चिंब तू.. चिंब मी! भाग -४

मुसळधार पावसातील एक बेधुंद कथा!
चिंब तू.. चिंब मी!
भाग -चार.
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)



'खरंच मी खूष आहे का?' आजी गेल्यावर निशीने स्वतःला प्रश्न केला. तिच्या मनाने काय उत्तर दिले ते माहीत नाही पण तिचे ओठ पुन्हा रुंदावले खरे.

ऋषीच्या वागण्यात होणारा बदल आज तिने टिपला होता. कारमधून उतरताना त्याने स्वतःहून समोर केलेला हात, त्याचे ते रस्त्यावरचे कणीस खाणे, पावसातील भिजणे, तिच्याकडे टाकलेला त्याचा चोरटा कटाक्ष..! हे सारेच नवीन होते तिला. हा त्याच्यातील बदल होता की घटस्फोटाची याचिका दाखल झाल्याच्या आनंदात त्याने केलेली कृती? तिलाही उमजत नव्हते.

आजी खोलीबाहेर जाण्याची नि ऋषी आत येण्याची एकच गाठ पडली. तो आत आला तेव्हा निशीच्या चेहऱ्यावर गोंधळलल्याचे भाव होते. त्याला वाटले की आजी तिच्याबरोबर देखील धोत्रे वकिलांबद्दल बोलली असावी.

"निशी, आजी काही बोलली का तुला? तिचे बोलणे एवढे मनाला लाऊन घेऊ नकोस." कपडे बदलायला बाथरूमकडे जात तो म्हणाला.

'खरंच, हा म्हणतोय तसे आजींचे बोलणे मनाला लाऊन नको घ्यायला. आपल्यापासून वेगळे होऊन हा खूष असेल तर कशाला वाईट वाटून घ्यायचे?' ती स्वतःला समजावत होती.

ऋषी फ्रेश होऊन आला तर त्याला ही खिडकीतून बाहेर पाहत असताना दिसली. पावसाची सर आता ओसरली होती तरी बारीक रिपरिप सुरूच होती. निशी पाठमोरी उभी होती. तो तिला न्याहाळत होता. पाठीवर मोकळे सोडलेले कुरळे केस, स्तिथप्रज्ञासारखी निश्चल उभी असलेली ती.

'आजी म्हणते तसे खरंच चुकत आहे का माझे? शिल्पी आता माझ्या आयुष्यात नाहीच आहे, तरी तिच्या आठवणीत मी रोज कुढत असतो. चुकीचे आहे हे सगळे. पण ती माझे पहिले प्रेम होती. पहिले प्रेम कधी विसरता येतं का? आणि निशीचे काय? इतक्या दिवसात तिची सवय झालीये मला. मग तिच्यशिवाय राहणं मला शक्य होईल? पण ती तरी तिच्या पहिल्या प्रेमाला कुठे विसरली आहे?' 

त्याच्या डोक्यात प्रश्नांचा नुसता कल्लोळ माजला होता. कानात हेडफोन टाकून तो डोळे मिटून शांत बसून राहिला. 'आता कसलेच विचार नकोत. मी आणि राहत फते अली खान! बस्स.' त्यांचे एकेक नगमे तो ऐकू लागला. डोळ्यातून उष्ण थेंब गालावर आले तसे त्याने हेडफोन काढून फेकले.
'साला, जिच्यावर एवढा जीव ओवाळून प्रेम केला त्या शिल्पीने नकार दिला तरी डोळ्यातून एवढी आसवं वाहिली नाही, मग आता का इतके अस्वस्थ वाटत आहे?'

उठून तो हॉलमध्ये आला. रिमोट हातात घेऊन उगीच चॅनल बदलवण्याचा खेळ खेळू लागला.

रात्री नेहमीप्रमाणे हसत खेळत सगळ्यांची जेवणं पार पडली. सगळ्यांचे आनंदी चेहरे बघून निशीच्या डोळ्यात आपसूकच पाणी आले. हे आनंदी घर आता काही दिवसांचेच सोबती आहे. मग मी इथे नसेन. आपल्या जमदग्नी बाबाकडे तर जाता यायचे नाही. ताई आपल्या मर्जीने घर सोडून गेली तर त्यांनी तिला कायमचे आपल्या आयुष्यातून कमी केले. मी तर घटस्फोट घेतला हे त्यांना कळेल तर त्यांच्या रागाच्या स्फोटात माझे काय होईल? आणि ऋषीचे काय? त्याच्या घरचे लोक कसे रिॲक्ट होतील?'

"अगं निशी, कुठे हरवलीस? ताटातील वरण केव्हाच संपलेय. कोरडा भात खातेस तरी तुला कळले नाही." पुष्पाच्या आवाजाने ती भानवर आली. ओशाळल्यासारखे होऊन तिने भराभरा आपले जेवण आटोपले आणि स्वयंपाकघर आवरायला निघून गेली.

*******

"यांचे काही बिनसलेय का गं?" रात्री झोपताना मनोहर(ऋषीचे बाबा) पुष्पाताईंना विचारत होते.

"नाही हो. बाहेरून फिरून आलेत आज दोघं. मुख्य म्हणजे तुमचा लेक पावसात भिजला, पहिल्यांदा. निशीमुळे बदलतोय बरं तो." त्यांच्या हसण्याने मनोहरही हसले.

"चला, म्हणजे ऋषीची गाडी मार्गी लागली म्हणायची. आता पुढच्या वर्षी आपल्या घरी जुनिअर ऋषी किंवा निशी यायची शक्यता दिसतेय." मनोहर हसत हसत उदगारले.

"ईश्श! तुमचं आपलं काहीतरीच!" पुष्पाताई लाजल्या.

"पुष्पे, तू कशाला लाजतेस? तुमच्या जुनिअरबद्दल नाही, मन्या आपल्या ऋषीच्या ज्युनिअर बद्दल बोलत आहे." आजी आत येत म्हणाली.

"सासूबाई, तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकलंत ना? असे चोरून ऐकणे फार वाईट."

"गप गं. तू मला अक्कल शिकवू नकोस. येताना माझ्या कानावर पडले म्हणून मी बोलले. अशा खाजगी गोष्टी बोलताना दाराची कडी लावायची असते, एवढं साधं तुला कळत नाही?"आजी फणकाऱ्याने म्हणाली.

त्यांचे बोलणे सुरू असताना मनोहरने उठून खुर्ची घेतली अन त्यावर मस्त बैठक मांडून ते बसले.

"मन्या, तिकडे कुठे बसतोस? इकडे ये. मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी."

"अरेच्चा! तुमचं भांडं इतक्यात मिटले का? मला वाटलं किमान चांगला अर्धातास तरी माझे मनोरंजन होईल." मिश्किल हसत मनोहर.

"हसतोस काय गधड्या? मामला जरा सिरीयस आहे. तुमच्या ज्युनिअर संबंधी आहे." डोळे बारीक करून आजी.

"आई, काय झाले?" पुष्पाताईच्या चेहऱ्यावर चिंता.

बायको 'सासूबाई' वरून 'आई'वर आली म्हणजे नक्की काहीतरी सिरीयस आहे हे उमगून, मनोहर उठून त्यांच्याजवळ येऊन बसले.

आजी चेहऱ्यावर गंभीर भाव आणून बसली होती. पुष्पा आणि मनोहर तिच्या चेहऱ्याकडे नि मग एकमेकांकडे पाहत होते. दोनेक मिनिटं अशीच गेली.

"आई, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन सिरियस सिचूएशन साठी परफेक्ट मॅच झाले आहेत. आता तरी बोलाल का?" पुष्पाताईच्या नजरेत काळजी दिसत होती.

आजीने चष्मा नाकावर ओढून तिच्याकडे पाहिले आणि परत तो डोळ्यावर नीट बसवला.
"ऊहूं ऊहूं.." खाकरत गळाही साफ केला.

"आईऽऽ " पुष्पाचा अधीर स्वर.

"मन्या, आज धोत्र्याचा फोन आला होता." मनोहरकडे बघून आजी.

"कोण? बंडया का? आणि त्यानं तुला का फोन केला?" मनोहर.

"हम्म. वकील आहे ना तो. म्हणून त्याने फोन केला होता. माझ्या नव्हे, तुमच्या चिरंजीवाच्या बाबतीत." आजी.

"का गं? त्याच्या कामाच्या ठिकाणी काही लोचा वगैरे झाला आहे का?"

"मरू दे हो त्याचं काम. काही भानगड असेल तर सोड म्हणा ती नोकरी. त्याला काय छप्पन्न दुसऱ्या नोकऱ्या मिळतील. असं वकीलाकडं का जायचं?"  इति पुष्पा.

"छप्पन नोकऱ्या नाही, छप्पन छोकऱ्या असं आहे ते!" मनोहरने लागलीच तिची चूक दुरुस्त केली आणि पुष्पाने त्यांच्याकडे बघून डोळे वटारले. तिचे ते रूप पाहून त्यांनी  लागलीच जीभ चावली.

"इथं जवळ आहे तीच एक छोकरी टिकव म्हणावं आधी. कुणाचं काय नि कुणाचं काय चाललंय." आजीने डोक्याला हात लावला.

"आई, अहो काय बोलताय?"

"पोरं आज धोत्र्याकडं गेली होती." आजी.

"म्हणजे सोबत निशीसुद्धा?" पुष्पाचा प्रश्न.

"हो. दोघांना घटस्फोट हवाय म्हणे!" आजीने बॉम्ब टाकला.

"काऽऽय?" त्या बॉम्बनी या दोघांचाच स्फोट उडाला.

"आई, अगं बंड्याचा काहीतरी गैरसमज झाला असावा." मनोहर.

"किंवा तुमच्या ऐकण्यात काही गफलत झाली असावी." पुष्पा.

"पुष्पे, माझ्या कानावर शंका घेऊ नकोस आणि मन्या, तो धोत्र्या काही कोर्टात रिकामा बसला नाहीये आपल्याला उगाच फोन करायला." आजीने मग दोघांनाही अहं पासून इति पर्यंत सगळा वृत्तांत सांगितला.

"पण प्रश्न हा येतो की मुळात सगळं चांगलं सुरू असताना दोघांना का वेगळं व्हायचे आहे?" मनोहरांच्या डोक्यावर आठी पडली.

"मला निशी हवी आहे. तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार." पुष्पाताईच्या डोळ्यात पाणी जमा झाले. मनोहर आणि आजी दोघांनीही एकाच वेळी तिच्याकडे पहिले.

"असं का बघताय? म्हणजे ऋषीही मला हवाच आहे पण निशीमुळेच मी जिवंत आहे ना? नाहीतर माझं काही खरं नव्हतं. डॉक्टरांनी हात वर केले होते. निशी या घरात आली नि तिच्या पायगुणाने मी बरी झाले. विसरलात का सगळे?" ती हळवी झाली.
"शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात पण हे दोन वेडे गेलेच चढायला. थांबा, मी दोघांचेही चांगले कान उपटते आणि सांगते.." ती दारापर्यंत पोहचली देखील.

"अगं ए माझे सूनबाई, थांब जरा. त्यांचे त्यांनाच निस्तरू दे ना." आजीने तिला दारातून परत खोलीत घेतले.

"अहो पण आई.." पुष्पाच्या डोळ्यात अजूनही पाणी होते.

"अगं अजून घटस्फोट झाला नाहीये. आता ते दोघं कोर्टाची पायरी चढलीच आहेत तर त्यांनाही थोडा अनुभव घेऊ दे की. बाकी मग आपण आहोतच, पण त्यांना गरज भासल्याशिवाय मध्ये पडायचं नाही." आजी.

"आपल्याला हे पटलंय बुवा. आई तू सॉलिड आहेस बघ." मनोहर.

"अहो पण.."

"पुष्पे, अगं त्यांनी खेळ सुरू केलाय तर आपणही जरा मजा घेऊयात की. त्या दोघांविरुद्ध आपली टीम. बघूया कोण जिंकतं ते! आणि तुला तरी वाटते का की ते दोघं घटस्फोट घेतील?"

"नाही ना, उलट दोघं प्रेमात आकंठ बुडाल्यासारखी वाटतात. मला तर काही सुचतच नाहीये."

"झालं मग. मग तर विजय आपलाच आहे." आजी.

"पण प्रेमात पडल्याचं ते नाटक करत असतील तर?"पुष्पा मध्येच म्हणाली.

"माझ्या नजरेला खरं खोटं काय ते बरोबर कळतं हं! आणि तू आता सीआयडी चे डोके लाऊन त्यांच्या मध्ये पडू नकोस. निश्चिन्त रहा. आपल्याला काही माहीत आहे हे त्यांना कळायला नको." आपल्या खोलीत जाता जाता आजी म्हणाली.

"आपल्याला हे असं उंदरामांजरा सारखं खेळायलाच हवे का? ऋषीशी स्पष्ट बोललो तर काय होईल?" आजी गेल्यावर पुष्पाने मनोहरला विचारले.

"टीव्हीतल्या त्या रटाळ मालिका बघून तुम्ही दोघी नवनवे खेळ खेळत असता ना? तसेच हा सुद्धा एक खेळ समज." अंगावर पांघरून घेत मनोहर उत्तरले.
:
क्रमश :
*********
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.
प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव.*
फोटो गुगल साभार.



🎭 Series Post

View all