चिंब तू.. चिंब मी! भाग -५

मुसळधार पावसातील एक भन्नाट कथा!

चिंब तू.. चिंब मी!

भाग -पाच.

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


"हे असं उंदरामांजरा सारखं खेळायलाच हवे का? ऋषीशी स्पष्ट बोललो तर काय होईल?" आजी गेल्यावर पुष्पाने मनोहरला विचारले.

"टीव्हीतल्या त्या रटाळ मालिका बघून तुम्ही दोघी नवनवे खेळ खेळत असता ना? तसेच हा सुद्धा एक खेळ समज." अंगावर पांघरून घेत मनोहर उत्तरले.

त्यांच्याकडे पाठ करून पुष्पा निजली पण तिच्या डोळ्याला डोळा लागेना. स्वयंपाकघरातून आवाज आला तशी तिची पावलं तिकडे वळली. तिथे ऋषी कॉफी बनवत होता.

"काय रे? अजून झोपला नाहीस?" तिने सांशकतेने विचारले.

"नाही गं अजून. आज जरा आमचा कॉफीचा बेत ठरलाय." तो हसून म्हणाला.

"आमचा?" पुष्पाच्या चेहऱ्यावर अजूनही संशय होता.

"हो, निशी आणि मी गं. तुला काय वाटलं?" तो कॉफीचा फ्लास्क घेत म्हणाला. " तू घेतेस का थोडी? " तिच्याकडे बघून तो.

"छे रे! मी पाणी घ्यायला आले होते." ती फ्रिजकडे वळली.

तो हसून निघून गेला.


"छ्या! आई काहीही बोलतात. माझा ऋषी किती समजदार आहे. तो का निशीला डिवोर्स देईल? आजवर त्याच्या बाबाने मला कधी साधा चहा दिला नाही, माझा लेक मात्र बायकोला स्वतःच्या हाताने बनवलेली कॉफी देतोय. गुणाचं गं माझं बाळ!" ती स्वतःशीच म्हणाली.

'पण जर आई म्हणतात ते खरं असेल तर? तर या खेळातील उंदीर आणि मांजर म्हणजे कोण?'


क्षणातच तिच्यासमोर उंदराच्या मिशा असलेला ऋषी आणि बोक्यासारखा मनोहर असे चित्र तयार झाले. पुष्पाने आपल्या डोक्याला पकडून हलवले आणि पाण्याची बाटली तोंडाला लावली.

'बाई गं, आईंनी म्हटल्याप्रमाणे आपले सीआयडीचे डोके नको वापरायला. नाही नाही ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. माझ्या लेकराचा संसार सुखाचा होऊ दे म्हणजे झालं.'

ती जाऊन मनोहरशेजारी पडली.


*********

ऋषी आत आला तेव्हा निशी बेडवरची चादर नीट करत होती. त्याचा सोफादेखील आवरून ठेवला होता. लग्नाच्या पहिल्या रात्रीच दोघांनी एकत्र झोपायचे नाही या अलिखित करारावर थम्सअप केले होते.


"सोफ्यावर मी नाही झोपणार." निशीने त्याला बजावले होते.

"मी माझा बेड शेअर नाही करणार." ऋषीनेही आपले म्हणणे क्लीअर केले.

"खाली झोपले की माझी पाठ लागते." ती.

"सेम हिअर!" तो.

"आयडिया!" थोडावेळ विचार केल्यावर दोघांच्या डोक्यात एकाच वेळी ट्यूब पेटली.

"आपण रोटेशन करूयात. एक दिवस तू सोफ्यावर, एक दिवस मी." निशीच्या बोलण्यावर त्याने अंगठा वर केला.

"पण आज कोण कुठे झोपेल?" ती.

"तू बेडवर झोप. तसाही आजचा तुझा पहिला दिवस आहे. मी सोफ्यावर झोपतो." तो बोलायचा अवकाश की तिने मस्तपैकी ताणून दिले होते.


आता बेड आवरताना ती दिसली अन त्याला त्यांची पहिली रात्र आठवली. स्फूटसे हसू घेऊन तो तिच्याजवळ उभा राहिला.

"कॉफी?" त्याच्या प्रश्नाने ती त्याच्या बाजूने वळली.

"तू माझ्यासाठी खरंच कॉफी केलीस?" कप हातात घेत तिने विचारले.

"हम्म. तूच मघाशी बोलली होतीस ना, तुला माझ्या हातची कॉफी प्यायचीय म्हणून." तो म्हणाला.

ही गोष्ट त्याच्या ध्यानात असेल असे तिला वाटलेही नव्हते. का कोण जाणे, पण चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली होती.

"मला वाटलं तू फक्त तुझ्या शिल्पीसाठीच कॉफी करतोस." कप ओठांना लावत ती म्हणाली.

"करतोस नाही, करत होतो. शिल्पी भूतकाळ आहे माझा." तो हळूच म्हणाला.

"आणि वर्तमान?" तिच्या अनपेक्षित प्रश्नावर त्याने तिच्याकडे पाहिले.

'अगं वेडे, माझा वर्तमान, भविष्य आता फक्त तूच आहेस. कधी कळेल तुला?' त्याने मनात म्हटले.


"शिल्पीची खूप आठवण येत असेल ना तुला?" तिने दुसरा प्रश्न विचारला.

"हम्म! पहिलं प्रेम विसरणं कठीण असतं. तू देखील तुझ्या आदीला मिस करत असशील ना?"

'माझा आदी? तो माझा होताच कुठे? मला फक्त तसं वाटायचं.' ती मनात उत्तरली.


"काय गं?" तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत तो.

हम्म! पहिलं प्रेम विसरणं कठीण असतं, असं तूच म्हटलंस ना." ती पुसटसे हसली.

"कॉफी एकदम फर्स्ट क्लास झाली हं." विषय बदलवण्याचा तिचा केविलवाणा प्रयत्न.


"मग पुढे काय ठरवलंस?" तो.

"म्हणजे?"

"म्हणजे आपण वेगळे झाल्यावर काय करणारेस? आदीला भेटशील का?" त्याने शेवटी विचारलेस.

"तो पास्ट होता रे माझा. आता त्याचा चॅप्टर क्लोज झालाय. मी मस्तपैकी लेडीज होस्टेलला राहीन. माय जॉब अँड माय लाईफ! फायनली स्वतःच्या मर्जीने जगायला मिळेल." ती.


"होस्टेल? का?" त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.

"स्वतःचा फ्लॅट घेईपर्यंत रे. मग तिकडे शिफ्ट होईन. डिवोर्स घेऊन घरी जाईल तर आमचे जमदग्नी मला घराबाहेर काढतील ना. त्यापेक्षा आपणच आधी सोय केलेली बरी!" जराशी हसली ती.

"तू सांग, तू जाणार का शिल्पीला भेटायला?" निशीने त्याला विचारले.


"ती जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहे कोणास ठाऊक!" तो खिन्न हसला.

"मग?"

"मग काय? माझी नोकरी आणि मी. बस्स! हॅपी लाईफ."

"नि लग्न?" तिचा पुढचा प्रश्न.

"लग्न?" तो हसला. "नको रे बाबा. आईसाठी एकदा केलं तेच पुरेसे आहे. आता परत त्या वाटेने जायला नको." त्याने कानाला हात लावले.

"माझा इतका वाईट अनुभव आला का तुला?"

तिचे टपोरे डोळे आणखी मोठे झाले.

"ए, नाही गं. तुला असं कुठे म्हटले मी? तू खूप चांगली आहेस. तुझी खूप आठवण येईल मला, खरंच. स्पेशली झोपताना. फायनली मी माझा बेड एकट्याने वापरायला लागेल." सेंटी होता होता त्याने त्यात कॉमेडीचा तडका मारला.

"अच्छा बच्चू, म्हणून मला मिस करणार, हो का? थांब बघतेच तुला." तिने बेडवरची उशी त्याला फेकून मारली.

"सॉरी! सॉरी! मला तसे नव्हते म्हणायचे." त्याने कान पकडले आणि ती बेसावध असताना आपल्या बाजूची उशी तिच्या अंगावर फेकली.

"यूऽऽ.." तिने परत त्याच्यावर उशी फेकली.


दोघांच्या मस्त्या, हसण्याचा आवाज. पुष्पाच्या डोक्यातील सीआयडी जागी होणार नाही, तरच नवल!ऋषीच्या खोलीपाशी येऊन तिने अंदाज घेतला. आतले खेळीमेळीचे वातावरण अनुभवून ती माघारी फिरली.

'आईंच्या डोक्यात काहीही येतं. पोरं एकमेकांच्या प्रेमात पुरती बुडालीत, मग घटस्फोटाचा विचार का करतील? त्या धोत्रे वकिलाने काहीतरी भलतेच ऐकले असेल.'

चेहऱ्यावर एक समाधान घेऊन पुष्पा या खेपेला गाढ झोपली.

******

"ऋषी, मी मात्र तुला खरोखर मिस करेन." क्षणभर थांबून निशी म्हणाली. तिचा आवाज भारावला होता.

"व्हाय?" तो.

"डोन्ट नो!" तिने खांदे उडवले.

"काहीतरी वेगळं वाटत आहे ना आज?" त्याने हलक्या आवाजात विचारले.

"तुलाही?" ती.

"हम्म!" तो.

"समथिंग मिसिंग असं काहीतरी?" ती.

"हो गं." तो.


क्षणभर दोघेही गप्प झाले.

'निशी, आपण काही चुकीचा निर्णय तर नाही ना घेतला?' त्याचे अंतर्मन तिला विचारत होते.

"काही म्हणालास का?" तिने शांततेचा भंग केला.

"अं? नाही, काही नाही. झोपायचं?" ऋषी.

"हम्म. गुडनाईट." ती परत बेड आवरायला लागली.

"गुडनाईट!" आपली उशी घेऊन तो सोफ्यावर पहुडला.

*******


निशी बेडवर लेटून होती. घरघर फिरणाऱ्या पंख्याच्या पात्याकडे तिचे डोळे लागले होते.


तिला आठवली तिच्या लग्नानंतरची पहिली रात्र. याच बेडवर ती तयार होऊन बसली होती. नाही, आजीने तिला तयार करून पाठवले होते. हातात मसल्याचे दूध असलेला ग्लासही दिला होता. ऋषीला आवर्जून द्यायचे हे बजावून आजी खोलीबाहेर गेली तेव्हा कुठे तिने सुटकेचा निःश्वास टाकला होता. ऋषी खोलीत आल्यावर त्याच्याशी काय बोलायचे, त्याला आपल्यापासून लांब राहायला कसे प्रवृत्त करायचे याचीच उजळणी चालली होती की ऋषी दार लोटून आत आला.

त्याच्या याच बेडवर ही आपले अंग चोरून बसली होती. ऋषी जवळ आला तशी तो स्पर्श करेल या भीतीने ती पटकन उठून उभी झाली.

"हे बघ, मला शिवू नकोस." थोड्याशा जोरात पण बाहेर ऐकू जाणार नाही अशा आवाजात ती म्हणाली.

तो तिच्याकडे गोंधळून बघत होता.

"मला ते.. अम्म, माझे ते महिन्याचे पाच दिवस सुरू आहेत." तिने कसेबसे ओठात आले ते बोलून टाकले.

तिला काय म्हणायचे आहे ते त्याला समजले.

"रिलॅक्स! मी तुला काहीच करणार नाहीये." तो किंचित हसून म्हणाला.

"म्हणजे?" ती.

"म्हणजे मी हे पाच दिवस काय, ह्या पुढेही काहीच करणार नाही."

त्याचे बोलणे ती आश्चर्याने ऐकत होती.

"ॲक्च्युअली, आय एम सॉरी. मला हे आधीच सांगायला हवे होते पण आपले लग्नच एवढ्या घाईत झाले की काही बोलायला वेळच मिळाला नाही." त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते.

"काय? काय सांगायचे होते तुला?" तिची उत्सुकता शिगेला पोचली होती.

:

क्रमश :

********

काय सांगणार होता ऋषी? वाचा पुढील भागात.

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.

प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव.*

फोटो गुगल साभार.🎭 Series Post

View all