चिंब तू.. चिंब मी! भाग -३

मुसळधार पावसातील ओलीचिंब कथा!
चिंब तू.. चिंब मी!
भाग -तीन.
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

'वेडा होतो तेव्हा. मनही वेडे होते. आता मात्र मनाचे एकट्याचे नाही तर दिल और दिमाग दोघांचे मिळून ऐकायचे.' निशीकडे एक कटाक्ष टाकून तो स्वतःलाच म्हणाला.

*****

"आलात दोघं? कुठे गेला होतात?" दारात पाय टाकल्याबरोबर पुष्पाताईंनी म्हणजे ऋषीच्या आईने विचारले.

"आई अगं.. आँछीऽऽ. आँऽऽछीऽऽ" काही सांगणार तोच ऋषीला शिंका यायला लागल्या.

"अगंबाई, शिंकतोस काय? पावसात वगैरे नाही ना भिजलास? काय गं निशी स्वतःबरोबर त्यालाही भिजवलेस की काय? नाहीतर आमचा हा ऋषी म्हणजे अगदीच ध्यान आहे बरं. पाऊस म्हटलं की अंगावर पांघरून घेऊन झोपा काढण्यात तेवढा उस्ताद. बरं झालं त्याला घेऊन गेलीस ते. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला नि वाण नाही पण गुण लागला म्हणायचा." पुष्पाताई नॉनस्टॉप बोलत होत्या.

"अगं अगं आई! किती गं बोलशील? आँऽऽछीऽ!" शिंकत शिंकत ऋषी.

"बोलू दे रे! नि टिपिकल सासूसारखे नाही बोलतेय. कौतुक करतेय माझ्या सुनेचे. बघ, निशी कशी लाजतेय ते बघ. लग्न मानवलं हो तुम्हा दोघांना. असेच एकत्र रहा. आनंदी रहा." पुष्पाताईंच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता होती.

"आई, काहीही हं!" निशी लाजण्याचा अभिनय करून आत गेली.

"आई, काहीही काय बोलतेस गं?"ऋषीच्या चेहऱ्यावर एक त्रागा होता.

"अरे- अरे! काय मुलगा आहेस तू? एकच वाक्य पण बोलण्याची पद्धत बघ किती वेगळी आहे. ती बापडी 'आई, काहीही हं.'म्हणून लाजली आणि तू 'आई काहीही काय बोलतेस' म्हणून चिडतोस काय? शिक रे जरा तिच्याकडून. कसली गोड सून मिळालीय मला."
ऋषीने कपाळावर हात मारून घेतला.

"हरे! हरे! लेक एवढा भिजून आलाय नि पुष्पे तू कसली गं सुनेचे कौतुक करण्यात गुंतली आहेस? जा त्याला चांगला अद्रक घातलेला चहा करून दे.
ये रे बाळा, तुझे केस कोरडे करून देते."
आजी टॉवेल घेऊन येत म्हणाली.

"स्वतः कधी आपल्या सुनेचे कौतुक केले नाही नि मी माझ्या सुनेचे करतेय तर तेही बघवत नाही." हिरमुसून पुष्पा स्वयंपाकघरात गेली.

"अगं आजी, माझे मी करेन ना केस कोरडे." तो.

"ऋषी, असा पावसात भिजून केस ओले होऊन आलेला तू किती दिवसांनी या म्हातारीच्या डोळ्याला दिसलास रे. शाळेत होतास तेव्हा कधी चुकून ओला झाला असशील तर तेव्हा डोके पुसून दिले असेल. तेव्हाचा आता चान्स मिळतोय तर करू दे ना." 
त्याला खाली बसवत आजी म्हणाली.

"आजी, तू पण ना." तो निमूटपणे खाली बसला.

"का रे? आता म्हातारीकडून केस पुसावेसे वाटत नाही होय? हां, आता काय बायकोकडून पुसायचे असतील." त्याला चिडवत आजी.

"तसं नाही गं?" तो कल्पनेनेच शहारला.डोळ्यासमोर निशी त्याचे केस पुसतेय असे चित्र तयार झाले होते.

"मग कसं? चांगली आहे रे निशी. आणि ते तुम्ही रोमान्स- बिमान्स का काय म्हणता, त्याचे हेच तर दिवस असतात. तिच्या सोबत भिजलास तर फार बरं वाटलं आम्हाला." आजीच्या बोलण्यावर ऋषी नुसता हसला.

"आणि त्या धोत्रे वकीलाकडे कशाला रे गेला होतास?" आजीच्या अचानक विचारलेल्या प्रश्नाने ऋषीने चमकून तिच्याकडे पाहिले.

"असा का बघतोस? मांजर डोळे मिटून दूध पीत असली तरी इतरांना कळते बरं. त्यांचे डोळे मिटलेले नसतात." आजी.

"पण तुला कसं गं कळलं?" ऋषी.

"ज्या वकिलाकडं गेला होतास ना, तो तुझ्या बाबाचा लंगोटीयार होता. फाटक्या चड्ड्या घालून आपल्या घरी यायचा तेव्हापासून ओळखते मी त्याला. त्याने तुझे पूर्ण नाव वाचले नि मन्याचा मोबाईल बंद होता म्हणून पहिले घरी फोन केला."

आजीचे ऐकून ऋषीने डोक्यावर हात मारून घेतला. कुठून हा वकील पदरी पडला असे त्याला वाटले.

"काळजी करू नकोस. मी पुष्पीला यातलं काहीच बोलले नाहीये आणि मन्याला फोन करून सांगू नकोस म्हणून त्या धोत्रेलाही बजावलंय. आधी तुझ्याकडून खात्री करून घ्यायची होती."

"थँक यू आजी." डोक्यावरचा आजीचा हात हातात घेत तो म्हणाला.

"ऋषी, तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे ते मला ठाऊक नाही पण निशी तशी चांगली मुलगी आहे रे. त्या शिल्पीच्या नादात हिला गमावून बसू नकोस म्हणजे झालं." त्याच्या डोक्याची मसाज करत आजी.

"कोण कोणाला गमावतोय?" चहा घेऊन बाहेर येत पुष्पाताईंनी विचारले.

"काही नाही गं. आमच्या दोघातले आहे हे. दे त्याला चहा नि तू देखील पी. मी निशीला नेऊन देते." असे म्हणत आजी उठली.

"सुनेला नाही हो कधी हातात चहा दिला. नातसुनेचे मात्र भारी कौतुक." पुष्पाताईंनी नाक मुरडले.

"तुझ्यापेक्षा ती जास्त गोड आहे ना म्हणून." आजी निशीच्या खोलीत जात म्हणाली.

"काय गं आई? तुम्ही दोघी सारख्या भांडत का असता?"

"भांडण कसलं रे? आमचं प्रेम आहे ते. दिवसभर तुम्ही कुणी घरी नसता मग आम्हाला कंटाळा येतो. मग टीव्ही बघून तिथल्या सासूसुनेसारखं वागायचा प्रयत्न करतो. तितकंच आमचं मनोरंजन." पुष्पाताईच्या हसण्यात त्यांच्या सुखी संसाराचे चित्र त्याला दिसत होते.

"तुला माहितीये ऋषी, नातं कुठलेही असो, थोडासा प्रेमाचा शिडकावा केला ना तर आपोआपच त्या नात्याची चव वाढते. आता साधे मक्याचे कणीस घे. आपण ते भाजून असेही खाऊ शकतोच की. पण त्यावर तिखट, मीठ शिंपडले आणि थोडासा लिंबू चोळला तर तेच कणीस कसे आंबट, तिखट गोड, मस्त लागते. तसेच नातेही आसावे. कधी आंबट तिखट तर कधी थोडेसे कडूसर! तेव्हाच त्या नात्याची रंगत वाढते बरं."
चहाचा घोट घेऊन त्या म्हणाल्या.

"आई! कसलं भारी बोलतेस गं. असं वाटतं नुसतं ऐकतच राहावे." आईच्या तोंडून कणीस ऐकले आणि मघाशी खालेल्या कणीसाची चव त्याच्या जिभेवर रेंगाळली.

"नुसते ऐकू नकोस गधड्या. तसे वागायला सुद्धा लाग. माझ्या सुनेला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे बरं. नवराबायकोचे नाते फार नाजूक असते अरे. त्या नात्यातला गोडवा जप. कधी वाटलं नातं तिखट होतेय तर त्यात जरासा आंबटपणा आण आणि कधी त्या नात्यात कडवटपणा येतोय असे जाणवले तर प्रेमाची साखरपेरणी कर. नात्याला आणखी घट्ट बनवण्याचा प्रयत्न कर."

आईचे ऐकून तो नुसता हसला. केविलवाणा! 'आमचे नाते तर आता शेवटच्या टप्प्यावर पोहचले आहे. पुढच्या दहा पंधरा दिवसात त्याची वीण कायमची तुटेल. मग कसलं काय नि कसलं काय?'

"तुला वाटत असेल ही आई आत्ता का प्रवचन देतेय. पण काय करू रे? तुझे लग्न झाले तेव्हापासून सहा महिने मीच बेडवर होते. आत्ता कुठे सावरायला लागलेय. मग आत्ताच सांगणार ना? बरं, जा तुझ्या रूममध्ये. बघ जरा, नाहीतर तुझी आजी माझ्या सुनेला माझ्याविरुद्ध भडकावत असेल."

"आई? तू पण ना." तो हसत उठला.

"गंमत रे! त्या आपल्या सासूसुनेच्या मालिकांचा प्रभाव. तशी माझी सून फार गोड आहे बरं आणि माझी सासू म्हणजे मुरलेलं लोणचं. जेवढंत्यांचे वय वाढतेय ना तेवढीच नात्यातील आंबटगोड चव देखील वाढतेय." पुष्पाताईचे सासूचे कौतुकपुराण काही संपत नव्हते.
*******

आजी स्वतः चहा घेऊन आलेल्या बघून निशी जराशी ओशाळली.

"आजी, तुम्ही का आलात? मी बाहेर आलेच असते ना." ती.

"अगं नशीबवान आहेस तू. सासू तुझ्यासाठी चहा बनवते काय? आजेसासू आणून देते काय?" आजी हसली.
"गंमत केली गं बाय. नाहीतर मनावर घेशील."

"नाही हो आजी." तीही हसली. तिच्या डोळ्यातील ओल आजीच्या नजरेतून सुटला नाही.

"निशी, तुमचं सगळं ठीक चाललंय ना बाळा? म्हणजे प्रत्येक नात्यात चढउतार येतातच हो, पण कशाला महत्त्व दिले पाहिजे हे आपल्याला कळायला हवं बरं."

"आजी.. "

"ऋषी चांगला मुलगा आहे गं. पण तू त्याच्यासोबत खूष तर आहेस ना?"

"हो.. खूप खूष आहे मी." चेहऱ्यावरची वेदना लपवत निशी म्हणाली.

"मग हे त्यालाही कळू दे. कधीतरी सांगावं गं आपल्या पार्टनरला, की मी खूष आहे तुझ्यासोबत. नात्यात घट्टपणा येतो त्याने. पण त्याआधी स्वतःलाच विचारावं 'मी खरंच खूष आहे ना?' म्हणून. स्वतःलाच फसवत जगू नये माणसानं. आणि स्वतःशी कधी खोटंही बोलू नये." बाहेर जाता जाता आजी म्हणाली.
"आणि ऋषी बदलतोय गं. कधी नव्हे ते आज पावसात भिजलाय."त्यांच्या मोहक हास्याने तिच्या ओठावरही हसू उमटले.

'खरंच मी खूष आहे का?' आजी गेल्यावर निशीने स्वतःला प्रश्न केला. तिच्या मनाने काय उत्तर दिले ते माहीत नाही पण तिचे ओठ पुन्हा रुंदावले खरे.

ऋषीच्या वागण्यात होणारा बदल आज तिने टिपला होता. कारमधून उतरताना त्याने स्वतःहून समोर केलेला हात, त्याचे ते रस्त्यावरचे कणीस खाणे, पावसातील भिजणे, तिच्याकडे टाकलेला त्याचा चोरटा कटाक्ष..! हे सारेच नवीन होते तिला. हा त्याच्यातील बदल होता की घटस्फोटाची याचिका दाखल झाल्याच्या आनंदात त्याने केलेली कृती? तिलाही उमजत नव्हते.
:
क्रमश :
********
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.
प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव.*
फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all