चिंब तू.. चिंब मी! भाग -७

मुसळधार पावसातील एक बेधुंद कथा!

चिंब तू.. चिंब मी!

भाग -सात.

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


झोप उडाली तशी उठून ती खिडकीत उभी राहिली. काही वेळ विसावलेला पाऊस पुन्हा बरसायला लागला होता. वाऱ्याचे थंड झोत तिच्या चेहऱ्यावर येऊन आदळत होते.

खोलीतील मंद प्रकाशात तिने ऋषीकडे एक नजर टाकली. तो पाठमोरा झोपला होता.

तो बेधुंद पाऊस, तो उधाण वाहणारा वारा अन पाठमोरा झोपलेला ऋषी! तिच्या डोळ्यात उगाचच थेंब जमा होऊ लागले.

'उतरे मेघ हिया पर छाए

निर्दय झोके अगन बढाए

बरसे हैं अखियों से सावन रोये

मन हैं पगला,

कहाँ से आए बदरा हो ऽऽ

घुलता जाए कजरा..'

तिच्या मनात पुन्हा येसूदास आपले सूर छेडत होता.


"आईऽऽ.."

अचानक ऋषीच्या किंचाळण्याच्या आवाजाने निशी धावत त्याच्याजवळ आली.

"काय झालं? काही वाईट स्वप्न पडले का?" तिने लाईट लावत त्याला विचारले. अंगाभोवती चादर लपेटून तो बसला होता. घाबरलेला!

"हे घे. पाणी पी." तिने दिलेले पाणी तो घटाघटा प्याला.

"खिडकीजवळ तूच उभी होतीस का?" जरासे अडखळत तो विचारत होता.

"हो."

"लग्नाच्या पहिल्या रात्री अशीच जवळ येऊन घाबरवले होतेस नि आज काय? केस एकदम मोकळे सोडून खिडकीजवळ उभी. किती घाबरलो मी, माहितीये?"

तिला त्याच्या ओरडण्याचे कारण कळले.

"हो, दिसतेय चेहऱ्यावर." त्याच्याकडे बघून ती खुदकन हसली.

तो मात्र तिच्या टपोऱ्या डोळ्यात बघत होता.

"निशी, तू रडत होतीस का?"

"नाही रे, मी का रडेन? मी पाऊस बघत होते." तिने आपली नजर टाळली.

"अंधारात?"  तो.

"पाऊस बघायला उजेड कशाला हवा? खरं तर तो बघण्यापेक्षा त्याला अनुभवावं. त्याचा आवाज कानात साठवून ठेवावा.."


"पुरे! नसेल सांगायचे तर नको सांगू. उगाच मला टोप्या तरी नको घालू. झोप आता नाहीतर परत घाबरायचा मी." पुन्हा आडवा होत ऋषी म्हणाला.


ती शांतपणे बेडवर लेटली होती. मन पुन्हा सैरभैर!

'ऋषीला आपल्या चेहऱ्यावरचं सारंच कळतं मग मनातले कळत नसावे का?'

विचारातच तिने आपली कुस बदलली.

********

दुसऱ्या दिवशी सकाळी घरी सगळे नॉर्मल वागत होते. डोळे मात्र यांच्यात खरंच काही बिनसले आहे का याचा शोध घेत होते.

दोघे एकत्र ऑफिसला जायला निघाले तसे पुष्पाने दोघांनाही अंगारा लावला आणि हाताची बोटे मोडली. ऋषीने आजीकडे बघून 'काय?' असे नजरेनेच विचारले त्यावर तिने 'काही नाही' म्हणून मान डोलावली.


आज ऑफिसला जाताना दोघेही जास्त बोलत नव्हते. कदाचित एकमेकांबद्दल काही वाटू लागले आणि त्याच्या झालेल्या जाणीवेमुळे असावे. तिला ड्रॉप करून ऋषी त्याच्या ऑफिसला निघाला. तिला सोडून जाताना कारच्या आरशातून तिला बघण्याचा मोह त्याला टाळता आला नाही.


वाटेत जाता जाता त्याने कार धोत्रेच्या ऑफिसकडे वळवली. घटस्फोटाची कागदपत्रे परस्पर घ्यावे असा त्याचा मानस होता पण ते शक्य झाले नाही. शेवटी त्याने ते घरी न मागवता त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर मागवले.


ऑफिसच्या कामात आज त्याचे लक्ष लागत नव्हते. वर्षभरातल्या एकेक आठवणीत तो निशीला शोधत होता.

लग्नाच्या प्रसंगी तिच्या ओठावर असलेले हसू खोटे होते हे त्याच रात्री त्याला कळले होते. तो जवळ येऊ नये म्हणून तिने लढवलेली ती पाच दिवसांची शक्कल आठवली नि त्याला आतासुद्धा हसू आले. मग त्यांनी एकमेकांना स्वतःविषयी सांगितलेली माहिती, त्यांचा करार.. सारे सारे डोळ्यासमोर उभे राहिले.

पुढच्या दहा दिवसांनी त्यांच्या लग्नाची वर्षगाठ होती. त्या पूर्वीच त्यांना एकमेकांशी बांधलेली गाठ सोडायची होती. तिचा लग्नातला चेहरा, पहिल्या रात्री मनमोकळ्या गप्पा मारतानाचा चेहरा अन काल रात्री त्याच्याजवळ काळजीने आली तेव्हा चिंतातूर झालेला चेहरा..!

तिची एकेक रूपं ऋषी आठवत होता. अन अचानक त्याला रात्रीचे तिचे पाणावलेले डोळे आठवले.

'कालपासून निशी सारखी रडतेच आहे. ह्या डिवोर्सचा तिला त्रास होतोय. पण त्रास तर मलाही होतोय. बघता बघता वर्ष होतं आलं, आम्ही एकत्र आहोत. किती सहज ती घरात वावरते. आईशीही किती छान पटते. आजीची तर सुरुवातीपासूनच लाडकी आहे. माझं काय? मलाही ती आवडायला लागलीय. पण हे असे अचानक एका दिवसात?'

त्याने हलकेच हसून आपले डोळे मिटले. खुर्चीला डोके टेकवून बसलेला तो अन बंद डोळ्यासमोर दिसणारा निशीचा चेहरा!


'मी प्रेमात पडलोय निशीच्या. कदाचित आधीपासूनच, पण कळायला उशीर झाला. खूप गोड आहे ती. तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही मी आणि तिला हे सांगायलाच हवं.'

खाडकन डोळे उघडून त्याने मोबाईल हातात घेतला.


'हाय! शार्प चार वाजता कॉफी शॉपमध्ये ये. इट्स अर्जंट!' मेसेज टाईप करून त्याने तिच्या वॉट्सअँपला सेंड केला आणि आपला मोबाईल स्विचऑफ करून ठेवला.

त्याचे हृदय धडधडत होते. शिल्पीला प्रपोज करताना जेवढी धडधड होती त्याच्या पाचपटीने आता वाढली की काय असे त्याला वाटू लागले होते.

'मेसेज डिलीट करावा का? आणि तिने पाहिला असेल तर? नको. आता डायरेक्ट सायंकाळी चारलाच मोबाईल सुरू होणार.'  त्याने स्वतःला बजावले. 


कामात तर लक्ष नव्हतेच. नजर सतत हातातील घड्याळाकडे जात होती. आत्ता कुठे बारा वाजले होते. शेवटी त्याने सुट्टी टाकली आणि ऑफिसमधून बाहेर निघाला. डोक्यात काहीतरी वेगळेच घोळत होते.


*******

"काय रे ऋषी असा अचानक घरी परत आलाहेस? तब्येत बरी आहे ना तुझी?" आईने दारातच त्याला गाठले.

"आणि हे काय? तू एकटाच? निशी कुठे आहे? तुम्ही दोघे सोबत गेला होतात ना?"


"हो गं आई, सोबतच गेलो होतो. पण मला जरा काम होते म्हणून मी निघून आलोय."

"का रे बाबा? डोके दुखत आहे का? चेहरा का असा?" आईच्या मागे आजी उभी राहिली.


"अगं,तुम्ही दोघी काय डिटेक्टिव्ह आहात का? मला आत तर येऊ देत." त्याच्या बोलण्याने दोघीही मागे सरल्या. "आणि प्लीज, आता माझ्या मागोमाग माझ्या खोलीत येऊ नका. महत्त्वाच्या कामात आहे मी." त्यांचा आत शिरकाव व्हायच्या पूर्वीच त्याने दार आतून लाऊन घेतले.


"आई काय झाले असेल हो लेकराला? का तो घरी आला असेल? सगळे ठीक असेल ना?" पुष्पा चिंतातूर झाली.


"पुष्पे, अगं आत्ता तूच सांगत होतीस ना की रात्री दोघे मोठमोठ्याने हसत, खिदळत होते. मग काळजी नको करू. चल आपली सिरीयल लागली असेल." आजी तिला टीव्ही बघायला घेऊन गेल्या.

******

इकडे लंचब्रेक मध्ये निशी व्हाट्सअँप मेसेज चेक करत असताना तिला ऋषीचे नाव दिसले. मेसेज वाचून तिला धक्काच बसला. आता अशा भलत्या वेळी याने का बोलावले असेल? काय अर्जंट आहे? हे प्रश्न तिला छळत होते. 

काळजीने त्याला कॉल केला तर मोबाईल ऑफ येत होता. तिने त्याच्या ऑफिसमध्ये फोन करून पाहिला, तर तो तिथेही नव्हता. काय लोचा झाला आहे तिला कळेना.


'घरी फोन करावे का?' तिच्या मनात आले.

'नको. घरचे उगाच टेंशन मध्ये येतील.' तिने हातातील मोबाईल टेबलवर ठेवून दिला.

'ऋषी, का रे जीवाला घोर लावतो आहेस?' मोबाईल मध्ये असलेल्या फॅमिली फोटोतील त्याच्या चेहऱ्याला झूम करून ती त्याला न्याहाळत होती.


त्याचा तो मेसेज अन मग ऑफ असलेला मोबाईल. तिचे कामातून लक्षच उडाले. दुपारचे अडीच वाजले होते. आणखी दिड तास तिला काढायचा होता.

जीव टांगणीला लाऊन ठेवण्यापेक्षा तिने शेवटी घरी फोन केलाच. तिथे काही धागेदोरे हाताला लागतात का हे बघायचे होते.


"हॅलो आजी, कशा आहात?" आजीने फोन उचलल्यावर ती दुसरे काय विचारणार?


"मला काय धाड भरलीय गं? मी मस्त आहे. तू कसा अचानक फोन केलास?"


"अहो, सहजच. म्हणजे आईंचे औषधं वगैरे संपलीत का? आणायचे आहेत का म्हणून फोन केला होता." ती तरी कुठे मुद्द्यात हात घालणार होती.


"निशी, तुझ्या सासूच्या गोळ्या सुटून महिना झाला गं बाई. तुझ्या लक्षात नाहीये का?"


"अरे! विसरलेच बघा. ते ऋषीचा फोन लागला नाही ना तर तुम्हालाच विचारावं म्हणून फोन केला." तिने जीभ चावली.


"आता कसं विषयावर आलीस!" आजी गोड हसली.

"तुझा ऋषी घरी आला आहे, काहीतरी काम होतं म्हणे. मी सांगते हं त्याला."


"अहो आजी नको. मी नंतर बोलते त्याच्याशी. आता ठेवते फोन." 

तो घरी आहे हे ऐकून तिचा जीव भांड्यात पडला. पण तो असा मोबाईल बंद करून घरी का गेला हे मात्र कळत नव्हते.

आजीने 'तुझा ऋषी!' म्हटले तेव्हा तिच्या कानाला किती गोड वाटले होते.

********

खरंच का गेला होता ऋषी घरी? घरी आल्याआल्या आपल्या खोलीत येऊन त्याने सर्वात प्रथम दरवाजा घट्ट बंद केला आणि त्याने निशीची आलमारी उघडली. निशीच्या साड्या, तिचे ड्रेसेस तो बघत होता.

'बापरे! किती ते कपडे? पण यातून तिचा फेवरेट कलर कोणता ते कसे ओळखायचा?'

त्याला गहण प्रश्न पडला. इतके दिवस सोबत असून तिच्या आवडीनिवडी आपल्याला कशा कळल्या नाहीत याचा राग येत होता.

जनरली मुलींचा आवडता रंग गुलाबी असतो म्हणतात पण हिच्याकडे मात्र प्रत्येक रंगाचे कलेक्शन होते.


आपल्या मनातले त्याला आज सांगायचे होते. त्यासाठी काहीतरी खास गिफ्ट करावे असे डोक्यात आले आणि म्हणून तिचा आवडता रंग जाणून घ्यायला तो धावतपळत घरी आला होता. तर इथे असा घोळ होऊन बसला. आता काय करायचे या विचारात असताना त्याला एक कल्पना सुचली.


कसली कल्पना? वाचा पुढील भागात.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.

प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव.*

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all