चिंब तू.. चिंब मी!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
भाग - दहा. (अंतिम)
'उद्या धोत्र्याला घरी बोलावून खरं खोटं काय ते वदवून घ्यायलाच पाहिजे.' आजीने मनातल्या मनात निर्णय घेऊन टाकला.
****
"ऋषीऽऽ"
निशी खोलीमध्ये आली तीच मुळी ऋषीच्या नावाने हाका मारत.
"अरे, आता तुला माझ्याशिवाय क्षणभरही करमत नाही का गं? आहे मी इथेच." बाथरूममधून बाहेर येत तो म्हणाला.
"मस्करी नको रे. इथे सगळा घोळ झालाय."
"काय झाले?" त्याच्या प्रश्नावर तिने स्वयंपाकघरात घडलेला प्रसंग सांगितला.
"म्हणजे आजीने कुणाला सांगत नाही म्हटलं अन अख्ख्या घराला हे सांगून टाकले तर. आजीचा खेळ आता तिच्यावरच उलटणार बघ तू."
"अरे कसला खेळ नि कसले काय? मला इकडे टेंशन आलेय नि तुला खेळ सुचते आहे. आता मी आईला कसे फेस करणार?" ती.
"इतकी पॅनिक होऊ नकोस. माझी आई भोळी आहे गं. तिला आजीने गुंडाळले असेलच. पण आता तिला मी दाखवून देणारच की वो आज्जी हैं तर मै भी उसकाच नातू हूं." तो जोमात आला होता.
"अरे, म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू?" तिला अजूनही उमगत नव्हते.
"मी एकटाच नाही, आपण दोघे मिळून करू आणि सोबतीला ते धोत्रे वकील."
"पण करायचे काय आहे?" ती.
"लग्न! त्यांना वाटू दे की आपण घटस्फोट घेतोय. आपण त्यांना परत एकदा लग्न करून सरप्राईज देऊया." तो तिला सांगत होता.
"ऋषी, तू लग्नाचा विषय काढलाच आहेस तर मलाही त्यावर बोलायचे होते. भावनेच्या भरात मी तुला लग्नाला हो म्हटले पण एकदा लग्न झालेय ना आपले. मग परत का?"
"निशी ते लग्न इतरांसाठी लग्न होते पण आपल्यासाठी खरंच होते का गं? आपले लग्न, लग्न नव्हतेच मुळी. तडजोड होती ती आपणच आपल्याशी केलेली. एक अलिखित करार! मी आईसाठी लग्नाला तयार झालो तर तू तुझ्या बाबांच्या शब्दाखातर. लग्नाच्या पहिल्याच रात्री आपण ठरवलं की एका वर्षांच्या आत वेगळे व्हायचे. तसा करार देखील आपण केला होता. त्या लग्नात ना मी खूष होतो ना तुला मनासारखे काही करता आले. म्हणून तर काल मी तुला विचारले होते, माझ्याशी लग्न करशील का म्हणून."
त्याचे उत्तर ऐकून तिच्या डोळयात पाणी आले.
"ए वेडाबाई, आता का रडतेस? आता तुझ्या ओठावर मला फक्त हसू बघायचे आहे. प्रत्येक मुलगी तिच्या लग्नात आनंदी असते, तो आनंद बघायचा आहे. मलाही माझी हौस मिरवायची आहे. नि मुख्य म्हणजे आई तेव्हा आजारी होती म्हणून काही करू शकली नाही ना, तर तिलाही आता तिच्या इच्छा पुऱ्या करु द्यायच्या आहेत."
"ऋषी, किती समजूतदार आहेस रे तू! मला ना शिल्पीला एकदा भेटायचे आहे. तिला थँक यू म्हणायचे आहे.कारण तिने तुला नकार दिला म्हणून तर हा हिरा माझ्या पदरात पडला." ती.
"मग अशाने तर मलाही आदित्यला भेटायला हवे, काय म्हणतेस?" तो.
"नको रे, त्यापेक्षा आपला भूतकाळ मागे ठेवून आपण पुढे जाऊया. तुला काय वाटते?"
"तुझ्याचसारखे." त्याच्या बोलण्यावर ती खुदकन हसली.
दोघे बाहेर आले तेव्हा आजीची सांशक नजर त्या दोघांवरून आळीपाळीने फिरत होती.
ते ऑफिसला निघाले तरीही ती विचार करत होती. ऋषीने जाता जाता तिला विचारले देखील, आजी बरं नाहीये का म्हणून. शेवटी ती त्याचीच आजी. ती थोडीच ताकाला तूर लागू देणार होती?
"बरे आहे." म्हणून तिने त्याला हाकलले.
******
ऑफिसला जाण्यापूर्वी ऋषी आणि निशी दोघेही धोत्रे वकिलाकडे गेले नि आपण घटस्फोटाचा अर्ज मागे घेत आहोत म्हणून सांगितले.
"अरे? तुमचे कालपर्यंत फायनल झाले होते ना? मग आज अचानक विचार कसा बदलला?"
"बदलला." तो.
"मग आता?"
"तुम्हीच आजीला आमच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं ना, मग आता तुम्हीच ते निस्तरा." ऋषी.
तेवढ्यात वकिलांचा फोन वाजला. "ऋषी, अरे तुझ्याच घरून फोन येतोय."
"घ्या मग. आजीच असणार. तिला सांगा तिने जे ऐकले होते ते खरे आहे."
"पण तुमचा विचार बदलला होता ना?" धोत्रे.
"काका अहो, ते तुम्हाला माहितीये, आजीला नाही." ऋषी.
"गंडवणार पोरगं अशाने." स्वतःशीच बोलत त्यांनी फोन उचलला.
"धोत्र्या, उद्या दुपारी दोन वाजता घरी ये. मला बोलायचं आहे तुझ्याशी. कारणं सांगू नकोस." त्यांच्याकडून हो-नाही असे काहीच न ऐकता आजीने फोन ठेवून देखील दिला.
"ऐकलं ना? आता सांग काय करायचं?"
"आम्ही म्हणतो तसे करायचे." निशी हसून म्हणाली.
मग दोघांनी त्यांना आपला प्लॅन समजावून सांगितला. वकीलसाहेबांनी दोघांना कोपरापासून हात जोडले.
*****
"ऋषी, होईल ना रे सर्व ठीक? मला भीती वाटत आहे." रात्री झोपेची तयारी करताना निशी त्याला विचारत होती.
"निशी आता प्रेमात पडलोच आहोत तर पोहायला तर लागेलच. नि काळजी नको करू गं. सगळे व्यवस्थित होईल." तो.
"आणि ऐक ना, मी जरावेळ बेडवरच थांबतो."
"ए, नाही हं. लग्नापूर्वी मी तुला बेड शेअर करू देणार नाही." तिचे टपोरे डोळे आणखी मोठे करत ती म्हणाली.
"अगं, मलाही करायचा नाहीये, पण.." त्याचे बोलणे पुरे होण्याआधीच दार वाजले.
"झोपलात का?" आईच्या आवाजाने तो दार उघडायला उठला. " ही सीआयडी ची गँग येणार हे ठाऊक होतं मला."
"अगंबाई अजुन जागेच आहात होय? मला वाटलं झोपले असणार. बरे आहे ना तुला? निशी तू ठीक आहेस ना गं? म्हणजे कालचा पाऊस बाधला नाही ना तुला?" पुष्पा त्यांच्याशी बोलत तर होती, नजर मात्र सारखी सोफ्याकडे भिरभिरत होती.
"बरे आहेत ते. चल, झोपु दे त्यांना. गुडनाईट रे पोरांनो." आजी तिला घेऊन गेली.
त्या गेल्यावर दोघेही हसायला लागले.
"आईची माया वेडी असते रे. ऋषी यू आर लकी की तुला एवढी गोड आई मिळाली." निशीच्या बोलण्याला त्याने दुजोरा दिला.
सोफ्यावर आपला बिछाना टाकून त्याने अंग टेकवले. पाठमोरी त्याला ती न्याहाळत होती.'बाबांच्या इच्छेखातर मी याच्याशी लग्न केले पण त्यांचा हा निर्णय चुकीचा नव्हता. त्यांनी नेहमीच माझे हित चिंतले, रिद्धीताईला देखील त्यांनी माफ केले असते तर?'
"झोप गं. नंतर मग मलाच बघत राहायचे आहे." त्याच्या आवाजाने लाजून तिने तोंडावरून पांघरून घेतले.
थोड्यावेळाने तो तिची चादर ओढतोय असे तिला जाणवू लागले. धडधडत्या छातीने तिने आपली चादर पुन्हा घट्ट पकडली.
"अगं ए भित्री भागुबाई, तुझा मोबाईल केव्हाचा वायब्रेट होतोय ते सांगायला आलोय. ऊठ." त्याने थोडया जोरानेच तिची चादर ओढली.
त्याच्याकडे खुन्नस नजर टाकून तिने आपला मोबाईल हिसकावला. रिद्धीचा फोन होता. इतक्या रात्री फोन बघून तिने काळजीनेच उचलला.
"निशू ऽऽ.."
"ताई तू बरी आहेस ना?" तिचा आवाज ऐकून तिने विचारले.
"हो गं राणी, मी खूप खूष आहे आज." तिच्या आवाजातून तिचा आनंद जाणवत होता.
"निशू, तू मावशी होणार आहेस." रिद्धी बोलली तसे निशीने आनंदाने उडी मारली.
"वॉव! ताई, किती गोड न्यूज दिलीस. आय एम सो हॅपी!" निशी.
"पुढची न्यूज ऐकशील तर आनंदाने वेडी होशील. तुला माहितीये निशी? हॉस्पिटलमधून आल्यानंतर मी आपल्या घरी फोन केला होता .घाबरतच. पण बाबा चक्क बोलले माझ्याशी. न्यूज ऐकून तर आईला घेऊन घरीसुद्धा आले होते. आत्तापर्यंत ते इथेच होते. म्हणून तुला उशिरा फोन केला."
"ताई, ताई, ताई. किती ग्रेट न्यूज दिलीस अगं. मी खूपच खूष आहे." तिच्या डोळ्यातून आनंदाच्या सरी वाहत होत्या.
फोन ठेवल्यानंतरही ती कितीतरी वेळ रडतच होती.
"ए वेडाबाई, अगं आनंदाची बातमी होती तरी किती रडशील?" तिचे अश्रू पुसत तो म्हणाला.
"ऋषी, किती समजून घेतोस रे तू मला. पुढे जाऊन आपल्या मुलीने असे काही केले तर तिलाही समजून घेशील ना?" ती स्फुन्दत म्हणाली.
"वेडीच आहेत तू. आधी आपल्या मुलीला या जगात तर येऊ दे." तिच्या डोक्यावर त्याने टपली मारली तसे भानावर येऊन ती पुन्हा चादरीच्या आत गडप झाली.
******
दुसऱ्या दिवशी दुपारी आजी पुष्पा आणि मनोहरसमोर धोत्रे वकिलाची शाळा घेत असताना ऋषी आणि निशी ऑफिसमधून घरी आले.
"आता पोरही इथेच आहेत. बंड्या खरं काय ते सांगून टाक." मनोहर.
"हो, ही दोघं घटस्फोट घेणार होती पण.."
"पण काय?" पुष्पाच्या डोळ्यात गंगायमुना उभ्या राहिल्या होत्या.
"काकू हे पाकीट घ्या आणि तुम्हीच बघा काय ते." धोत्रेने आजीकडे एक लिफाफा दिला.
मोठया कुतूहलाने आजी तो उघडत होती. मनोहर आणि पुष्पा काय असेल म्हणून उत्सुकतेने तिच्याकडे डोकावत होते तर ऋषी आणि निशी खाली मान घालून उभे होते.
आजीने लिफाफा उघडला नि तिच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटले. त्यात ऋषीने आपल्या हाताने डिझाईन केलेले लग्नाचे कार्ड होते.
आठ दिवसावर मुहूर्त येऊन ठेपला होता.
"लबाडांनो हे आहे होय तुमचे खरे रूप. माझ्या सुनेला तर तुम्ही पार घाबवूनच सोडले होते." त्या दोघांचे कान पकडत आजी म्हणाली.
"पण मग या बंड्याकडे तुम्ही का गेला होतात?" मनोहरने विचारले.
ऋषी काही बोलणार तोच निशी पुढे आले.
"ऋषी मला बोलू दे. आपल्या पुढच्या आयुष्याची सुरुवात मला खोटे बोलून करायची नाहीये. हो बाबा, आम्ही खरंच घटस्फोट घ्यायलाच वकिलांकडे गेलो होतो. पण ती केस फाईल झाली नि आम्हाला आमच्या प्रेमाची जाणीव झाली." तिच्या बोलण्याला साथ देत ऋषीने मग पूर्ण सत्य सांगितले. त्याच्या आयुष्यातील शिल्पी त्यांना ठाऊक होती, निशीच्या भूतकाळातील आदित्यही त्यांना माहीत झाला.
"सत्य बोलायला खूप हिंमत लागते पोरी. तुम्ही दोघांनी स्वतःच्या मर्जीविरुद्ध लग्न केले असले तरी एकमेकांपासून आपला भूतकाळ लपवून ठेवला नाही यातच तुमच्या नात्याची पारदर्शकता दिसून येते. तुमच्या नात्याची दोरी तर वरूनच बांधली होती, तुम्हाला मात्र ते आत्ता जाणवलं." दोघांनाही जवळ घेऊन कुरवाळत आजी म्हणाली.
पुष्पाताई आणि मनोहर यांनाही त्यांचा अभिमान वाटत होता.
*******
ठरल्याप्रमाणे लग्नाचा दिवस उजाडला. नव्या नवरीच्या रूपात निशीचे सौंदर्य उठून दिसत होते. आनंदाने आणखीनच त्या निखारात भर पडली होती. त्यांच्या लग्नाचा पाहिला वाढदिवस अन त्याच दिवशी त्यांनी नव्याने बांधलेली लग्नगाठ! मायाताई आणि शामराव हे आले होतेच पण त्यांच्यासोबत रिद्धी आणि तिच्या घरचेही आले होते. शेवटी सर्वांचे सूर एकत्र जुळले होते.
दुसऱ्या दिवशीची पूजा आटोपली आणि मग प्रथेनुसार रात्री खास आजीने तयार करून दिलेला मसल्याच्या दुधाचा पेला घेऊन निशी नव्याने त्यांच्या खोलीत गेली.
"आता तरी मला बेड शेअर करू देशील ना?" तिचा लाजेने लाल झालेला चेहरा ओंजळीत घेत ऋषीने विचारले.
ती आणखीन लाजली.
"इतकी लाजू नकोस. हे घे, दूध पी." त्याने दुधाचा ग्लास तिच्यासमोर धरला.
"ऋषी, आजीने ते तुझ्यासाठी दिलेय." ती हळूच कुजबुजली.
"हम्म! पण मला दूध अजिबात आवडत नाही. म्हणूनच तर मागच्या वर्षीही तुलाच प्यायला दिले होते." तोही कुजबुजत म्हणाला.
"काय? मला वाटले की तू काळजीपोटी ते दिलेस. पण तू तर.."
तिने त्याच्या अंगावर लटक्या रागाने उशी फेकली. त्यानेही तिच्यावर दुसरी उशी फेकली. उशांच्या त्या खेळात ऋषीच्या बाहुपाशात ती केव्हा विसावली तिलाही कळले नाही.
बाहेर श्रावणसरी कोसळत होत्या, इकडे ऋषीच्या सुरात तिचे सूर मिसळले होते.
'आओगे जब तुम ओ साजनाऽऽ
अंगना फूल खिलेंगे
बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम झूम के
दो दिल ऐसे मिलेंगे..
आओगे जब तुम ओ साजना..!'
*****समाप्त ******
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.
प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव.*
फोटो गुगल साभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा