चेहरा-दि अननोन फेस (भाग-एक) [रहस्यकथा स्पर्धा]

रहस्यकथा एका मुखवट्याआडच्या चेहऱ्याची.

चेहरा-दि अननोन फेस.

Chehara-The unknown face.

(काल्पनिक)

भाग-एक.

[नमस्कार मी सेवानिवृत्त सबइन्स्पेक्टर श्रीकांत पाटेकर माझ्या कारकिर्दीतील काही अविस्मरणीय केसमधील एक रहस्यमयी केस आज आपल्या समोर घेऊन येत आहे.]

आज लग्नाचा दुसरा वाढदिवस असल्यामुळे ड्युटी थोडी लवकर संपवून मी घरी निघालोच होतो,इतक्यात पोलीस स्टेशन मधील फोन खणाणला. हवालदार प्रदीप शिर्के यांने तो उचलला आणि पलीकडील बोलणं  ऐकून मला म्हणाला,"साहेब घाटात अपघात झालाय,मोटारगाडी दरीत पडलीये. "

मी म्हणालो,"अरे बापरे,मग लवकर जाऊन पाहावं लागेल,लगेच चला गाडी काढा."

हवालदार शिर्केसह आणखी तीन शिपाई आणि बचावकार्यात लागणार आवश्यक साहित्य घेऊन आम्ही घाटाच्या दिशेने निघालो. सूर्य अस्ताला जाऊन अंधार पडत आल्यामुळे माझ्या मनात घालमेल सुरु होती,कारण बचावकार्यात अडथळा येणार होता. एवढ्या घनदाट दरीत रात्री उतरण म्हणजे साक्षात यमदेवाच्या दारावर थाप मारल्यासारखंच होत. पण आमचं ब्रीदवाक्यच आहे, "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" म्हणजेच दिवसरात्र अखंडित सेवा देणे. प्रकाशासाठी आमच्याकडे चारपाच बॅटऱ्या होत्या,पण त्यांचा निभाव कधीपर्यंत लागेल काही सांगता येत नव्हतं. या सगळ्या विचारात गर्क असताना अर्ध्या तासात आम्ही घाटात पोहोचलो.घटनास्थळी गर्दी दिसत होती, प्रत्येकजण दरीत वाकून बघत होता. वाटेवर आडवीतिडवी वाहन लावल्यामुळे अनेक वाहन घाटात थांबून राहिली होती.त्यामुळे सगळ्या घाटात ट्रॅफिक जाम झाल होत. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन मी दोन शिपायांना ती गर्दी हटवून वाहतूक सुरु करायला सांगितलं आणि मी प्रत्यक्षदर्शी व्यक्तीकडून माहिती घेऊ लागलो.

मी म्हणालो, "आम्हांला फोन करून ज्यांनी माहीती दिली त्यांनी समोर या."

एक पस्तीशीतील व्यक्ती आणि  त्याच्यापाठोपाठ एक विशीतला मुलगा आमच्या समोर आले.

ती व्यक्ती म्हणाली, "साहेब आम्हीच फोन केला होता."

मी म्हणालो, "घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होता आणि तुम्ही नेमक काय पाहिलं?"

ती व्यक्ती म्हणाली,"साहेब आम्ही दुचाकीवरून घाटाखालून वरती येत असताना समोरच्या वळणावरून वाऱ्याच्या वेगाने एक गाडी आली आणि थेट दरीत कोसळली.आम्ही दुचाकी बाजूला लावून तिकडे धाव घेतली तर गाडी दिसेनाशी झाली होती, फक्त झाडाच्या फ़ांद्या मोडल्याचा आवाज येत होता."

मी म्हणालो, "अच्छा...,गाडीला कोणी धडक वगैरे मारली किंवा गाडीतून कोणी उडी मारली अस काही घडलं काय?"

ती व्यक्ती म्हणाली,"अस काही दिसलं नाही साहेब, पण गाडी खूप वेगात होती आणि क्षणात ती दिसेनासीसुद्धा झाली."

मी म्हणालो,"ठीक आहे,पुन्हा काहीच गरज भासली तर मी आपणास बोलावून घेईन. तुमच नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक शिर्केकडे द्या."

हवालदार शिर्केनी मदतकार्यात अडथळा येईल अशा ठिकाणावरून बघ्यांची गर्दी पांगवली आणि प्रत्यक्षदर्शी कडून नाव पत्ता वगैरे लिहून घेतलं. त्यानंतर हवालदार शिर्केला मी म्हणालो,"शिर्के आपल्याला खाली उतरून पाहावं लागेल, बॅटरी आणि दोरखंड घ्या."

एव्हाना बायकोचे चार मिसकॉल येऊन पडले होते,या सगळ्या घडामोडीत तिकडे दुर्लक्ष केल होत. म्हणून तिला कॉल लावला, मी म्हणालो,"हॅलो प्रिया अग मला यायला थोडा उशीर होईल, तुम्ही जेवून घ्या."

पलीकडून प्रिया  नाराजीच्या सुरात म्हणाली, "तुमचं हे नेहमीच असं असतं, नोकरीबरोबर आपल्याला आपलं घर ही आहे याची जरातरी जाणीव असुद्या."

मी तिला समजावत म्हणालो, "अग प्रिया माझं कामच असं आहे त्याला मी काय करणार?"

प्रिया म्हणाली,"अहो इतरवेळी ठीक आहे, पण आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून तरी वेळेवर घरी यावं एवढी माझी अपेक्षा असणं चूक आहे काय?"

मी म्हणालो, "अग तुझं काहीच चूक नाही, पण मी लवकरात लवकर घरी येईन,मग करू सेलीब्रेशन."

प्रिया समजुतीच्या सुरात म्हणाली,"हम्म्म्म्म ठीक आहे, पण लवकर यायचा प्रयत्न करा."

मी म्हणालो, "हो नक्की, एवढं काम आटोपलं कि आलोच."

अस सांगून मी कॉल कट केला. अजून किती वेळ लागणार होता माहित नव्हतं पण प्रियाला खरं सांगितलं असत तर ती काळजीत पडली असती म्हणून खरं सांगू शकलो नाही. पोलिसांना वैयक्तिक आयुष्यात अशा कितीतरी आनंदाच्या क्षणांवर पाणी फेराव लागत त्याच हे जिवंत उदाहरणं.

आता आम्ही दरीत उतरणार असल्यामुळे खिशात काही साहित्य ठेऊन चालणार नव्हतं कारण ते थेट दरीत पडण्याची शक्यता होती,त्यामुळे खिशातील सर्व पैसे,महत्वाची कागदपत्रे आणि मोबाईल गाडीत ठेऊन आम्ही खाली उतरायची तयारी केली. 

कमरेला दोरखंड बांधून हवालदार शिर्के आणि एकजणासह मी स्वतः दरी उतरायला सुरवात केली,एव्हाना गर्द अंधार पडला होता,बॅटरी डोक्यावर अडकवून आम्हाला शक्य तितक्या खाली जायचं होत,कारण रात्री सगळी दरी उतरण शक्य नव्हतं आणि पहाट होईपर्यंत हातावर हात ठेवून गप्प बसून राहणं मला पटत नव्हत. सुदैवाने कदाचित एखाद्या झाडावर गाडी अडकून राहिली असेल तर आम्ही त्यांना मदत करू शकू या हेतूने आम्ही खाली उतरत होतो. काळाकुट्ट अंधार, घोंगवणारा वारा,राक्षसासारखे भासणारे ते अजस्त्र डोंगर,रातकिड्यांची किरकिर, बॅटरीच्या प्रकाशाकडे झेप घेणारे कीटक आणि मधूनच जंगलातल्या कोल्ह्यांची कोल्हेकुई,यामुळे वातावरण भयाण झालं होत. अशातच पायाखालचा एखादा ठिसूळ दगड निसटून खोल दरीत कोसळायचा आणि काळजात धस्स व्हायचं.असं जीवावर उदार होत आमची कसरत सुरु होती.एक चूक झाली तरी ती परवडणारी नव्हती कारण त्या चुकीची किंमत जीव देऊन चुकती होणार होती. त्यामुळे अत्यंत सावधपणे आमची बचावमोहीम सुरु होती.

किमान अर्धातास उलटला होता अजून खूप खाली उतरावं लागणार होत आणि आता पोटात भुकेची आग लागली होती.पण आता उपाशीपोटी आपलं कर्तव्य पार पाडाव लागणार होत. मुळात मला भूक आणि झोप कंट्रोल होत नाही पण आज काळ कसोटीचा होता, प्रसंग बाका होता. एक एक पाऊल सावधपणे ठेवत आम्ही खाली खाली उतरत होतो. आता आम्ही बरेच अंतर खाली आलो होतो पण गाडीचा किंवा त्यातील व्यक्तींचा काहीच मागमूस लागतं नव्हता.आम्ही आवाज देऊ लागलो, "कोणी आहे काय? खाली दरीत कोणी आहे काय?" अशा चारपाच आरोळ्या दिल्या तरीही कोणाचा काही प्रतिसाद नव्हता. आमच्याजवळच्या बॅटऱ्या चार्जिंग संपल्यामुळे आता मंद होत चालल्या होत्या,त्यामुळे आता अजून खाली उतरणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही परत वरती जाऊन सकाळी लवकर पुन्हा दरीत शोधमोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू वरच्या दिशेने सरकू लागलो. पोटात भुकेमुळे आग उसळली होती, हातात जास्त ताकत उरली नव्हती.अशावेळी मला अचानक आठवला तो आपला मर्द मराठी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे. कशा पद्धतीने मूठभर मावळ्यानिशी तानाजी सिंहगडचा उभा कडा चढून गेला असेल? या विचाराने माझ्यातील मावळा जागा झाला.शरीरात ताकत कमी असली तरी आता मला आपला इतिहास डोळ्यासमोर दिसत होता आणि त्यामुळे बाहू स्फुरले आणि जिद्दीच्या जोरावर सहकाऱ्यांसह मी हळूहळू वरती घाटावर परत आलो.

बघ्यांची गर्दी आता कमी झाली होती.जे थोडेफार लोक होते त्यांना पांगवून 

सर्व साहित्य गाडीत घेऊन आम्ही परत पोलिसस्टेशनकडे निघालो पण 

खाली गेलेल्या गाडीत कोणकोण असेल?त्यांचं पुढे काय झालं असेल? जंगली श्वापदांच्या तावडीतून ते वाचतील का? असे असंख्य प्रश्न मनाला भेडसावत होते.

क्रमशः 

©®श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर.9975288835.

[कथा आवडल्यास लाईक कमेंट करून नावासहित नक्की शेअर करा. साहित्यचोरी हा गुन्हा आहे, तरी नावात फेरबदल करून फॉरवर्ड केल्यास नाईलाजास्तव कायदेशीर कारवाई करावी लागेल.]

🎭 Series Post

View all