चिंब तू.. चिंब मी! भाग -९

ऋषीचे प्रपोजल निशी स्वीकारेल का? वाचा आजच्या भागात.
चिंब तू.. चिंब मी!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
भाग - नऊ.


"म्हणजे निशी, माझ्याशी लग्न करशील का? हे डिवोर्स वगैरे विसरून जा. आपण परत लग्न करू. मी तुला आनंदात ठेवेन. तुझ्यासोबत पावसात भिजेन, थंडीत बर्फात उभा राहीन. म्हणशील तर उन्हाळ्यात उन्हातही उभा राहीन. तू फक्त हो म्हण."
भर पावसात तो गुडघ्यावर बसून होता. हातामध्ये एक नाजूकशी डायमंड रिंग!

"अरे, नको रे!" तिच्या तोंडून बाहेर पडले.

"का? आपण जर खरेखुरे नवराबायकोसारखे राहिलो तर तुला चालणार नाही का?" तो अजूनही गुडघ्यावर बसून होता.

"तसे नाही म्हणायचेय मला. पाऊस, थंडी, ऊन याबद्दल जे बोलतो आहेस त्याबद्दल म्हणतेय मी." ती.

"मग मी जे विचारले त्याबद्दल काय मत आहे ते सुद्धा सांग ना. तुला माझ्याशी लग्न केले तर चालणार का?" ऋषीने त्याचा प्रश्न रेटून धरला.

"आणि तुझी शिल्पी तुझ्याकडे परत आली तर..?" तिचे दुसरेच सुरू.

"आता तिने स्वतःहून मला मागणी घातली ना तरी ती नको आहे. तुला तो तुझा आदी हवाय का ते सांग." जरासा चिडला तो.

"छे रे! त्याच्यासारख्या मुलाचे तर मी आयुष्यात कधी तोंडदेखील पाहणार नाही." तिचे उत्तर.

"आणि मी? माझे काय? मला असे किती वेळ पाण्यात बसवून ठेवणार आहेस?" तो.

"ऊठ ना मग. मी कुठे बसायला सांगितले आहे." ती मिश्किल हसत म्हणाली.

"असे नाही. तुझे उत्तर ऐकल्याशिवाय मी उठणार नाही. एकतर हो म्हण किंवा नाही म्हण, पण तुझे उत्तर सांग." तोही इरेला पेटला होता.

खरे तर त्याच्या प्रपोजलने ती भारावून गेली होती. त्याच्या डोळ्यात तिच्याविषयी दिसणारे खरे प्रेम तिने आजवर कोण्याच्याही नजरेत पाहिले नव्हते.

"ऋषी, नाही रे. मी तुझ्याशी लग्न नाही करणार.." ती पिटुकला चेहरा करून बोलत होती.
तिचे अर्धवट बोलणे ऐकून ऋषीचा चेहरा उतरला. तिच्यासमोर धरलेली अंगठी खिन्न चेहऱ्याने डब्बीत ठेवत तो उठला.

"मी तुझ्याशी लग्न नाही करणार असे म्हणणारी मुलगी खरंच मूर्ख असेल." ती पुढे बोलायला लागली. "पण मी तर शहाणी आहे ना, मग मी असे कसे म्हणू? उलट तुझ्यासोबत माझे उरलेले आयुष्य घालवायला मला नक्कीच आवडेल. तुझ्यासारखा प्रेमवेडा मला शोधूनही कुठेच सापडणार नाही." ती त्याच्याजवळ जात अगदी हळुवार बोलत होती.

"म्हणजे निशी.. तुझा होकार आहे?" त्याच्या कानावर अजूनही विश्वास बसत नव्हता.

"हूं." तिने त्याच्या डोळ्यात बघत मान हलवली.

"निशी, थँक यू, थँक यू सो मच!" तिला मिठीत घ्यायला त्याचे हात सरसावले पण त्याने त्याच्यावर आवर घालून हात मागे घेतले.

त्याच्या या गुणावरदेखील तर ती भाळली होती. इतके दिवस एकत्र असून सुद्धा त्याने तिला कधी तसला स्पर्श केला नव्हता.

"मे आय?" त्याने पुन्हा हात पुढे केले.

त्याच्या मिठीत ती नकळत शिरली आणि पावसाचा वर्षाव पुन्हा सुरू झाला.

'मुसळधार पावसात 
चिंब तू.. चिंब मी
एकमेकांच्या प्रेमात
वेडा तू.. वेडी मी!'
तिच्या ओठावर चारोळी येऊन विसावली.

"निशी, मी खूप खूप खूष आहे." तिला मिठीत घेत म्हणाला.

"मी सुद्धा!" ती.

"तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही गं."

"मी सुद्धा." ती.

"आय लव्ह यू निशी, टिल द एन्ड ऑफ लाईफ!"

" मी सुद्धा!"
ती तशीच हळुवारपणे म्हणाली.

"या शब्दांशिवाय तुला दुसरं काहीच येत नाही का गं?" तो ही तसाच हळुवारपणे तिच्या कानात कुजबुजला.

त्याच्या तशा अलवार बोलण्याने शहारली ती.
"ऋषी.. तुझ्यामुळे 
शब्दही झाले मुके
अन ह्या प्रेमापुढे 
हे जग ही भासे फिके..!"
हलकेच बोलत ती त्याच्या मिठीतून बाहेर आली.

तो प्रेमभरल्या नजरेने तिच्याकडेच बघत होता.

"घरी जाऊया?" निशीने त्याची नजर चोरत विचारले.

त्यानेही फक्त मान डोलावली. भावनावेगाने दोघे एकमेकांच्या मिठीत तर विसावले होते. आता मात्र दोघेही एकमेकांशी नजर चोरत होते.

"घरी पोहचेपर्यंत दोघे एकमेकांशी अवाक्षरही बोलले नाही. ऋषीचे हृदय अजूनही जोरात धडकत होते. आजच्याइतकी सुंदर भावना त्याने आजवर अनुभवली नव्हती. शिल्पी त्याच्या आयुष्यात होती तेव्हाही नाही.

आणि निशी..? ती तर स्वतःची अशी उरलीच नव्हती. ऋषीची ती भारदस्त मिठी तिला हवीहवीशी वाटली होती. जणू मखमली मोरपीस अंगभर फिरतेय असेच काहीसे झाले होते.

****** 
"ऋषी, दोघेही किती भिजला आहात? आता अख्खा पावसाळा असेच भिजत राहणार आहात का? काय गं निशी?" आजीने दोघांनाही दारात गाठले.

"भिजू द्या हो. लहान आहेत पोरं. आता नाहीतर मग काय तुमच्या वयाची झाल्यावर भिजणार का? जा रे पोरांनो चेंज करून घ्या. मी गरमागरम भजी करते." पुष्पा दोघांकडे बघत म्हणाली. दोघांचे चेहरे काहीसे वेगळे भासत होते.

"काय गं निशी? काही घडलेय का?" निशीकडे बघत त्यांनी विचारले. ती लाजून आत पळाली.

"आता हिला काय झाले? काय रे ऋषी?"तिने त्याच्याकडे मोर्चा वळवला.

"आई, तू पण ना."
निशीच्या मागे तोही आत गेला.

"पण मी काय केलं?" पुष्पाच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या.

"तू काहीच केलं नाहीस. आता भजी कर." आजीने फर्मान सोडले तशी पुष्पा आत गेली. मनात अजूनही गोंधळ होता.

*******
"आँऽऽछीऽऽ"
तासाभराने ऋषीच्या शिंका सुरू झाल्या. रात्री जेवणाच्या टेबलवरही त्याचे तेचसुरू होते.

"पाऊस आज जास्तच अंगात भिनलेला दिसतोय." मनोहर म्हणालेच. त्यावर तो गप्प बसला.निशीही शांतच होती.
सायंकाळचा पाऊस दोघांच्या मनातून अजून कुठे गेला होता.


झोपायच्या वेळी बेड आवरत असताना दारावर टकटक झाली. आजी आणि आई दोघीही आल्या होत्या.

"निशी हे हळदीचे दूध आणलेय. दोघेही प्या आणि हा काढा, तो तेवढा ऋषीला दे."
तिच्याकडे ट्रे देत पुष्पा म्हणाली.

"हो, पाऊस बाधतो हं ऋषीला. म्हणून तो कधी जास्त भिजत नाही." आजी.

"आज्जी, आता मी आहे ना? मी घेईन काळजी. तुम्ही नका टेंशन घेऊ." निशी त्यांना सांगत होती.

"तू आहेसच गं. पण आईचं काळीज. ते थोडीच मला स्वस्थ बसू देईल? ही वाफाऱ्याची मशीन आणि ही विक्सची डबी. हे सुद्धा जवळ ठेव. रात्री आवश्यकता पडेल. येतो आता आम्ही निघतो. झोपा तुम्ही.
ऋषी झोप रे बाळा. निशीला त्रास नको देऊ." ऋषीकडे बघून पुष्पा म्हणाली आणि त्या दोघी निघून गेल्या.


"आता लहान आहे का मी? का सतत दोघी डोज देत असतात. आँऽऽछी!" नाक पुसत तो.

मंद हसत तिने त्याच्यापुढे दुधाचा ग्लास ठेवला.

"हे काय? दूध आवडत नाही मला. हवा तर पूर्ण काढा मीच पितो."

"काढा तुलाच प्यायचा आहे कारण तुला सर्दी झाली आहे. त्यापूर्वी हे दूध पी." ती.

"निशी, काय यार तू पण आई आणि आजीसारखी वागायला लागलीस?" तो.

"आता होणारी बायको मी आहे तुझी. एवढं तर ऐकावेच लागेल ना." त्याच्याजवळ बसत ती म्हणाली.
तिच्या त्या उत्तराने त्याने नाक दाबून का होईना एका झटक्यात ग्लास रिकामा केला.

"खूष?" तिच्याकडे ग्लास देत तो म्हणाला.

" हम्म! डोक्याला विक्स लाऊन देऊ का?"

"बापरे! निशी, खूप काळजी घ्यायला लागलीस गं." तो हसला.

"आजीला शब्द दिलाय म्हणून विचारलेय."

गोरीमोरी होत ती. "झोप आता." ती सोफ्याकडे जायला निघाली तसा त्याने तिचा हात घट्ट पकडला.

"निशी, तू कायम माझ्यासोबत राहशील ना गं?" त्याच्या स्पर्शाने ती शहारली आणि प्रश्नाने गालावर लाली आली.

"ऋषी, मघाशी जे बोलले ते अगदी खरे होते. आता आयुष्य तुझ्यासोबतच घालवायचे आहे. आणि हे काय? तुझं अंग किती गरम झालेय? थांब तुला गोळी देते." म्हणून तिने त्याला तापाची गोळी दिली.

तो झोपेपर्यंत ती त्याच्याजवळ बसून होती. रात्री काही गरज लागेल म्हणून तिने सोफा ओढून बेडला लावला. रात्री उशिराने ती झोपी गेली.

सकाळी सकाळी पुष्पाने आवाज दिला तेव्हा घाईत निशीने दरवाजा उघडला. आज जरा उठायला उशीर झाला होता. त्यात सोफा जागेवर सरकवायचा राहून गेला.

सोफ्याची बदललेली दिशा आणि त्यावरची विस्कटलेली चादर पुष्पाला बरेच काही सांगून गेली.

******

"अगं पुष्पे, नेमके काय झाले ते सांगणार आहेस की अशी डोळ्याला पदर लाऊन बसणार आहेस?"
आजीच्या प्रश्नाने पुष्पाला आणखी भरून आले.

"आई, ते धोत्रे वकिलांनी म्हटले ते शंभर टक्के खरे आहे. आपल्या ऋषी आणि नि 
निशीचा संसार संपणार हो."

"अगं ये बाई, काय झाले ते तरी नीट सांगशील का?" आजी.

"आई, कसं सांगू? ऋषी आणि निशी वेगळे झोपतात. म्हणजे त्यांच्यात काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाहीये."

स्वयंपाकघरात पाऊल टाकण्यापूर्वी दारातच निशीच्या कानावर दोघींचा संवाद पडला आणि ती तिथून लगेच सटकली.

"अगं, त्याला सर्दी झाली म्हणून दोघे वेगळी झोपले असतील. तुझ्या ना डोक्यात काहीबाही येत असते." आजीच्या उत्तराने पुष्पाच्या डोक्यातील संशय शमला पण आजीच्या मनात मात्र संशयाची पाल चुकचूकायला लागली.

'उद्या धोत्र्याला घरी बोलावून खरं खोटं काय ते वदवून घ्यायलाच पाहिजे l.' आजीने मनातल्या मनात निर्णय घेऊन टाकला.

काय होईल पुढे? वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.
प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव.*
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all