लहानपणीचे स्वप्न

म्हातारपणी जगण्याची नवी आशा देणारे लहानपणीचे स्वप्न


नुकत्याच पन्नाशीत पदार्पण केलेल्या सारिकाला आजकाल घर खाऊ लागलं होतं. कळत नव्हतं तिच्यासोबत काय होत होतं ते?

तिचं मन छोट्या छोट्या गोष्टींनी उदास व्हायचं. तिला समजायचं असं उदास होणं बरोबर नाही. म्हणून ती आतल्या आत कुढत बसत होती. कारण बोलायला घरात कुणी टिकतच नव्हतं. सून मुलगा दुसऱ्या शहरात कामाला, मुलगी सासरी आणि नवरा त्याच्या नोकरीत मग्न. रात्री सोबत जेवायचं मग इकडल्या तिकडल्या गप्पा मारून झोपायचं.

आपल्या जीवनात आता काहीच नावीन्य उरलं नाही असंच तिला वाटत होतं. पण तेच तेच रटाळ जीवन जगून तिला कंटाळाही आला होता.

"आपण फाशी घेऊन घ्यावी का?" कधीकधी छताला फिरणाऱ्या पंख्याला बघून उगाच तिच्या मनात येई अन ती तशीच त्याला बघत बसे. असं नाही कि मुलं नवरा तिला विचारत नव्हते. त्यांना फक्त तिच्या मनात उठत असलेल्या वादळाचा अंदाज नव्हता. त्या खोलीत कोणालाच शिरता आलं नव्हतं.

अशातच डिसेंबर महिना आला. मुलगा, सून घरी आली. थर्टी फर्स्ट, न्यु इयरच्या पार्टीच्या चर्चा होऊ लागल्या. पण सारिकाचं कशातच चित्त लागेना. त्यांना असं बघून सून, मेघाला बरं वाटलं नाही. सारिकाला एकटेपणाने ग्रासलंय हे तिने हेरलं. मेघा सारिकाला रोज संध्याकाळी बळजबरीने तर कधी तिला घरात बोर होतंय असा बहाणा करून पार्कमधे फिरायला घेऊन जाऊ लागली. तिथे तिने सारिकाची ओळख एका "वरिष्ठ नागरिक" समूहासोबत करून दिली. हळूहळू त्यांच्यासोबत सारिका रमू लागली.

त्या ग्रुपसोबत विविध कार्यक्रमात भाग घेऊ लागली. गाण्याच्या भेंड्या, मॉर्निंग वॉल्क, इव्हीनिंग वॉल्क, डबेपार्टी होऊ लागली.

इतकंच काय सारिका आता नवऱ्यालाही वेळ मिळेल तेव्हा सोबत घेऊन जाऊ लागली. एकतीस डिसेंबरला त्यांनीही मस्त डिनर पार्टी केली. तसेच नवीन वर्षाच्या निमित्ताने या जन्मावर सतत प्रेम करायचं असा संकल्पही सारिकाने केला.

सून मेघाने नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला सारिकाला फोन केला, "आतापर्यंत आपल्या कुटुंबाबद्दल, मुलांबद्दल खूप स्वप्न बघितली सासूबाई. आता स्वतःसाठी बघा एखादं स्वप्न."

"हो मलाही आता तसंच काहीसं वाटतंय. पण या वयात कोणतं नवीन स्वप्न बघू आणि ते पूर्ण करायला धडपडू तेच कळत नाही आहे." सारिका बोलली.

"अहो सासूबाई आता लहान होताय असं समजा आणि आठवा बालपणीचं एखादं अधुरं स्वप्न. जसं मला लहानपणी पायलट व्हायचं होतं." मेघाने सांगितलं.

"हा म्हणूनच ती स्कुटी हवेत उडवल्यासारखी पळवतेस." सारिका हसून म्हणाली.

"सासूबाई विषय तुमचा सुरु आहे." मेघा लटका राग दाखवून म्हणाली.

"ह्म्म्म, मला ना घोडसवारी करायला, तलवारबाजी आणि कराटे खेळायला शिकायचं होतं." सारिकाने मन मोकळं केलं.

"चला मग स्वप्नपूर्तीकडे एक पाऊल उचला. मी आपल्या घराच्या जवळपास असलेल्या कराटे क्लासचा पत्ता देते काढून आणि तलवारबाजी व घोडसवारीचंही बघते काय करता येईल ते." मेघा म्हणाली तशी सारिका स्वतःला घोड्यावर बसून तलवारबाजी करण्याच्या स्वप्नात रममाण झाली.