चिंब भिजलेले भाग 3

चिंब भिजलेले


राज्यस्तरीय करंडक कथामालिका फेरी
विषय:- प्रेम कथा
कवितेचे नाव:- चिंब भिजलेले भाग 3


हॅलो...


हा बोल रे!


काम झालं पूर्ण.


खरचं! लै भारी.... मग वाट कसली बघतोयस पोस्टव की तुझ्या लिखाणाच्या साईडवर.


अगं पण नाव?


नाव?


हो अगं,लेखिकेच नाव तर लागेलचं. आपण अन्नोन नावाने कथा पोस्ट केली तर कोणीही कॉपीपेस्ट करेल स्वतःच्या नावावर.


अंम्म्म...एक काम कर मधुराणी नाव दे.


वाहह!मस्तचं की. ठीक आहे मी लगेच सगळ्या अपलोड करतो आणि ए बाई.. पहिले तुझं ते जाडजुड पुस्तक म्हणजे ती वही वही तरी कसली माझं रजिस्टर पण तुझ्या मैत्रिणीच्या वही पेक्षा लहान असत ते जे काही चोरून म्हणजे तुझ्या भाषेत लपवून आणलं आहेस ते पहिले घेऊन जा.


तू जरा जास्तच बोलतोयस अस नाही का रे वाटत तुला!


चल बाय ठेवतो मी आणि सगळ्या कथा लगेच पोस्ट करतो.


हम्म आलास ना लाईनवर... बाय आणि पोस्ट केल्यावर मला लिंक शेअर करा...धन्यवाद.


बापरे...प्रत्या... तुला हीच मुलगी आवडली का रे प्रेम करायला. हिला प्रोपोज करता करता जीव जायचा वाटते तुझा? प्रथमेश स्वतःशीच बडबड करत हसत होता.


संध्याकाळी ऐश्वर्या ऑफिसचं काम संपवून मधूला भेटायला येते.


मधु..ए मधु...मधु.....


अगं हो हो..काय आरडाओरडा चालु आहे तुझा?


मला तुझ्या हातचा मस्तपैकी आलं काळेमिरी घातलेला गरमा गरम चहा हवाय.


बरं बाईसाहेब बसा हां आणते. काय गं आज झालंय काय तुला? प्रेमात बिमात पडलीस की काय? नाही म्हणजे स्वारी एवढी खुशीत दिसते म्हणून विचारलं? मधु भुवया उडवत विचारते.


असचं समज हवं तर. आज मला नाही माझ्या प्रेमाला त्याच पहिलं प्रेम मिळवून देणारा आहे मी म्हणून जाम खुश आहे. डार्लिंग.. आज तुला जे हवं ते माग.


बापरे.. काय झालं तरी काय आहे. मधु चहाचा ट्रे घेऊन येताना बोलली.


सांगते.. सगळं सांगते तू बस आधी इथे..
ऐश्वर्या मधूचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवते.

"हे बघ चिडू नको.. मी ना काही दिवसांपूर्वी तुझी ती....म्हणजे तुझी ती डायरी.. गपचूप नेली होती आणि त्यातील तुझ्या कथा आहेत म्हणजे तुझं ते लिखाण...मी प्लब्लिश केलं... " शेवटचे तीन शब्द पटकन बोलून जात ऐश्वर्या गप्प बसते.


काय?? अगं पण का केलंस असं? ऐश्वर्या अगं काय बोलू मी आता तुला?


ऐक ना राणी.. चिडू नको ना! प्लिज


बर सोड आता झालं गेलं.. कधी आणि कुठे पोस्ट केलं आहेस?

सोशल मीडियावर आणि मधुराणी या नावाने पोस्ट केलं आहे.


ठीक आहे आणि कधी पर्यंत येईल ते वाचनात?


दोनच दिवसांत! मधु तू .. चिडली नाहीस?कारण अनिकेत रागवेल म्हणून मागच्यावेळी तू नाही बोलली होतीस.


का चिडू मी? हे बघ तू मला विचारलं असतंस तर मी नाही म्हणाले असते जे पोस्ट करणार आहेस ते काही वाईट नाही आणि अनिकेतचं बोलशील तर त्यांना जे हवं त्या गोष्टी ते करताहेत मग मी मला हवं ते का नको करू? आणि मी आईबाबांना सगळं सांगायचं ठरवलं आहे.त्यांचा मुलगा काय उद्योग करतो हे त्यांना पण कळुदे. त्रास होईल पण मी आहे त्यांना सांभाळून घ्यायला.


मधु डार्लिंग.. आय एम सो हॅपी फॉर यू डिअर. लव्ह यू.
म्हणत ऐश्वर्या मधूला मिठी मारते.


दोन दिवसांत मधूचे ब्लॉग सोशल मीडियावर येतात आणि खूप गाजतात. उत्कृष्ट लिखाण आणि ओघवती भाषा शैली.. सगळ्यांना तिच्या कथा फार भावल्या. तिचे ब्लॉग खूप व्हायरल होत होते. मधु खुश होती. स्वतःच आयुष्य वाचून तिला भरून आलं होतं.


तिने गावी सासूबाईंना फोन केला आणि भेटायचं असल्याचं सांगितलं. थोडं शेतीचं काम असल्याने आठ दिवसांत येऊ अस सांगून जुजबी बोलणं करून मधूने फोन ठेवला.


मधूचे स्टेट्स पाहून आणि त्या कथा पाहून अनिकेत भयंकर चिडला.

हे अति होतंय मधु! तुला सांगितलं होतं सोशल मीडिया यूज करायचा नाही तरी तू तेच केलंस! ऐश्वर्याच्या नादाला जाऊन माझ्या शब्दाच्या विरोधात जायची तुझी हिम्मत कशी झाली?


झालं तुमचं? आणि हे सगळं मला विचारणारे तुम्ही कोण? मी काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही नाही हं मला सांगायचं; माझं मी बघेन आणि कुणाशी मैत्री करायची कोण चांगलं कोण वाईट हे मी ठरवणार तुम्ही नाही.


जास्त बोलतेस मधु..


आता कुठे बोलायला शिकले मी, थँक्स टू ऐश्वर्या...या सगळ्यात तिनेच मला मदत केली. स्वतःसाठी उभं राहायला शिकवलं,लढायला शिकवलं,स्वाभिमान आणि अभिमान शिकवला. अरे हो आईबाबांना बोलावलं आहे मी. गावी शेतीची कामे आहेत म्हणून आठ दिवसांनी येतील. तुमचे सगळे उद्योग त्यांना सांगणार आहे आणि लवकरचं या नात्यातून मोकळी होणार आहे. नको त्या नात्याचं ओझं वाहण्यात काय अर्थ आहे.


मधु.. त्यांना का पण? त्यांना मी सांगेन वेळ आली की.
अनिकेतचा आवाज जरा वरमला होता.


तुम्ही सांगण्याची योग्य वेळ कधीच येणार नाही आणि मला या नात्यात जबरदस्ती राहण्यात काही अर्थ नाही. पैशांसाठी तुम्ही आईबाबांच्या भावनांचा पण खेळ करून ठेवला आहे.


मधु.. प्लिज नको सांगू.. तुला हवं ते कर मी नाही रोखणार पण त्यांना सांगू नको प्लिज.. अनिकेत रिक्वेस्ट करत बोलला.

मला रोखणारे तुम्ही कोण? हा विषय मला वाढवायचा नाही. या आठवड्यात सगळा विषय संपवून टाकायचा आहे मला. एवढं बोलूनचं मधु तिच्या खोलीत निघून जाते.

अनिकेत डोक्याला हात लावून विचार करत बसतो.

आठ दिवसांनी आईबाबा येतात.


क्रमशः


श्रावणी लोखंडे
जिल्हा - पालघर

🎭 Series Post

View all