर दुसऱ्या बाजूने खाली आली. आम्ही सगळे पाहात राहिलो. ते पाहून इन्स्पे.माझ्याकडे वळले आणि म्हणाले, "म्हणजे हे असं आहे तर ? हे चित्र वर सरकवून तुम्ही खालीतळघरात काहीतरी करीत होतात . मला वाटलंच इथे तळघर असणार. " मला चांगलीच थरथर सुटली ,तोंडाला कोरड पडली. पण माझ्या नशिबाने म्हणा किंवा आणखीन कशानेही म्हणा पडलेली चादर अशा रितीने पडली होती की तळघराकडे जाणाऱ्या विवरातल्या पायऱ्या झाकल्या गेल्या. इन्स्पे. जोरात तिकडे वळत् मला म्हणाले, " किती प्रयत्न करणार आहात पुरावे लपवण्याचा ? काय ? त्यावर कळू नये म्हणून सोफा सरकवलात ....... ? " त्यांनी घाईघाईने सोफा बाजूला ओढला. माझ्या लक्षात आलं की ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते कोनाड्यात शिरले पण त्यांना काहीही दिसले नाही की सापडले नाही त्यांनी एका हातात चादरीचे एक टोक धरले , पूर्ण चादर धरली नाही. नाहीतर खालच्या पायऱ्या दिसल्या असत्या. माझं नशीब जोरावर होतं. मग मी तोंड उघडलं. "साहेब , हा फक्त मोठा कोनाडा आहे. मी कधी पाह्यला पण नव्हता. केवळ कुतुहल म्हणून मी चित्र वर सरकवलं. " त्यानी हातातली चादर खाली टाकली. पण ते जोरात म्हणाले, " तुम्हाला काय वाटतं आम्ही तसेच जाऊ ? अजून कितीतरी गोष्टी इथे पाह्ण्यासारख्या सापडतील. चला वर जाऊ. " असं म्हणून ते आणि आम्ही सगळेच जिन्याकडे निघालो. वरच्या मजल्यावर गेल्यावर आधी आमच्या बेडरूमची तपासणी झाली. त्यात काही न मिळाल्याने इन्स्पे. साहेब नाराज झाले.

मग ते बाजूच्या भागात जाण्यासाठी मला म्हणाले, " तिकडच्या चाव्या द्या. ...... " त्यावर तो भाग मी भाड्याने न घेतल्याने माझ्याकडे तिकडच्या चाव्या नसल्याचे आणि त्या हरिदास कडे असतील असे सांगितले. मग माझ्यवर जोरात ओरडून म्हणाले, " मग मागच्या वेळेला आपण आत कसे शिरलो होतो ? " त्यांना कुठूनतरी मला अडकवायचे होते. त्यांना बाजूची खिडकी दाखवली . तिथे ग्रिल नव्हतं. ती खिडकी त्यांनी सताड उघडली. आणि आधी ते खिडकीतून उडी मारून आत उतरले. नंतर त्यांची माणसं . मी अजून तिथेच उभा राहिलेला पाहून ते मला म्हणाले, " तुम्हाला काय निमंत्रण पत्रिका द्यायला पाहिजे का ?मग मीही उडी मारून आत शिरलो. आतल्या खोलीला कुलूप होतं. त्यात सगळेच शिरले. तिथे पडलेला बेड अजूनही तसाच होता. गादीची आता चाळण झाली होती. आमच्या चालण्यामुळे खोलीतली धूळ उडत होती. एक भिंतीतलं कपाट होतं. तेही जोर लावून उघडले. त्यातले खण वाळवी लागल्यामुळे अर्धवट पडण्याच्या स्थितीत होते. पण तिथेही काही सापडलं नाही. मग शेजारची दुसरी खोली तपासण्यासाठी बाहेर आलो. तिला कुलूप होतं. ते पण त्यानी फोडलं. त्याचा कडी कोयंडा मात्र हालायला तयार नव्हता. ज्या कॉन्स्टेबलने तो उघडला. त्याच्या हाताला जखम झाली. दरवाज्या उघडला. आतमध्ये बेड नव्हता. खोली चांगलीच मोठी होती. तिची खिडकी बंद होती. त्यात दोन मोठाले पेटारे होते. त्यांनाही कुलुपं होती. तीही उचकटून उघडली. आता पेटाऱ्यांचे दरवाजे उघडण्यासाठी दोन माणसं लागली. एका पेटाऱ्यात कपडे भरलेले दिसले. त्यात जुनी लुगडी, काही फ्रॉक आणि इतर कपडे होते. पण सगळ्यांचीच जाळी झाली होती. हातात उचलताच त्यांची माती होत होती. इन्स्पे. साहेबांचा इंटरेस्ट जात होता. मग दुसरा पेटारा उघडला. तिथे मात्र एक लहान मुलाचा तुटका सांगाडा दिसला. तो कोणाचा होता. आणि किती जुना होता. कळत नव्हतं. माझ्याकडे संशयाने पाहत इन्स्पे. म्हणाले , "शेवटी सापडला ना महत्त्वाचा पुरावा. " जणू काही मीच तो लपवून ठेवला होता. कॉन्स्टेबल कडे वळून ते म्हणाले, "पंचनामा करा आणि हे ताव्यात घ्या. तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवा. आत्ता कळेल काय गौडबंगाल आहे ते. " विजयी मुद्रेने कानविंदे गेले.
मी माझा शोध सुरू केला. दरवाज्या बंद केला चादर काढून पुन्हा मी पायऱ्या उतरून आत गेलो. मला आत्ता तरी भुकेकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आत शिरून मी पुन्हा पेट्यांच्या मागे न लागता थडग्यांकडे माझा मोर्चा वळवला. टॉर्च वापरून मी तडा गेलेल्या थडग्याचं निरिक्षण करण्यात गर्क होतो. हातात पहार घेऊन आत घुसवली. आणि जोर लावला. एका बाजूने थडगं अर्धवट फुटलं. आत मध्ये विस्कळित झालेली हाडं आणि एक कवटी पडली होती . बाजूला एक लुगड्याची घडी होती. आणि काही भांडी होती. मला याचा अर्थ लागेना. कदाचित ज्या कुणाला पुरलं त्याच्या बरोबर कपडे आणि खाणं पिणं ठेवलं असावं. मी टॉर्चच्या प्रकाशात जास्त निरिक्षण करू लागलो. माझं लक्ष अजिबात नव्हतं. तेवढ्यात फडफड फडफड करीत एक मोठ्या आकाराचं वटवाधुळ माझ्या डोक्यावरून चिर्र चिर्र .............. असा आवाज करीत गेलं.
घाबरून माझ्या हातातली पहार पडली. आणि मी धावत पायऱ्यांकडे आलो. दोन तीन पायऱ्या चढलो , तेव्हा पुन्हा तेच वटवाधुळ पुन्हा माझ्या दिशेने तरंगत गेले. माझा श्वास जड झाला होता. मी कसातरी पायऱ्यांवरून एकदाचा कोनाड्यात आलो. आता मात्र कोनाडा बंद करणं गरजेचं होतं. मी धावत जाऊन दरवाज्या उघडला. अचानक दारात जुडेकरला पाहून मला थरथर सुटली. मी चांचरत त्याला विचारलं. " क का का आलास ? तुझं काय काम आहे ? " तो म्हणाला , " सर एवढं घाबरायला काय झालं. ? अहो, मी तुम्हाला सहजच भेटायला आलोय.तुमच्या जेवणाची काय व्यवस्था आहे ती पाहायची होती. बाकी काही नाही. " आता बाहेरचा तो कंगवा आणणं कठीण होतं. त्याच्या समोर कसा आणणार ? त्याल कोनाड्यात काय आहे ते दिसले असते. मी स्वतःला सावरीत म्हणालो. " अरे मी स्वैपाक केलाय. तू जा. , तू तू जा . प्लीज मला वाटलं तर मी बोलावीन. " मी त्याला आत घेत नव्हतो . हे त्याला जाणवलं असावं. तो थोडा निराश झाला. मग म्हणाला, " सर काही लागलं तर सांगा. येतो मी. " आणि तो निघून गेला. तो पूर्ण जाईपर्यंत मी दरवाज्यातच उभा राहिलो. तो दिसेनासा झाल्यावर मी ते अवजार आणण्यासाठी बाहेर आलो तर तिथे मला ते अवजार दिसेना. मी डोकं फिरल्यासारखं ते शोधीत राहिलो. त्या नादात आणि भीतीच्या लहरीत मी वाड्याच्या मागच्या भागातही गेलो. जिथे विहीर आहे. तिथला वाकलेला वड अधून मधून हालत होता. मला आत्ता तरी काही सुचत नव्हते. ते अवजार मिळाले नाही तर चित्र खाली कसे आंणणार ? आणि तळघरातलं/भुयारातलं वटवाधुळ वर आलं तर ? अशी किती वटवाधळं आत आहेत कोण जाणे . असं काय करावं की जेणे करून तो तळघराचा भाग बंद होईल. मला घरात जावेसे वाटेना. खरं तर आत्ता ऊन होतं. आणि तेही चांगलं कडक. विचार कर करून माझं डोकं भणाणू लागलं. मी पुन्हा पुन्हा त्याच जागी जाऊन ते अवजार शोधत राहिलो. शेवटी एकदाचा थकून घरात गेलो. कोनाड्यातल्या त्या पायऱ्या आता अगदी स्पष्ट दिसत होत्या. मला आता खाली जावसं वाटत नव्हतं. मग एखादी शिडी सापडते का ते बघू लागलो. त्यासाठी वरच्या मजल्यावरच्या खोल्याही शोधल्या. पण व्यर्थ. मला काही मिळेना. वाड्यातल्या सगळ्या जागा पाहून मी बेजार झालो. आणि सोफ्यावर बसलो. परत एकदा बाहेर जाउन ते अवजार शोधावं असं वाटलं. पण तो विचार झटकून टाकला. मग मात्र मी वाड्याच्या दुसऱ्या भागातल्या खोल्या पाहण्याचं ठरवलं. धावत जाऊन मी वरच्या मजल्यावरच्या त्या बिनगजांच्या खिडकी कडे गेलो. आता आत उजेड होता. मी कालच्या सारखीच उडी मारून आत शिरलो. समोरच उघडी असलेली खोली पाहीली. पण तीत काही सापडलं नाही. मग दुसऱ्या खोलीतील पेटाऱ्यांमधील सामान वर खाली करून पाहिले तिथे मला एक हातोडी आणि काही खिळे सापडले. ते सगळं इतकं गंजलेलं होतं की गंजाचा बराचसा भाग माझ्या हाताला लागला. मला पर्वा नव्हती. मग मी विचार केला ज्याअर्थी इथे हातोडा खिळे सापडले त्याअर्थी हे वापरण्यासाठी शिडी असलिच पाहिजे. पण ती सापडली नाही. मी स्वतःला बुद्धिमान समजत होतो , पण माझं डोकं आता चालेनासं झालं. खाली आलो. स्वैपाकघरात येऊन मी भात लावला. थोडं फार दूध होतं. दूधभात तरी जेवता येईल. कुठेतरी लोणचं सापडलं.

आता भूक लागली होती. घड्याळात पाहिलं. बारा वाजून गेले होते. अति श्रमामुळे मला सोफ्यावर झोप लागली. दरवाज्या उघडा होता. त्याची मला पर्वा नव्हती. जवळ जवळ तास भर झोप लागली. जाग आली ती जळल्याचा वास आल्यामुळे . सबंध वाडाभर जळल्याचा वास येत होता. मी धावत स्वैपाकघरात गेलो. तिथे लावलेल्या भाताचा कोळसा झाला होता. मी पटकन गॅस बंद केला. एक दोन पंखे होते ते फुल केले. सगळी दारं खिडक्या उघड्या ठेवल्या तेव्हा कुठे वास कमी झाला. मग परत मी भात लावला. आता मात्र लक्ष ठेवून मी तो नीट होऊन दिला.

लवकरच जेवायला बसलो. अर्ध्यातासात जेवण झालं. खाण्यासाठी आणखीन काही आहे का ते शोधता शोधता मला एक डबा होता. त्यात लाडू होते. आता मात्र मला शिडी पाह्णं गरजेचं वाटू लागलं. मी गेट बाहेर चर्चच्या दिशेने असाच गेलो. तिथल्या प्रार्थना हॉल मध्ये उभा होतो. बाजूच्या पाद्र्यांच्या खोल्यांमध्ये शोधाशोध केली. तिथे एका खोली मध्ये मला एक पाच सहा फुटी शिडी सापडली. मला आनंद झाला. ती जड शिडी उचलून मी मोठ्या कष्टाने वाड्यात आणली. एकदाची ती चित्राच्या बाजूला लावली. आणि वर चढलो. एवढ्या उंचीवरून मोठ्या मुष्किलीने मी मघाशी मिळालेला हातोडा घेऊन फटके मारायला सूरुवात केली. चित्र हालत नव्हते. पुन्हा दुसऱ्या बाजूने शिडी लावून तिथे ठोकीन पाहिलं. अचानक जोराचा आवाज करीत चित्र खाली दाणकन कोनाड्यावर घसरून घट्ट बसले. ते तुटून तर बसले नव्हते ..........? माझ्या मनात शंका . जर तसं झालं असेल तर परत ते वर जाणार नाही. असो. आजच्या दिवसा पुरते तरी माझे काम झाले होते. संध्याकाळी मी गाडी घेऊन गावात जायचे ठरवले. हॉल आवरून ठेवला. मग पुन्हा मी झोपी गेलो. मला पुन्हा थोडी डुलकी लागली.
आता उठल्यावर मात्र मला जरा नॉर्मलला आल्यासारखे वाटले. साधारण सहाच्या सुमारास मी गावात गेलो. वेगवेगळ्या प्रकारची भाजी घेतली. चालता चालता शिवमंदिराजवळ आलो. तिथेच गाडी पार्क केली होती. अचानक मला पारलोके गुरुजींची आठवण झाली. मी मंदिराच्या मागच्या भागात डोकावलो. तिथे गुरुजींच्या दोन खोल्या होत्या. पुढे होऊन मी गुरुजींच्या घराची कडी वाजवली. आतून गुरुजींच्या कण्हण्याचा आवाज येत होता. अतिशय क्षीण आवाजात गुरुजींनी " आलो , आलो .......... " म्हंटले. आणि दरवाज्या उघडला. गुरूजींची तब्बेत ठीक दिसत नव्हती. घाबरून गुरुजी म्हणाले, " तुम्ही कशाला आलात , मीच आलो असतो तुमच्याकडे . येताना तुमचा पाठलाग तर झाला नाही. ? " मी मानेनेच नकार दिला. त्यावर ते म्हणाले, " या , जरा आजूबाजूला पाहून मग दरवाज्या लावून घ्या. मग या. " मी दरवाज्या लावून घेतला. मग गुरुजी क्षीण आवाजात म्हणाले, " काय सांगणार ? तो गोळे आणि ते पाठक भटजी दोघे डांबरट आहेत हो. तुमच्या वाड्यात सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी एक आजी राहत होत्या. त्या चेटुक विद्येत प्रविण होत्या.

त्या चेटुक विद्येत प्रविण होत्या. त्या सगळे वेडाचार करून पिशाच्च विद्या संपादन करायच्या. त्यासाठी त्या नदीकाठच्या स्मशानात साधना करीत . माझे वडील त्यांच्या घरी पुजा अर्चा करायचे. आणि त्यांचे पुरोहितही होते. सगळी धर्म कृत्ये पण तेच करायचे. खरंतर ते एक कर्नाटकी कुटुंब होतं. त्या कुटुंबातले प्रमुख रघुराजन या जिल्ह्याचे कलेक्टर होते. त्यांच्या पत्नीही सुविद्य होत्या. त्यांना दोन मुलं होतीमुलीचं नाव होतं चिरुमाला आणि मुलाचं नाव रमेश. थांबा हं , माझ्या वडिलांनी एक डायरी ठेवली होती. त्यात बरीचशी माहिती लिहिलेली होती. ही घ्या. .............." असं म्हणून त्यांनि एक निळ्या रंगाची डायरी माझ्या हातात दिली. मी ती घेऊन माझ्या बॅगमध्ये ठेवतोय न ठेवतोय तोच दरवाज्यावर लाथा मारायला सुरुवात झाली. " ए भटा, दार उघड. तुला आता धडा शिकवलाच पाहिजे........" असे म्हणत आधीच जुनाट दरवाज्या. लवकरच तुटला आणि तीन माणसं आत शिरली. एकाच्या हातात भला मोठा सुरा होता. दुसरे दोघे पुढे झाले आणि त्यांनी भटजींना धरून ठवले. ते जिवाच्या आकांताने ओरडत होते. मी पुढे होऊन विरोध करू लागलो. तर मला एकाच्या हातातील काठीचा प्रसाद मिळाला. त्यावर तो म्हणाला," ओ , मॅनेजर , भाइर व्हा, न्हाई तर तुमाला बी पाठवू वर. मग त्यांनी मला दरवाज्या बाहेर ढकलले. तरीही मी पुन्हा आत शिरायचा प्रयत्न केला. मग माझ्या लक्षात आलं की पोलिसांना बोलावलं पाहिजे. फोन केल्यावर कानविंदे साहेब आले मी त्यांना सगळी माहिती दिली. ते म्हणाले, " तुम्ही तिथेच थांबा आम्ही येतो. पण तोपर्यंत भटजींच्या पोटात सुरा भोसकला होता. भटजी तळमळत होते. मग ते तिघे पळून गेले. बाहेर उभ्या असलेल्या बाइक्स वरून त्यांनी पळ काढला. तेवढ्यात पोलिसांची जीप आली. कानविंदे म्हणाले, " हे बरं केलत, आम्हाला बोलावलंत. पळून गेला नाहीत. त्या मारेकऱ्यांचं वर्णन सांगा मग सगळे सोपस्कार होईपर्यंत जवळ जवळ आठ वाजत आले . दुसऱ्या दिवशी पो. स्टेशनला येण्याचं आश्वासन देऊन मी घरी निघालो. माझ्या डोळ्या समोरून भटजींचा चेहरा हालत नव्हता. घरी परत मला स्वैपाक करावा लागला. जेमतेम जेऊन मी पुन्हा अंथरूणावर लवंडलो. साडेदहा अकराच्या सुमारास मी लाइट मालवून सोफ्यावर झोपलो. अजूनही मला बेडरूममध्ये झोपण्याचं धाडस होत नव्हतं. थंडीचे दिवस होते. केव्हातरी मध्यरात्री एक दीडच्या सुमारास मला माझ्या सोफ्याभोवती फिरत असल्याचा भास झाला. उठून दिवा लावायला हवा होता. मी सोफ्यावर उठून बसलो. तर तिथे जिन्याच्या खालच्या पायऱ्यांवर एक आठदहा वर्षांची मुलगी. जिचा फ्रॉक ठिकठिकाणी फाटला होता.

खिडकीतून येणाऱ्या अंधुक प्रकाशात मला दिसले की ती रडत बसली होती. तिचं विवळणं ऐकून मला घामफुटला.हे असं दृष्य कधीही न पाहिल्याने मला थंडी भरली. आता ती मुलगी पुढे पुढे येत होती. तिच्या तोंडातून भरमसाट लाळ गळत होती. तिचे दात टोकदार होते. तिची मान बघता बघता फिरली आणि ती जिन्यावरून जाऊ लागली. मी कसा तरी उभा राहिलो , पण भीती मुळे लाइट लावण्याचे जमले नाही. माझे दात वाजू लागले आणि माझी शुद्ध हारपून मी सोफ्यावर पडलो. किती वेळ मी त्या अवस्थेत होतो. कोणास ठाऊक. मुलगी मात्र आता गेली होती. दुसऱ्या दिवशी मी उशिरा उठलो. माझ्या अंगात ताप होता. माझं अंग ठणकत होतं. मी जेमतेम चहा केला. आणी पुन्हा झोपलो.खरंतर डॉक्टरांकडे जायचं होतं. पण गाडी चालवणं कठीण होतं. साडे नऊ पर्यंत मी अंथरूणात लोळत होतो. घरच्या गोळ्या घेतल्या. पण माझा कामावर जाण्याचा मूड होईना. दहाच्या सुमारास जुडेकर आला. माझं येण्याचं चिन्ह दिसेना त्यावर तो म्हणाला, " सर मी तुमच्या साठी औषध घेऊन येतो आणि डबा सुद्धा. ......... " मी त्याला नाही म्हणणार होतो. . पण मलातरी स्वैपाक कसा जमला असता ? तो गेला. मी हळूहळू उठून लहानसहान कामे केली. कामाला येणाऱ्या बाईने काम कधीच सोडले होते. लीना नव्हती, त्यामुळे असेल. मी फक्त पुढचा पुढचा कचरा काढून घेत असे. अचानक मला ही बदली स्वीकारल्याचा पश्चात्ताप होऊ लागला. मी त्या भावनेतून स्वतःला सावरले.मलासगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा होता. लवकरच जुडेकर आला . त्याच्यामुळे जेवणाचा प्रबंध झाला. मग तोच म्हणाला, " सर ,वहिनी येत नाहीत तोपर्यंत माझी बायको तुमच्या घरची कामं करील. मी तिला पाठवतोच. तुम्ही बिलकुल नाही म्हणू नका. " त्याने औषधही आणले होते. मला त्याचं आश्चर्य वाटत होतं. इतकं चांगलं वागणं असलं तरी तो श्रीवास्तवशी संबंध का ठेवीत होता. मला कालच्या त्या गुंडांमध्ये पैंसारखा आवाज वाटला. ते कशाला असलं कृत्य करतील. आता मला अंधुक संशय येऊ लागला. जुडेकर , पै, हरिदास , गोळे आणि पाठक गुरुजी काहीतरी कारस्थान तर माझ्या विरुद्ध करीत नव्हते ? मोहंती साहेबही यात सामिल होते की काय ? असे मला वाटले. पण मी तो विचार झटकला. मुलगी नाहीशी होऊनही ते स्वस्थ कसे बसले होते . ........छे माझा विश्वासच बसेना. माझी नक्कीच काहीतरी चूक होत असेल, असे वाटून मी तो विचार सोडून दिला. दिवस आळसात गेला. संध्याकाळच्या सुमारास मी पो. स्टेशनला गेलो. कानविंदेंना गुन्हेगारांचं वर्णन दिलं. इतरही गोष्टी झाल्या. ते थोडे निवळलेले दिसले. बहुतेक त्यांना माझा फारसा सहभाग जे घडत होतं त्यात नसावा हे पटलं असावं. नंतर मी त्यांच्या कानावर वाड्यातल्या चमत्कारिक घटना घातल्या. तेही आश्चर्यचकित झालेले दिसले. शेवटी ते सौम्यपणे म्हणाले, " असं आहे बघा सबनिस , आम्ही फक्त जे दिसतं त्यावरच कारवाई करू शकतो. याचा अर्थ तुम्ही बोलताय ते खोटं आहे अस नाही. फक्त लक्ष ठेवा. आणि अधून मधून मला रिपोर्ट करीत जा. लवकरच काहीतरी लिंक आमच्या हाती नक्की लागेल. " मी घरी आलो. मला परत दमल्यासारखे वाटू लागले. ताप भरतो की काय अशी भीती वाटली. संध्याकाळचा डबा जुडेकर देऊन गेला होता. तो खाल्ला. दिवस भरात काहीही शोधता आलं नाही. किंबहुना आता शोध वरच्या आणि बाजूच्या भागातल्या खोल्यांमध्येच घ्यावा लागणार असे दिसत होते. चित्र पक्के बसले होते म्हणून मला तळघरात जाता येत नव्हते.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all