चिरुमाला (भाग १)

नोकरीत बदली होणं, हे कुणालाच नवीन नाही.......
नोकरीत बदली होणं हे कुणालाच नवीन नाही . तसं ते मलाही नवीन नव्हतं. बँकेतल्या नोकरीतली बदली मात्र एखाद्या शहरात असली तर बरं वाटतं परंतू एखाद्या आडवाटेच्या खेड्यात असेल तर प्रत्येक बाबतीत आपली अडवणूक होत आहे असं
वाटतं. मे/ जून महिन्याच्या सुरवातीलाच बदल्या का होतात हे एक मला न सुटलेलं कोडं आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या राज्यात बदल्या होत असल्याने मी , माझी बायको लीना आणि दोन्ही मुलं यांना नेत नसे. उगाच त्यांना त्रास नको असं वाटे. खरंतर कोठेही जाण्याची तयारी आणि कामातली तत्परता पाहूनच मला बढती मिळाली होती. थोडक्यात , माझी इमेज बँकेत चांगली होती. मी कोणत्याच कामात कधीही तक्रार करीत नसे. त्याला कारण माझी आधीची नोकरी. तिथे जामनेरकर नावाचे आमचे बॉस होते. ते नेहमी सांगायचे . तुम्हाला येतय तेवढं काम करा. पुढची मदत करायला मी बसलोच आहे. अर्थात असा सल्ला फार थोड्या लोकांना मानवला. त्यातला मी एक.असो. ........तो सोमवारचा दिवस होता. अचानक हाती आलेल्या आदेशाने प्रथम मी विचलित झालो. हातातला आदेश उघडून पाहिला. त्यात माझी बदली रामनूर गावात झाली असल्याचे लिहिले होते. मी माझ्या वरिष्ठ साहेबांना भेटलो. त्यावर ते म्हणाले, " बदली रद्द करण्यासाठी आला असाल तर मी मदत करू शकत नाही. हे लक्षात घ्या. इतर काही माहिती हवी असेल तर देतो. " ते नवीन होते. त्यांना माझी फारशी माहिती नव्हती म्हणूनच ते असे म्हणाले. मग त्यांचा गैरसम्ज दूर करून मी म्हणालो, " मला थोडा जॉइनिंग टाइम वाढवून पाहिजे. निदान पाच दिवस तरी हवाय. " अर्थातच त्यांनी तो मान्य केल. कारण मी बदली रद्द करण्याची कोणतीही गळ घातली नव्हती. .......लवकरच मी घरी आलो. लीनाला सांगितल्यावर ती म्हणाली," म्हणजे एकटीनं सगळा भार सांभाळायचाय म्हणा की. " तिच्या तोंडावर थोडी काळजी दिसली. तिचा इंटरेस्ट वजा व्यथा मी जाणून होतो. म्हणून मी म्हणालो," या वेळेस मी
तुला आणि मुलांनाही घेऊन जाणार आहे. त्यामुळे सगळा भार तुझ्यावर पडणार नाही. ,... काळजी नसावी. " हे ऐकल्यावर तिचा चेहरा थोडा प्रफुल्लित झालेला दिसला.

रानमूरला मी स्वतः एकदा जाऊन येण्याचं ठरवलं. दोन दिवस आधीच वरूणराजांनी लहानसा शिडकावा करून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती. रामनूर एक साधारण वस्तीचे तालुक्याचे गाव होते. तालुक्याचे असले तरी गाव खेडेगावासारखे वाटत होते. तिथे शाळा होती. अगदी इंग्रजी माध्यमाची . त्यामुळे माझा प्रश्न सुटला होता. मुलगी सीनियर के जी मधे होती. मुलगा अजून लहान होता. साधारण मुंबई पासून सात आठ तासावरचे ते गाव. प्रथमदर्शनी मला आवडले नाही. स्थानिक लोक लेंगा शर्ट घालणारे , टोपी धारक होते. तिथे बँकेने आपली शाखा का काढली होती कुणास ठाऊक. पण तो माझा प्रश्न नव्हता. गावात बस स्टँडवर उतरल्यावर मी बँकेची चौकशी केली. जवळच असलेल्या एका बर्‍यापैकी
मोठ्या रस्त्यावर पंधरा मिनिटे चालल्यावर ब्रांच दिसली. तशी ब्रांच जवळ होती. ब्रांच म्हणजे एक बैठी चार पाच खोल्या असलेली इमारत होती. आजूबाजूला मात्र बरीच झाडे आणि जंगलासारखा भाग पाहून मला आश्चर्य वाटले. ब्रांचमधे जाऊन मॅनेजर शशिकांतनला भेटलो. हस्तांदोलन वगैरे झाल्यावर तो मला म्हणाला, " वैसे अकौंट होल्डर्स बहोत कम है. ब्रांच नया है , इसलिये लोनका पॉलिसी अभी तक तय नही हुवा है. आठ
दस फॅक्टरि है. उनके लोन अ‍ॅप्लिकेशन्स पेंडिंग है. लोकल लोग भी टीक है. यहां बाहर की खबर जल्दी समझती नही है. अभी आप आनेवाला है
अच्छी बात है . कोई तकलीफ नही. हां , छुट्टी के दिन टाइम निकालना मुश्किल जाता है. " त्याने मला घरी चलण्यास सांगितले. .पण एका लहानश्या ओ ळखीवर त्याच्या घरी जाणं मला प्रशस्त वाटेना. ..... थोडक्यात तसं फारसं सांगण्यासारखं नसावं. मी परत एकदा हस्तांदोलन करून निघालो. जरा गावात चक्कर मारण्याचे ठरवले . साधारणपणे एखाद दोन , तीन मजली इमारती सोडल्या तर बैठी घरंच जास्त होती. लवकरच उन्हाची थाप लागू लागल्याने मी बस पकडून जाण्याचे ठरवले. बस यायला जवळ जवळ तास भर असल्याने आणि मला गावाची फारशी माहिती नसल्याने मी तिथेच बसून  वेळ काढला. आता जागा पाहणं जरूरीचं वाटू लागलं. मी माझ्या एजंटाला भेटण्याचे ठरवले. मंध्यतरी मी स्टँडवरच्या कँन्टीन मधे मिसळ पाव खाऊन कशीतरी भूक भागवून घेतली . मी आळसटल्यासारखा  बसून होतो. मुंबईच्या सुखसोयी आणि इथली स्वीकारलेली बदली यांनी निर्माण केलेली चिंता मला आता ग्रासू लागली. तात्विक दृष्ट्या कोठेही जाण्याची तयारी असणारा मी थोडा खट्टूच झालो. बसची येण्याची अजून तरी वाट दिसत नव्हती. स्टँडवर आता फक्त मी आणि दोन चार स्थानिक प्रवासी दिसत होते. सहज म्हणून मी
डोळे मिटले. थोडी डुलकी लागली. दहा पंधरा मिनिटांनी मला जाग आली. मग विचार आला, बस तर येऊन गेली नाही ? पण आजूबाजूच्या
प्रवाशांच्या संख्येत काहीच बदल दिसला नाही .
आता जवळ जवळ दीड तास झाला होता. बस येणार की नाही इथपासून माझ्या मनात शंका येऊ लागली. मी परत एकदा चहा घेण्याच्या विचारात असतानाच एक मोठा शेंदरी फेटा घातलेले , बाध्याने दणकट , थोडे म्हातारपणाकडे झुकलेले, मोठाल्या मिशा पिळत एक गृहस्थ माझ्या बाजूला आले आणि म्हणाले ," वाईच सरका की राव. " असे म्हणून त्यांनी हातातली काठी
बाकाच्या बाजूला लावली आणि शेजारी बसले. त्यांच्या हातात सामान नव्हतं. म्हणजे त्यांना कोठेही जायचं नसावं. अंगात एक सदरा , आणि धोतर. खिशातली चंची बाहेर काढून मला म्हणाले." घेता का थोडी ? " मी नाही म्हंटले. मग ते तंबाखू काढून चोळू लागले. बार भरून मला म्हणाले.
" गावात नवे दिसताय की राव . कुठून आला ? मुंबै ? " मी मानेनेच हो म्हंटले. त्यावर ते म्हणाले "बँकेत कामाला ? " त्यांनी कसे ओळखले कुणास ठाऊक . मी हो म्हणालो. थोडं थांबून मग म्हणाले," बस आत्ता नाही आहे. चार वाजल्याशिवाय बस न्हाई राव. " मी चरकलो . आणि म्हणालो.
पण बोर्डावर दीड चा टाइम दाखवलाय." त्यावर ते म्हणाले." अवो तो बोर्डावरला टाइम हाय. पन बस चार शिवाय न्हाई येनार. " ..... माझी
निराशा पाहून ते म्हणाले," असं बघा .ही काय तुमची मुंबै न्हाई. माजं म्हातार्‍याचं ऐकाल तर माज्या घरी चला. चार घास खाऊन घ्या. काय
समजल ? म्या गावचा पाटील हाय. चला अनमान करू नगा. " मीही विचार केला. आणि बॅग उचलून त्यांच्या मागून चालू लागलो. मध्येच थांबून
बसच्या कंट्रोल रुममधे बसलेल्या माणसाला म्हणाले," भाऊ, साहेबान्ला घरी घेऊन जातोय. साहेब आल्याशिवाय बस सोडायची न्हाई. काय ......?" आतला माणसाने त्यांना अभिवादन करून हो म्हंटले. मी त्यांच्या मागोमाग चालू लागलो. ..........

( क्र म शः )

🎭 Series Post

View all