चिंगी

एक सुरवंट फुल पाखरात बदलण्याची सुंदर गोष्ट.

"चिंगे,ये चिंगे आग व्हय लवकर फूड,शेळ्या आन मेंढर गेली निगुन,आजी ओरडली."तशी चिंगी भानावर आली आणि पुढे चालू लागली.चिंगी वय वर्ष सहा.सखाराम शेळके तिचा बाप.मेंढपाळ होता तो.वर्षानुवर्षे मेंढ्या घेऊन फिरणे आणि त्यांचे पालनपोषण करणे हाच त्याचा व्यवसाय होता.चिंगी त्याची धाकटी लेक.

गेल्या वर्षी चिंगीची आई रानात मेंढ्या चारताना साप चावल्याने देवाघरी गेली.चिंगी बिचारी चार पाच वर्षांची लहानगी पोर तिला आईला काय झाले हेसुद्धा समजले नाही.तेव्हापासून चिंगी तिच्या आजी - आजोबा आणि भाऊ यांच्यपाठोपाठ मेंढ्या आणि शेळ्या राखायला जाऊ लागली. पालावर तिला पहायला आता कोणीच नसायचे ना.


लहानगी पाच वर्षांची चिंगी चालून दमून जायची."आजे,बस ना हित. पाय लई दुखत्यात."

आजी चिंगीच्या गालावरून हात फिरवायची,"लेकरा,बसून न्हाय चालायचं.मेंढर जात्याल ना फूड निघून."

चिंगी शहाण्यासाराखी चालू लागे.कधी तिला आजोबा पाठीवर घेत तर कधी भाऊ किंवा वडील.एकदा चिंगीला रानात चालताना पायात काटा घुसला,"आई ग!"चिंगी जोरात ओरडली.

तिचा बारा तेरा वर्षांचा भाऊ महादेव जवळच होता.तो पळत आला,"चिंगे काय झालं?काय दुखतयं का?"

तशी चिंगी रडत म्हणाली,"दाद्या, ह्ये बग पायातून रगात येतया."

चिंगिच्या वडिलांनी तिला उचलून सरकारी दवाखान्यात नेले.तिथल्या डॉक्टर बाईंना हात जोडत सखाराम म्हणाला,"ताई,आव जरा बगता का?पोर लई रडतीया."

डॉक्टरांनी चिंगिची जखम स्वच्छ केली.त्यांनतर चिमट्याने काटा बाहेर काढला.आता चिंगिला जरा बरे वाटले.ती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली,"आबा,ह्यांच्याकड तर जादू हाय र.तू मायला का नाय आणल ह्यांच्याकड?"सखाराम चिंगीला बाहेर घेऊन आला.



सखाराम गप्प झाला.त्याला प्रश्न पडला की ह्या पोरीला कसे समजावू जिथे साप चावला तिथे डॉक्टर नव्हते.सखाराम गप्प बसलेला पाहून चिंगी परत म्हणाली,"सांग ना तू मायला का नाय आणल हित?"


सखाराम आणि चिंगी यांचे बोलणे तिथे शाळेतील मुलांना घेऊन आलेल्या परदेशी बाई ऐकत होत्या.त्यांनी चिंगीला जवळ बोलावले.तिला पर्समध्ये असलेले चॉकलेट देत तिला म्हणाल्या,"बाळा,हे जादुगार खूप कमी आहेत आपल्याकडे.बघ तू अशी जादुगार बनलीस तर किती छान होईल!"

चिंगीचे डोळे आनंदाने चमकले,"खर सांगताय?म्याबी आस व्हईल?"

बाई हसल्या,"चिंगे,त्या डॉक्टर,मी आम्ही सगळ्या अशाच लहान मुली होतो.आता बघ मोठ्या झालो."

बाई तिला समजावत होत्या.तेवढ्यात सखाराम औषध घेईल आला आणि चिंगी निघून गेली.जाताना मात्र चिंगी सारखे. बाईंकडे पहात होती.त्यानंतर चिंगीने दादाला विचारले,"दादा,ही डाक्टर कस व्हत्यात र?"


तो दहा बारा वर्षाचा पोरगा काय सांगणार?तरी त्याच्या परीने तो म्हणाला,"चिंगे,त्याकरता साळत जावं लागत. आपुण कस जाणार ग?"


चिंगी त्याचा प्रश्न ऐकून गप्प राहिली.तेव्हापासून येता जाता चिंगी शाळेबाहेर उभी राहून शाळेकडे पहात राही.तिच्याभोवती असलेली चौकट मोडून तिला पलीकडे जायचे होते.


चिंगी आजीच्या हाका ऐकून भानावर आली.आजी म्हणाली,"आग चल लवकर, समद घेतल दुकानातून."

तेवढ्यात परदेशी बाई शाळेला येत होत्या.त्यांनी चिंगीला हाक मारली. तिच्या आजीला बाई म्हणाल्या,"चिंगी किती वर्षांची झाली आता?"

आजी काहीतरी आठवत म्हणाली,"सा वर्षाची व्हईल बगा आता."

बाई हसत म्हणाल्या,"मग तिला शाळेत टाका."

आजी म्हणाली,"बाई,आव आमचं जिन हे आस.आमच्यात पोरगी बारा तेरा वर्षाची झाली, शानी झाली की लगीन लावत्यात."

बाईंना शाळेत जायचे होते.बाई आजीला म्हणाल्या,"आजी आज शनिवार आहे.उद्या मी तुम्हाला भेटते."


आजी घरी जाताना विचार करत होती बाईंना काय बोलायचे असेल याचा.चिंगी हा प्रसंग विसरून गेली.दुसऱ्या दिवशी परदेशी बाई चिंगी आणि तिच्या आजीला भेटायला आल्या.चिंगी खेळत होती.बाईंना पाहून आजीला हाक मारली.आजीने पटकन बाईंना बसायला एक जुने पोते अंथरले.

बाई हसत बसल्या.आजी अगदी संकोचून गेली होती.परदेशी बाई हसत म्हणाल्या,"आजी,मी तुमच्या लेकीच्या वयाची आहे."

आजी म्हणाली,"बाई, आमच्याकुन काय चुकी झाली का?आस कुणी येत न्हाय व भेटाय.म्या सांगन चिंगीला साळ फूड हुबी राहत जाऊ नग."

बाईंनी आजीचा हात हातात घेतला,"आजी,उलट मी हे सांगायला आलेय की चिंगी शाळेत आली तर मला खूप आवडेल."


आजी हसली,"आव साळा कशी शिकणार आमी.आज हित तर उद्या तिथं."

तेवढ्यात सखाराम आला.बाईंनी त्यालासुद्धा समजावले,"दादा आता जग बदलत आहे.विचार करा.चिंगी आणि तिच्या भावाला शिकू द्या."

सखाराम म्हणाला,"पण बाई,आमी आठ महिन बाहेर आसतोय."

बाई त्याला म्हणाल्या,"चिंगीची आई दवाखाना नाही म्हणून जग सोडून गेली.आता पोरीला तरी चांगले आयुष्य जगू द्या."


बाई समजावून निघून गेल्या.सखाराम विचारत पडला. वर्षानुवर्ष आखलेली चौकट एकीकडे त्याला अडवत होती आणि दुसरीकडे पोरांचे भविष्य खुणावत होते.


सखाराम,त्याची आई आणि वडील तिघांनी मिळून विचार केला.चिंगीची आजी म्हणाली,"बाई म्हणत्यात ते मला बी पटत बघ."

सखाराम म्हणाला,"व्हय,आक्की पण म्हणायची मला साळत जाऊ द्या.लगीन लावून दिलं तीच.आन काय झालं?"

आजी म्हणाली,"आर पण सखा,तीच लगीन व्हईल का अशान?"

आजोबा म्हणाले,"आपूण आस फिरते,कशी व्हईल शाळा?"


तरीही सखारामचा निर्णय झाला होता.दुसऱ्या दिवशी सखाराम चिंगी आणि तिच्या दादाला घेऊन शाळेत गेला.शाळेच्या गेटजवळ तो जरा घुटमळत उभा होता.त्याला पाहताच परदेशी बाईंचे डोळे आनंदाने चमकले.त्यांनी सखाराम आणि मुलांना बोलावले.चिंगी आणि तिच्या दादाला शाळेत टाकून सखाराम घरी आला.


दिवस वाऱ्याच्या वेगाने जात होते.सखारामची दोन्ही पोरे हुशार होती.परदेशी बाईंनी प्रेमाने शिकवले त्यामुळे शाळेची गोडी लागली.मोठा दादा बारावी झाल्यावर शिक्षक झाला.चिंगी मात्र अजूनही वेगळे ध्येय ठेवून होती.


ह्या वर्षीच्या वैद्यकीय पदवीचे सुवर्णपदक विजेत्या आहेत प्रगती सखाराम शेळके.माईक वर घोषणा झाली आणि चिंगी उर्फ प्रगती भानावर आली.\"प्रगती\" तिच्या लाडक्या परदेशी बाईंनी दिलेले नाव आज सार्थ झाले होते.


चिंगी आज डॉक्टर झाली होती.तिच्या परदेशी बाईंनी दाखवलेली शिक्षणाची वाट आज तिला इथे घेऊन आली होती.सुवर्णपदक घेऊन ती खाली उतरली.आजी म्हणाली,"चिंगे,लई मोठी झालीस पोरी."

दादा म्हणाला,"आजी,आता ती डॉक्टर झालीय.इथे तरी चिंगी म्हणू नको तिला."

चिंगी हसली,"दादा,कितीही मोठी झाले तरी आजी आणि तुमच्यासाठी मी चिंगीच आहे."


इतक्यात चिंगी आपले सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र घेऊन एका व्यक्तीकडे चालू लागली.शेंबूड पुसत,रडत,आशाळभूत नजरेने शाळेच्या गेट बाहेर उभ्या असलेल्या चिंगीचे बोट धरून तिला इथपर्यंत घेऊन येणाऱ्या परदेशी बाईंकडे चिंगी उर्फ प्रगती चालत येत होती.



समोरून चालत येणाऱ्या आत्मविश्वासपूर्ण डॉक्टरी पदवी घेतलेल्या चिंगीकडे बाई पहातच राहिल्या.एक सुरवंट फुलपाखरात बदलले होते.

चिंगीने आपले सुवर्णपदक काढून बाईंच्या गळ्यात घातले,"बाई आज माझ्या हातात ती जादू आहे ज्यामुळे मी माझ्या आईसारख्या अनेकांना वाचवू शकेल.आता कोणी चिंगी अनाथ होणार नाही."


परदेशी बाईंनी आपल्या शिष्येला मायेने जवळ घेतले.तिला परत एकदा कौतुकाने पहात बाई म्हणाल्या,"आज तू अनेक चौकटी मोडल्यास पोरी.


अशिक्षितपणा,बालविवाह,अंधश्रध्दा,अशा अनेक चौकटी मोडून एक नवी चौकट निर्माण केलीस.तुझ्यासारख्या अनेक मुलींना तू नवी वाट दाखवली."

बाई बोलायचे थांबल्या.चिंगीने बाईंचे हात हातात घेतले,"बाई,एक अनाथ गरीब पोर जी शिक्षणाच्या चौकटीबाहेर होती.तिला तुम्ही हाताला धरून इथवर आणलेत."


आज महाविद्यालयाच्या चौकटीतून डॉक्टर प्रगती बाहेर पडत होती.तिच्या बाजूला होता ह्या चौकटी मोडायला मदत करणारा तिचा बाप,तिला जीवापाड सांभाळणारे आजी,आजोबा आणि दादा.ह्या सगळ्यांकडे परदेशी बाई कौतुकाने पहात होत्या.आज ही चौकट ओलांडून एक संवेदनशील आणि हुशार डॉक्टर बाहेर पडत होती.


आजही अशा अनेक चिंगी उभ्या आहेत चौकटी बाहेर आणि त्यांना ह्या चौकटी ओलांडायला मदत करणाऱ्या परदेशी बाईंसारखे देवदूत सुद्धा आपले काम करत आहेत आजही त्याच निष्ठेने.