चिरोटे

चिरोटे

साहित्य -

२ वाट्या मैदा, १ छोटी वाटी मोहनासाठी तूप, २ वाट्या साखर, चवीपुरते मीठ, तळणासाठी तेल किंवा तूप.

कृती - 

प्रथम मोहन व चवीपुरते मीठ घालून मैदा भिजवून घ्या.३ ते ४ तास व्यवस्थित झाकून ठेवा. साखरेचा एक तारी पाक करून घ्या. मैदा चांगला मुरल्यावर तो मळून घ्या. त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून पोळीप्रमाणे लाटून घ्या. त्या लाटलेल्या पोळीचे चार ते सहा किंवा तुम्हाला पाहिजे तसे तुकडे करून घ्या. व तळून घ्या. हे तळलेले चिरोटे पाकात टाका. व लगेच खायला घ्या.

टीप -साखरेचा पाक एकतारीच म्हणजे थोडा कडकच ठेवा. अन्यथा चिरोटे नरम पडू शकतात. साखरेच्या पाकात थोडे लिंबू पिळून घातले तर ते आणखी चविष्ट लागतात.


अनारसे 

साहित्य - 

१ ग्लास तांदूळ, १ ग्लास साखर, तळणासाठी तूप.

कृती -

तांदूळ तीन दिवस भिजत घाला. मात्र दररोज तांदळातील पाणी बदलले गेले पाहिजे. तिसऱ्या दिवशी हे तांदूळ पाण्यातून काढून चाळणीत ठेवा व पाणी निथळू द्या. नंतर स्वच्छ कापड घेऊन तांदूळ त्या कापडावर पसरवून ठेवा. पाणी  सुकल्यानंतर साधारण ओले असतानाच मिक्सरमधून काढून घ्या. साखरेची पिठी करून घ्या. तांदळाचे पीठ व साखरेची पिठी चांगले मिक्स करून घ्या. व त्याचे छोटे छोटे गोळे करून डब्यात ठेवून द्या. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अनारसे करा.

बऱ्याच जणांना अनारसे हा किचकट पदार्थ वाटतो परंतु त्याचे योग्य माप असेल तर अनारसे अजिबात बिघडत नाहीत. एक ग्लास तांदूळ व एक ग्लास साखर हे माप घेत असताना साखर थोडी सुद्धा जास्त घेऊ नये थोडी कमी घेतली तर चालू शकते म्हणजे एक टेबल स्पून कमी घ्या. बघा कसे जाळीदार अनारसे तयार होतात.(अनारसे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा तांदूळ जुनाच असला पाहिजे)

चला तर मग वाट कसली बघतायं.

येत्या दिवाळीला ही रेसिपी अवश्य करून बघा.

मस्त खा.

स्वस्थ रहा.

धन्यवाद.

सौ. रेखा देशमुख.