Login

चिरुमाला (भाग १०)

दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही उशिरा........

दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही उशिरा म्हणजे आठ वाजता उठलो. अचानक माझ्या ज्येष्ठ बंधूंचा फोन आला . ते सपत्निक येणार असल्याचे म्हणाले. अर्थातच त्यांना आणण्याची जबाबदारी जुडेकर वर सोपवली. बँकेतला काही स्टाफ मी या कार्यक्रमाला बोलावला होता. त्यादिवशीच्या कार्यक्रमात आम्ही थोडा बदल केला होता. तो म्हणजे पार्टी सकाळी न ठेवता संध्याकाळी सहा वाजता ठेवली. म्हणजे जास्त गर्दी होऊ नये. भटजी नऊ साडेनऊ पर्यंत येणार् होते. आम्हाला झोप नसल्याने आमचे डोळे चुरचुरत होते. सध्या साडेनऊ पर्यंत आवरणार कसे हा प्रश्न होता. तरीही जुजबी कामं करीत होतो. पावणे नऊ च्या सुमारास जुडेकर आला. आल्य आल्या त्याने कोण भटजी ठरवलाय ते विचारले. पारलोकेचे नाव ऐकताच तो म्हणाला, " काय सर, तुम्ही नेमका नको त्या भटजीला बोलावलात. तो वेळ तर सोडाच , न येण्याबद्दल प्रसिद्ध आहे. " आता मात्र माझी पाचावर धारण बसली . आता काय करावं. मी जास्त लक्ष जुडेकरच्या बोलण्याकडे न देता त्याला काही कामं सांगितली. तो माझ्या ज्येष्ठ बंधूंना आणण्यासाठी गेला. थोड्याच वेळाने गोळे पण आला. तो फारसं बोलत नसला तरी ठरवून दिलेली कामं करीत होता. दहा वाजायला आले. आमचे ज्येष्ठ बंधूही आले. त्यांना त्यांची खोली दाखवली. ते वाडा पाहून फारच खूष झाले. त्यांना मूलबाळ नसल्याने ते आणि वहिनी एकटेच आले होते. आल्या आल्या त्यांनी माझ्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या भेटी आणि खाऊ देऊन खूष केले. एकूण वातावरण आता जास्त प्रसन्न वाटू लागले. प्रत्येकाला आपले भाऊ बहीण आल्यावर आनंद होतोच. अर्थातच बायकोचा भाऊ त्याला अपवाद असतो. असं म्हंटलं म्हणून रागावू नका , मी पण तुमच्यासारखाच आहे. असो. ..............अजून भटजी काही आले नाहीत. साडेदहाच्या सुमारास मी त्यांच्या येण्याची आशा सोडली. मग त्यांच्याकडे जाऊन यायचं ठरवलं. मी निघालो आणि गेटमध्ये भटजी शिरताना दिसले. पण त्यांनी चेहरा वळवल्यावर मला ते वेगळे असल्याचे दिसले. त्यांचं नाव पाठक होतं. आल्या आल्या ते म्हणाले, " पारलोके गुरुजींची तब्बेत बिघडल्याने त्यांनी मला हे काम दिलय. " जुडेकर तिथेच उभा होता. माझ्या कानाशी लागून तो म्ह्णाला , " हेच तर गोळेचे भटजी आहेत. हे झाड फूंक पण करतात, म्हणून तर त्यांचं आणि गोळे चं जमतं. ..... " माझी निराशा झाली. पण ती न दाखवता मी त्यांचं स्वागत केलं. आता गोळेला तर सगळं कळणार होतं. . ... असो. त्यांनी हॉलमध्येच सगळे विधी करणार असल्याचे सांगितले. मग मी म्हणालो, " अहो पण बाहेर मांडव घातलाय , तिथेच बरं पडेल. " त्यावर ते म्हणाले, " काय भाऊ वास्तुशांतीचा विधी वास्तूमध्ये करायचा की वास्तू बाहेर करायचा ? " मी काही बोललो नाही. आणखीन तीन ब्राह्मण आले. ते पाठकांचे सहाय्यक असावेत. लवकरच त्यांनी हवन वेदी तयार केली. वेगवेगळं साहित्य त्यांनी पद्धतशीर मांडलं. मग लवकरच विधींना सुरुवात झालीहोमाचा धूर वाड्यात दाटू लागला. मुलांना मुद्दामच बाहेर खेळण्यासाठी पाठवलं . पण ती अधून मधून येतच राहिली.
जुडेकरनी मांडव चांगला घालून घेतला होता. तिथे येणाऱ्या स्टाफ साठी बसण्याची व्यवस्था केली होती.
आल्याबरोबर त्यांना थंड पेय्य दिले गेले. त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं. असो. आमचा विधी आता जोरात चालू होता. मंत्र म्हणणारे म्हणणारे
आता उच्चरवाने मंत्र म्हणू लागले. एकदा तर मला असं वाटलं पाठक गुरूजी तंत्रविद्येतील मंत्र म्हणतायत की काय. अर्थात मला त्यातले फारसे कळत नव्हते. आता जवळ जवळ सव्वा तास बसून झाला होता. आणखीन एक तास तरी लागेल असे गुरुजी म्हणाले." खरंतर यात ब्रेक नसतो . पण हल्ली आम्ही ब्रेक देतो. आजकाळचे यजमान म्हणजे फार काळ न बसणारे असतात . असो. तुम्ही दोघांनी लाल वस्त्र नेसून या ." त्यांना काही तरी टीकात्मक बोलायचे असावे.पण त्यांनी मोह आवरलेला दिसला...... . असो आम्ही दोघेही थोडया वेळापुरते उठलो. सर्वानाच चहा कॉफी दिली गेली. तेवढ्यात आमचे सहाय्यक मॅनेजर माझ्या जवळ येऊन म्हणाले, " सर तुम्ही आणि वहिनी अगदी एखाद्या संस्थानिकासारखे दिसत आहात. .... " काहीतरीच अशा अर्थाचे हात मी हवेत उडवले. मग आम्ही पुन्हा बसलो. तेव्हा गुरुजींनी आम्हाला हार घातले. तीन ब्राह्मणांपैकी एक जे अतिशय काळे आणि ज्यांचे दात पुढे होते ते मंत्र क्वचितच म्हणत होते त्यांना मग पाठक गुरुजींनी समोर बसायला सांगितले.त्यांना पान वाढून जेवायला सांगितले. आणि मला म्हणाले, " इकडे लक्ष द्या, हा विधी तसा यात नसतो, पण या वाड्या करता हा केला जातो. असं माझ्या वडिलांनी पूर्वीच सांगितलं होतं. म्हणून आपण करीत आहोत. " मग त्यांनी ज्या गुरुजींना समोर बसायला सांगितले होते त्यांच्या वर मंत्र म्हणत अक्षता टाकायला सुरुवात केली व बाकीच्या दोघांनी चिताभस्म उधळायला सुरुवात केली. त्याबरोबर मला भीती वाटली. मी तसे त्यांना म्हणालोही. पण त्यांनी त्यांना डिस्टर्ब न करण्याच्या खाणाखुणा केल्या. व नंतर सांगतो असे सांगितले. जवळ जवळ अर्धातास हे सगळं चालू होतं. मग पूर्णाहुती झाली. तेव्हा गुरुजी आणि इतर ब्राह्मण हे " जय बिष्णोई, जय महाकाली, असे ओरडून त्यांनी सगळ्या दिशांना कुंकू उधळले. आणि ज्या ब्राह्मणावर अक्षता आणि चिताभस्म टाकले होते त्याला तयार केलेला वास्तुपुरूष, जो जवळ जवळ अर्धाहात लांब होता, तो बाथरूम आणि संडास याच्या मधल्या मोकळ्या जागेमध्ये पुरायला सांगितलं. बरोबर आणलेला गवंडी घेऊन आम्ही तिघे तिथे जाऊन तिथली एक लादी काढून थोडा खड्डा खणून त्यात प्रथम निळी आणि लाल फुलं पसरून त्या वास्तुपुरूषाची मूर्ती आडवी पुरली. मग त्यावर लादी परत बसवली. ती दक्षिण दिशा होती. त्या वास्तुपुरुषाला नैवेद्य वगैरे दाखवून मग मुख्य आरती होमकुंडाची आणि इतर प्रस्थापित केलेल्या देवतांची आरती केली. सगळं संपायला मला साडेबारा वाजले. मग जेवणं चालू झाली आधी भटजींची जेवणं झाली. नंतर त्यांना दक्षिणा देऊन नमस्कार केले. मला जरा बाजूला घेऊन पाठक गुरूजी म्हणाले, " ज्या भटजींवर आपण चिताभस्माचा प्रयोग केला त्यांना आधी बाहेर काढा मग आम्ही जाऊ. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी केले. ते गेल्यावर पाठक म्हणाले, " असं आहे बघा, हे आपण वेगळं का केलं तर , हा वाडा जेव्हा बांधला गेला तेव्हा त्याच्या पायामध्ये एक कबर आणि काही मानवी हाडं आणि कवट्या सापडल्या होत्या. त्यांच्या नावानं आपण पुजा आणि शांत केली . ती करावी लागते असे पूर्वापार कागदोपत्री या वाड्याच्या बाबत उल्लेख असल्याचे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते. खरंतर नरबली द्यावा लागतो किंवा रक्त द्यावं लागतं. पण आजकाल असं काही केलं तर चालणार नाही, म्ह्णून हे आपण केलेलं आहे. यात भीती दायक काही नाही. उलट आता सगळी भीती संपलेली आहे. काळजी नसावी . " हे सगळं लीनाच्या समोरच झाल्याने तिला बरे वाटलेले दिसले. मग मात्र पाठक गुरूजी आणि दुसरे दोघे गेले. आता मी माझा स्टाफ आणि जुडेकर एवढेच राहिलो. गोळेही त्यांच्या बरोबरच बाहेर पडला. तेही न सांगता. त्यांचं आणि गोळेचं काहीतरी साटंलोटं असणार याची मला शंका आली.
आता स्टाफ आणि आमची जेवणं व्हायची होती. जेवणाची व्यवस्था बाहेरच केली होती.स्टाफ संध्याकाळी येणार नव्हता. नाही म्हणायला माझे असि. पै यांना मी आग्रह करून थांबवून घेतले. जुडेकर आणि गोळे होतेच . म्हणजे गोळे पार्टीला येणार असावा. जेवणा नंतर लवंडण्याची सवय असल्याने मी आणि इतर सगळेच सुस्तावले होते. लवकरच संध्याकाळचे साडेपाच झाले. प्रथम येणारे त्या विभागाचे आमदार होते. पुरेकर नावाचे एक प्रसिद्ध डॉक्टर होते, गावातले नावाजलेले चोनकर आणि भवानीलाल हे सोनार होते. महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या नन मॅडमही आल्या . सहा सव्वा सहा पर्यंत मोहंती साहेब त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली पण आल्या. मुली आल्या आल्या
माझ्या मुलांबरोबर खेळायला गेल्या. मिसेस मोहंती आणि मि. मोहंती एखाद्या जपानी माणसासारखे दिसत होते. जिल्ह्याच्या कार्यालयातील
काही स्टाफ आलेला होता. त्यांच्यात " तो " श्रीवास्तव होता. मला तो आवडत नव्हता. असो. आलेला माणूस आवडायलाच पाहिजे असं थोडंच आहे ? आमचे गावातले काही मोठे खातेदारही होते. म्हणजे त्यांना बोलावलं होतं . ...... नदीवरच वारा वाढला होता. संध्याकाळच्या संधिप्रकाशत पार्टीला सुरुवात झाली. काही ड्रिंक्सही ठेवली होती. संथ संगित चालू होतं. सर्वानाच नदीच्या सान्निध्यात असलेला वाडा आवडला. वाड्यालाही दिव्यांची आरास केली होती . येताना सगळ्याच पाहुण्यांनी भेटी आणल्या होत्या. त्या नको नको म्हणत असतानाही
आमच्या हातात कोंबल्या गेल्या. माझा हेतू फक्त काहीतरी निराळे करायचे एवढाच असल्याने भेटी मला अनपेक्षित होत्या. असो. कॉंट्रॅक्टरची
माणसं ड्रिंक्स फिरवीत होती. आता गप्पांना ऊत आला होता. आमदार साहेब अचानक उठले आणि हातात माइक घेऊन म्हणाले, " जरा
सगळ्यांनीच इकडे लक्ष द्या." (नाहीतरी त्यांना भाषणाची सवय होतीच . बहुतेक ते संधी पाहत असावेत असे वाटले) त्यांनी स्थानिक राजकारणाचा परामर्श घेत म्हंटले, " बँकेनी जेवढी कर्ज देता येतील तेवढी उद्योजकांना द्यायला पाहिजेत. सरकार बँकेच्या पाठीशी आहे.
गावात आणि म्हंटलं तर सबंध जिल्ह्यात उद्योग वाढले पाहिजेत , म्हणजे बेकारी कमी होऊन लोकांना वेगवेगळ्या वस्तुही वापरायला मिळतील. हे लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी विकास साधता आला पाहिजे. गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास, ............. " ते आणखीनही काही पुढे बोलत होते. पण मी आणि मोहंती साहेब तर लोकांशी बोलण्यात मग्न होतो. त्यामुळे माझं लक्ष भाषणात बिलकूल नव्हतं. तसंही भाषण आजच्या पार्टीच्या अजेंड्यावर नव्हतं. आलेले लोक खूष असावेत.असे एकूण त्यांच्या चेहेऱ्यांवरून वाटत होते. मग
जेवण तयार असल्याची घोषणा मी केली. बुफे लावल्याने लोकांना बरं वाटलेलं दिसत होतं. मुख्य म्हणजे गावातल्या लोकांना त्याचं अप्रूप
वाटलं. आता साडेआठ वाजत होते. जेवणाची गर्दी चालू झाली. खाद्यपदार्थांचं कौतुक होताना दिसत होतं. लीना मिसेस मोहंतींशी गप्पा मारण्यात रंगली होती. मुलं वाड्यात खेळत होती. अधून मधून त्यांनाही जेवणाची आठ्वण केली जात होती. पण ती तिकडे लक्ष देत नव्हती.
अचानक ऐकू आलेल्या किंकाळीने सगळ्यांच जेवण थांबलं. माझ्या मुलीचा रक्ताळलेया हाताने धावत माझ्याकडे आली ती ओक्सबोक्शी रडत होती. तेवढ्यात माझ्या मुलाच्या तक्रारीने मी स्तंभित झालो. " पप्पा, पप्पा , रसिकाला ना तिकडे एक ताई आहे ना तिनी बोलावलं आणि तिच्या हाताला ती चावली. आणि दिव्याला ना (म्हणजे मोहंतींची एक मुलगी ) ती ताई घेऊन गेली. " असं म्हंटल्याबरोबर मी आणि मोहंती वाड्याकडे धावलो. वर जाऊन पाहतो तर खिळवलेली खिडकी मला पूर्ण उघडी दिसली. कोणीतरी ती जोर लावून उघडली असावी. मध्ये गज नसल्याने
मोहंतीच्या मुलीला घेऊन जाणं शक्य झालं असावं. आम्ही तिच्या नावाने हाका मारीत राहिलो. उघडलेल्या खिडकीतून आत शिरून मी तिथल्या जिन्याचा दरवाज्या उघडण्याचा प्रयत्न केला. पण मला ते जमले नाही. तसं तिथे शांतता होती. आणि वातावरणही बदलले नव्हते. एक प्रकारची निराशा निर्माण झाली. मिसेस मोहंती आणि लीनाही मग आत आल्या. दोघीच ताबा सुटला होता. दिव्या मिळत नाही असे दिसल्याने मिसेस मोहंतीही रडू लागल्या. तेवढ्यात कोणीतरी पोलिसांचं नाव घेतलं आमदार साहेब आत आले आणि त्यांनी माझ्या विभागात असं झालंच कसं यावर ते बोलू लागले त्यावर कोणितरी पोलिस कंप्लेंट करण्याचं सुचवलं . मग आमदार साहेबांनि पोलिसांना फोन लावला. अर्ध्या पाऊण तासाने पोलिस आले. आता चौकशिला सुरुवात होणार या काळजीने मला ग्रासले.
प्रथम पोलिसांनी मला भाड्याने न दिलेल्या भागाची पाहणी केली. आत जाऊन खालचा दरवाज्याही उघडला. आतमध्ये प्रखर टॉर्चच्या प्रकाशात आतली धूळ मात्र अंगावर आली. खाली असलेल्या खोलीत आम्ही सगळेच शिरलो. पण तिथे एका प्रचंड बेडशिवाय काही सापडले नाही तिथेल्या गाद्यांमधून अळ्या वळवळत असलेल्या दिसल्या. मात्र तिथे त्यांना दिव्याच्या स्कर्टचा एक तुकडा सापडला. " म्हणजे इथे दिव्या आली होती तर. पण ती कुलूप असताना कशी आली ?मि. सबनीस तुम्ही इथे केव्हातरी आला असालच नाही का ? " मला त्यांनी विचारले. अर्थातच मी नाही म्हंटले. त्यावर कानविंदे माझ्याकडे संशयाने पाहत म्हणाले, "तुमचं उत्तर हेच असणार म्हणा.... " तिथून बाजूच्या खोल्याना पण कुलुपं होती. अर्थातच माझ्याकडे चाव्या नव्हत्या. त्या हरिदास कडे असतील असे मी सांगितले. त्यांनी हरिदासचा पत्ता फोन नंबर सहित घेतला. त्याला त्यांनी उद्या सकाळी पोलिस स्टेशनला बोलावले होते. त्यानंतर थोडा वेळ जाऊन देऊन
इन्स्पे. म्हणाले, " कशी नाहीशी झाली असेल हो ? " मी म्हंटले , " मला तरी काय माहित ? ".... " मला ते माहित आहे हो. पण तुमचा अंदाज काय आहे ते पाहतोय. " मग ते खाली आले. आणी प्रत्येकाचे स्टेटमेंट घेतले. आणि नंतरच सगळ्यांना घरी जाऊन दिले. जाता जाता मला म्हणाले, "काय आहे मि. सबनीस जो भाग आपल्याला दिला नाही, तो पाह्ण्याची उत्सुकता तुम्हालाही असणारच. म्हणजे तुम्ही तो भाग केव्हातरी पाहिला असणारच , नाही का ? अर्थात तुमच्याकडे चावी नव्हती . काय ...? " असंच म्हणायचंय ना तुम्हाला. " मी होकार दिला.
तुम्ही नक्कीच मूळ कुलूप तोडून आत पाहिलं असणार. आणि आत्ता आम्ही जे कुलूप तोडलं , ते तुम्ही लावलेलं कशावरून नव्हतं ? " थोडे
थांबून ते म्हणाले, " बघा काही आठवलं तर लगेच सांगा आणि हो उद्या या पो. स्टेशनला तुमच्या साहेबांबरोबर . तक्रार नोंदवावीच लागेल.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all