चिंब तू.. चिंब मी! भाग -१

ओल्याचिंब पावसातील ओलीचिंब कथा!

चिंब तू.. चिंब मी! (पावसाळी कथास्पर्धा )

भाग -एक.'कहाँ से आए बदरा

घुलता जाए कजरा..

कहाँ से आए बदराऽऽ..'

मुसळधार बरसणारा पाऊस आणि तिच्या मनात घोळणाऱ्या या ओळी..

पाऊसवेडी ती. पहिला पाऊस, दुसरा पाऊस असं समीकरण तिला कधी मांडताच आले नाही. पाऊस म्हणजे तिच्यासाठी फक्त पाऊस असायचा. कधी रिमझिम.. कधी मुसळधार! भिजताना ती त्याच्यावर अलगद व्हायची स्वार!

अशी ही पाऊसवेडी. आज मात्र धो धो कोसळणाऱ्या पावसात डोळ्यातील पावसाला रोखू पाहत होती. डोळे तिचेच असले तरी त्यांनी आज तिच्याशी असहकार पुकारला होता. डोळ्यातील काजळ त्या पावसात अलवारपणे मिसळू लागला होता. अन मनात त्याच ओळी पुन्हा फेर धरत होत्या.


'कहाँ से आए बदरा

घुलता जाए कजरा..

कहाँ से आए बदराऽऽ..'


ती निशी.. वय वर्ष पस्तीस! आईने म्हणजे मायाताईने मोठया हौसेने तिचे नाव निशी ठेवलेले. कारण तिचा जन्मच मुळी रात्रीचा. तीही काही खूप अशी देखणी नव्हतीच! सावळीशीच.. रात्रीपूर्वीच्या संधीप्रकाशासारखी. पण चेहऱ्यावर एक तेज होते. तिचे टपोरे काळे डोळे, एकदम कुणालाही भूल पाडतील असे नसले तरी बोलके होते. एक आत्मविश्वास होता मनात. काहीतरी वेगळं करण्याची वृत्ती अन तेवढीच धमकही. अभ्यासात हुशार. अगदीच एकपाठी नसली तरी एकदा वाचलेले बरेचशे टकुऱ्यात शिरायचे.


अशी ही आपली निशी, या कथेची नायिका. बोलघेवडी, जीवनाचा आनंद मनमुराद लुटणारी! मग अशी ही आनंदवेडी पावसापासून दूर कशी पळणार? तिचा जन्मच मुळी पावसातला. पावसातला की सरत्या पावसातला? भाद्रपद सरून माघारी बरसलेल्या पावसात ती जन्मली. पावसाळा सरत आला होता पण त्याचं दान हिच्या पदरी मात्र मात्र पुरेपूर पडलं होतं.


थोरल्या बहिणीच्या रिद्धीच्या पाठीवरचा हिचा जन्म! बापाला म्हणजे शामरावांना मुलगा हवा होता. पहिली पोरगीच तेव्हा चिडचिड करणारा बाप हिच्या जन्माच्या वेळी आनंदी नव्हता पण तेवढा नाराजही झाला नाही. कारण तिच्या आईला गरोदरपणात त्याच्या गेलेल्या आजीने दृष्टांत दिला म्हणे. मग आपलीच आजी परत आली असं समजून त्यानं हिला स्वीकारलं.

आजीचं रूप म्हणून मग थोरलीच्या तुलनेत जरा सुटच भेटली हिला. अभ्यासात हुशार म्हणून बापाची आणखी लाडकी. रिद्धी जेमतेम. एकच गोष्ट तीनवेळा वाचली की मग त्यातली अर्धी डोक्यात भरायची. 'ढ' चा एक ठपका रिद्धीला बसलेला तर ही हुशार म्हणून मिरवणारी!


दिवसामाजी दिवस पुढे सरकत गेले. ऋतुचक्र बदलत गेले. दोघी बहिणी मोठया होत होत्या. थोरलीच्या रूपात आणखी भर पडत होती. नवतारुण्याचं चैतन्य अंगावर ल्यालं होतं. निशीपेक्षा ती जराशी उजळ, सरळ चाफेकळी सारखं नाक. हसताना गालावर पडणारी खळी! तिच्याकडे बघून कोणीही खलास होऊन जाईल. लहानपणी शामरावानं फारसे लाड केले नव्हते, ती उणीव आईने भरून काढली होती. निशीपेक्षा आईचा रिद्धीवर जरा जास्तच जीव. तिला ती तिचेच प्रतिरूप वाटे. तिच्या बालपणात तीही आपले बालपण परत जगली होती.

निशीच्या जन्मानंतर घरातले चक्र काहीसे फिरले होते. नवऱ्याची नोकरी गेली आणि मग कामाला वाहून घेतलेल्या तिला निशीच्या बाळलिलेत रमायला वेळच मिळाला नाही.


हुशार म्हणून निशी तेराव्या वर्षीच शिकायला नव्या शहरात गेली. रिद्धी मात्र गावातल्याच कॉलेजला होती. तिचे कलेकलेने वाढणे तिची आई अनुभवत होती. अभ्यासात फारशी हुशार नसली तरी तारुण्यात सुंदरतेने मुसमुसलेली तिला बघून शामराव खूष होते. कोणतेही चांगले स्थळ तिच्यासाठी येईल अन तिच्या जीवाचे सार्थक होईल असे त्यांना वाटे. रिद्धीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. आत्याच्या मुलावर तिचा जीव बसला होता.

बापाने स्थळं पाहणे सुरू केले तशी ती त्याच्यासोबत पळून गेली कारण शामरावांना तो रुचला नव्हता.

बापाचेच काळीज ते. द्रवणार नाही तर काय होईल? पण हा बाप जरा उलट्या काळजाचा होता. आतापर्यंत रिद्धीचे भले व्हावे असा चिंतणारा तो आता मात्र तिच्या नावाने आंघोळ करून मोकळा झाला. मला एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे निशी! हेच तो साऱ्यांना सांगे. ही निशीच त्याचे नाव काढेल, याची त्याला तिळमात्र शंका नव्हती. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल गर्व! त्याच्या मनात तिच्यासाठी एक खास स्थान. निशीलाही बापाबद्दल आदर, तिला त्याचा अभिमान!


आईचे काळीज रिद्धीसाठी तीळतीळ तुटायचे. शामरावाच्या काळजात निशीचेच नाव कोरले असायचे. त्याच्या डोळ्यातील स्वप्न आता तिची झाली होती. बापलेकीच्या कहाणीला नवी सुरुवात झाली होती.


बाबाचा शब्द म्हणजे निशीसाठी अंतिम शब्द! ते म्हणतील तीच पूर्व दिशा. तिच्या अशा वागण्याने तिच्याच आयुष्याची होईल का निशा?

*******


"डोळ्यातल्या अश्रुंना सांग, म्हणावं एवढं बरसू नकोस." ऋषिकेश निशीकडे एक कटाक्ष टाकून म्हणाला.


"हं?" तो बोलतोय ते आपल्या काळजीने, या विचाराने क्षणभर हरखली ती. पण क्षणभरच!

तिच्या मनातल्या 'कहाँ से आए बदरा..' चा सूर लुप्त झाला होता.


"आधीच बाहेर पाऊस कोसळतोय. त्यात तुझ्या डोळ्यातील पावसाची भर! वैताग आलाय नुसता. त्यात तुझ्या डोळ्यातील काजळ देखील बाहेर पसरत चाललाय." कार पुढे दमटवत तो म्हणाला.


त्याच्या बोलण्याने तिचे हरखून जाणे तिथेच थांबले. 'असा कसा हा इतका रुड आहे?' तिच्या मनात विचार डोकावला. हा असा आहे हे लग्नाच्या पहिल्याच रात्री कळलं होतं तरी एवढे दिवस घालवलेच की याच्यासोबत. आजच्या दिवसाची आतुरतेने वाटही बघत होते. मग आता का रडू येत आहे?'


"निशी कम ऑन यार! अशी टिपिकल बायकोसारखी आजतरी रडू नकोस. आपलं ठरलं होतं ना की वर्षांच्या आत डिवोर्स घ्यायचा. हा आपला दोघांचाही करार होता. मग का रडते आहेस तू?" त्याची चिडचिड होत होती.

आपण का चिडतोय हे त्यालादेखील जाणवत नव्हते. काहीतरी चुकतेय खरे असे मात्र राहूनराहून जाणवत होते.


"सॉरी यार! मी उगाचच चिडतोय तुझ्यावर. पण तुला माझा स्वभाव माहितीय ना? मग का एवढं मनाला लाऊन घेतेस? मला तर वाटलं होतं की आजचा दिवस आपण मस्तपैकी सेलिब्रेट करणार. तू मात्र अशी हिरमुसून बसली आहेस." त्याने परत तिच्याकडे एक नजर टाकली.


'आत्ताच एवढा चिडला होता. आता कसा काळजीने बोलतोय? काय तर यार म्हणे! एवढी जवळची वाटते मी तरी का असा वागतो हा? आणि ऋषी, तुझा स्वभाव मला नाहीतर आणखी कोणाला रे कळणार? दहा पंधरा दिवस वगळले तर वर्षाचे तीनशे चाळीस -तीनशे पन्नास दिवस तुझ्याच तर सोबत होते मी. एखाद्याचे मन कळायला एक क्षणही पुरेसा असतो आणि कधीकधी आयुष्यभर सोबत असूनही ते उमगत नाही.'

तिने डोळे मिटून घेतले आणि डोके जरासे कलते करून बसली. तेवढ्यात त्याने ब्रेक लावला.


"बाईसाहेब उतरा खाली." त्याने जणू ऑर्डरच सोडली.


"इथे?" इतक्या वेळचा निशीच्या तोंडून निघालेला पहिला शब्द!


"हूं. तिकडे बघ. मक्याचे कणीस दिसते आहे." तो.


"त्याला भुट्टा म्हणतात अरे." ती.


"हां! तेच ते. तुला आवडतं ना? चल खाऊया."


"तुला तर असं रस्त्यावरचं काही आवडत नाही." तिच्या डोळ्यात आश्चर्य होते.


"हो गं. पण आज चालेल मला. तुझ्या आवडीचे आज काहीतरी करावे असे वाटत होते. मग भुट्टाच सही!" तो कारमधून बाहेर आला आणि तिच्या बाजूचा दरवाजा उघडून तिच्या समोर आपला हात पुढे केला.


ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच होती.

'ऋषी, एवढा जपतोहेस मला. माझी छोटूशी आवड तुला पूरी करावीशी वाटतेय. मग तू मला आवडायला लागला आहेस हे तुला कळत नसावे का रे?' तिने त्याच्याकडे बघत डोळ्यांनीच प्रश्न केला.


तो प्रश्न त्याच्यापर्यंत पोहचला की नाही कोणास ठाऊक? कारण त्याच्या डोळ्यावरचा गॉगल त्याने काढलाच नव्हता. तिच्यासमोर त्याने हात पुढे केला होता. त्या हाताला हातात घेऊन ती उतरेल असे त्याला वाटले. ती मात्र आपली नाजूक शिफॉनची साडी सावरत स्वतःच उतरली. त्याने आपला हात आपसूकच मागे घेतला.


'का करतोय मी असं? आजवर तिच्यापुढे कधी हात पसरला नव्हता. आज का तिचा हात हातात घ्यावासा वाटतोय?' हात मागे घेताना त्याच्या मनाला विचार शिवला.


"मिस्टर, पाऊस कोसळतोय. डोळ्यावरचा गॉगल तेवढा काढा." हातातील छत्री त्याच्या डोक्यावर धरत ती म्हणाली.


असं पावसात कोण गॉगल घालतं? खरं तर हा प्रश्नच होता. पण तिलाही त्याच्या डोळ्यातील पाऊस दिसला तर? या दुसऱ्या प्रश्नापायी आतापर्यंत त्याने गॉगल तसाच ठेवला होता.

"तुला आवडतो ना पाऊस? मग छत्री का उघडलीस गं? भिजूयात ना आपण." गॉगल काढताना शिताफीने डोळे पुसत त्याने विचारले.

"आवडेनासा झालाय रे तो." किती सहजतेने बोलून गेली ती.

"मला आवडायला लागलाय तो!" तोही तेवढ्याच सहजपणे म्हणाला.

चालता चालता तिची नजर त्याच्याचकडे! जणू तिचे डोळे त्याच्या डोळ्यांना विचारत होते,

'माझा तर जीव गुंतलाय तुझ्यात

तूही गुंतलाहेस का तेवढाच माझ्यात..?'

:

क्रमश :

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

******

ऋषी आणि निशी.. दोघेही प्रेमात चिंब भिजलेले! मग कुठे शिंकली माशी? काय आहे यांची कहाणी? वाचा पुढील भाग.

चिंब तू.. चिंब मी!

*साहित्यचोरी गुन्हा आहे.

प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव.*

*******
🎭 Series Post

View all