चेहरा-दि अननोन फेस (भाग-3)

रहस्यकथा एका मुखवट्याआडच्या चेहऱ्याची

चेहरा-दि अननोन फेस (भाग-3)

Chehara-The unknown face.

(काल्पनिक)


 

मागच्या भागात आपण पाहिलं..

लग्नाच्या वाढदिवशीसुद्धा घरी उशिरा पोहोचल्यामुळे प्रिया माझ्यावर नाराज झाली होती, पण घरच्यांना सत्यपरिस्थिती सांगितल्यावर सगळं वातावरण निवळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीसस्टेशनंमध्ये गेल्यावर मला विश्वासराव घाटगेंनी फोनवरून आपल्या पुतण्यासह त्याची बायको आणि नातू घरी आले नसल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर माझ्यासह माझे सहकारी आणि व्हाईटआर्मीचे जवान घेऊन अपघातस्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केल होत. त्यानंतर दरीत आम्हाला गाडी सापडते पण त्यात कोणीच नसत किंवा त्यातील व्यक्तींचा मागमूसही लागत नव्हता.  आता पुढे……

अपघातग्रस्त गाडीजवळ काहीच न सापडल्यामुळे पुढच्या कारवाईसाठी मला पोलीसस्टेशनला जावं लागणार होत. त्यामुळे बाकी सहकाऱ्यांना आजूबाजूचा परिसर पिंजून काढायला सांगून मी रस्सीद्वारे  घाटावर आलो. मी वरती येताच तिथे उपस्थित सर्व चॅनेल आणि वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींनी माझ्या सभोवती गराडा घातला आणि माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

असं वाटलं कि जणू कोणीतरी मधमाशीच्या पोळ्यावर दगड मारावा आणि त्यातल्या मधमाशा माझ्या सभोवती"मीच तो" असं समजून त्यांनी मला घेराव घालावा. मी त्या सर्वांना उद्देशून म्हणालो, "कृपया एकेक जण प्रश्न विचारा,म्हणजे मला तुमचा प्रश्न कळेल आणि तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळतील."

माझं हे बोलण त्यांना पटलं आणि त्यानी एकेकजणांनी प्रश्न विचारायला सुरवात केली.

पत्रकार:"साहेब अपघातग्रस्त व्यक्ती कोण आहे? त्याची ओळख पटली काय? "

मी:"अपघातस्थळी कोणतीही व्यक्ती आढळून आलेली नाही. पण आजूबाजूला शोध सुरु आहे."

पत्रकार:"तुम्हाला अपघातस्थळी पोहोचायला वेळ झाला असं आपणास वाटत नाही काय? "

मी:"हे पहा आम्हाला माहिती मिळताच आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो होतो आणि आम्ही दरीत शक्य तितक्या खाली उतरून मदतीचा प्रयत्न केला होता पण आमच्याकडे असणाऱ्या बॅटऱ्यांचा प्रकाश कमी झाल्यामुळे आम्हाला परत वरती यावं लागलं."

पत्रकार:"साहेब हा अपघात आहे कि घातपात?आपणास काय वाटत? "

मी:"हे पहा सद्यस्थितीला मी काहीच सांगू शकत नाही,तपास आणि पंचनामा सुरु आहे. लवकरच आम्ही आपणास कळवू.

असं म्हणत मी तसाच गाडीत बसलो तसे पुन्हा सगळ्यांनी घोळका करून प्रश्नांचा भडीमार केला.

मी सर्वांना उद्देशून म्हणालो, "हे बघा आमच्या हाती काही लागलं तर मी आपणांस कळवतो, तूर्तास मला पुढील कार्यवाहीसाठी जावं लागेल."

आणि मी चालकाला इशाऱ्याने गाडी हलवण्यास सांगितलं.आम्ही पोलीसस्टेशनंला पोहोचलो,आत गेल्यावर पाहिलं तर कॉन्स्टेबल शिंदे जवळ  विश्वासराव घाटगे तक्रार नोंदवत होते.

मी आत जाताच सगळे उठून उभे राहिले. मी विश्वासरावांना बसायला सांगितलं आणि मी केबिनमध्ये गेलो.

थोड्या वेळात कॉन्स्टेबल शिंदे आत आला आणि म्हणाला, साहेब मी विश्वासरावांची तक्रार नोंदवून घेतली आहे, तुम्ही एकदा नजरेखालून घाला. "

मी शिंदेला म्हणालो,"ठीक आहे.त्यांना आत पाठवून दे."

मी ती तक्रार नीट वाचल्यावर माझ्या मनात एक शंका निर्माण झाली.

दोनच मिनिटात विश्वासराव आत आलेत आणि त्यानी मला नमस्कार केला.

मी त्यांना म्हणालो,"विश्वासराव मी तक्रार वाचली आहे पण मला अजून काही शंका आहेत? "

विश्वासराव म्हणाले,"काय शंका आहेत साहेब? विचारा."

मी म्हणालो, "मला सांगा तुमचा पुतण्या राजवर्धन घाटगे,याला दारूचं व्यसन होत काय?"

विश्वासराव,"आता तुमच्यापासून काय लपवायचं साहेब? राजवर्धन खूप दारू प्यायचा.आम्ही त्याला समजवण्याचा खूपदा प्रयत्न केला,पण तो सुधारण्याऐवजी जास्तच बिघडला. त्यामुळे आम्ही त्याच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करत आलो."

मी स्पष्ट  सुरात म्हणालो, "हे बघा विश्वासराव मी स्पष्टच बोलतो, काल रात्री घाटातून खाली दरीत एक चारचाकी मोटारगाडी कोसळलेली आहे आणि त्या गाडीचं मॉडेल तूम्ही तक्रारीत लिहून दिलेल्या गाडीच मॉडेल एकच आहे."

विश्वासराव हबकून म्हणाले, "हे माझ्या देवा हे काय ऐकतोय मी, हे असं कस झालं?"

मी म्हणालो,"विश्वासराव सांभाळा स्वतःला,अजून फक्त शक्यता आहे. ती तुमचीच गाडी आहे याची अजून खात्री नाही. "

विश्वासराव घाबरून म्हणाले, "साहेब त्या गाडीत असणाऱ्या माणसांवरून कळेल कि कोणाची गाडी आहे?"

मी म्हणालो, "नाही आम्हाला गाडीत कोणीच सापडलं नाही,किंवा त्यात कोण होत कि नाही आणि त्यांचं काय झालं याबद्दल अजून काहीच माहिती मिळाली नाही."

हे ऐकल्यावर विश्वासरावांना ग्लानी आल्यासारखं झालं, मी ताबडतोब त्यांचा ढासळणारा तोल सावरला आणि कॉन्स्टेबल शिंदेला पाणी आणायला सांगितलं.

विश्वासरावांना पाणी पाजत मी म्हणालो, "सावरा स्वतःला, तुम्हीच अशी हार मानली तर कस होणार? तुम्हाला मन कठोर कराव लागेल." त्यांना आता थोडं बर वाटू लागलं.

इतक्यात कॉन्स्टेबल शिर्केचा फोन आला, तो म्हणाला,"हॅलो साहेब आम्ही सगळीकडे खूप शोध घेतला पण अजून कोणाचा मागमूस लागला नाही आणि क्रेनच्या साहाय्याने ती गाडी वरती काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत पण एवढ्या सहज ती वरती येईल असं वाटत नाही. "

मी म्हणालो, "हॅलो शिर्के, एक काम करा त्या गाडीचा चासीसनंबर काय आहे बघा आणि मला कळवा, त्यावरून कळेल ती गाडी कोणाची आहे."

शिर्के म्हणाला, "ठीक आहे साहेब.

मी कॉन्स्टेबल शिंदेला म्हणालो,"शिंदे विश्वासरावांना घरापर्यंत सोडून या. त्यांची तब्येत ठीक दिसत नाही."

यावर विश्वासराव म्हणाले, "नको नको माझा ड्राइव्हर आहे गाडीत मी जाईन त्याच्यासोबत. पण साहेब तेवढी ती गाडी कोणाची आहे हे कळताच मला फोन करून सांगा. ती गाडी आमची नसली तरच माझा जीव भांड्यात पडेल."

मी म्हणालो,"नक्कीच तुम्हाला कळवीन, चिंता करू नका." असं बोलल्यावर 

विश्वासराव खुर्चीतून उठले आणि म्हणाले,"साहेब मी येतो आता." जाताना  त्यांनी माझ्याकडे पाहून हात जोडले,मग मीही खुर्चीतून उठून त्यांना आदर दिला. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे काळजी दिसत होती.

थोडयाच वेळात घटनास्थळावरून घाटावर येऊन शिर्केने मला फोन केला.

शिर्के:"हॅलो साहेब गाडीचा  चासीसनंबर मिळाला आहे."

मी:"व्हेरी गुड शिर्के.काय नंबर आहे सांग मी लिहून घेतो?"

शिर्के:"हो साहेब घ्या,MHK997Y52PR885A घेतला काय?"

मी:"हो घेतला, मी आरटीओ ऑफिस कडून पुढील माहीती मिळवतो, तुम्ही अंधार पडू लागल्यावर तिथून निघा."

आणि मी फोन ठेवला.

त्यानंतर पुढच्याच क्षणाला मी आरटीओ ऑफिसशी संपर्क साधून माहिती घेतली.मला जी भीती होती ती खरी ठरली, अपघातग्रस्त गाडी राजवर्धन घाटगे  यांचीच होती. त्या गाडीमधून त्यांच्याबरोबर त्यांची बायको आणि त्यांचं लहानग बाळ गेलं होत असं विश्वासराव म्हणाले होते. त्यामुळे मला गहिवरून आलं. मी स्वतःला सावरून विश्वासरावांना फोन केला.

मी:"हॅलो विश्वासराव,मी सबइन्स्पेक्टर श्रीकांत पाटेकर बोलतोय. तुम्ही कुठे आहात सद्या?"

विश्वासराव:"आताच घरी पोहोचलो, बोला साहेब राजवर्धन आणि गाडीविषयी काही समजलं काय?"

थोडा दीर्घ श्वास घेत मी:"राजवर्धनबद्दल नाही पण चेस नंबरवरून आम्हाला गाडीबद्दल समजलं आहे."

अधीरपणे विश्वासराव:"काय समजलं कोणाची गाडी आहे ती?"

मी:"हे बघा विश्वासराव गाडी तुमचीच आहे आणि पुढील गोष्टींचा तपास करण्यासाठी आम्ही तुमच्या घरी येणार आहोत."

हे ऐकल्यावर पलीकडून एकदम 'धप्प' असा आवाज आला आणि कॉल कट झाला. मनात प्रश्न पडला कि,"काय झालं असेल? विश्वासरावांना धक्का तर बसला नसेल?गाडीत जर हे तिघेजण होते, तर मग त्यांचं पुढे काय झालं?गाडीत किंवा आजूबाजूला अपघातग्रस्त व्यक्तींचा कसलाच  मागमूस लागत नव्हता.मग हे प्रकरण नक्की आहे तरी काय?"

या प्रश्नांची उत्तर लवकरच शोधावी लागणार होती.

क्रमशः

©®श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर.9975288835.

(कथा आवडल्यास नावासहित शेअर करा. साहित्यचोरी हा गुन्हा आहे तरी कोणीही नावात फेरफार करून कथा फॉरवर्ड करू नये, अन्यथा नाईलाजास्तव कायदेशीर कारवाई करावी लागेल.)




 

🎭 Series Post

View all