चिरुमाला (भाग ५)

जैवणं तर झाली .....

           जेवण तर झालं. पुन्हा हात धुण्यासाठी कीचन मध्ये जाणं भाग होतं. पण आता मला भीती नव्हती. मी आत जाऊन परत बेतानेच नळ सोडला. हात धुतले. जेवणाची भांडी धुऊन ठेवली . येताना मी सहज सरदारांच्या चित्राकडे पाहिले. ते माझ्याकडे जास्तच उग्र नजरेने बघत असल्यासारखे वाटले. कदाचित माझं येणं त्यांना रुचलं नसावं. मग मी कीचनमधला लाईट बंद करण्यासाठी गेलो. एकवार नजर सगळीकडे फिरली. का कोण जाणे , मघाशी मोठ्ठे असलेले कीचन मला जास्तच चिंचोळे वाटू लागले. म्हणजे कोनाडे , फडताळ जागच्या जागीच होतं. पण मी जास्त विचार न करता लाईट बंद केला. बाहेर आलो. आता मात्र मी सरदारांच्या चित्राकडे बलपूर्वक पाहिलं नाही. दिवाणावर येऊन बसलो. बॅगेतली एक पातळ चादर (जी एकच होती ) काढली आणि दिवाणावर घातली. आता झोपण्याची तयारी करणं मला भाग होतं. मी सहज म्हणून मोबाईल उघडला. जेमतेम आठ वाजत होते. एवढ्या लवकर झोपावं की नाही तेच कळेना. म्हणून नुसताच बसून राहिलो. मग लक्षात आलं की पुढचा दरवाजा लावायचा आहे. मी उठलो. अर्धवट लावलेला दरवाजा मी मुद्दाम उघडला. त्याचे एक दार दोन्ही हातांनी कसेतरी उघडताच दुसरे दार मला उघडण्याची वेळच आली नाही. इतक्या जोरात वारा आला अन त्याने ते दार धाडकन उघडलं. बाहेर निव्वळ काळोख होता. बालचंद्र उगवलेला दिसला. आकाशात मेघांची भलतीच दाटी झाली होती . पावसाला सुरुवात झाली होती. ............नदीचा खळखळाट स्वच्छ ऐकू येत होता. जणू नदी माझ्या दरवाज्याला लागून वाहत होती. मी बाहेर पाऊल टाकले. पोर्चमध्ये आलो. लांबवर विजेच्या दिव्यांची मंद ओळ दिसत होती. तिकडे गाव असावं. माझी नजर आवाराकडे गेली. गेटपासून दोन्ही बाजूच्या कंपाउंडच्या भिंती दिसत होत्या. एका भिंतीजवळ काहीतरी जुनाट बांधकाम दिसत होतं. ते कदाचित मंदिर असावं. म्हणजे आवारात मंदिर होतं. मी ते पाहण्यासाठी वळणार एवढ्यात घरात "धपकन " काहीतरी पडल्याचा आवाज झाला. म्हणून मी मागे वळलो. पण आत काहीच दिसत नव्हते. आतून वरच्या मजल्यावर एका कमानी खालून जाणारा लाकडी जिना दिसला. पण तिथे काहीही नव्हतं. सध्यातरी माझा वरच्या मजल्यावरच्या खोल्या उघडून पाहण्याचा मानस नव्हता. नाहीतर मी खालच्या तीन खोल्या उघडून पाहिल्या असत्या. सकाळ पासून बसचा प्रवास , शिवाय बँकेतली दगदग , आणि एक प्रकारची नव्या परिसराची भीतीवजा रुखरुख, यांनी मी बराच दमलेला असल्याचे माझ्या लक्षात आलं. मी घरात परत आलो. जेमतेम जोर लावून दोन्ही दारे लावून घेतली. अडसर मात्र मला अर्धवटच सरकवता आला. मी पूर्ण सरकवण्याचा नाद सोडून दिला. ...............
आता मी दिवाणावर येऊन बसलो. परत माझी नजर चित्राकडे गेली. हे चित्र मला सारखे भेडसावणार की काय असे वाटून दिवाणाच्या अर्धगोलाकार बाजूच्या विरुद्ध बाजूला माझे डोके करण्याचे ठरवले. मला उशीशिवाय झोप येत नसे. एक वेळ गादी नसेल तरी चालते. असो मी माझे काही कपडे गुंडाळून त्याची उशी केली. मग लाईट न मालवण्याचे ठरवून तसाच अंथरूणावर पडलो. मला झोपायला पूर्ण अंधार लागत असे. यावर माझी आणि लीनाची बऱ्याच वेळा भांडणं झाली होती. असो. मी पडलो. माझं लक्ष आता माझ्या डोक्यावरच्या सिलींग कडे गेलं ते जवळ जवळ पंधरा ते सतरा फूट होतं. तिथे काही दगडी कोरीव काम केलेलं असावं . मला ते धड दिसेना मी तिकडे लक्ष दिले नाही नंतर अतिश्रमामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा मला पंधरा वीस मिनिटात झोप लागली. अतिविशाल जागेत आणि अतिलहान जागेत मांणसाला भीती वाटते. माझा दिवाण इतर फर्निचर जिथे होतं तिथून हॉलचा उरलेला भाग बराच मोठा होता. मला झोप तर चांगली लागली होती. पाच सहा तासांनी माझी झोप उघडली. ती मला बाथरूमला जायचे असल्याने . मी जागा झालो. अचानक डोळ्यावर आलेल्या प्रकाशाने माझे डोळे प्रथम दिपले. मग लक्षात आलं की आपण वेगळ्याच ठिकाणी आहोत. मला अजूनही बाथरूम कुठे आहे माहित नव्हतं. आता आली का पंचाईत. मी विचार केला. हे बाथरूम नक्की कुठे असेल. मला अंदाज येईना . पुढचा दरवाजा उघडून मी बाहेर जाऊ शकत होतो. पण तो उघडणार कसा ? हॉलची कोणतीही खिडकी मी उघडलेली नव्हती. पावसाचा दमदार आवाज येत होता. मी माझ्य मोबाईलचा टॉर्च चालू केला. कीचन जवळ गेलो, पण चित्राकडे न बघता. टॉर्चच्या प्रकाशात एक दरवाजा सताड उघडा दिसला. तिथे बाथरूम
वजा एक खोली होती. आतली खिडकी तुटलेली होती. टॉर्चच्या प्रकाशात मला तिथे संडास दिसला. तुटलेल्या खिडकीतून भन्नाट वारा आणि पावसाच्या धारा आत येत होत्या. मी कसातरी वापर करून बाहेर आलो. तिथे नळाची सोय नव्हती. मी दरवाजा लावून घेतला. पण माझ्या माघारी तो परत थाडकन उघडला. परत अंथरूणावर पडलो पण आता मात्र झोप येईना. या जागेची पूर्ण माहिती करून घेतल्याशिवाय इथे लीनाला आणि मुलांना आणणं कठीण असल्याची मला जाणीव झाली. तरीपण पंधरा जून पर्यंत त्यांना आणणं भाग होतं. शाळा उघडणार होती. आज तीन जून . अजून माझ्या हातात दहा बारा दिवस होते. बहुतेक मी चार वाजेपर्यंत जागा होतो. मग मात्र मला परत पेंग आली. सकाळचे
सात वाजले होते. मी खडबडून जागा झालो. बाहेर जेमतेमच उजेड होता. सूर्य पण आळसावल्यासारखा उगवला होता. पुढील दरवाज्याच्या फटीतून उजाडल्याची जाणीव झाली. पक्ष्यांचा आवाजही येऊ लागला. म्हणजे मला समजू लागला.
मी उठून सर्व जोर एकवटून पुढचा दरवाज्या उघडला. पावसाच्या पागोळ्यांचा टर्ररर ......... टप असा आवाज येत होता. मी बाहेर पाऊल टाकलंं. नदीवरून येणारा भन्नाट वारा पाहून मला बरं वाटलं. बँक अकराशिवाय उघडणार नव्हती. बँकेच्या मूळ
चाव्या माझ्याकडे दिलेल्या होत्या. सेफसहित सगळयाच चाव्या मला सांभाळणं भाग होतं. प्रथम विचार आला तो चहाचा. तो कोण देणार होतं.

           येताना दूध आणलं असतं तर निदान दूध पिता आलं असतं. पण गॅस नाही याचीही जाणीव झाली. काहीही असो. मी दात घासून चेहरा साफ केला. बाहेर पडून वाड्याच्या भोवती चक्कर मारायला बाहेर पडलो. काल दिसलेली मंदिरासारखी जागा प्रथम पाहिलि. ते एक तुटलेलं शिवमंदिर होतं. आतली पिंडी पन्हळीसहित शाबूत होती . पण छत मात्र अर्धवट कोसळलेलं होतं. सगळीकडे चिखल राड झाली होती. मी पायात काहीच न घातल्याने पाय चिखलाने माखले होते. मंदिरापुढे मी गेलो. तिथून थोड्या लांबवर असलेल्या नदीचे पात्र दिसत होते. आणि जुडॅकर म्हणाला त्याप्रमाणे एक तुटके चर्चही दिसले. आता पाऊस पूर्ण थांबला होता. मग मी गेटच्या डाव्या बाजूला फेरी मारली. त्यातल्या थोड्या भागात तुटलेले चिरे पडलेले होते. मला कळेना असा कोणता भाग होता जो ढासळलेला होता. असो. डाव्या बाजूच्या मागील बाजूस लांबवर डोंगरावर मला किल्ल्याचा भाग दिसत होता. जो मी पाटलांच्या वाड्यातून पाहिलेला होता. इथेही वारा जोरात वाहत होता. आता मात्र घड्याळाने साडे नऊ झाल्याचे दाखवल्याने मी काढता पाय घेत हॉल मध्ये आलो. केरसुणीने थोडा हॉल साफ केला. आतमध्ये उजेड सगळीकडे पसरला होता. अजून मला बँकेत जायला बराच वेळ होता. अर्थात, मी साडेदहा पर्यंत जाण्याचे ठरवले. मग तसे काहीच काम नसल्याने मी माझ्याजवळच्या चाव्यांचा जुडगा घेऊन कमानिंमागच्या तीन खोल्या उघडण्याचे काम सुरू केले. माझ्या बॅगेत खोबरेल तेलाची बाटली असल्याने तिन्ही कुलुपांमध्ये तेल टाकले. हॉलच्या डाव्या बाजूच्या कमानींमागे दोन खोल्या होत्या. आणि उजव्या बाजूला एकच खोली होती. कीचन मध्ये जाऊन ओट्यावरची खिडकी उघडण्याचा प्रयत्न करणं मला भाग होतं. ओट्यावर कसाबसा चढून भल्या मोठ्या खिडकीच्या तावदानाशी मी कुस्ती करीत राहिलो. माझा

जवळजवळ अर्धातास गेला. मी चांगलाच घामाघूम झालो. शेवटचा प्रय्त्न म्ह्णून मी तावदान जोरात ढकलून पाहिल. तावदान तर उघडलं . पण माझा तोल जाऊन मी ओट्यावरून घसरलो. आणि जेमतेम स्वतःला सावरीत अर्धवट उघड्या खिडकीतून बाहेर पाहिले, तर एक मोठा
वड आपल्या अजस्त्र पारंब्या सांभाळीत एका बंद मोठ्या विहिरीवर झुकलेल्या स्थितीत उभा असलेला दिसला. म्हणजे इथे विहीर आहे तर.
आता मात्र मी हॉलमध्ये आलो. खोल्या आल्यानंतर उघडण्याचे ठरवले. साबण वगैरे घेऊन मी बाथरूम मध्ये जाऊन अंघोळ उरकली. माझी काही स्तोत्र होती ती पुटपुटत मी बाहेर आलो. कपडे केले. आणि जुडेकरला फोन केला. त्याला मला घ्यायला येण्यासाठी सांगितल. तो
येईपर्यंत मी दिवाणावर बसून राहिलो. शेवटच्या कमानीमधून वर जाण्यासाठी लाकडी जिना होता. त्याने मला वर जायचे होते. मी वेळ जावा म्हणून जिन्याजवळ आलो. जिना काळ्या तेलकट रंगाचा असावा . मी कठड्याला हात न लावता जिना चढू लागलो. इतकी धूळ त्याच्यावर जमलेली होती. आश्चर्य म्हणजे जिन्याच्या शेवटच्या पायरी जवळ एक दरवाजा होता. नशीब त्याला कुलूप नव्हतं. आता तो दरवाजा कडी उघडून ढकलण्याचा प्रयत्न केला तर तो उघडेचना. मी घड्याळ पाहिल. दहा वाजून गेले होते. जुडेकर लवकरच येईल म्हणून मी दरवाजा उघडण्याचा नाद सोडून देऊन पुन्हा दिवाणावर येऊन बसलो. आता मला चैन पडेना कधी बँकेत जातो असे झाले होते. मी पोर्च मधून बाहेर येऊन जुडेकरची वाट पाहत राहिलो. जवळ जवळ पावणे अकरा वाजता जुडेकर आला. आला म्हणजे मला जंगलाच्या रस्त्यातून वाड्याकडे येताना मला दिसला. मला थोडा रागच आला होता. पण मी विचार केला, ही मुंबई नाही. इथे प्रत्येक गोष्ट सावकाश होत आसणार आणि मला त्याची सवय करून घ्यावी लागणार होती. तरीही मी दोन लिस्ट बनवल्या एक बँकेत पुरी करण्याची कामं आणि घरची कामं. त्यातल्या घरातल्या कामांची लिस्ट मी जुडेकरला देणार होतो. जुडेकर दाराशी आला . त्याने अभिवादन केले आणि म्हणाला. " सर , आपल्यासाठी थोडा नाश्ता आणलेला आहे , तो करून घ्या. " असे म्ह्णुन त्याने तो नाश्त्याचा डबा माझ्यसमोर उघडला . मी खूष झालो. माझा त्याच्यावरच राग कुठल्या कुठे पळाला. लवकरच दरवाजा बंद करून आम्ही बँकेत जाण्यासाठी निघालो. पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली. जंगलाच्या रस्त्यावर आल्यावर मी मागे वळून वाड्याकडे पाहिलं. तो आता एखादा सरदार कसा प्रतिकारासाठी घट्ट उभा राहतो तसा दिसू लागला. जणू विरोधा हा त्याचा आत्मा होता. मी जास्त विचार न करता बँकेत पोहोचलो. माझा हा पहिला दिवस सुरू झाला. सगळी माहिती घेऊन कामाला सुरुवात झाली होती. बँकेतला बहुतेक स्टाफ बाहेरून आलेला होता. आणि त्यातले सगळेच जिल्ह्याच्या ठीकाणी स्थायिक झालेले होते. फक्त मी सोडून. अचानक लीनाचा फोन आला. मी तिला सगळं काही ठीक असल्याच सांगितल. तिच्या सूचना संपेनात , मग मीच कामात असल्याचे सांगून फोन बंद केला. तिला लवकरात लवकर यायचं होतं. मी तिला पुढील रविवारी घेऊन येण्याचे वचन दिल. मलाही ती यायला हवीच होती. घरातल्या सगळ्या गोष्टी पाहत बसण्याचा मला कंटाळा येत होता. हेड ऑफिसला पण मी सब कुछ ठीक असल्याच कळवल. सगळाच स्टाफ ठीक होता. त्यांना मराठी बॉस आल्याने आनंद झालेला दिसला. पण काम काढून घेण्यात मी शशीपेक्षा जास्त कडक होतो. असो. आज जेवणाचा प्रश्न आला नाही. जुडेकरने घरातून जेवण आणले होते. ते मी घेतले. तो जमेल तेवढी माझी सेवा करीत होता. मी हेड ऑफिसला गाडी बाबत विचारणा केली. ती लवकरच जिल्ह्याच्या ठिकाणची शाखा देईल असे मला कळवण्यात आले.
जिल्ह्याच्या ठिकाणी संपर्क साधल्यावर मला गाडी चार पाच दिवसात मिळेल असे सांगण्यात आले. परंतु ड्रायव्हरची पोस्ट माझ्या साठी नसल्याने , मलाच गाडी चालवावी लागेल किंबा मी लोकल ड्रायव्हर ठेवल्यास मला त्याचे पैसे मिळतील असेही सांगण्यात आले. आता संध्याकाळचे पाच केव्हा वाजले
मला कळलेच नाही. सगळा स्टाफही जाण्याच्या तयारीत असताना मोठा आवाज काढीत एक उंच धिप्पाड गृहस्थ बँकेत शिरले. त्यांनी आमच्या एका कौंटरवरील माणसाला विचारले. " कुठे आहेत मॅनेजर ? , आं ...... कुठे आहेत? " माझ्या केविनचा दरवाजा ढकलून ते परवानगी न घेता
आत शिरले. मला थोडा राग आला. पण तो गिळून मी त्यांना बसायची खूण केली. त्यावर चिडून ते म्हणाले, " बसायला नाही आलो मी, माझ्या
लोन ऍप्लिकेशनचं काय झालं ते सांगा आधी. मागचा तो मद्राशी गेला काय ? पैसे खाऊ लोक आहात तुम्ही सगळे, काय समजलात ? .........
ते आणखीनही काही बोलणार होते. तेवढ्यात मी बेल दाबून जुडेकरला त्यांच्यासाठी पाणी आणण्यास सांगितले. त्यांची बडबड चालूच होती. मी त्यांच्या लोनचे पेपर्स मागवले. लोन अगेन्स्ट स्टॉक , ची ती केस होती. अजून बँकेचा अहवाल बाकी होता. चार पाच महिने झाले होते.
मी स्वतः वर ताबा ठेवीत म्हंटले , " आम्ही हेड ऑफिसच्या अहवालाचीच वाट पाहत आहोत. " असे म्हणताच ते भडकून म्हणाले, " हे पाहा , तुम्हाला नसेल द्यायचं तर तुमच्याच बँकेच्या डिस्ट्रिक्ट शाखेतून घेईन. लक्षात ठेवा माझे हात वर पर्यंत पोहोचले आहेत. " काही कारण नसताना मला दिलेली धमकी अजिबात आवडली नाही. मी शक्यतोवर ताबा।ठेवून म्हणालो, " आय ऍम हेल्प्लेस, मि. शितोडीकर. मला अहवाल मिळाल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. आपण जाऊ शकता. " असे म्हंटल्याबरोबर ते चवताळून म्हणाले, " मला घालवताय तुम्ही पण लक्षात ठेवा तुम्हाला घालवल्याशिवाय मी राहणार नाही. असे म्हणून तो धिप्पाड माणूस केबिनचा दरवाजा उघडून तावातावाने निघून गेला. तो गेल्यावर आमचे आसि. मॅनेजर आत आले आणि म्हणाले, "सर तुम्ही योग्य उत्तर दिलेले आहे. एवढंच की हा माणूस वरून दडपण आणण्याची शक्य्ता आहे. " मी ठीक आहे म्हणालो आणि आम्ही हळूहळू सगळेच निघालो. जुडेकर आत आला माही बॅग घेत निघाला मी त्याच्या
मागोमाग निघालो. माझं डोकं त्या धिप्पाड माणसामुळे भणभणत होतं. मी आणि जुडेकर काहीच बोललो नाही. मात्र जाताना जुडेकर म्हणाला
" सर उद्या मी जिल्ह्याच्या गावी जाऊन तुमचं गॅस कनेक्शनच काम करीन. बहुतेक आठ्वडाभरात गॅस नक्की येईल. आणखी एक सर. मी आपल्याला रात्रीचा जेवणाचा डबा घेऊन येईन. माझी बायको करून देणार आहे. फार कशाला सर आपल्या मिसेसना यायला उशीर झाला तर आणि गॅस आला तर ती घरी येऊन जेवणही करून जाईल. " मला त्याच्या आदरातिथ्याचे आश्चर्य आणि कौतुक वाटलं. आपण करू का एखाद्यासाठी एवढं. असा विचारही माझ्या मनात आला. आम्ही निघालो. अर्ध्या तासात आम्ही वाड्यावर पोहोचलो. जाताना परत एकदा त्याने
माझ्या जेवणाचं आश्वासन दिलं. आज येताना दोन तीन थंडपेयांच्या बाटल्या घेतल्या होत्या.

( क्र म शः )

🎭 Series Post

View all