Feb 24, 2024
वैचारिक

बालपणीचा काळ सुखाचा

Read Later
बालपणीचा काळ सुखाचालहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा।।

तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या या ओळी आपल्याला आठवतात जेव्हा आपण संसाराच्या जबाबदाऱ्यांनी त्रस्त असतो आणि विशेषतः जेव्हा बालपणीचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि आठवतात बालपणीचे दिवस!लहानपणीच्या आठवणी!
मगं वाटते लहान होतो ते चं किती छान होतं...

गेले ते दिवस, आणि राहिल्या त्या आठवणी...
बालपण कधी संपलेचं नसते तर ?बालपणातील जगण्याची संधी पुन्हा मिळाली तर ?या विचारांबरोबर दृष्टीपटलामागे पुसट झालेले बालपणाच्या आठवणी स्पष्ट दिसू लागतात.
खरोखरच बालपण हे अत्यंत निरागस,मोह-माया,राग,लोभ इत्यादींपासून दूर,स्वच्छंदी जीवन.
एका लेखकाने बालपणाचे किती छान वर्णन केले आहे.
\"बालपण म्हणजे गोल मोहक गिरक्या!बालपण म्हणजे उंच उंच लाटा! बालपण म्हणजे स्फटिकासारखे शुभ्र धवल रंग!\"
खरचं बालपण किती सुखाचं असतं,दुःख, चिंता,जबाबदारी यांचा संबंध ही आलेला नसतो.आपण आणि आपलं विश्व .निःस्वार्थ ,निष्पाप स्वच्छंदी फुलपाखरासारखं जगणं म्हणजे बालपण...परींच्या दुनियेची स्वप्न पाहणारं,इसापनीती,पंचतंत्र, चांदोबा या कथांच्या विश्वात रमणार,बागुलबुवा ची भीती बाळगणारं ,मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारं, मोठ्यांचे अनुकरण करणारं,छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणारं,मनासारखं न झाल्यास जोरजोरात रडणारं,हवं ते मिळाल्यास खुदकन हसणारं...
बाल्यावस्था म्हणजे जीवन ग्रंथाच सोनेरी पान!बालपणात आईचे वात्सल्य, वडिलांचे प्रेम,आजी-आजोबा ,नातेवाईकांकडून होणारे लाड,सर्वांकडून केले जाणारे कौतुक या सर्व गोष्टींचा आनंद काही औरचं!
खरचं प्रत्येकाच्या आयुष्यातील \"मर्मबंधातील ठेव\" म्हणजे बालपण ,बालपण म्हणजे गोड आठवणींचा ठेवा!
मात्र हे बालपण कधी संपते ते कळतचं नाही. जसजसे वय वाढते तसतसे चिंता ,जबाबदाऱ्या वाढत जातात.

जया अंगी मोठेपण! तया यातना कठीण!!

वाढत्या वयाबरोबर समस्या ही वाढत जातात. कार्य क्षेत्र वाढत जाते, नोकरी,व्यवसाय, पैसा,प्रसिद्धी यात गुंतुन जातो.निखळ आनंदाला पारखे होत जातो.
मोठे पणी असणाऱ्या जबाबदाऱ्या यामुळे बालपणीच्या कोमल फुलांचे मोठेपणी निर्माल्य होऊन जाते.मात्र त्या फुलांचा सुगंध आठवणींच्या रुपात मनाच्या कोपऱ्यात दडलेला असतो आणि बालपणाचे सवंगडी भेटल्यावर हा सुंगध नव्याने दरवळावा असे वाटते.
लहानपणीच्या खोड्या,धम्माल, लाड ,कौतुक, खेळ,उनाडपणा ,गंमतीजंमती आपणास विचारांचे पंख लावुन अलगद भूतकाळात नेऊन सोडतात....
मोठे झाल्यावर आपल्याला जगाची ओळख पटू लागते,अनुभवांची शिदोरी असते,परिपक्व विचार असतात ,सुखसोयी पायाशी लोळण घालत असतात.पण पाहिजे असलेला आनंद कोठेतरी शोधत असतो आणि तेव्हा प्रत्येकाला बालपणीचा काळ सुखाचा वाटतो.

असे असले तरी काळ थांबवणे आपल्या हातात नसते आणि परत मागील काळात जाणेही शक्य नसते.आयुष्य हे पुढे जगायचे असते.
खरंतर प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते पण आपण ते कधी शोधत नसतो.जरी वयाने मोठे झालो तरी बाल्यातील निरागस वृत्ती ही आयुष्यभर जपली तर...एक कोवळ,लवचिक, प्रामाणिक मन जपलं तर...
केशवसुतांच्या शब्दांत सांगायचे तर \"प्रौढत्वी निज शैशवास जपणे\"

वय,जबाबदाऱ्या विसरून मनाने पुन्हा लहान होऊन बालपणाचा आनंद घेतला तर.....
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//