चेहरा-दि अननोन फेस (भाग-10)

रहस्यकथा एका मुखवट्याआडच्या चेहऱ्याची

चेहरा-दि अननोन फेस (भाग-10)

Chehara=The unknown face (part-10)

मागच्या भागात आपण पाहिलं…….

राजवर्धनच्या मृत्यूनंतर अरुंधती मॅडमनी विश्वासरावांकडे सीमाच्या लग्नाचा विषय काढला पण त्यांनी आपल्या घराण्याच्या रूढी,परंपराचा दाखला देत या लग्नाला नकार दिला. पण अरुंधती मॅडमनी सीमाच्या लग्नाचा निर्धारच केला होता.

आम्हालाही राजवर्धनच्या केसमध्ये एक महत्वाचा साक्षीदार सापडला होता.

आता पुढे…….

राजवर्धनची केस आता लवकरच निकालात लागणार होती, कारण एकदा का तो साक्षीदार समोर आला कि सगळं चित्र स्पष्ट होणार होतं. म्हणून मी विश्वासरावांना सांगितलं कि,

"उद्या सगळ्यांना घरी थांबवून घ्या, आम्ही चौकशीसाठी येणार आहोत."

ते म्हणाले, "ठीक आहे साहेब, पण कसली चौकशी? आणखी काही समजल आहे काय?"

मी म्हणालो,

"ते उद्या सगळयांना कळेलच."

असं म्हणून मी फोन ठेवला.

दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे मी आणि माझे सहकारी सगळे विश्वासरावांच्या घरी पोहोचलो.

घरी सगळे लोक हजर होते, फक्त राजवर्धनची आई दिसत नव्हती.

म्हणून मी विचारलं,

"विश्वासराव संजीवनीमॅडम कुठे दिसत नाहीत?"

यावर विश्वासराव म्हणाले,

"त्यांची जरा तब्येत ठीक नाही म्हणून त्या त्यांच्या खोलीतच आहेत आणि तसही त्यांना काही बोलता येत नाही, त्यामुळे त्या असल्या नसल्या तरी सारखचं आहे."

मी म्हणालो,

"ठीक आहे, काही हरकत नाही, पण आमच्या साक्षीदाराला चालता बोलता येत."

यावर मी थोडासा हसलो.

विश्वासराव आश्चर्याने म्हणाले,

"साक्षीदार? कोण आहे साक्षीदार?"

मी म्हणालो,

"लवकरच सर्वांना समजेल."

यावर सीमा माझ्या समोर येऊन म्हणाली,

"साहेब, कोण आहे साक्षीदार?राजवर्धनबद्दल काय सांगितलं त्यानं?"

यावर अरुंधती मॅडम म्हणाल्या,

"साहेब काहीतरी बोला, कोण आहे तो साक्षीदार? कुठे आहे?"

माझ्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना हाच सुद्धा प्रश्न पडला होता, कारण हे गुपित त्यांनाही माहीत नव्हतं. एक असं गुपित जे की ज्यामुळे खरा गुन्हेगार गजाआड जाणार होता.

सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटले होते, हे पाहून मी म्हणालो,

"गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कधीना कधी पोलिसांच्या जाळ्यात नक्कीच अडकतो, त्यामुळे माणसाने कधीही कोणताही गुन्हा करताना हा विचार करायला हवा की त्याच्यापेक्षाही वरचढ कोणीतरी असू शकत."

यावर विश्वासराव म्हणाले,

"म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे साहेब? कोणी कसला गुन्हा केला आहे?"

मी म्हणालो,

"हो गुन्हा केलाय, खूप मोठा गुन्हा. आणि तो गुन्हेगार इथं उपस्थित आहे."

हे ऐकताच सगळे हबकून एकमेकांच्या तोंडाकडे  पाहू लागले.

यावर सीमा म्हणाली,

"साहेब कसला गुन्हा? आणि कोण आहे गुन्हेगार?"

मी हसतच म्हणालो,

"हा हा हा, गुन्हेगार कोण? आणि गुन्हा काय? हे त्या गुन्हेगाराला चांगलंच  माहित आहे, त्यानेच हे सगळे षडयंत्र रचलं होतं. पण शेवटी सापडलाच, आता त्याची सुटका नाही."

यावर विश्वासराव म्हणाले,

"साहेब कृपया आम्हाला समजेल असं सांगा,आम्हाला काहीच कळेनासं झालं आहे."

यावर मी म्हणालो,

"विश्वासराव सांगतो ऐका, राजवर्धनचा अपघात हा पूर्वनियोजित कट होता.

जो खूप आधीपासून  एका कुटील डोक्यात शिजत होता."

विश्वासराव म्हणाले,

"काय? पूर्वनियोजित कट? कोण आहे ती व्यक्ती?"

मी म्हणालो,

"थोड्याच वेळात सगळं स्पष्ट होईल,सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील."

सगळं वातावरण गंभीर बनलं होतं आणि एका व्यक्तीच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता, नजर सैरभैर झाली होती. मनात सुरु असलेली प्रचंड उलथापालथ चेहऱ्यावर दिसत होती.तो साक्षीदार कोण आहे आणि तो काय सांगतो याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते.

यावर सीमा म्हणाली,

"साहेब कोण आहे तो साक्षीदार? त्याला समोर तरी बोलवा. आम्हालाही पाहू ध्या."

यावर मी म्हणालो,

"हो तो समोर येईलच, फक्त काही क्षणांचा अवकाश आहे. तो जवळ आला आहे."

आणि इतक्यात त्याचा फोन माझ्या फोनवर आला आणि तो म्हणाला,

"साहेब मी आत येऊ का?"

मी म्हणालो,

"हो,इथंही सगळेजण तुम्हाला भेटण्यास आतुर आहेत."

एवढं बोलून मी फोन ठेवला.आणि सर्वांना म्हणालो,

"तुम्ही ज्याची वाट पाहत आहात तो बाहेर आला आहे, लवकरचं आत येईल."

हे ऐकताच सर्वांच्या नजरा सावध झाल्या आणि सगळेजण  एकटक दरवाजाकडे बघू लागले.

इतक्यात एक व्यक्ती समोरून हळूहळू चालत आत घरात येत होती,सगळ्यांनी नजरा त्याला न्याहाळू लागल्या.

तो कोण आहे याचा अंदाज घेऊ लागल्या. पण त्याने चेहऱ्यावर मास्क घातलेला असल्याने त्याला कोणी ओळखू शकत नव्हतं.

प्रत्येकजण अंदाज बांधत होते की हे कोण असावं?

सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव दिसत होते.

ती व्यक्ती माझ्या जवळ येऊन उभी राहिली,चेहऱ्यावरच्या मास्कमधून फक्त डोळे दिसत होते. ते डोळे एका व्यक्तीला ओळखीचे वाटत असल्याने त्याची भीतीने गाळण उडाली होती.

थोडावेळ अंदाज बांधण्यात गेल्यावर विश्वासराव म्हणाले,

"पाटेकर साहेब,कोण आहे ही व्यक्ती? आणि यांनी चेहऱ्यावर मुखवटा का घातला आहे?"

मी म्हणालो,

"हाच आहे आमचा साक्षीदार, ज्याला हे षडयंत्त्राची खडानखडा माहिती आहे. ज्याच्या जोरावर आपण राजवर्धनचा अपघात करणाऱ्या आरोपीला सर्वांसमोर आणू शकतो आणि त्याचा गुन्हा सिद्ध करू शकतो."

हे ऐकल्यावर विश्वासराव त्याच्याकडे बघतच राहिले.

यानंतर अरुंधती मॅडम म्हणाल्या,

"साहेब सगळं बरोबर आहे,पण याने आपली ओळख का लपवली आहे? हा साक्षीदार आहे तर मग मुखवट्याआड का लपला आहे? त्याला समोर येऊन आपली ओळख करून द्यावी."

मी हसतच म्हणालो,

"हाहाहा, कधीकधी काही लोकांच्या मुखवट्याआड लपलेल्या खऱ्या चेहऱ्याची ओळख जगासमोर आणण्यासाठी स्वतःलाही मुखवट्याआड लपावं लागतं."

यावर सीमा वैतागून म्हणाली,

"कसला चेहरा? कोणाचा चेहरा? कोणी लपवला? काहीतरी समजेल असं बोला साहेब. विनाकारण शब्दांचा खेळ करू नका, आधीच आमच्या घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे आम्ही वाईट परिस्थितीतुन जातं आहोत. तुम्ही त्यात आणखी भर नका घालू, जे असेल ते स्पष्ट बोला."

मी म्हणालो,

"हो मी तेच करण्यासाठी आलो आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तरं मात्र सगळ्यांनी तयार ठेवा."

मी पुढे सांगू लागलो,

"तर सर्व घाटगे कुटुंबातील सदस्यांना मला हे सांगायचं आहे की, मी सगळं बोलून झाल्यावर आपल्या ज्या काही शंका असतील त्या मला विचारा. पण त्याआधी मध्येचं कोणीही बोलायचं नाही.

सगळ्यात आधी मी हे स्पष्ट करतो की राजवर्धनचा खुन झाला आहे आणि आरोपी कोण आहे हे आम्हाला समजलं आहे. तर साक्षीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे मी सगळा घटनाक्रम आपल्यासमोर मांडत आहे.

घटना घडलेल्या दिवशी ठरल्याप्रमाणे राजवर्धन, सीमा आणि वीरेन शॉपिंगसाठी बाहेर पडले, थोडावेळ शॉपिंग केल्यानंतर राजवर्धनने सीमाला  राहिलेलं शॉपिंग करायला सांगून तिथून निघून गेला. त्याच्या मागावर असणाऱ्या माणसांनी निर्जनस्थळी त्याची गाडी अडवून त्याला बेशुद्ध करून आपल्या गाडीत टाकून गोव्याला घेऊन गेले. इकडे बाकी लोकांनी त्याची गाडी सुरु करून जोरात दरीत सोडून दिली, कारण पोलीस इकडे शोध घेण्यात व्यस्त राहुदेत आणि तोवर मृतदेह गोव्याच्या समुद्रात कुजू देत.

इकडे सीमा आणि वीरेन पार्किंगमध्ये थांबले असताना एक गाडी आली आणि त्यांना घेऊन गेली.

राजवर्धनला तिकडे गोव्याला घेऊन गेल्यावर तो अर्धवट शुद्धीत आला असताना घाटगे कुटुंबातीलच एका व्यक्तीने राजवर्धनवर बंदुकीने गोळ्या झाडल्या आणि राजवर्धन समुद्रात कोसळला."

हे ऐकताच विश्वासराव मटकन खाली बसले तोपर्यंत सीमाला चक्कर आली आणि ती सोफ्यावर कोसळली.

क्रमशः

©®श्री.सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर.9975288835

(कथा आवडली तर लाईक, कमेंट आणि नावासहित नक्की शेअर करा, पण नावात फेरफार करून फॉरवर्ड करू नका. साहित्यचोरी हा गुन्हा आहे, तसे आढळल्यास नाईलाजास्तव कायदेशीर कारवाई करावी लागेल.)

🎭 Series Post

View all