छत्रपतींचा शिष्य

.
जैतपूरच्या किल्ल्याला महंमद बंगशाचा वेढा पडला होता. दुपारचा प्रहर होता. गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस होता. राजकुमारी मस्तानी हिने राजा छत्रसालच्या महालात प्रवेश केला. तिचे सौंदर्य काय वर्णावे ? पान खाल्ले की गळा लाल होत. जितकी सौंदर्यवती , लावण्यवती होती तितकीच शूर , धाडसी , शहाणी आणि मुत्सद्दी होती. तिचे मराठेशाहीवर उपकार आहेत. तिचा पुत्र समशेर बहादूर पानिपतावर वीरगतीला प्राप्त झाला. तिच्याच वंशावेलीतील नवाब अली बहादुर याने राणी लक्ष्मीबाईस 1857 च्या उठावात सहाय्य केले. असो. राजा छत्रसाल एका तलवारीची पूजा करण्यात मग्न होते.

" पितामहाराज , तुम्ही बोलावले ?" राजकुमारी मस्तानी म्हणाली.

" होय. एक खलिता लिहायचा आहे. आमची इच्छा होती की तो खलिता तुम्ही स्वतः लिहावा. " महाराज छत्रसाल म्हणाले.

" आपली इच्छा तोच आमच्यासाठी आदेश. परंतु आज अचानक या तलवारीची पूजा कशासाठी ?" राजकुमारी मस्तानीने विचारले.

" पुत्री , ही तलवार एका थोर युगपुरुषाने आम्हाला दिली होती. आज गुरुपौर्णिमा आहे. म्हणून गुरूची आठवण म्हणून तलवारीची पूजा करत आहे. " महाराज छत्रसाल म्हणाले.

" कोण होता तो युगपुरुष ?" राजकुमारी मस्तानीने विचारले.

महाराज छत्रसाल कथा सांगू लागले.

***

कृष्णा नदीच्या काठावर महाराजांची छावणी पडली होती. राजा छत्रसाल तेव्हा 20-22 वर्षांचे होते. सोबत गोरेलाल तिवारी हे सहकारी होते.

" गोरेलाल , आम्ही जे करतोय ते योग्य आहे ना ?" महाराज छत्रसाल म्हणाले.

" समस्त हिंदुस्थानात अंधार पडलेला असताना हा एकमेव पुरुष प्रकाशकिरण घेऊन आलाय. तुम्ही निराश होणार नाही. " सहकारी गोरेलाल म्हणाला.

छत्रपती शिवाजी महाराजांकडे निरोप गेला. वीर राजा चंपतराय बुंदेला यांचा पुत्र भेटायला आलाय हे ऐकून महाराजांना आनंद झाला. त्यांनी परवानगी दिली. छत्रसाल छावणीत येताच महाराजांचे ते तेजस्वी रूप डोळ्यात साठवत राहिले. त्यांनी आदराने मुजरा केला. सोबत गोरेलाल तिवारी हेदेखील होते. महाराजांनी छत्रसालला बरोबरीच्या बैठकीवर बसवले.

" छत्रसाल भेटायला येतोय ही कल्पना हेरांनी आधीच दिली होती. आपला पराक्रम आम्हास ठाऊक नाही ऐसे न समजणे. देवगढच्या लढाईत आपण अतुलनीय शौर्य गाजवले आहे. आपण कोणती अपेक्षा धरून येणे केले आहे ?" महाराजांनी विचारले.

" अंधारात चाचपडत आहे महाराज. प्रकाश दाखवा. आलमगीर औरंगजेबाला आमच्या वडिलांनी सहाय्य केले. तरी पण आलमगीराने वडिलांना अपार छळले. शेवटी त्यांना मृत्यू प्राप्त झाला. मुघलांनी राज्य बुडवले. काही वर्षे अज्ञातवासात राहून पुन्हा हतबल होऊन मुघलांची चाकरी करावी लागली. शौर्य गाजवूनही त्याचा मोबदला भेटत नाही. हिंदू आणि तुर्कांचे कधी मिलन झाले आहे का? घुसमट होत आहे. आम्हाला पदरात घ्या. आजन्म आपली सेवा करु. " छत्रसाल हात जोडून म्हणाला.

" आपल्यासारखा छावा पदरी असेल तर आम्हाला आनंदच होईल. आपण पराक्रमही गाजवाल. पण नाव आमचेच मोठे होईल. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलुखात जाऊन तिथे स्वराज्याचा वणवा पेटवा. तिथल्या मुलुखाला स्वतंत्र करा. आई भवानी आणि ब्रजनाथ श्रीकृष्ण सदैव आपल्या पाठिशी आहेत. " महाराज उद्गारले.

एक महिना छत्रसाल महाराजांच्या पदरी राहिला. महाराजांनी छत्रसालास सर्व प्रशिक्षण दिले. राजकारण , गनिमी कावा , हेरखाते , मंत्रिमंडळ या सर्व बाबतीत अनुभवाचे धडे दिले. शेवटच्या दिवशी महाराजांनी एक भव्य तलवार छत्रसालास दिली.

" छत्रसाल , तुम्ही कर्तबगार आहात. आम्हीदेखील शून्यातून स्वराज्य निर्माण केले. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही नक्कीच नवीन स्वतंत्र राज्य निर्माण कराल. आपण सर्व या भरतभूमीचे लेकरे. समस्त भरतभूमी परकीयांच्या पाशातून मुक्त करू. कधीही मदत लागली तर आपल्या रक्षणासाठी मराठे सदैव तत्पर असतील. " महाराज म्हणाले.

पुढे छत्रसालने एक एक किल्ला जिंकत संपूर्ण बुंदेलखंड मुघलांपासून मुक्त केला. शिवरायांवर महाकाव्य लिहिणारे कवी भूषण जेव्हा बुंदेलखंडात आले तेव्हा छत्रसालाने त्यांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली. हे महाराजांबद्दल असलेल्या आदरापोटीच.

***

राजा छत्रसालने हकीकत सांगितली. त्यांचे डोळे पाणावले.

" ज्योतीने ज्योत पेटवावी आणि अवघे आसमंत उजळून निघावे तसे केले महाराजांनी. " राजकुमारी मस्तानी म्हणाली.

" अगदी योग्य बोललात. यासमयी छत्रपती शिवाजी महाराजांचा नातू छत्रपती शाहू महाराज तख्तावर विराजमान आहे. इतर रजपूत राजे मदत नाकारत असताना त्यांचाच पेशवा आपली मदत करेल. खलिता लिहायला घ्या.

जो गति भई गज ग्राह की
सो गति भई है आज
बाजी जात बुंदेल की
बाजी राखौ लाज "

©® पार्थ धवन

🎭 Series Post

View all