चिंब तू.. चिंब मी! भाग -६

मुसळधार पावसातील एक बेधुंद कथा!
चिंब तू.. चिंब मी!
भाग -सहा.
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

"ॲक्च्युअली, आय एम सॉरी. मला हे आधीच सांगायला हवे होते. पण आपले लग्नच एवढ्या घाईत झाले की काही बोलायला वेळच मिळाला नाही." त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते.

"काय? काय सांगायचे होते तुला?" तिची उत्सुकता शिगेला पोचली होती

"मला हे लग्न करायचे नव्हते." तो मनाचा हिय्या करून बोलला.

"काऽऽय?" ती जवळजवळ किंचाळलीच.

"अगं, जरा हळू!" ऋषी हळू आवाजात म्हणाला.

"काय? तुला लग्न करायचे नव्हते? पण का?" ती अगदीच बारीक आवाजात कुजबुजली.

"कारण माझं एका मुलीवर प्रेम आहे." तोदेखील कुजबुजत म्हणाला.

"वॉव! इंटरेस्टिंग." ती खुसपुसली.

"डोंबल्याचं इंटरेस्टिंग." त्याचीही खुसपूस सुरू. "पण आपण इतक्या हळू का बोलत आहोत?" विचारताना स्वर अजूनही खालच्याच पातळीवर होता.

"तूच म्हणालास ना, हळू बोल. म्हणून."

"अगं, इतकं पण हळू नाही. नार्मल टोन मध्ये आपण बोलू शकतोच." तो.

"ओह. नाव काय रे तिचं?" निशीने नेहमीच्या आवाजात विचारले.

"शिल्पी!" तो उत्तरला.

"भारीच रे! तू ऋषी आणि ती शिल्पी. तुझे नाव संपले की तिचे सुरू."

"एक मिनिट, तुला माझा राग नाही आला का?"

"का?" ती.

"मी असं तुला फसवून लग्न केले म्हणून." तो तिच्याकडे गोंधळून पाहत होता.

"छे रे! उलट ज्याचे प्रेम त्याला मिळाले पाहिजे या मताची आहे मी." ती हसून म्हणाली.

"म्हणजे? तुझेही दुसऱ्या कोणावर प्रेम आहे नि माझ्याशी जबरदस्तीने लग्न झालेय का?" आता त्यालाही तिच्यात इंटरेस्ट यायला लागला.

"एक्झाक्टली असंच नाही. पण बाबांचा शब्द प्रमाण मानत आलेय मी. सो..
ते जाऊ दे, तू सांग. तुला का लग्नाची घाई झाली होती? अँड व्हॉट अबाऊट शिल्पी?"

निशीच्या प्रश्नावर ऋषी खिन्न हसला. "ती सोडून गेलीय मला." एक उसासा टाकत तो.

"ओ, आय एम सॉरी!" कान पकडत ती.

"अगं, तू का सॉरी म्हणतेस? सोडून गेली म्हणजे त्या अर्थाने नाही गं." ऋषी.

"म्हणजे ब्रेकअप?" ती.

"तसेही नाही. म्हणजे मी प्रपोज केले होते, पण ती नाही म्हणाली. तिला लग्न वगैरे नको होतं, म्हणून.
मला काय म्हणायचंय ते कळतंय का तुला?" त्याचा प्रश्न.

"हो, थोडंफार कळलं पण तरीही तू अचानक लग्न का केलेस ते नाही समजलं."

"आईमुळे गं. तीन महिन्यांपूर्वी अचानक घेरी येऊन ती पडली आणि तेव्हापासून अंथरुण पकडलं. सगळ्या तपासण्या, औषधं, डॉक्टर झालीत. काहीच निदान होईना. त्यामुळे तिने हाय खाल्यासारखे केले. हे शेवटचे आजारपण, यातून सुटणार नाही असे तिला वाटायला.
मग महिन्याभरात माझे लग्न व्हावे म्हणून तिने आजीला गळच घातली. आजीने तिचा शब्द लगेच झेलला आणि वधूसंशोधन सुरू केले. अनायसे एक दिवस तुझ्या बाबांची आजीशी मंदिरात गाठ पडली. दोघेही अनोळखी पण अचानक त्यांची ओळखी झाली आणि आजी लग्न पक्के करूनच घरी आली." त्याने आपल्या लग्नाची कथा तिला ऐकवली.

"तू काही बोलला नाहीस?"

"काय बोलणार? एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला लग्नाचा विचारही न करणारी शिल्पी.. आजीने माझ्या अबोल्यालाच मूक संमती समजून पंधरा दिवसात लग्न होणार हे जाहीर केले. एक सासू आपल्या सुनेसाठी एवढं करू शकते तर मी तर तिचा मुलगा आहे ना?" 
वातावरण थोडे इमोशनल झाले.

"माझे सोड, तू कशी काय लग्नाला तयार झालीस?"

आता तिची टर्न होती.
"माझ्या ताईने लव्हमॅरेज केले, तेव्हापासून बाबांनी त्यांच्या मनातून तिचे नाव काढून टाकले. त्यांच्या सर्व अपेक्षा माझ्यावरच उरल्या. मग एके दिवशी अचानक ते लग्न ठरवून आले नि घरी सांगितलं. माझा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता."

"आणि मग तुझ्या प्रेमाबद्दल काय?" त्याने विचारणा केली.

"प्रेम!" ती स्फूट हसली. डोळ्यात हलकेच पाणी तरळले.
"आदित्य नाव त्याचं. सगळे आदी म्हणतात. एकदम हँडसम, सगळ्या पोरी त्याच्यावर मरायच्या. मलाही तो आवडत होता. आणि एके दिवशी त्याने चक्क मला प्रपोज केले. सगळ्या जगाचा विसर पडून मीही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. बाबांना कळले तर काय होईल ही भीती मनात यायची, पण आदी सगळं नीट करेल असा विश्वास होता."

"मग?"

"मग काय? इतर पोरांसारखा तोही दगाबाज निघाला. त्याची ऑलरेडी दोनचार लफडी होती."

"तरी त्याने तुला प्रपोज केलं?"

"त्याच्या मित्रांनी बेट लावली होती म्हणे. सुंदर मुली फिरवतोसच, या खेपेला माझ्यासारखी सुमार पोरगी फिरवून दाखव म्हणून."

"ओह!"

"पण माझं खरंखूरं प्रेम होतं रे. यू नो, पहिलं प्रेम." ती क्षणभर शांत झाली.

"बाबांनी लग्न ठरवलं नि पंधरा दिवसात मी गुमान बोहल्यावर चढले. फार्मालिटी म्हणून तुम्ही मला बघायला आला होतात, पण माझी कशातच इच्छा नव्हती. आता बाबा म्हणतील तेच करायचं असे ठरवले होते." बोलताना निशिचा गळा भरून आला.

"घे, दूध पी. तुला बरं वाटेल."त्याने तिच्यासमोर दुधाचा ग्लास पकडला.

"अरे, आजींनी ते तुझ्यासाठी दिले होते."

"पी गं. ती थोडी ना बघायला येणार आहे?" तो म्हणाला तसा निशीने पटकन ग्लास तोंडाला लाऊन रिकामा केला.

"मग आता काय प्लॅन आहे?" तिने विचारले.

"खरं तर मी माझ्याबद्दल सांगितल्यावर तू कांगावा करशील नि मला घटस्फोट मागशील असे मला वाटले होते, म्हणून मी सगळं तुला सांगण्याचे धाडस केले." ऋषी निर्विकारपणे म्हणाला.

ती हसली. "मी सुद्धा काही दिवसांनी नवरा मानसिक आणि शारीरिक छळ करतो म्हणून घटस्फोटासाठी अर्ज करण्याच्या विचारात होते. म्हणजे बाबांचा शब्दही राखल्या जाईल आणि मी पण तुझ्यातून मोकळी होईन."
"मी आणि शारीरिक छळ?" त्याला हसू आले. "मी तर तुला कधी हातही लावणार नाही."

"ए, थँक यू आणि सॉरी सुद्धा." ती.

"थँक यू ठीक आहे पण सॉरी का?" भुवई उंचावत तो.
"ते मघाशी पाच दिवसांच्या प्रोग्रामविषयी मी तुझ्याशी खोटं बोलले ना म्हणून." ती खाली बघत म्हणाली त्यावर तो पुन्हा हसला.

"मग आता पुढे काय करायचं?" निशीने विचारले.

"सोप्प आहे. हे बघ,आपल्या दोघांनाही एकत्र राहायचे नाहीये. तर आई बरी होईपर्यंत वाट बघू. किमान चार पाच महिने जाऊ देत. मग आपला मार्ग वेगळा. आपण आपली डिवोर्सची केस फाईल करू."

त्याचे बोलणे निशीला पटले. तसेही नवरा त्रास देतोय म्हणून ती त्याला सोडणार होतीच त्यापेक्षा हे भारी होतं. दोघांनाही एकमेकांसोबत राहायचे नव्हते, त्यामुळे एकमेकांशी खोटं न बोलता ते वागू शकत होते.
लग्नाच्या तारखेपासून एका वर्षाच्या आत वेगळे व्हायचे हा दोघांचा करार झाला. तसे त्याने एका पेपरवर लिहून घेतले आणि त्यावर दोघांनीही सह्या केल्या. नंतर झोपायचे कुठे यावर छोटूसं भांडण झालं आणि मग बेड नि सोफ्यावर दोघांनीही रोटेशन नी झोपायचे या मतावर दोघांचे एकमत झाले.

"गुडनाईट!" म्हणून तो सोफ्याकडे गेला नि हिने बेडवर मस्तपैकी ताणून दिले होते. दोन मिनिटांनी ऋषीने डोळे उघडले तर निशी त्याच्यासमोर उभी होती.

तो दचकून उठून बसला. "ए, घाबरलो ना मी. अशी का उभी आहेस?" त्याचा प्रश्न.

"फ्रेंड्स?" तिने आपला हात समोर केला.

"नको गं बाई, आपल्यात आणखी दुसरे कोणते नाते नको. मैत्री, मग भावनांचा गुंता.. मग स्वतःला त्रास! सॉरी, पण आपल्यात कसलेच नाते नको. झोप आता. दमली असशील. गुडनाईट!" त्याने परत चेहऱ्यावर चादर ओढून घेतली.

******

डोळे मिटण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आज तिला झोप येत नव्हती. लग्नाची पहिली रात्र जशीच्या तशी डोळ्यासमोरून सरकत होती. घरात सगळ्यांसमोर नवरा बायको म्हणून वागताना उडणारी तारांबळ, कधी नातेवाईकांनी विनोदाने केलेली खेचाखेची.. हे सर्व निस्तरताना नाकी नऊ यायचे. अर्थात दोघांच्याही. असे असले तरी त्या घरातील माणसांवर नकळत तिचा जीव बसला होता. तिचे बाबा म्हणजे अगदी तापट, रागीष्ट. ऋषीचे बाबा तसे नव्हते. थोडे शांत आणि संयमी, जरासे खेळकर या वृत्तीचे होते. ती या घरात आली तेव्हा पुष्पा अंथरुणात खिळली होती पण सुनेच्या आगमनानंतर तिची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. निशीच्या पायगुणाने आपण बरे झालोय असेच तिला वाटायचे आणि त्यामुळेच तिचा निशीवर भारी जीव होता.

आणि ऋषीची आजी? ती तर एक अफलातून व्यक्तीमत्वाची होती. गोड, प्रेमळ!
ऋषीचे नि तिचे नाते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे असले तरी या मंडळीत तिचा जीव गुंतत जात होता.. आणि नकळत ऋषीत देखील ती गुंतली होती. हे आजवर तिला कधी जाणवले नव्हते आणि आज वकिलांकडे गेल्यानंतर अचानक तिला याची जाणीव झाली. ऋषीशिवाय नाहीच जगू शकणार हे तिला कळले होते.

लग्नाला जवळपास वर्ष होत आले होते पण आजवर ऋषीने तिला कधी स्पर्श केला नव्हता. त्याने त्याचा पाळलेला शब्द, त्याचे वागणे, तिची काळजी घेणे.. निशीला आवडू लागले होते.

झोप उडाली तशी उठून ती खिडकीत उभी राहिली. काही वेळ विसवलेला पाऊस पुन्हा बरसत होता. वाऱ्याचे थंड झोत तिच्या चेहऱ्यावर येऊन आदळत होते.
तिने खोलीतील मंद प्रकाशात ऋषीकडे एक नजर टाकली. तो पाठमोरा झोपला होता. तिच्या डोळ्यात उगाचच थेंब जमा होऊ लागले.

'उतरे मेघ हिया पर छाए
निर्दय झोके अगन बढाए
बरसे हैं अखियों से सावन रोये
मन हैं पगला
कहाँ से आए बदरा हो ऽऽ
घुलता जाए कजरा..'

तिच्या मनात पुन्हा येसूदास आपले सूर छेडत होता.
:
क्रमशः
********
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.
प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव.*
फोटो गुगल साभार

🎭 Series Post

View all