चिरुमाला (भाग १२)

आईवडिलांनी सांगितल्याप्रमाणे.........

आईवडलांनी सांगितल्याप्रमाणे आपण देवापुढे नतमस्तक होतो. काहीही असो. मला जरा बरं वाटलं. उदबत्तीच्या वासात एक प्रकारची प्रसन्नता
पसरली. जेवणाची तयारी करायला घेतली. कारण आज लीना नव्हती . तसाही मला तासभर लागलाच असता. कुकरचं झाकण लावणं हा प्रकार मला जमायलाच पंधरा ते वीस मिनिटं गेली. बायका कशा या गोष्टी पटकन करतात, कोण जाणे. अखेरीस लागलं. मी हॉलमधे आलो.
इथे टीव्ही नव्हता. त्यामुळे मला बातम्या कळायला उद्या सकाळचा पेपर येई पर्यंत वाट पाह्णं भाग होतं. वेळ जावा म्हणून मी वाचायला पुस्तक काढलं. माझं लक्ष लागेना. आज लीना नाही झोप लागणं कठीण आहे. मी एवढ्या मोठ्या वाड्यात एकटाच झोपणार होतो. नाही म्हंटलं तरी तिची गेले काही महिने सवय झाली होती. एखादा टीव्ही आणणं भाग होतं. कुकरची शिट्टी झाली आणि मी दचकलो. वातावरणात वाऱ्याशिवाय
एकही आवाज नव्हता. सहज म्ह्णून मी सरदार साहेबांच्या चित्राकडे पाहिलं . त्यांची नजर दरवाज्यावर स्थिर झालेली दिसली . मग उठून मी चित्राजवळ गेलो. चित्राकडे निरखून पाहू लागलो. तशी ते चित्रही माझ्याकडे निरखून पाहत असल्याचा भास झाला. मी माझयाजवळचा मोठा
टॉर्च आणला आणि चित्राच्या सर्व कडांवर मारून पाहिला. तिथे हातही फिरवून पाहिला. हाताला काळसर डाग पडले. मग टॉर्च खालच्या
कडेवर मारल्यावर मला असं आढळून आलं की माझ्या एका बोटाच्या रुंदी इतकी लांबलचक फट तिथे होती. केवळ कुतुहल म्हणून मी टॉर्च तिथे मारला. आतला भाग पोकळ असल्यचे आढळून आले. आत मध्ये भिंत नसावी तर एखादा मोठा कोनाडा असावा आणि त्यावर चित्र खिळवून बसवले असावे असे वाटले. कारण प्रकाशाची तिरीम बरीच आत जात होती . पण दुसरे टोक दिसत नव्हते. म्हणजे तिथे भिंत असावी अशी माझी समजूत झाली. काही झालं तरी इथे एक गोष्ट चांगली होती , ती म्हणजे इथे उंदीर, झुरळं असले प्राणी नव्हते. असो. मी स्वैपाकघरात गेलो. जेवण बनवलं एका डिशमध्ये वाढून घेऊन टेबलावर बसलो. जेवण तर झालं. जेमतेम नऊ वाजत होते. दुसरं काही काम नसल्याने मी सरदार साहेबांच्या चित्राजवळ परत जाऊन त्या फ्रेमचं निरिक्षण करू लागलो.सगळ्ञ्या कडा पाहून घेतल्या पण कोठेही फट सापडेना आता माझ्या हातात एका लहानश्या पटाशी सारखे हत्यार होते. माझ्याकडे असलेल्या एकूण हत्यारांमधे तीच एक सापडली. जिचा उपयोग होईल असे वाटले.
मी ती पटाशी फ्रेमच्या खालच्या भागातल्या कडांमधे घालून पाहिली, फ्रेम उचकटता येत नव्हती . एक तर ती फार जुनी होती. कदाचित शंभर
एक वर्ष जुनी किंवा त्याहीपेक्षा जुनी असावी. मग टॉर्च पेटता ठेवून मी ती फ्रेमच्या खालच्या भागात जिथे फट होती तिथे घालून पाहिली पण फ्रेम
तसूभरही हालली नाही. सरदार साहेबांच्या डोळ्यात आता माझ्याबद्दलची तुच्छातेची भावना दिसली. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळलं . पण पूर्वी
अशी जिवंत दिसणारी चित्रे काढण्याची कला विकसित झाली असावी. मी त्याबद्दल बरेच वाचले होते. माझ्या चित्रकलेच्या दोन परिक्षा झाल्या होत्या. त्यात आम्हाला चित्रकलेचा जागतिक इतिहास अभ्यासाला होता. त्यात अशा अद्भुत चित्रकलेचे वर्णन होते. अर्थात त्यात अशी चित्रे कशी काढावीत याबद्दल काहीही पद्धत दिली नव्हती. मी परत एकदा प्रयत्न करून पाहिला टॉर्चच्या प्रकाशात आत एखादी लाकडी फळी असावी असे दिसले. पण मला त्याचा अर्थ लागेना. कदाचित चित्र सरकवून आत एखादा रस्ता किंवा खोली निघेल अशि मला शंका होती. पण तसे काही
झाले नाही. मी प्रयत्न सोडून दिला. परत एकदा पुन्हा प्रयत्न करून पाहायचे ठरवले. या सगळ्य प्रकारात दहा वाजून गेले होते. मी झोपण्याची
तयारी केली. अर्थातच हॉलमधे. मला बेडरूममधे झोपण्याचे धाडस झाले नाही. दिवा तसाच ठेवून मी झोपी गेलो.


केव्हातरी तीन एक वाजता मी तहान लागल्याने उठलो. स्वैपाकघरात पाणी पीत असताना अचानक
वरच्या म्हणजे बाजूच्या भागात कोणीतरी धावत असल्याचा आवाज आल्याने मी चांगलाच दचकलो. मग भानावर आल्यावर मी ओरडलो. " अरे,
को ण आ हे वर ?........" थोड्यावेलाने आवाज थांबला. पण टॉर्च घेऊन बघण्याचे धाडस मला होईना. तरीही मनाचा हिय्या करून मी जिना
चढू लागलो. तेव्हा वरच्या कॉरिडॉरमधून जिन्यावर धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी थरथरत्या हाताने टॉर्च लावला. त्याच्या प्रकाशात वरच्य दोन पायर्‍यांवर मला हिरवे डोळे असलेले मांजर दिसले. ते ट़़क्क माझ्याकडे बघत होते. त्याची नजर लवत नव्हती. मी हातातली पटाशी उगारली तेव्हा कुठे ते परत वरच्या मजल्यावर उडी मारून गेले. मग वरचे जिन्याचे दार उघड ले. तिथल्या बेडरूममधे शिरलो. पण तिथे काहीही सापडले नाही. सरदार साहेबांच्या फोटो मागे नक्कीच काही तरी असावं असा मला संशय होता. उद्याचा दिवस माझ्या हातात होता. नंतर लीना येणार होती. रात्र कशीतरी काढली. दिवस उजाडला. आज सुट्टी असल्याने मी जरा आरामात उठलो. माझी अपेक्षा लीनाचा फोन येईल आला नाही. मीही मुद्दामच केला नाही.
सकाळचा वेळ तर साफसफाई करण्यात आणि वर्तमानपत्र वाचण्यात गेला. घरात जी काही बिस्किटं, वगैरे होते ती खाल्ली गेली. आत्ता तरी माझ्याकडे कोणीही येणार नव्हतं. म्हणून मी घराला कुलुप घालून पडक्या चर्चकडे मोर्चा वळवला. साधारण दोनतीन मिनिटं चालल्यावर एका बाजूने पडके चर्च समोर आलं. त्याचा प्रार्थना हॉल शिल्लक होता. तिथे असलेले तुटके फुटके बेंचेस तुडवीत मी तेथील व्यासपिठाकडे गेलो. ते साधारन दोन तीन फूट उंच होतं. वर सगळं गवत उगवलेलं होतं. तिथलं भाषणाचं मेज केव्हाच नष्ट झालेलं होतं. हॉलच्या खिडक्या बऱ्याचश्या तुटलेल्या होत्या. ज्या होत्या त्या जेमतेम उभ्या होत्या. त्यांच्या रंगित काचा शिल्लक होत्या. नदीचा आवाज आता स्पष्ट येत होता. त्या काळात जवळ जवळ पन्नास साठ माणसं सहज आत मावत असतील तिथल्या पडझडीत मला काहीही वस्तू अथवा कसलेही अवशेष दिसले नाहीत. फुटक्या काचांपासून पायांना वाचवीत मी बाहेर आलो. बाहेरील दगडी प्रवेशदाराची कमान अजून पक्की उभी होती. त्यावर त्या चर्चचं नाव कोरलेलं होतं. एक दोन ग्रीक किंवा रोमन लहान मुलांचे उघडे नागडे पुतळे म्हणजे आपण त्यांना मूर्ती म्हंटलं तर बरं होईल त्या अजून चांगल्या अवस्थेत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि खेळकरपणा अजूनही दिसत होतं. हॉलच्या कमानीसारख्या खिडक्या म्हणजे उत्तम शिल्पशास्त्राचा नमुना होत्या. मग मी पडक्या भागाकडे वळलो. तिथे असलेले कॉरिडॉर सुद्धा प्रचंड लांब होते. जिथे लागून खोल्याअसाव्यात. ज्या आता भंगलेल्या अवस्थेत होत्या. कदाचित त्या पाद्र्यांचे विश्रांती स्थान असाव्यात. जेवढ्या भागात आत शिरता येत होतं तिथे गेलो. मध्येच एक मोठा खड्डा, म्हणजे एखादे विवर असावे असा पडलेला दिसला. आत काळोख असल्याने मला दिसले नाही. दिवसाउजेडी इतक्या काळोखापुढे तर रात्रीच्या भयानकतेची कल्पना करता येत नव्हती. मी फार आत न शिरता मागे फिरलो. सहज नजर चर्चच्या मनोऱ्याकडे गेली तर तिथे एक दोन घारीसारखे पक्षी बसलेले दिसले. मी मग नदीकडे गेलो. नदीवरचा भन्नाट वारा अक्षरशः मला ढकलीत होता. जणूकाही तो म्हणत होता. " इकडे का आलास ...........? चालू लाग " हा भाग तुझ्यासारख्या सामान्य माणसासाठी नाही. इथे वैराणतेचं राज्या चालतं. तू अतिक्रमण करतोयस. तरीही मला तो परिसर आवडला. चिंतन मनन वगैरे करणाऱ्यांसाठी तो चांगला असावा. पण का कोण जाणे तिथे पावित्र्य आहे असे मात्र वाटले नाही. कंटाळून मी निघणार इतक्यात माझी नजर नदीतील खडकांच्या एका रांगेकडे गेली . जणूकाही सेतू बांधला असावा. ती रांग नदीच्या पलिकडच्या तिराकडे नेत होती. तिथे मात्र रान होतं. विषेश काही न सापडल्याने मी घरी परत आलो. ........... आता सकाळचे साडे नऊ वाजत होते. मी विचार केला शोध घ्यायचा असेल तर तो आत्ताच घेतला पाहिजे. म्हणून मी पुन्हा सरदार साहेबांच्या चित्राजवळ आलो.

खरं म्हणजे मला आत्ता भूक लागली होती. मी पोहे करायला घेतले. मला जवळ जवळ पोहे खायला साडेदहा झाले. केवळ लीना कसे बनवते ते पाहून बनवल्याने बनवेपर्यंत माझ्या तोंडाला फेस आला. स्वैपाक हा प्रकार बायकाच करू जाणेत. असो. मी आता पुढचे दार लावले. आतून कसाबसा अडसर लावला. आतला लाइट चालू केला. मग मी माझ्याजवळची हातोडी, पटाशी, आणि स्क्रू ड्रायव्हर वगैरे घेऊन सरदार साहेबांच्या चित्राकडे आलो. त्यांच्या मुद्रेकडे दुर्लक्ष केले. मला आत्ता त्यांना काय वाटतंय हे जाणून घेण्यात मुळीच स्वारस्य नव्हते.....आता टॉर्च फुल ठेवून मी पटाशी चित्राच्या खालच्या फटीत घातली. मग एका बाजूने चित्राच्या उभ्या कडेला स्क्रू ड्रायव्हर लावला. जोर लावता लावता माझं सगळं लक्ष फट कशी उघडेल याकडे होतं. त्यामुळे खड.... र्र र्र र्र असा आवाज करीत चित्र वर वर सरकू लागलं. मला आनंद झाला. मी माझ्या कामात यशस्वी होतोय हे पाहून मी पुन्हा जोर लावायला सुरुवात केली. चित्राची उंची पाच ते साडे पाच फूट होती. ते पूर्ण सरकवण्याचा प्रयत्न मी करीत होतो. आता माझी उंची कमी पडू लागली. माझ्याकडे मोठं स्टूल किंवा इतर काही साधन नसल्याने मला चित्र अर्ध्याच्यावर थोडंसंच सरकवता आलं. अर्थात माझी उंचीपण त्याने गाठली नाही. मग माझं लक्ष उघडलेल्या भागाकडे गेलं. आतमध्ये एका लहान खोली एवढी पोकळ जागा दिसली. कदाचीत हा मोठा कोनाडा असावा. त्या कोनाड्याच्या खालच्या भागावर पाय ठेवून मी टॉर्च मारला आणि वरचा भागही दिसला. माझा अंदाज बरोबर होता. मी खाली पाहिलं. आत मध्ये एक मोठं खड्ड्यासारखं विवर होतं. टॉर्चच्या प्रकाशात आत उतरणाऱ्या पायऱ्या मला दिसू लागल्या. त्या गोल असाव्यात . मला आत पाऊल टाकण्याचं धैर्य झालं नाही. आत व्यवस्थित बसवलेल्या चिऱ्यांवर वर्षानुवर्षाच्या घाणीचे जाड थर बसले असावेत. कदाचित ते निसरडे असतील. मला का कोण जाणे आत पाऊल टाकावेसे वाटेना. ही कोणत्याही दृष्टीने मला फायर प्लेस वाटत नव्हती. पण सगळ्याच भागात बसलेली पुटं आणि जाड जाड कोळ्यांची मोठमोठी जाळी पाहून परत ते चित्र जागेवर बसवावे असे वाटू लागले. पण ते मला शक्य होईल असे वाटेना. आता वरून ते ढकलावे लागणार आणि माझी उंची तेवढी नव्हती. मी चित्राच्या खालच्या भागाला जोर लावून पाहीला. पण आता ते खाली सरकायला तयार नव्हते. मला आता चांगलाच घाम फुटू लागला होता. ते खरंतर वरून ठोकायला पाहिजे होतं. पण वर म्हणजे तरी दहा बारा फुटांवर मी जाणार कसा ? सिलिंग वीस फुटांचे होते. आणि स्वैपाकघर आणि चित्र यांमध्ये वर मजला नव्हता. आता हे चित्र जर खाली आले नाही तर ? मला लीनाची आठवण झाली. कोणी नाही आलं तरी ती आज संध्याकाळी येणार होती . मी जरा वेळ सगळेच प्रयत्न बंद करूनसोफ्यावर बसलो. इकडे तिकडे पाहत होतो काही अवजार किंवा काही कल्पना सुचते का . पण काही सुचायलाच तयार नव्हतं. मी वेळ जावाम्हणून वरच्या मजल्यावरच्या बेडरूम कडे निघालो. दिवस असल्याने विचित्र अनुभव येण्याचा प्रश्नच नव्हता. मी बेडरूमचे कुलूप उघडले. आत शिरलो. तिथली खिडकी उघडली. बाहेर पाहत बसलो. मला नसते उद्योग करायला कोणी सांगितले होते ? असं लीना विचारणार. बाहेर पाहतापाहता शिवमंदिरा जवळच्या कंपाउंड वॉलजवळ एक लांबलचक लाकडी दांडा आणि त्यवर लोखंडी कंगव्या सारखी वस्तू बसवलेली दिसली.म्हणजे रेल्वे वर्करच्या हातात जो लोखंडी पंजा असतो , ज्याने तो रुळांमधले लहान लहान दगड एका पातळीत आणण्याचा प्रय्त्न करतो तसलंकाहीतरी . मला त्याचा उपयोग लक्षात येईना. पूर्वी इथे दगड पसरलेले असतील का ? मी उगाचच कल्पना करीत होतो . मग या अवजाराचाउपयोग काय ? विहिरीतला गाळ काढायला, की विहिरीत पडलेली वस्तू काढायला ? प्रश्न माझेच होते , उत्तरंही माझीच होती. मला काहीसमजेना. अचांनक ते अवजार घरात आणून पाहावे आणि काही उपयोग होतो का ते पाहावे. म्हणून मी जिन्यावरून धावत जाऊन ते अवजार घेऊनयेण्याचा प्रयत्न केला. तर ते माझ्याच अंगावर आले. मी बाजूला झाल्याने माझ्या अंगावर न पडता. ते वेडे वाकडे पडले. ते चांगलंच जड होतं. मी ते कसेतरी ओढीत दरवाज्यातून घरात आणले. एकदाचे खाली टाकले. मग चित्रा जवळ उभा राहून मी त्याचा कंगव्यासारखा भाग चित्राच्या वरलावला. आणि तो तिथे अडकल्यावर खाली ओढू लागलो. मी त्याला लटकलो आणि त्याची पकड सुटली की काय काही कळायच्या आत त्याअवजारासहीत खाली पडलो. माझा श्वास वरचा वर खालचा खाली झाला. जरा विश्रांती घेण्यासाठी सोफ्यावर बसलो. मी स्वतःला लाख शिव्या दिल्या. आता हे चित्र खाली कसं येणार या कल्पनेनीच मला घाम फुटू लागला. त्यात लीना येणार. मी पुन्हा
ते अवजार उचललं. आणि पुन्हा वरच्या कडेला लावलं. आणि दांडा थोडा लांब राहून आणि तिरका करून ओढून पाहिले. मोठ्या प्रयासाने ते चित्र थोडे खाली आले. आता माझा उत्साह वाढू लागला. मी परत परत ते अवजार वापरून ते चित्र हळूहळू खाली आणण्यात यशस्वी झालो. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. म्हणजे हे अवजार यासाठीच तर वापरले जात नव्हते ? असा विचार माझ्या मनात आला. याचाच अर्थ जेव्हा जेव्हा खाली उतरायचे असेल तेव्ह ते अवजार वापरून चर सरकवताही येत असेल आणि बंद करता येत असेल. मी ते अवजार परत बाहेर जाऊन जिथे होते तिथे ठेवले. मी त्या अवजाराला नमस्कार केला.
जेमतेम मी जेवण बनवले . दुपार नंतर झोपलो. वातावरण थंड होते. मी अजूनही वाड्याची मागची बाजू पाहिली नव्हती.आत्तातरी माझ्यात तेवढी चिकाटी नव्हती. उद्या ऑफिसला जायचे होते आणि संध्याकाळी लीना आणि मुलं येणार होती. मी पाच वाजेपर्यंत वाट पाहिली . मग गाडी घेऊन लीनाला आणायला स्टँडवर गेलो. ............. ‌ साडेसहा वाजता बस आली. त्यांना उरतून घेतलं आणि घरी आलो. वाटेत येताना लीना फार बोलत नव्हती. पण अगदीच अबोल नव्हती. तिने विचार केला असावा. जे झालं त्यात माझी चूक
नव्हती. आता ती घरी आल्यावर नेहमीप्रमाणे वागू लागली. मला आनंद झाला. पण झोपताना मात्र ती मुलांना घेऊन वेगळ्या वेडरूनमध्ये झोपली. मी तेही मान्य केले. वास्तविक पाहता मी तिच्या जवळीकेची वाट पाहत होतो. असो. रात्र ठीक चालली होती. अचानक दीड वाजता
कुणातरी लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागल्याने मी जागा झालो. मी इकडे तिकडे पाहिले. आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. 

  तोही न वापरात असलेल्या भागातून. मी तिथली खिळवलेली खिडकी सावकाश , आवाज न करता उघडली. पलिकडच्या भागात असलेल्या एका खोलीच्या उंबऱ्यात बसून एक मुलगी रडत होती. मला तिचा चेहरा काळोखामुळे दिसत नव्हता. तिच्या अंगावरचे फ्रॉक सारखा कपडा असावा. बहुतेक तिने चेहरा ओंजळीत लपवलेला असावा. मी तिला धीर करून विचारावंसं वाटलं , " का ग बाळ का रडतेस ? आई दिसत नाही का तुझी ? आणि तू इथे कशी आलीस ? " पण प्रत्यक्षात माझ्या तोंडाला कोरड पडली होती . आणि फक्त हवा बाहेर पडली. त्यावर उत्तरादाखल( ? ) ती विरळ होत होत दिसेनाशी झाली. माझ्या मानेवरून घामाचा थंडगार ओघळ सरकत असलेला जाणवला मी खिडकी तशीचउघडी ठेवून खाली आलो. लीना आणि मुलं गाढ झोपेत होती. त्यांना न उठवण्याचं ठरवून मी हॉलमध्ये आलो आणि सोफ्यावर बसून या घटनेवरविचार करू लागलो. आत्तापर्यंत फक्त सावल्या दिसत होत्या , आज प्रत्यक्ष मुलगी दिसली. हे नक्की काय आहे ? कोणाला विचारावं ते समजेना.इथे कोणीही नव्हतं , की ज्याच्याजवळ मी मन मोकळं करू शकलो असतो . लीनाला तर हे सांगणं कठीण होतं. ......... सकाळ होईपर्यंत मी जागाच होतो. दुसऱ्या दिवशी मी तसाच मरगळलेल्या स्थितीत बँकेत गेलो. मला कोणाचातरी सल्ला हवा होता. मध्ये एकदा मोहंती साहेबांचा फोन आला . त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलेलं होतं. त्यांना आत्ताची कर्जांची माहिती हवी होती. मी तसा हा विषय विसरलो होतो. म्हणजे काम करीत नव्हतो असे नाही. अचानक संध्याकाळी पै माझ्या केबिनमध्ये आले. ते थोडे काकू करीत मला म्हणाले, " सर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही मानाल का ? म्हणजे काय आहे की तुमचा देवावर वगैरे विश्वास नाही म्हणून म्हणतोय. ..... " त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं मी " बोला " या अर्थी मुद्रा केल्यानंतर ते म्हणाले, " सर इथे नदीच्या पलिकडच्या तीरावर एक बाबा राहतो त्याला जाऊन भेटलात तर तुम्हाला थोडी मदत होईल...... असं वाटतं. " ते पुन्हा माझ्या प्रतिक्रियेसाठी थांबले. मी काही वेळाने म्हणालो, " ठीक आहे , पण तुम्ही माझ्या बरोबर याल तर बरं होईल. " त्यावर ते प्रथम कचरू लागले. मग त्यांनी येण्याचं मान्य केलं. मग ते इकडे तिकडे घाबऱ्या घुबऱ्या पाहत म्हणाले, " सर ही गोष्ट गोळेला कळून उपयोगी नाही. " मी का विचारलं पण ते उत्तरादाखल उठून निघून गेले. अचानक मला आमच्या हेड ऑफिसमधून बोलावणं आलं . ते कशा संंदर्भात होतं कळलं नाही. म्हणजे उद्या प्रथम हेड ऑफिसला जावं लागणार तर, मी स्वतःशी पुटपुटलो. दोन दिवस तरी जातील . त्या अवधीत लीनाला " ती " मुलगी दिसली तर गहजब होईल आणि आल्यावर ती काहीही करेल ही भीती मला वाटली. मी घरी पोहोचलो. लीनाला उद्या मला मुंबईला जायचंय म्हंटल्यावर ती परत माझ्याबरोबर यायचं आहे असं म्हणाली. पण

मुलांची शाळा सारखी बुडवणं बरोबर होणार नाही असे मी म्हंटले. ते तिने नाराजीनेच मानले. त्या रात्री काहीही झालं नाही. सकाळी उठून मी
मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलो. जाताना मी तिघांचा निरोप घेतला. लीनाचा मूड चांगला नव्हता. मी त्याची पर्वा केली नाही. .............

  मुंबईची मिटिंग झाल्यावर मला माझ्या मुंबईतल्या साहेबांनी बोलावलं. ते म्हणाले, " मि. सबनीस . माझ्याकडे तुमची गोपनीय फाइल आलेली आहे. त्यात वेगवेगळी आरोपपत्र आहेत. हे झालं कसं ? मी काय निर्णय घ्यावा तुम्हीच सांगा. " मी काही बोलत नाही असे पाहून ते म्हणाले, " मार्चपर्यंत मी तुम्हाला मुदत देतोय , ती घ्या आणि तुमचं काम रुळावर आणा. उशीर केलात तर मी काहीही करू शकणार नाही. " मी आभार मानून निघालो. केबिनचा दरवाज्या उघडणार इतक्यात साहेब म्हणाले, " सबनिस काही प्रॉब्लेम आहे का ? माझाअसं विचारण्याचा काहीही संबंध नाही. पण तुम्ही फार ताणाखाली वावरताय असं मला वाटतं. " मी उत्तरादाखल एवढेच म्हणालो, " तुम्ही दिलेली डेडलाइन मी पाळीन. " मी बाहेर पडलो. बस पकडण्यासाठी मुंबई सेंट्रलला आलो .गाडीची वाट पाहत बसलो होतो. गाडी लागायला वेळ होता. माझी नजर सहजपणे एक दोन बाकडी सोडून बसलेल्या एका माणसाकडे गेली. ते एक मोठा चेहरा असलेले गृहस्थ होते. त्यांनी अंगात फक्त सदरा आणि लेंगा घातलेला होता. त्यांचे भव्य कपाळ पाहणाराचे लक्ष वेधून घेत होते. लांबलचक वाढवलेले पांढरे केस मानेपर्यंत रुळत होते. पाढरी शूभ्र दाढी त्यांना शोभून दिसत होती. का कोण जाणे पण मला ते बुवा बापू यांपैकी वाटले नाहित. तेजस्वी मोठे डोळे टोकदार नाक आणि निश्चयी जिवणी त्यांच्या कर्तवगारीचे प्रतीक होती. कपाळावर तिबोटी शिवगंध आणि मध्ये शेंदरी टिळ्यावर बुक्का लावलेला त्यांना शोभून दिसत होता. तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेला एक साधारण माणूस जो त्यांचा सचीव होता (हे नंतर कळलं) तो उठून माझ्याकडे आला आणि त्याने मला त्यांच्या बद्दल सांगायला सुरुवात केली. त्यांचं नाव "वरदाचार्य पुराणिक" होते. त्यांची गूढ शास्त्रांतील प्रगती आणि त्यांचे विचार, आजकालची पिढी कशी फसव्या अध्यात्माच्या मागे लागल्ये आणि त्यामुळे त्यांचे नुकसान यावर त्या माणसाने जणू व्याख्यान आरंभले. मला जरा वैतागच आला. आता लवकरच बस येईल तर बरं . म्हणजे या चेल्याच्या तडाख्यातून मी सुटेन असा विचार करून मी इकडे तिकडे पाहिलं. ते पाहून तो म्हणाला, " मी तुम्हाला बहुतेक बोअर करतोय असं दिसतंय . पण आमच्या महाराजांची गूढशास्त्रांवर जी हुकुमत आहे तिचा अनुभव घेतल्यावर तुमचा नक्कीच विश्वास बसेल. "असे म्हणून त्या माणसाने समोर बोट करीत " अरे ती पाहा बस आली " असे म्हणून मला नमस्कार केला. आणि मला त्या महाराजांचं कार्ड दिलं व म्हणाला, " कधी काही सल्ला मसल्त लागली तर जरूर फोन करा. कारण महाराज बहुतेक परदेश दौऱ्यावर असतात पण इथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यात ते विशेष आस्था दाखवता बरं का. चला निघूया. “ असे म्हणून तो दुसऱ्या आलेल्या गाडीत जाऊन महाराजांसहित बसला. जाता जाता महाराजांनी माझ्याकडे सहजपणे पाहिले व ते हसले. त्यांचं हास्य खरोखरीच गोड होतं. माझ्या आयुष्यात तरी मी असा माणूस पाहिला नव्हता. त्यांचा विचार मागे सारीत , मी गाडीत जाऊन बसलो.बसलो. दिवस थंडीचे होते. पण मला आवडत नव्हते. माझा विचार खरं म्हणजे हरिदास कडे जाण्याचा होता. पण मी तसं केलं नाही. आता मीच सगळं शोधून काढणार आणि त्यातून सुटणारही. रात्री अकराच्या सुमारास मी घरी पोहोचलो. मधलं जंगल एकूण सगळा वैराणपणा मला काहीच जाणवत नव्हतं. घरी आलो. लीनाने दार उघडले. मला जेवायचं नाही असं मी सांगितल्यावर तिने जास्त चवकशी न करता ती झोपण्यासाठी निघून गेली. वरचा मजला अर्थातच मी बंद करून चावी माझ्याकडे ठेवली होती . लीनाने वर जाऊन काही पाहू नये म्हणून. मला लवकर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता. थोडा जास्तवेळ अंथरूणात रेंगाळलो. चहा वगैरे घेतल्यावर लीना म्हणाली, " काल माझ्या स्वप्नात एक मुलगी आली होती. आपल्या रसिकापेक्षा थोडी मोठी होती. आणि ती रडत होती. वरच्या मजल्यावरच्या दरवाज्यामागे उभी होती. मी जागी झाले. तेव्हा पहाट झाली होती. इथे नक्की काय आहे , याचा तुम्ही कधी विचार केलाय .. .....?" माझ्याजवळ उत्तर नव्हते. लीना घरी असल्याने मला माझी शोध मोहीम राबवता येत नव्हती.

फेब्रुवारी महिना असल्याने मुलांच्या परीक्षांचं वेळापत्रक तर मिळालं होतं. वीस तारखेच्या पुढे म्हणजे शेवटच्या
आठवड्यात परीक्षा होत्या. असो. दोन दिवस लक्षात राहण्यासारखं काही न घडल्याने मी कामावर बिनधास्त जात होतो. अशाच एका संध्याकाळी मी घरी येण्या जरा वाड्याच्या वापरात नसलेल्या भागात काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज झाला . ते संध्याकाळचे सात वाजले होते. मला यायला नेमका उशीर झाला होता. लीना घाबरून मुलांना घेऊन पोर्चमध्ये येऊन बसली होती. मी आलो तर आमची कोणाचीच तिथे जाऊन पाहण्याची प्राज्ञा नव्हती. अर्थात मला पाहण्याची सारखी उबळ येत होती.म्हणून मी त्या रात्री लीना झोपल्यावर बघायचे ठरवले. लीना आणि मुलं रात्री साडेदहाच्या सुमारास झोपली. मी हळूच उठून वरच्या मजल्यावर कुलुप उघडून आलो. तिथल्या बेडरूमचा दरवाज्या उघडून दिव्याचे बटण चालू केल्यावर तिथल्या धुळीत काहीतरी सरकत गेल्याच्या खाणाखुणा दिसल्या . मी त्या कुठे जातात ते पाहू लागलो. पण भिंतीजवळ त्या खुणा संपलेल्या दिसल्याल. मग बाहेर येऊन पाहिलं तर बेडरूमच्या बाहेरच्या धुळीतही तशाच खुणा आणि दोन मोठे पाय दिसले. ते खिळवलेल्या खिडकीच्या जवळ संपलेले दिसले. ते मानवी पाय होते. मी खिडकीतून आत टॉर्च मारून पाहिले. मी जसा आतल्या जिन्याचा दरवाज्य अर्धवट उघडा सोडला होता , तो तसाच दिसला. तिथेही काहीतरी पुन्हा ओढत नेल्याच्या खुणा दिसल्या. अगदी जवलून पाहिल्यावर ते पाय एखाद्या मोठ्या जनावराचे आहेत असे भासले. "पण इथे कोणते जनावर येणार .....? " मी स्वतःशी पुटपुटलो. मग मात्र मी बेडरूम बंद केली आणि खाली निघणार एवढ्यात खिडकी पलीकडच्या भागात कोणीतरी धावत असल्याचा आवाज झाला. मी जोरात
" कोण आहे तिकडे ......... " असे विचारले. उत्तर आले नाही . नाही म्हणायला खिडकी पलीकडच्या बंद खोलीबाहेर एक आकृती दिसली .

  तिच्याकडे पाहता पाहता ती पांढऱ्या रंगात रुपांतरीत झाली. आता आजूबाजूच्या वातावरणात एक प्रकारची विचित्र शांतता निर्माण झाली. त्या पांढरट आकृतीने आता माझ्याकडे मान वळवली. तिचा चेहरा मी कॉलेजात असताना एका मुलीच्या कायम मागे असे, त्या पुष्पा नावाच्या मुलीसारखा दिसू लागला. ती हसत होती. माझा घसा कोरडा पडला होता. ही इथे कशी आली ? आणि हिचा संबंध काय ? असं माझ्या मनात आलं पण मग माझ्या भोवतालचा सगळा भागच फिरत असल्याचा मला भास झाला आणि माझी शुद्ध हरपून मी खाली पडलो. .............

मला जाग आली तेव्हा मी खालच्या बेडरुममध्ये बिछान्यावर पडल्याचे मला जाणवले. लीना बेडजवळ उभी होती.तिच्या हातात पाण्याचा पेला होता. तिने तो माझ्यापुढे केला. आणि म्ह्णाली, " घ्या. पाणी ......... " मी पाणी प्यायलो. आणि माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तो ओलसर लागला. त्यावर लीना म्हणाली, " वर पडला होतात बेशुद्ध होऊन. मी पाणी प्यायला उठले, तेव्हा तुम्ही बेडवर दिसला नाहीत . म्हणून वर आले. " थोडा वेळ थांबून ती म्हणाली, " अशा अवस्थेत इथे राहावसं वाटतंय तुम्हाला ? हे प्रमोशन की काय आहे ना ते नाही म्हणा आणि बदली करून घ्या आणि मुंबईला चला. यातच शहाणपणा आहे. खरंतर चहाची वेळ नव्हती पण तिने चहा केला . तो घेतल्यावर मला जरा बरं वाटलं. मग मात्र मी तिला म्हणालो, "परीक्षा झाल्याबरोबर तू मुलांना घेऊन मुंबईला जा. " त्यावर ती शांतपणे म्हणाली, " मी दाखला काढून घेणार आहे. " आणि बाजूला माझ्याकडे पाठ करून झोपून गेली. दुसऱ्या दिवशी मी येताना गावात जाऊन काही किराणा सामान वगैरे विकत घेतले. गाडीमध्ये टाकून गाडी सुरू करणार एवड्यात माझी एका व्यक्तीकडे नजर गेली. ते होते. पारलोके भटजी. मी गाडी बंद करून त्यांना हाक मारली. त्यांनी वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांना नीट दिसलं नसावं. म्हणून ते गाडीजवळ आले. त्यांची माझी नजरानजर झाली. आणि मला ओळखताच ते पळत सुटले. कोणतेही उत्तर न देता ते का पळाले मला कळेना. मग मीही उतरून त्यांचा पाठलाग करू लागलो. अधून मधून मी त्यांना हाका मारीतच होतो. ते हळू हळू शिवमंदिराजवळ आले. ते घरात जाण्याच्या आत त्यांना गाठले. त्या बरोबर ते गयावया करून म्ह्णाले," साहेब मला जाऊ द्या हो. तुमच्या बरोबर पाहिलं तर "ते" मला त्रास देतील. माझ्या बायको मुलांना मारतील . मी जातो. मला जाऊ द्या..........." असं म्हणून ते मला टाळून पुढे जाऊ लागले. मग मी जाऊन देऊन त्यांना म्हणालो, " गुरुजी मी तुमच्या घरी आलो तर चालेल का ? मला तुमच्याशी बोलायचंय. त्यावर ते " ठीक आहे ठीक आहे . पण कोणालाही कळता कामा नये. " असं म्हणत घरात गेले. मी विचार करीत गाडीत बसलो. भटजींनी मला घाबरण्याचं कारण कळेना. यात गोळेचा तर संबंध नाही ? मी घरी पोहोचलो. लीना आणि मुलं बाहेर खेळत असलेली दिसली. मला पाहून लीना मुलांना म्हणाली," चला, बाबा आल्येत . खेळ बंद. " त्यावर रसिकाने तक्रारीच्या सुरात म्हंटले " येऊ दे ना. तुला पाहिजे तर जा. आम्ही दोघे खेळतो. " रसिकाचं कधीच समाधान होत नसे. मग मीच म्हंटलं, " खेळा गं थोडावेळ. " मग लीना आणि मुलं अर्धातास खेळत राहिली. लीनाचा माझ्या येण्यामुळे खेळातला इंट्रेस्ट गेला होता. लवकरच ती आत आली. मी गंमत म्हणून विचारले, " आज काय घडलं वाड्यात ? , म्हणजे काही दिसलं बिसलं ? " लीनाला माझा चेष्टेचा सूर आवडला नाही. पण ती काही न बोलता संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागली. रात्री नवाच्या सुमारास आम्ही जेवायला बसलो. परीक्षेचा विषय निघाला . मग त्यावर लीना  म्हणाली ," मी नन मॅडमशी बोलल्ये. आम्ही दाखला काढून घेऊ म्हणून. ........ " थोडे थांबून तिने माझी प्रतिक्रिया अजमावण्याचा प्रयत्न केला. मी काहीच उत्तर देत नाही असे पाहून ती पुढे म्हणाली, " ............मॅडमनी तुम्हाला भेटायला बोलावलंय. " मी जाऊ म्हंटलं आणि विषय टाळण्याच प्रयत्न केला. तिला ते आवडलं नाही. आवरा आवर करताना ती म्हणाली , " तुम्ही काय ठरवलंय , शाळेच्या बाबतीत ? " मग मात्र मी म्ह्णालो, " आपण थोडं थांबावं , इतकी चांगली शाळा मिळणार नाही. परीक्षा झाल्याबरोबर तू मुलांना घेऊन जा पाहिजे तर, पण दाखला काढण्यावर विचार करू. " तिला ते आवडलं नाही. " काहीही झालं तरी मी मुलांना घेऊन इथे परत येणार नाही. " ती थोडी चिडूनच म्हणाली. पुढचा दरवाज्या उघडाच होता. बाहेर मिट्ट काळोख होता. वातावरणात चांगलीच थंडी होती. दरवाज्या जवळ रसिका उभी होती.अचानक ती ओरडली, " मम्मी , तिकडे बघ कोण आहे. ती ताई वाटते. "

(क्रमशः)

🎭 Series Post

View all