Mar 03, 2024
स्पर्धा

चिंब तू.. चिंब मी! भाग -८

Read Later
चिंब तू.. चिंब मी! भाग -८
चिंब तू.. चिंब मी!
भाग -आठ.
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


आपल्या मनातले त्याला आज सांगायचे होते. त्यासाठी काहीतरी खास गिफ्ट करावे असे डोक्यात आले आणि म्हणून तिचा आवडता रंग जाणून घ्यायला तो धावतपळत घरी आला होता. तर इथे असा घोळ होऊन बसला. आता काय करायचे या विचारात असताना त्याला एक कल्पना सुचली.
********
बरोबर चारच्या ठोक्याला निशी कॉफीशॉप मध्ये पोहचली. आपला हिरो ऋषी तिथे तिच्याआधीच येऊन हजर होता. दुरूनच तिला तो दिसला. तिला तो सकाळपेक्षा जरा वेगळा भासत होता. सकाळी घातलेला शर्ट त्याने बदलला होता. त्याच्या गोऱ्या अंगावर आत्ता घातलेला निळ्या रंगाचा शर्ट उठून दिसत होता. त्याची नजर तिच्यावरच खिळली होती.
त्याचे ते टक लाऊन बघणे.. तिला ती पुन्हा त्याच्या प्रेमात पडतेय की काय असे वाटत होते.

'पुन्हा प्रेमात पडतेय म्हणजे काय? त्याच्या प्रेमात पडल्याची जाणीव तर कालच झाली होती. आता पुन्हा काय नवीन? आणि हा असा काय पाहतोय? डिवोर्सचे पेपर घेऊनच आला असेल का?' 
छोट्याशा डोक्यात किती ते प्रश्न!

"हाय!" तो हसला.

"सॉरी, मला लेट झालं का?" ती.

"नाही गं. मीच आधी येऊन बसलो." त्याच्या ओठावर स्मित होते.

"छान दिसतोस. आज एकदम पावसाळी रंग? क्या बात हैं!" खरे तर तिला त्याचा मोबाईल बंद का होता हे विचारायचे होते. पण तो इतका हँडसम दिसत होता की ती मघाचे सर्व प्रश्न विसरली.

"तुला आवडलं? थँक यू!" तो.

"हम्म! डार्क कलर आवडतात मला."तिचे ओठ रुंदावले.

"आणि असे अचानक का बोलावलेस? पेपर्स रेडी झालेत का?" कॉफीचा घोट घेताना तिने विचारले तसा त्याच्या ओठातील घोट बाहेर येतायेता वाचला.

"का? त्याशिवाय आपण असे सोबत कॉफी पिऊ शकत नाही का?"

"नाहीरे! तसे नव्हते म्हणायचे." ती गोड हसली.

'अरेच्चा! हसताना गालावर छोटूशी खळी देखील पडतेय तर? इतक्या दिवसात आज मला दिसली.' त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिले.

ऑफिसमधून परस्पर आली तरी फ्रेश दिसत होती. तिच्या अंगावरची फिकट निळ्या रंगाची साडी अन त्यावर तिचे कानातले मॅचिंग छोटुसे स्टड.
'शिल्पीसारखी नटणे बिटणे फारसे आवडत नाही हिला पण कपड्यांचा सेन्स बऱ्यापैकी आहे.' तो मनात विचार करत होता.

"निघायचं?" कॉफी संपली तशी तिने विचारले.

"हो निघूया ना." बील देऊन दोघे बाहेर पडले.

त्याने आपली बाईक स्टार्ट केली आणि तिला बसायचा इशारा केला.

"तू कार नाही आणलीस?" तिचा प्रश्न.

"नाही."

"का?" ती.

"आता एकावेळेस एकच वाहन चालवणार ना." तो मिश्किल हसला. "बस आता."

ती अवघडल्यासारखी त्याच्यामागे बसली. अशी बाईकवर पहिल्यांदाच त्याच्यासोबत ती जात होती.
त्याने थोडया जोरात ब्रेक दाबला नि तिने मागे पकडलेला हात त्याच्या खांद्यावर ठेवला.
"हळू अरे!" ती म्हणाली. त्याला त्याचेच हसू येत होते.

आकाशात हळूहळू ढगांची गर्दी होत होती.
"ऋषी, लवकर घरी चल. पाऊस येईल तर उगाच आपण ओले होऊ."

"तू घाबरतेस का पावसाला?" त्याने स्पीड वाढवत विचारले.

"नाही रे." ती बोलत तर होती पण तिला ऋषीचे वागणे काहीसे बदलल्यासारखे वाटत होते.
'हा खरंच बदललाय की मलाच असे वाटत आहे?'

ती विचारात हरवत असतानाच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. ऋषीने बाईकचा वेग थोडा वाढवला. कुणास ठाऊक का पण तिला आदीची आठवण झाली. त्याच्यासोबत पावसातल्या कित्येक आठवणी मनात कोरल्या होत्या. केवळ मित्रांशी लावलेली पैज म्हणून त्याचे तिला केलेले प्रपोज आणि वर्षभर फिरवून पुन्हा त्याच भर पावसात त्याने केलेले ब्रेकअप! आज सगळे पुन्हा नजरेसमोर येत होते.

आदीचे प्रपोजल, त्याचे प्रेम हे सारेच खोटे होते. त्याचा सुरू असलेला टाइमपास आणि त्याच्यावर जीव लाऊन बसलेली ती. बाईक चालवताना आरशातून ऋषीने तिच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली. तिचा उतरलेला चेहरा पाहून ती परत आदीच्या आठवणीत हरवलीय हे कळायला त्याला वेळ लागला नाही.
त्याने जराशा जोराने ब्रेक दाबला तशी ती त्याच्या अंगावर जाऊन आदळली.

"आदी काय करतोस? हळू चालव ना."

त्याने बाईक थांबवली. "निशी, मी ऋषी आहे." ओठावर हसू होतं त्याच्या.

"आय एम सॉरी, ते.." जराशी ओशाळली ती.

" इट्स ओके गं. भूतकाळातून वर्तमानात यावीस म्हणून ब्रेक मारला मी. असं कधी कधी आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टींना ब्रेक देणं आवश्यक असतं ना."

"तरीही सॉरी रे." ती खिन्नपणे म्हणाली. "आणि हे काय? किती भिजलाहेस तू? चल लवकर घरी जाऊया." ती.

"का अशी तुझ्या आवडत्या पावसापासून दूर पळतेस? अशी पावसात मुक्त होताना जास्त छान दिसतेस तू." बाईक थांबवत तो म्हणाला.

त्याच्या बोलण्यावर ती हसली. गोड! "ऋषी, तू जरा जास्तच स्तुती करायला लागलाहेस, असं तुला वाटत नाहीये का?" ती विचारती झाली.

तो ही हसला. "फ्रेंड्स?" त्याने आपला हात पुढे केला.

तिला आठवले, लग्नाच्या पहिल्या रात्री तिनेही असाच मैत्रीचा हात पुढे केला होता. त्यावर पुन्हा नवे नाते नको म्हणून त्याने दिलेला स्पष्ट नकार.. हेही आठवले तिला.

"नको रे ऋषी, आता परतीच्या प्रवासात पुन्हा नव्या नात्याचे ओझे नको."

"ठीक आहे, चल." त्याने बाईक सुरू केली.

"रागावलास?" पाठीमागून ती.

"नाही अगं. तुझा निर्णय घ्यायला तू मोकळी आहेस ना. मग मी का रागाऊ?"
थोडावेळ असाच शांततेत गेला.

"आपण कुठे जात आहोत?" निशीने त्याला विचारले.

"असेच येऊ थोडे भटकून." आरशातून तिच्याकडे पाहत तो. त्याचा चेहरा आज जास्तच प्रसन्न वाटत होता.

थोड्यावेळाने ते रिव्हर व्हिवला पोहचले. तिने कधीतरी त्याला सांगितले होते, ही जागा म्हणजे तिची आवडती जागा आहे.
'माझ्या किती छोट्या छोट्या गोष्टी याच्या ध्यानात आहेत. हा माझी आवड जपण्याचा प्रयत्न करतोय की मला गुडबाय म्हणण्यापूर्वी काही चांगले क्षण क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय?' ती विचार करत होती.

पाऊस अजूनही थांबला नव्हता. त्याची रिमझिम बरसात सुरूच होती. चिंब भिजलेला तो अन चिंब भिजलेली ती. सोबत वाफाळलेला चहा! तिला खूप छान वाटत होते. किती दिवसांनी ती अशी मनापासून आनंदी होती. नाहीतर आदित्यपासून वेगळे झाल्यानंतर ती या क्षणाला मुकली होती. लग्नसुद्धा बाबांचे मन राखण्यासाठीच तर केले होते.
तो सुंदर निसर्ग, खळखळ वाहणारी नदी.. तिचे डोळे पाणावले नाही तर नवलंच!

"ऋषी, थँक यू सो मच! किती दिवसानंतर मी हा आनंद उपभोगतेय." त्याच्याकडे बघत ती म्हणाली.

"आणि तरीही रडते आहेस?"

"याला आनंदाश्रू म्हणतात ऋषी. तुला माहीत नाही, तू किती सुंदर क्षण माझ्या आयुष्यात आणलेस. हा दिवस, ही सायंकाळ मी कधीच विसरणार नाही. खरंच खूप खूप खूप थँक यू! अगदी डायरेक्ट दिल से थँक यू!" ती हळवी होत म्हणाली.

"अगं, तू एकटीच किती वेळा थँक्स म्हणशील? मलासुद्धा तुला थॅंक्स म्हणायची एक संधी दे." तो म्हणाला.

"म्हणजे?"

"म्हणजे.. " त्याने बोलता बोलता एक लांब श्वास घेतला.
'ऋषी, आता जर बोलला नाहीस ना तर कधीच बोलू शकणार नाहीस.' त्याचे मन त्याला म्हणत होते. दोघांचा चहा पिऊन झाला होता.

"ऋषी.. चल ना बाहेर." त्याचे बोलणे पुरे व्हायच्या पूर्वी तीच बोलली.

बाहेर अंगावर उडणारे तुषार, निसर्गाने केलेली उधळण! निशीने आपले दोन्ही हात पसरले. डोळे मिटून पाऊस अंगावर झेलला. एक गरर्कन गिरकी घेतली. काल ऋषीने तिच्या आनंदाची जी कल्पना केली होती, अगदी तशीच ती ते क्षण जगत होती.

"ऋषी तू सुद्धा कर ना असे. मुक्त मुक्त झाल्यासारखे तुला वाटेल. ये ना माझ्यासोबत."
तिने एका हाताने ईशारा करून त्याला बोलावले.
त्याने तिचा तोच हात हातात घेतला.

"निशी.. आता मुक्त नाही, मला बांधल्या जायचेय तुझ्यासोबत! तू साथ देशील मला?"
त्याने थेट तिच्या डोळ्यात बघत विचारले.

"म्हणजे?" तिच्या आवाजाला कंप सुटला होता.

"म्हणजे निशी, माझ्याशी लग्न करशील का? हे डिवोर्स वगैरे विसरून जा. आपण परत लग्न करू. मी तुला आनंदात ठेवेन. तुझ्यासोबत पावसात भिजेन, थंडीत बर्फात उभा राहीन. म्हणशील तर उन्हाळ्यात उन्हातही उभा राहीन. तू फक्त हो म्हण."
भर पावसात तो गुडघ्यावर बसून होता. हातामध्ये एक नाजूकशी डायमंड रिंग!

"अरे, नको रे!" तिच्या तोंडून बाहेर पडले.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.
प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव.*
फोटो गुगल साभार.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//