बाल गुन्हेगारी ( कथा १- भाग १) सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

लहान मुलाच्या हातून होणाऱ्या चुका
बाल गुन्हेगारी
(कथा १,- भाग१) सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे


डॉ. शुभदा कुलकर्णी, (एम. बी. बी. एस., एम. डी. , पी. एच. डी. चाईल्ड सायकाॅलाॅजी) पाटी वाचून निखिल दवाखान्यात शिरला. समोरच रिसेप्शनवर जाऊन आभाचा नंबर लावला. पैसे भरले. " किती वाजेपर्यंत येईल नंबर? म्हणजे मुलगी खूप लहान आहे सारखी रडते म्हणून विचारले. " निखिल ने विचारले.
" तस सांगता येत नाही. तुमचा अठरावा नंबर आहे. आणि मॅडम अकरा वाजता येतात. म्हणजे दीड तरी वाजू शकतो. पण आधला मधला एखादा आला नसेल तर लवकर ही येईल. " रिसेप्शनीस्ट म्हणाली.
" मग मी फोन करून आलो तर चालेल का? म्हणजे तिच्या रडण्याचा इथे कोणाला त्रास होणार नाही. " निखिल.
" तुम्ही बरोबर साडेबारा वाजता या. मी तुम्हांला नंबर देते. तुम्ही उशीरा आलात तर मॅडम थांबणार नाहीत. त्या वेळेवर येतात." रिसेप्शनीस्ट. मुलीचे पूर्ण नाव सांगा. वय आणि इथे खाली सही करा. "

"आभा निखिल महाजन, वय सात वर्ष. " निखिलने माहिती सांगितली आणि सही करून मॅडमचे लावलेले फोटो आणि सर्टिफिकेट बघायला थोड्या दूर असलेल्या भिंतीकडे गेला. फोटो पाहून तो आश्चर्यचकित झाला. " शुभी " त्याच्या तोंडाचा आ वासला गेला. ही शुभी आहे ह्यावर त्याचा विश्वासच बसायला तयार होईना, इतका बदल तिच्यात झालेला दिसत होता. काळेभोर गुढग्यापर्यंत केसाची लांब वेणी, गहूवर्णी, गोब-या गालांची शुभी पटकन त्याच्या डोळ्यासमोर आली. आताच्या फोटोत एकदम बाॅयकट, गाल बसलेले, कशीतरीच दिसत होती. एकदम त्याला फिल झाले 'एकेकाळी ह्याच शुभावर आपण जीव ओवाळून टाकत होतो' आणि इतक्यात नित्याचा फोन वाजला " हॅलो, हं लावलाय नंबर, घरीच येतो आहे. " निन्या म्हणजे निहीरा निखिलची बायको, निखिल तिला प्रेमाने निन्या म्हणायचा. निखिल घरी गेला आणि जेवण वगैरे आवरून निन्या आणि आभाला घेऊन बरोबर साडेबारा वाजता दवाखान्यात पोचला. गेल्या गेल्या रिसेप्शनीस्ट काऊंटर वर जाऊन विचारले, " किती वाजता येईल नंबर? "
" आभा महाजन ना, अर्धा तास लागेल. निखिल निन्या आणि आभा जवळ जाऊन बसला.
" नक्की चांगल्या आहेत ना रे डॉ. बाई. आपली आभा बरी होईल ना? " निहीरा विचारत होती.
" ऐकले तरी आहे खूप. फार औषधे देत नाहीत. कौन्सिलींगवर भर असतो. आपण विश्वास ठेवू आणि पुढे जाऊ. तू नको काळजी करू. " निखिलने तिची समजूत घातली.

चाळीस मिनिटांनी आभाचा नंबर आला. निखिल निहीरा आभा आत गेले. " नमस्कार, मी निखिल, ही माझी बायको निहीरा, आणि ही मुलगी आभा. " निखिलने आपली ओळख करून दिली.
" ओळखले मी तुला निखिल. बोल. काय प्रश्न आहे? थांब त्याआधी मी ह्या बाहुलीशी ओळख करून घेते. कशी आहे आमची डाॅल? हं, मी चाॅकलेट देऊ तुला? " डॉ.शुभानी विचारले पण आभा मान खाली घालून आईच्या आणखी कुशीत शिरली.
" अग ही मावशी आहे बाळा, असे नाही करायचे, बोल हं मावशीची. " निहीरा म्हणाली. खाली मान घालूनच आभाने चाॅकलेट घेतले.
" निखिल मी बोलते निहाराशी. तू आभाला घेऊन बाहेर बसशील? " डॉ. शुभांगी निखिलला विनंती केली.

" हं, बोल. काय प्राॅब्लेम आहे? " डॉ.
" दोन तीन महिने झाले नक्की काय झाले ते आभा सांगत नाही. माझी बहीण आणि तिचा तेरा वर्षांचा मुलगा आमच्या घरी आले होते. ते आले तेव्हा आभा खूप खुश होती. ती जायच्या दिवशी मी आणि माझी बहीण बाहेर शाॅपिंगला गेलो होतो. निखिल कामावर गेला होता. बहिणीचा मुलगा आणि आभा दोघेच घरी होते. रात्री बहीण परत गेली. तेव्हा पण आभा ठीक होती. पण दुसऱ्या दिवशीपासून आभा सारखी रडत असते. काय झाले विचारले तर सांगत नाही. गोड बोलून, खुबीने काढून घेण्याचाही प्रयत्न केला पण नाही सांगत काही. हल्ली शाळेत जायला पण नाही म्हणते. काही वेळा निखिलकडे रहायला ही नाही म्हणते. सतत मला चिकटून असते. " निहीरा सांगत होती.

" तिने काही भितीदायक पाहिले आहे का? तिच्या मनात कशाची भिती बसली आहे का? तुझ्या बहिणीच्या मुलाकडे काही चौकशी केली का? " डाॅ. शुभानी विचारले.
" नाही तसे काही मनात आले नाही. पण मी बोलून घेईन त्याच्याशी. " निहीरा.
" थांब आधी आपण तिच्याशी बोलू. मी तिला चेक करते. मग तुला सांगते. " डॉ.शुभा.

निखिल आणि आभाला तिने आत बोलावले. जवळपास अर्धा तास ती त्या तिघांशी मुद्दाम बोलत होती. हळूहळू आभा त्यांच्यात थोडी थोडी बोलायला लागली. मोकळी झाली. मग डॉ. शुभांगी तपासायला आतल्या खोलीत घेतले. बरोबर निहीरा पण होती. स्टेथोस्कोप लावून मग हाताने पोट तपासले. आणि मग तिची अधिक तपासणी करणार तोच आभा जोरात रडायला लागली. तशी डॉ.शुभानी तपासणी थांबवली.
" बरं, असू दे. नाही तपासत. तुला दुखते का पोटात? " डॉ. नी आभाला विचारले.
" नाही, दुखत नाही. खूप भिती वाटते. " आभा रडत रडत म्हणाली आणि पटकन परत आईला चिकटली.
" आत्ता एवढेच पुरे. मला वाटते त्या दिवशी किंवा केव्हातरी काही चुकीचे घडले असणार. त्यामुळे ती फार घाबरली आहे. तिला सांगायचे आहे पण ती सांगू शकत नाही. मी बघते. तुम्ही अजून एकदा परत तिला घेऊन येऊ शकाल का? शक्यतो दुपारी चार वाजता या म्हणजे मी तिला जास्त वेळ देऊ शकेन. "
डॉ. शुभा, निखिल आणि निहीरा दोघांशी बोलल्या. पुढच्या आठवड्यात गुरुवारी भेटायचे ठरले.

घरी आल्यावर निखिल आणि निहीरा दोघेही खूप रडले. " काय झाले असेल माझ्या परीला? कुणी काय केले असेल? " निखिल रडत रडत म्हणत होता. निहीराने बहिणीला फोन केला, पण तिच्या मुलाविषयी तिच्याशी कसे बोलायचे ते ही फोनवर म्हणून ते बोलणे ही राहिले. नुसते विचार आणि विचार करून निखिल आणि निहीरा दोघांचेही डोके चक्रावून गेले. आभा शाळेत जायला घाबरत होती. तिच्या बरोबर नेहमी खेळणा-या मुलांबरोबर खेळत नव्हती. सारखी निहीराच्या मागे मागे करत होती.

गुरुवारी परत निखिल निहीरा आभाला घेऊन डॉ. शुभाकडे गेले. तिचा नंबर आल्यावर शुभाने आभाला एक छान बाहुली गिफ्ट दिली आणि चाॅकलेट ही दिले. मग शुभाने तिच्याबरोबर छान गप्पा मारल्या. तिच्याबरोबर हसी मजाक करता करता तिला बर्याच गोष्टी समजल्या. " तिचा मावस भाऊ तिला आवडत नाही. तो खूपच वाईट आहे." असे तिने शुभाला सांगितले. आणि काय घडले असावे याचा तिने अंदाज लावला. आभाला कन्सल्टिंग रूमच्या बाहेर एका नर्स बरोबर पाठवून ती निखिल निहीरा बरोबर बोलू लागली. तिने निहीराला विचारले, " आभाचा मावस भाऊ किती वर्षांचा आहे? '
"तेरा वर्षाचा आहे. पण त्याने काही केले का? " निहीरा.
" ते आत्ताच नाही म्हणू शकत आपण. पण आधी कधी तुम्ही त्या दोघांना एकटेच सोडून गेला होता का? " डॉ. शुभानी विचारले.
" नाही, तशी कधी वेळच आली नाही. मी कायम तिच्या बरोबर असते. " निहीरा.
"मग तिने कधी तिच्या मावस भाऊ विषयी तुमच्याकडे तक्रार नाही केली? म्हणजे तो तिला काही त्रास देत होता का?" डॉ. शुभा.
" नाही, कधीच नाही. दोघे छान खेळायचे. अगदी एकमेकांना सोडून जायला तयार नसत. पण तुम्ही असे का विचारता आहात डॉ? " निहीरा.

" ऐक निहीरा, आपण ठामपणे काही निष्कर्ष काढू शकत नाही. पण आभा म्हणत होती, " तिचा मावस भाऊ खूप वाईट आहे. तिला अजिबात आवडत नाही. आपण आधी तुझ्या बहिणीच्या मुलाशी बोलू. पण तुम्ही त्याच्याशी बोलून त्याला रागवू नका, नाहीतर घाबरून तो काहीच बोलणार नाही. ह्या गोष्टींचा रागावून उलगडा होणार नाही. त्याला गोड बोलून बोलते करावे लागेल. जमलं तर त्याला माझ्याकडे घेऊन या. आणि निखिल काळजी करू नकोस. ती नक्की बरी होईल. फक्त तिच्या मनातील भिती काढायला हवी. त्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. " डॉ. शुभा म्हणाल्या.
"पण मी फोन करून ताईशी बोलू का? " निखिल म्हणाला. माझ्याकडे
"खरतरं नको, किती झाले तरी आई आहे, ती मुलावर रागावेल, त्याला मारले, मग तो जास्त घाबरून जाईल. त्याला आण, तो मुलगा ही लहान आहे. त्यानेही जाणून बुजून काही केले नसेल. ह्या बाबतीत त्यालाही ज्ञान नसेल. तेव्हा ती काळजी ही घ्यायलाच हवी. हो ना? " डॉ. शुभाने निखिलला समजावले.

आभाला घेऊन निखिल आणि निहीरा घरी गेले. आता त्यांच्या इतकी तरी समजले होते की आभाला कशाला तरी घाबरली आहे. आता तिची भिती घालवण्यासाठी योग्य प्रयत्न केले जातील. आभाला झोपवल्यानंतर निहीरा ने आपल्या मोठ्या बहिणीला फोन केला आणि तिला तिच्या मुलाला आकाशला इकडे तिच्या घरी घेऊन यायला सांगितले. तिच्या बहिणीने तिला खूप विचारले पण निहीरा आपल्या बोलण्यावर ठाम राहिली. तिने कुठलेच कारण तिला सांगितले नाही, पण काही झाले तरी पुढच्या आठवड्यात आकाशला घेऊन येच असे तिने बहिणीला सांगितले. आता निखिल आणि निहीरा तिची बहीण आकाशला घेऊन कधी येते याची वाट पाहू लागले.

क्रमशः


सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


🎭 Series Post

View all