मी चाळ बोलतेय

A chawl is sharing it's golden memories.

मी चाळ बोलतेय

हो बरोबर ऐकलत. मी चाळ बोलतेय. फार फार पुर्वी एक चाळ होती असं आता म्हणावं लागेल अशा वेगात लालबागपरळमधल्याच काय तर मुंबईतल्या इतरही भागांतल्या चाळी नष्ट झाल्या. त्या जागी उंच उंच टॉवर उभे राहिले पण ते पुर्वीचे सोन्याचे दिवस,ती सोन्यासारखी माणसं अजुनही आठवतात मला. 

बैठी चाळ व माळ्यांची चाळ अशा चाळी असायच्या. मी बैठी होते. वरती कौल असायची. दोन घरांमधे पुर्वी पार्टीशनही पत्र्याचं,फुठ्ठयाचं असायचं. या खोलीत बोललेलं त्या खोलीत ऐकू जायचं. आरडेकरांच्या घरात गोडीडाळ/वरण नसलं तर आरडेकरकाकी मोठ्याने साद घालायची,"गो माई,ह्या सुहासाक पेलो घिऊन पाठवतय,तेका डाळ दी." असं हक्काचं शेजार. दिवाळीचा फराळ करायला शेजारणी प्रत्येकीकडे जमायच्या. शेजारपाळं वाटली जायची. प्रत्येक शेजारणीच्या हाताची चव चाळकऱ्यांना ठाऊक असायची. 

चाळीच्या एका बाजूला सार्वजनिक शौचालयं.होती.  इथे बाजुलाच धोबीघाट असल्याने तिथले भैयेही पोट मोकळं करायला याच शौचालयांचा वापर करायचे. प्रत्येकाची टमरेलं/तिनपाटंही नंबरने लावलेली असायची. एखाद्याचं अर्जंट असलं त्याला तेवढी सहानुभूती दाखवली जायची.

काही संडासांच्या मागच्या खिडक्यांच्या जाळ्या तुटलेल्या होत्या. एखादा मुलगा आत गेला की त्याचे मित्र पाण्याच्या बादल्या मागून जाऊन त्याच्या अंगावर ओतायचे,पण कधीतरीच हं. 

प्रत्येकाच्या घरासमोर ओटा असायचा. कामं आवरली की दुपारी कुणातरी एकीच्या ओट्यावर शेजारणींच्या गप्पा रंगायच्या. कधी रेशनवरुन आणलेले गहू,तांदूळ  पाखडले,निवडले जायचे. मुलींच्या केसातल्या उवा मारल्या जायच्या. लहान पोरं भोवरे फिरवायचे. काहीजणं टायर फिरवायचे. गोट्यांचा खेळ तर रंगात यायचा. मुली रशीऊडी खेळायच्या. मुलंमुली एकत्र डब्बा ऐसपैस,खांबखांब,लाकूडकीपाणी खेळायचे. विषाम्रुत खेळायचे. कधीकधी मुलांवरुन भांडणही व्हायची पण ती जितक्या लवकर व्हायची तितक्या लवकर निवायचीही. 

उन्हाळ्यात खाटीवर मेणकापड ठेवून त्यावर कुरडया,फेण्या,साबुदाणा चकल्या घातल्या जायच्या. सांडग्या मिरच्याही वाळवल्या जायच्या. चाळीत मनीमाऊही असायच्या. त्या वाशांवर फिरुन गस्त घालायच्या व उंदीर दिसला की त्यावर झेप घालायच्या.

जिच्याकडे जातं असेल तिच्याकडे इतर बाया आपले कुळीद भरडायला,तांदूळ दळायला घेऊन जायच्या. दोघीदोघी मिळून जातं ओढायच्या.

प्रत्येकीच्या दारासमोर छोटीसी बाग असायची. त्यात देवकेळी/कर्दळी,सोनटक्का,गुलछड,मोगरा,शेवंती अशी बरीच फुलझाडं असायची. पपई, शेवगाही असायचा. रानभेंडीचं झाड असायचं. त्याची फुलं पिवळी व आत लालसर असायची. हे झाडं सावली द्यायचं. कुणाच्या घरासमोर घुड/खुराडं असायचं कोंबड्यांचं. एका आजीची तर चुलही होती. ती वखारीतली लाकड़,करवंट्या वापरुन चुलीवर पाणी तापवे. 

चाळीच्या समोरच आताच्या दोन हॉलएवढा फरशी घातलेला सिमेंटचा चौक होता. त्यात डाव्या बाजुला चार मोऱ्या होत्या,उघड्याच. समोर साताठ नळ होते. या नळांना पाणी आलं की एकदोघे घड्याळ लावून बसायचे. प्रत्येकाने आपापल्या नंबरवर ठराविक वेळ पाणी भरायचं असायचं. 

पाणी आलं की चाळीत नुसती लगबग असायची. तांब्या,पितळेचे हंडे,बादल्यांनी तो चौक भरुन जायचा. मधल्या वाटेत दगड,धोंडे असायचे. त्यातून बायका डोक्यावर,कंबरेवर हंडे,कळशा घेऊन चालायच्या. भराभरा पाणी भरायच्या. भांडणं क्वचितच व्हायची. शिस्तीत पाणी भरलं जायचं. 

चाळीच्या डाव्या बाजूला धोबीघाट होता. त्यात वेगवेगळ्या भागात भैये आपापले कपडे धुवायचे,धोपटायचे,गरम पाणी ठेवायच्या सिमेंटच्या डोणी असायच्या. याच धोबीघाटात एका बाजूला खाटकाच दुकान होतं. दर बुधवार,शुक्रवार, रविवार ताजं ताजं मटण,कलेजी,रक्ती,वझडी/वजरी/भेजा घेण्यासाठी रांग लागायची गिर्हाईकांची. 

धोबीघाटाला लागुनच डाईंग होती व भैयांची शौचालयं होती. चाळीच्या एका टोकाला राजाभैया व इस्त्रीवाली भाभी होती. तिला एकच मुलगी होती. इस्त्रीवाली भाभी कोळशाच्या इस्त्रीने गिर्हाईकांच्या कपड्यांना कडक इस्त्री करायची. तिच्या डोक्यावर नेहमी पदर असायचा. भाभीची मुलगी सगळ्यांची लाडकी होती. ही लेक जेव्हा सासरी गेली तेव्हा सगळे चाळकरी तिला निरोप द्यायला बाहेर उभे होते. मस्त वाजतगाजत वरात जाऊ लागली आणि त्या लेकीने जी रडायला सुरवात केली..सगळी चाळ गदगदली. अम्मी मुझे ससुराल नहीं जाना है असं म्हणत मोठमोठ्याने रडत होती. 

एक असंच कुटुंब ज्यात शोभा,सविता बहिणीबहिणी रहायच्या. त्यांतल्याच एकीला म्हणे कोणीतरी भुताने झपाटलेलं. तिचं भुत काय जाईना. शेवटी एका जाणत्या बाईने तिच्या अंगात भूत आलं असताना..कसा नाय जात ता बघतय म्हणून खुटारा हातात घेतला व केरसुणीच्या मुगड्याचा प्रसाद सटासट देताच त्या मुलीचं भूत कुठच्याकुठे पळून गेलं,परत कधीच आलं नाही ते तिच्याच काय चाळीतल्या कोणाच्याही अंगात.

चाळीच्या बाजुलाच श्रीराम हिंदू हॉटेल होतं. या हॉटेलात पहाटेपहाटे गरमागरम शिरा मिळायचा. पिवळ्या रंगाचा हा शिरा हिरव्यागार पळसाच्या पानांत पार्सल मिळायचा. या पानांची एक वेगळीच भन्नाट चव यायची शिऱ्याला. या हॉटेलात बरीचजण उसळपाव खायची,जेवायची. बाजूला सलून होतं. त्यात काही माणसं फावल्या वेळात पेपर वाचत बसायची. 

शाळेच्या बससाठी वाट बघणारी मुलं सलूनसमोर पाठीला दप्तर लावून उभी रहायची. कधीकधी सलूनमधे जाऊन तिथल्या खुर्चीवर बसायची. तो पाण्याचा स्प्रे एकमेकांच्या केसांवर मारायची. समोरच्या डब्यातली पावडर पफने आपल्या गालांना लावायची.  सलोनवाले अशोककाका मुलांना कधीच रागवत नसत. त्यांच्यातलेच एक होऊन जात.

 बाजूला भाईची गादी होती. त्यात जाळीच्या भांड्यात अंडी लटकवून ठेवलेली असायची. आतासारखे ट्रे नव्हते तेव्हा अंड्यांसाठी.  काचेच्या बरण्यांमधे चणे,शेंगदाणे,लिमलेटच्या गोळ्या,विविध पक्षीप्राण्यांच्या आकाराची बिस्कीटं,पिवळ्या नळ्या/बॉबी, पेपरमिंटच्या गोळ्या ठेवलेल्या असायच्या. एका बाजूला पार्लेजीची बिस्कीटं रचलेली असायची. एका टोपलीत हिरवीगार खायची पानंही रचून ठेवलेली असायची. चिनीमातीच्या भांड्यात चुना असायचा. कातरलेली सुपारी,तंबाखूचे कप्पे असायचे. 

पेन,पेन्सिली,खोडरबरही गादीवर मिळायचे.शाईपेनच्या निब,फुल्स्केप पेपर,वह्या असं सगळं शैक्षणिक साहित्य मिळायचं. श्रीराम हिंदु हॉटेलच्याकडेला एक फुलवाला बसायचा. लांबलांब हार बनवायचा. त्याच्या पाठीला मोठं कुबड होतं. त्याच रांगेत वाण्याचं दुकान होतं जिथे सगळं वाणसामान मिळे. जाड धाग्याचा मोठी गुंडी टांगलेली असायची. पुडी बांधली की वाणी सटासट ती धाग्याने बांधायचा. 

चाळीच्या समोर लाकडाची वखार होती. मोठमोठे ओंडके असायचे तिथे. शिवाय एक गँरेज होतं तिथे दुचाकी व चारचाकीच्या दुरुस्तीसाठी. 

चाळीच्या समोर तनाळा होता. या तनाळ्यात खांब रोवलेले होते ज्यांना दोरखंड बांधलेले होते. या दोरखंडांवर भैये त्यांनी धुतलेल्या चादरी,शर्ट्स,पँटी वाळत घालायचे. चाळीतल्या बाया याच दोऱ्यांवर त्यांच्या सोलापुरी चादरी,गोधड्या वाळत घालायच्या. संध्याकाळी भैये कपडे काढून न्यायचे. तनाळा मग मुलांना खेळायला मोकळा व्हायचा. मुलं तिथे क्रिकेट, फुटबॉल खेळण्यात दंग व्हायची. बॉल कोणाच्या घरात गेला तर मुलं धुम ठोकायची. हळूहळू मागोसा घेऊन, मस्का लावून बॉल मिळवायची. दहीहंडीही याच तनाळ्यात बांधली जायची. चाळीतली मुलंच थर रचून हंडी फोडायची.

चाळीत काही मिलकामगार खानावळी होते. त्यांच्या पाळ्या असायच्या. दुपारी तीनला मिलचा भोंगा झाला की मिलकामगार यायचे. काही रात्रपाळीचे दुपारी झोपून असायचे. 

चाळीत भाजीवाले, मासेवाली,फुलवाली येत. 
शेजारणी पाजारणी मिळून फुलवालीकडून 
गावठी गुलाब, कोंबडा, माली घेत.
प्रत्येकीच्या अंबाड्यात ही व बागेतली फुलं विराजमान,
फुलदाण्याच जणू.

म्हावरेवाली कमल आपल्या या सख्यांसाठी खास 
रावसाची गाबोळी आणी. कुणाला करता येत नसेल तर रेसिपी शिकवे. तिच्या अंबाड्यात तगरीच्या कळ्यांची व चमचमत्या कागदाची चांदणी असे. ती आकडा लावून घाली. पापलेट,सुरमई, हलवा,बांगडे,मांदेली,मुशी,सौंदाळे असे बरेच ताजे मासे तिच्या टोपलीत असायचे. सोबत कोलंबी,शिंपल्या,खेकडेही असायचे. सवड असली तर कमल कोलंबी सोलुनही द्यायची.

दोन वाजता आईसकँडीवाला घंटी वाजवत येई.
सगळ्या पोरांचे कान त्या घंटीकडे. लाल, पिवळी, नारंगी आईसकँडी ऐश होती.

चार वाजता पाववाले आजोबा यायचे.
भलामोठा ट्रंक त्यांच्या डोकीवर असायचा. पांढराशुभ्र सदरा तसंच पांढरं धोतर, कपाळाला अबीर,गळ्यात तुळशीमाळ असा त्यांचा वेश असायचा. त्यांनी
पाववाले, खारीबटरवाले$$ असा आवाज दिला की 
पोरांचा ट्रंकेभोवती गलका व्हायचा. कोणतरी ट्रंकला हात लावायचं मग आजोबा डोक्यावरून ट्रंक उतरवायचे. तिच्याखालची चुंबळ हातात घ्यायचे व पेटीचं झाकण उघडायचे. लहानग्यांचे डोळे लकाकायचे. नानकटं,खारी,बटर,केक,टोस्ट..असं बरंच काही त्या ट्रंकमध्ये रचून ठेवलेलं असायचं.
कोण दहा पैसेवाली नानकटं घेई, कोण पस्तीस पैसेवाली मोठ्ठी खारी,दहा पैसेवाला  मोठ्ठा गोल बटर,तर कोण पस्तीस पैशाचा गुलाबी क्रीमवाला केक तर कोण
दिड रुपयावाला कमळाच्या नक्षीचा केक घेई. आजोबा पंढरपुरच्या वारीला गेले की त्यांचा मुलगा पेटी घेऊन येई.

कधी बांगडी वाला येई. हिरव्या रंगाच्या काचेच्या
बांगड्यांत पण किती डिझाईन. कासार बायांच्या हातात बांगड्या भरी. भांडीकुंडी करुन बायांचे हात कडक झालेले असत. बऱ्याच बांगड्या घालताना वाढवत. बायांच्या हातांना जखमा होतं, त्यातून रक्त निघे.
मग कासारदादा तिथे क्रिम लावी. बाया हाताची बोटं आवळून , डोळे गच्च मिटून कासारापुढे हात करत.
उजवा हात जरा जास्त कडक असे. बांगड्या भरुन झाल्या की कासाराच्या पाया पडीत.

गाढवीन घेऊन एक येई. छोट्या वाटीतून गाढवीणीचे दूध तो मुलांना देई. लगेच प्यायचे हा दंडक असे.
त्याला प्रत्येकाकडून दहा पैसे मिळत. एक दरवेशी भले मोठे केसाळ अस्वल घेऊन येई. द्रुष्ट लागू नये म्हणून अस्वलाचे केस छोट्या पेटीत घालून दोऱ्यात ओवून देई. हाजिमलंगवाले बाबा धुपारत घेऊन येत. त्यांच्याकडे मोरपिसाचा पंखा असे. 

महिन्यातून दोनदा गळ्यात धुराचं नळकांड अडकवून धुरवाला यायचा. लहान मुलं धुरवाल्याला फार घाबरायची. धुरवाला आला की सगळीजणं टोपांवर झाकण्या ठेवून,हातातली काम टाकून, आपापली चिल्लीपिल्ली कंबरेवर घेऊन बाहेर गँरेजजवळ जाऊन उभी रहात. पुर्ण चाळ हळुहळू त्या करड्या धुराने भरुन जाई. एक वेगळाच गंध असायचा त्या धुराला. धुरवाले गेले की सगळी आपापल्या खोलीत जात. धूर हळूहळू निघून जाई पण लादीवर रॉकेलचे थेंब रहायचे. 

कोणता सणसमारंभ असला की चाळीतली मुलं वर्गणी काढायची..तिही किती, घरटी पाचदहा रुपये. भाड्याने व्हीडीओ आणायचे त्यावर दोनतीन पिक्चर रात्रभर असायचे. 

दिवाळीत वरच्या चाळीच्या मैदानात एकत्र सार्वजनिक कार्यक्रम असायचे. स्त्रियांसाठी मेणबत्ती लावणे,पाककला, रांगोळी स्पर्धा...
सगळ्या नटूनथटून भाग घेत. पुरुषांसाठी मँरेथॉन,फँसी ड्रेस, पीठपैसा, मडके फोडी..कोण हनुमानाचे कपडे भाड्याने आणे तर कोण पुतळा बनी. लहान मुलांसाठी चमचालिंबू, कवितावाचन,निबंधलेखन,स्मरणशक्ती,संगीतखुर्ची,
कँरम,बुद्धिबळ ,भाषण स्पर्धा असायच्या. यातून मुलांचा व्यक्तिमत्व विकास होई.

तुळशीच्या लग्नात अंतरपाट, नवरा,भटजी
सगळी जय्यत तयारी असायची. तुळशीच्या डब्ब्यालाही
रंग लावायचे,नवीन कापड बांधायचे. बाशिंग,आवळा,बोरं,चिंचा नी पोरं..
भटजी मंगलाष्टका खणखणीत आवाजात म्हणायचे.
लग्न लावल्यावर ऊस,चुरमुरे,बोरांची खिरापत असायची.

चाळीतच एका आजोबांच भजनी मंडळ होतं.वाटेत सतरंजी घालून रोज त्या मंडळाचा सराव चाले.
छान देवाची गाणी कानावर पडत. मोठ्या मुलामुलींची प्रांगणात रोज संध्याकाळी कब्बडीची प्रेक्टीस असे.
थंडीत कब्बडीच्या स्पर्धा असायच्या.

होळीला मैदानात मोठी होळी पेटवत. सगळे गोल जमून एकमेकांच्या बैलाला ढोल करत. होळीतलं भाजलेलं 
खोबरं भारी लागे.जय देवा महाराजा म्हणून वरीष्ठ व्यक्ती होलिकादेवीला गाराणं घाली. रंगपंचमीला पोर शबय मागायला येत. त्यांच्यातलाच एक साडी गुंडाळून राधा बने. आयनाकाय बायना,घेतल्याशिवाय जायना
उंदरान नेली लंगोटी, उंदराची आय कवटा खाय.
किती खाय? चाळीस खाय..असं काहीसं गाणं करवंट्या वाजवत म्हणत.

परीक्षेआधी महिनाभर मोठी मुलं जवळच्या हाफकीन इन्स्टिट्यूटच्या आवारात नाईट मारायला जात. तिथेच अभ्यास करुन बरेचजणं मोठमोठ्या पदांवर पोहोचले.

कोणाचं बारसं,लग्न असलं की लाऊडस्पीकरवर गाणी लावली जात. कोणाहीकडे कार्य असुदे..अख्या चाळीत उत्साह असायचा. दिवाळीचे कंदीलही एकत्र बनवले जायचे..एकाच रंगाचे.त्यातून एकजूट दिसायची. सांताक्लॉजही बनवायचे. चाळीच्या पाठीमागे पंजाबी रहायचे. त्यांच ग्रंथसाहिबचं पठण संध्याकाळी चालू असायचं. दोऱ्यांच्या खाटीवर उन्हात बसून सरदारजी त्यांचे केस वाळवायचे. सगळ्या जातीधर्माची लोकं गुण्यागोविंदाने नांदायची. 

हळूहळू एकेकजण काही आर्थिक कारणांवरुन,काही जागेच्या कारणांवरुन चाळीतल घर विकून उपनगरात जाऊन राहू लागला मग बिल्डरांनी चाळीतल्या उर्वरित लोकांना चाळ तोडल्यावर टॉवरमधे जागा मिळाली. या टॉवरमधे रहाणारे पुर्वीचे चाळकरी अजुनही त्यांच चाळीतलं सहकाराचं जीवन जगत आहेत. 

अजुनही माझ्या काही चाळभगिनी या परिसरात आहेत. मी मात्र ते जीवन आठवांच्या पोतडीत भरुन ठेवले आहे.

-------सौ.गीता गजानन गरुड.