चिंब तू.. चिंब मी! भाग -२

मुसळधार पावसातील बेधुंद कथा!
चिंब तू.. चिंब मी!
भाग -दोन.
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

"तुला आवडतो ना पाऊस? मग छत्री का उघडलीस गं? भिजूयात ना आपण." गॉगल काढताना शिताफीने डोळे पुसत त्याने विचारले.

"आवडेनासा झालाय रे तो." किती सहजतेने बोलून गेली ती.

"मला आवडायला लागलाय तो!" तोही तेवढ्याच सहजपणे म्हणाला.

चालता चालता तिची नजर त्याच्याचकडे! जणू तिचे डोळे त्याच्या डोळ्यांना विचारत होते,
'माझा तर जीव गुंतलाय तुझ्यात
तूही गुंतलाहेस का रे तेवढाच माझ्यात..?'

गरमागरम भाजलेले मक्याचे कणीस, त्यावर शिंपडलेले तिखटमीठ. वरून झालेला लिंबाच्या रसाचा शिडकावा आणि सोबतीला पाऊस अन धुंद हवा..!
तिला आणखीन काय हवं होतं?

ऋषीला हे असलं बाहेरचे खाणे कधी रुचले नव्हते आज मात्र मुद्दामहून केवळ निशीसाठी हा बेत आखला होता. मक्यावरचे तिखट झोंबले त्याला.

"स्ससं! कशी खातेस गं तू मिटक्या मारत? मला तिखट वाटतेय." तो.

"वाटू दे जरासे तिखट, निघू दे डोळ्यातून जाळ.. तेव्हाच तर मग तुला लिंबाचा आंबटपणा आवडायला लागेल." ती मिटक्या मारत म्हणाली.

त्याच्या डोळ्यात खरंच पाणी आले होते. आता मात्र वर चोळलेल्या लिंबाच्या रसाने ती आंबट तिखट गोड चव त्याला आवडायला लागली. मिटक्या मारणाऱ्या तिच्याकडे तो एकटक बघत होता.

'हीदेखील अशीच या लिंबासारखी आंबट आहे. नात्यातला तिखटपणा झोंबायला लागला तेव्हा कुठे हिची किंमत कळतेय मला. ही माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली तर..? तर मग माझं आयुष्याला काही चवच उरणार नाही. नाही नाही.. मला हवीय ही. हा डिवोर्स वगैरे काही नको.'
त्याची नजर तिच्यावरच खिळलेली होती.

'साधे कणीस खाताना देखील किती सुंदर दिसतेय. सावळीशी, टपोऱ्या डोळ्यांची! असं वाटतंय की हिच्यावरून नजर हटूच नये. ही इतकी सुंदर आहे हे आज मला कळतेय. इतक्या दिवसात कधीच का काही जाणवलं नाही?'

तो इतक्या एकरूपतेने आपल्याकडे बघतोय याची पुसटशी जाणीव देखील निशीला नव्हती. ती आपला आवडता भुट्टा खाण्यात मग्न. खाता खाता तीची नजर रस्त्याकडे गेली.
एक प्रेमीयुगल बाईकवर स्वार होऊन निघाले होते. त्यांना जगाची जराही पर्वा नव्हती. आपल्याच मस्तीत, आपल्याच धुंदीत ते निघाले होते. पाऊस अंगावर झेलत, प्रेमात न्हाऊन निघत!

तिने त्यांना पाहिले आणि झर्रकन मन भूतकाळात गेले. तीही अशीच जगाला विसरून प्रेमात आकंठ बुडाली होती. ऋषीच्या..? नाही, नाही. आदीच्या प्रेमात.

आदी म्हणजे आदित्य देसाई. तिच्या वर्गातल्या सगळ्या मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होत्या आणि त्याने मात्र पूर्ण वर्गासमोर हिला प्रपोज केले होते.
रिमझिम सुरू असलेला पाऊस, हवेतील आल्हाददायक गारवा आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसलेला तो! किती गोंधळली होती ती.

"का वागतोस माझ्याशी असं?" विचारताना तिची जीभ चाचरली होती.

"आवडतेस तू मला!" थेट तिच्या डोळ्यात डोळे घालून तो बोलत होता.
"निशी तू आवडतेस यार मला. माझे प्रेम आहे तुझ्यावर. माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का?" त्याच्या हातात लाल गुलाब अन हिच्या चेहऱ्यावर फुललेले असंख्य गुलाब!

"पण मीच का? म्हणजे आजूबाजूला इतक्या सुंदर मुली असताना तू मलाच का विचारतो आहेस?" धाडसाने तिने पुन्हा विचारले होते.

"कारण तू सर्वांहून निराळी आहेस. एक वेगळीच सुंदरता आहे तुझ्यात. असे सौंदर्य जे रंगाच्या पलीकडे आहे. तुझ्या टपोऱ्या डोळ्यात, तुझ्या गुलाबी ओठात! तुझ्या झुकलेल्या नजरेत, तुझ्या आरक्त गालात. आणखी काय सांगू? तू फार वेगळी आहेस निशी आणि म्हणूनच तू मला आवडतेस. आणि मीही तुला आवडतो हे माहितीये मला. मग करशील ना माझ्या प्रेमाचा स्वीकार?"

त्याला नकार द्यायचा प्रश्नच कुठे होता. वर्गातील इतर मुलीप्रमाणे हिचाही जीव होताच की त्यावर. मग जर सगळ्यांना डावलून तो स्वतःहून विचारतोय तर भाव कशाला खायचा? तशीही त्याच्या स्तुतीने ती हुरळून गेलीच होती. तिनेही मग त्याच्या हातात स्वतःचा हात दिला.

त्याचे पहिले प्रपोजल, तिचा पहिलाच होकार. त्यांच्या प्रेमाला तो वेडा पाऊस साक्षीदार! किती मस्त वाटत होते. कुणीतरी आपल्याला आवडतो आणि त्यालाही आपण आवडतो ही भावनाच किती छान होती.
तिला तर अगदी पंख लाऊन वाऱ्यावर उडण्याचा भास होत होता. ती, तो आणि तिचा लाडका पाऊस!
त्याच्यासोबत बाईकवर त्याला घट्ट पकडून बसून कित्येकदा ती लॉन्ग ड्राईव्हवर गेली होती.सोबतीला पाऊस असायचाच. कधी रिमझिम.. तर कधी मुसळधार! किती किती छान दिवस होते ते!

ऋषीसोबत कणीस खाताना निशीने बाईकवर स्वार असलेल्या एका प्रेमीयुगलाला पहिले आणि प्रकर्षाने तिला आदीची आठवण झाली. तिने डोळ्याच्या कोनातून एक नजर ऋषीकडे टाकली. तो तिच्याचकडे बघत होता.

इतक्या दिवसानंतर ही आपली व्हावी ही त्याला झालेली जाणीव अन त्याच वेळी बाईकवर बसून गेलेल्या युगलावर तिची खिळलेली नजर..

'तिच्या पहिल्या प्रेमाला अजूनपर्यंत नाही विसरू शकली ही. मग खरंच माझी होऊ शकेल का? मी आपला उगाच नवी आशा मनाशी बाळगू बघतोय. आमच्या वाटा निराळ्या आहेत. आम्ही एक होणं निदान या जन्मी तरी शक्य नाही.' तिच्याकडे बघताना नेमकी जीभ दाताखाली आली नि कणसावरील तिखट परत जिभेला झोंबले.

"आई गं.." तो विव्हळला.

"अरे, ऋषी जपून ना. तुझे लक्ष कुठे आहे?" त्याच्या चेहऱ्यावरची वेदना तिच्या टपोऱ्या डोळ्यात उमटली.
"एक तर पावसात भिजतो आहेस. त्यात हे असे वागणे. घरी जाऊन तब्येत बिघडली तर मलाच बोलणी खावी लागेल." तिची बडबड सुरू झाली.

'ओह, माझ्या काळजीपोटी नव्हे घरच्यांच्या भीतीपोटी अशी वागतेय तर? पण मग तिच्या डोळ्यात ही वेदना का दिसतेय? की मलाच भास होतोय असा?' त्याने खिन्नपणे नजर खाली केली.

"भैय्या कितना हुआ?" म्हणत निशीनेच भुट्टेवाल्याला पैसे दिले.
"आता लवकर घरी चल. उगीच कोणाचा ओरडा नको. आणि पाऊस तर अजिबात अंगावर घेऊ नकोस." छत्री घेऊन ती पुढे निघाली. तो तिथेच होता.

"अरे चल ना. काय वेड लागले की काय तुला?" निशी पुन्हा त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. नजरेनेच त्याला छत्रीत यायला सांगितले.

ऋषी जरा नाखुषीनेच तिच्या सोबत निघाला.
'थांब ना जराशी! या मुक्त पावसात तू ही होना मुक्त. सोडून दे ती छत्री. दोन्ही हात समोर पसर. झेल त्या पाऊसधारा. मग हलकेच एक गिरकी घे. पावसाचे थेंब हवेत उडवून दे. काही थेंबाना विसाऊ दे तुझ्या केसांवर! आणि मग तुझ्या गालावर आलेल्या खट्याळ लटेआडून त्याला स्पर्शू दे तुझ्या गालाला.' त्याच्या मनात काय काय येत होते.

'अरे! वेडा आहे का मी? काय काय सुचते आहे?' त्याने स्वतःलाच एक टपली मारली.

"काय झाले?" तिचा प्रश्न.

"कुठे काय?" ऋषीने भुवई उडवली. "अगं हो. तुला ट्रीट द्यायला म्हणून घेऊन गेलो आणि शेवटी तूच पैसे दिलेस. सॉरी हं. घरी गेल्यावर मी तुझे पैसे परत करेन."

ती हलकेच हसली. "ऋषी, हिशोब करायचा म्हटला तर आपले एकमेकांना बरेच देणे लागतात रे. त्यापेक्षा एक कर.."

"काय?" त्याच्या प्रश्नात किती अधीरता, जणू ती म्हणेल,की सोड ना हा डिवोर्सचा हट्ट. विसरून जाऊया ना आपला करार.

"रात्री तुझ्या हातची कॉफी करशील माझ्यासाठी? एक स्पेशल चव आहे तुझ्या कॉफीला."निशी हसून म्हणाली. तिचे ते हसणे कुठेतरी बोचले त्याला.

त्या बोचऱ्या हसूत 'शिल्पी' दिसली त्याला. त्यानेच तर शिल्पीबद्दल निशीला सांगितले होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री. शिल्पीशिवाय तो कसा अधुरा, अपूर्ण आहे आहे ते त्याने पटवून दिले होते.

शिल्पी कशी एकदम रोखठोक, बिनधास्त! तिचे प्रेम करणे, त्याच्यावर सत्ता गाजवणे, तिचे निर्भीड वागणे.. फार फार आवडायचे त्याला.
"जगात कुणी कशीही कॉफी बनवू देत पण तुझ्या हातच्या कॉफीला जी चव आहे ना, तिला तोड नाही." सगळ्यांसमोर त्याच्या हाताला ओठांचा स्पर्श करत ती जेव्हा हे बोलली होती तेव्हाच त्याला ती जाम आवडली होती.
'युरेका युरेका..'त्याला जणू आत्मशोध लागला होता. 
हीच ती मुलगी जिच्यासोबत तुला आयुष्य काढायचंय. त्याच्या मनाने ओरडून त्याला सांगितले होते.

पाऊस बिऊस काही आवडायचा नाही तिला. मग ते भिजणं वगैरे चार हात दूरच राहिले. ज्या मुली पाऊस आवडतो म्हणून भिजतात त्या पार भैताड असतात. पावसात भिजून सर्दी पडसे करण्यापेक्षा अंगावर पांघरून झोपा काढण्यात जे सुख आहे तेच खरे सुख बाकी सगळा वेळेचा दुरुपयोग! या मताची असलेली ती. भजी खायला पावसाचा मुहूर्त का बघायचा? झाली इच्छा तेव्हा खा की.
'किती ते तिचे महान विचार. शिल्पीची नि माझी कुंडली मिळवली असती तर आमचे छत्तीसचे छत्तीसही गुण जुळले असते.'
तेव्हा कितीदातरी हे ऋषीच्या मनात यायचे.

शिल्पी मात्र त्याच्या हातावर तुरी देऊन जी फुर्रर्र झाली ती आजतगायत त्याला कधी भेटलीच नाही.

"हे इश्कविश्क प्यारव्यार असं काही नसतं रे. सगळी मोहमाया ती. अशी मुलगी शोध जी तुझ्यापेक्षा विरुद्ध असेल. सगळ्याच बाबतीत. तेव्हाच तुझा सुखाचा संसार होईल. माझ्या मागे लागशील तर हात धुऊन बसशील. हे लग्नबिग्नाची भानगड नको बाबा आपल्याला. आज एक तर उद्या दुसरा मुलगा फिरवायचा अशी आहे मी. आय वॉन्ट लिव्ह लाईक अ फ्री बर्ड!"
तिच्या या तत्वज्ञानाने तो पूर्णपणे कोलमोडला होता. तरीही लग्न करीन तर तुझ्याशीच ही शपथ त्याने खाल्ली होती.

'वेडा होतो तेव्हा. मनही वेडे होते. आता मात्र मनाचे एकट्याचे नाही तर दिल और दिमाग दोघांचे मिळून ऐकायचे.' निशीकडे एक कटाक्ष टाकून तो स्वतःलाच म्हणाला.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.
प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव.*
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all